पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाखरांचा मेळा, माझा गोतावळा

पहाटे पहाटे, पक्ष्यांच्या  किलबिलाटाने जाग आली. क्षणभर विचार आला,खरंच किती नशीबवान आहोत आपण! होय, नशीबवानच, मुंबई सारख्या शहरात असूनही हा मंजुळ ध्वनी आपल्या कानावर पडतो आहे. लग्न करून मुलुंडला आल्यावर माझ्या घराच्या खिडकीतून नजरेस पडणाऱ्या जांभूळ, अशोक, बाजूच्या इमारतीतिल भला मोठा पिंपळ, रस्त्यावरचा सोनमोहर ही सर्व वृक्षराजी  आणि त्यावरील  पक्षीगण ही सारी मंडळी माझी आतापर्यंतची सोबती.

       आमच्या अशोकाच्या झाडावर सकाळी सकाळी, बुलबुल Bulbul Red ventedनेहमी यायचा आणि एक ओळखीची शीळ घालायचा., खरंतर ती शीळ खूप कर्णमधुर असे परंतु सुट्टीच्या दिवशी मुलांना त्यामुळे जाग यायची आणि ती वैतागायची. हा बुलबुल एसी मधून टपकणारे पाणी प्यायला तिथे येत असे .जांभळाच्या झाडावर चिमण्या ,पोपट ,साळुंक्या, कावळे आश्रयाला असायचे. या साळुंक्या  सदैव जोडीजोडीने असायच्या.कधीही एकटी साळुंकीMaina मला दिसली नाही. संस्कृतात  हिला सारिका असे म्हणतात.या साळुंक्यांचा गलकाच  फार.

शेजारच्या इमारतीतील विस्तिर्ण पिंपळाचा प्रचंड पर्णसंभार, त्याची तुलना एखाद्या सुकेशीच्या केशसंभाराशीच करता येईल. पहाटेच्या वेळी दंवाने भिजलेली  या वृक्षावरची  ही पाने छतावरच्या झुंबरातील लोलकाप्रमाणे लटकलेली दिसतात. या झाडावर मला अनेक पक्षी भेटले. चिमणी, कावळा  या सारख्या नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांबरोबरच थोडासा लाजाळू असणारा  कोकीळ ( Cuckoo) दिसला.खरंतर मला, म्हणजे माझ्या मुलाला, का कोण जाणे?  पक्षी पटकन दिसतात. खरंतर आपण लताबाईंना  गानकोकिळा म्हणतो ते चुकीचे आहे  कारण  मादी कोकिळा कधीच गात नसते, नर कोकीळ गातो. त्याला ओळखायची खूण म्हणजे त्याच्या अंगावर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असते. कावळ्याप्रमाणे रंगरूप असल्याने हे परभृत् पक्षी मोठ्या लबाडीने भोळ्या भाबड्या कावळ्याकडून आपली अंडी तर उबवून घेतातच शिवाय  त्यांच्याकरवी खुशाल आपल्या पिल्लांची बेबी सिटींग करून घेतात.

        इथे मला इतरही अनेक पक्षी दिसले. त्या सगळ्यांची नावे मला माहिती नाहीत. एकदा असेच अचानक रात्रीच्यावेळी बाजूच्या इमारतीच्या फाटकावर मुलांना घुबड दिसले, धावत येऊन  त्यांनी मला बोलावलं .मी  घुबडाला बघायला आणि त्याने गर्रकन ३६० अंशाच्या कोनामध्ये मान वळवायला एकच गाठ पडली. किती सुंदर पांढरशुभ्र  होत ते. Indian barn owl  होत ते. या पक्ष्याला पाश्चात्य देशांमध्ये ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. परंतु या पक्ष्याला शकुन-अपशकुनाच्या नावाखाली आपल्या लोकांनी का दूर ठेवले आहे, हे काही कळत नाही.

आमचा मुलुंड पूर्वचा हा परिसर तसा वृक्षराजीने नटलेला. महात्मा फुले मार्ग दुतर्फा भल्यामोठ्या वृक्षांनी जणूकाही आच्छादलेला परंतु आताशी बरीच झाडं गतप्राण झालेली आहेत. महापालिकेने नवीन झाडे येथे लावलेली आहेत, हे नशीबच. आमच्या भागात भलेमोठे देशमुख उद्यान आहे. हे मुलुंड पूर्वेची शान आहे. इथेही भरपूर वृक्षराई दिसते. या उद्यानात एक डेरेदार  वडाचे झाड आहे. या झाडावर पोपट parraot आश्रयाला असतात. संध्याकाळची पाच साडेपाचची वेळ झाली की, या भल्यामोठ्या वडाच्या झाडावरून आमच्या इमारतीतील जांभळावर थोडावेळ विसावून बाजूच्या इमारतीतील पिंपळावरून आणि कदाचित यापुढे असणाऱ्या पाम एकर्स वसाहतीत या पोपटांची भ्रमंती चाललेली असते.

काही वर्षांनी  पाम एकर्स  सोसायटीमध्ये राहण्याचा योग आला. इथेही प्रथमदर्शनी माझ्या फ्लॅटमधून दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाने माझे मन मोहरले. जे तिथे होते ते इथे ही असल्यामुळे म्हणजेच दोन्ही स्थानातील साधर्म्यामुळे की, काय माझं मन या फ्लॅटमध्येही रमून गेलं. आंब्याचे  हे झाड तसं कावळ्यांच  अधिकार क्षेत्र. आमच्याकडे फ्लॅटच्या खिडक्यांच्या पत्र्यावर हे कावळे धाडकन येऊन  बसतात. त्या आवाजाची सुरुवातीला मला भीती  वाटायची पण आता त्याचा सराव झाला आहे. हे कावळे तसे कर्कश आवाजाचे, सहसा कोणाला न आवडणारे पण नीट विचार केला तर आपले बालपण सुरू होते ते या चिऊ-काऊच्या गोष्टीने आणि आपला अंतही पिंडदानाच्यावेळी कावळा शिवल्याशिवाय होत नाही. आपल्या मराठीत आपण तीक्ष्ण नजरेच्या माणसाला कावळ्याची उपमा देतो. घरावर कावळा ओरडत असेल तर पाहुणे येणार असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांचा एक नितांत सुंदर अभंग आहे; " पैल तो गे काऊ कोकताहे , शकुन गे माये सांगताहे " यामध्ये ते विठूराया पाहुणा म्हणून येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यासाठी कावळ्याला दहीभाताची उंडी भरवणार आहेत, त्याचे  बाहू सोन्याने मढवणार आहेत .हिंदीमध्ये झूट बोले कौव्वा काटे, असे म्हणतात. संस्कृतमध्ये एका सुभाषितांमध्ये कावळ्यासारख्या जागरूक विद्यार्थ्याला आदर्श छात्र मानतात..

या सोसायटीमध्ये इमारतींची रचना ही थोडी वेगळी असल्यामुळेच की काय, कबुतरांचा इथे त्रास कमीच आहे. ही कबुतरे श्वासाचे आजार पसरवतात. यांना वेदांमध्येही निषिद्ध मानलेले आहे. ऋग्वेदातील एका ऋचेमध्ये कबुतर घरात येणे, हा अपशकुन मानलेला आहे.

    चिमण्या House sparrow मात्र  इथे भरपूर दिसतात. ही एक आश्चर्याचीच बाब आहे. या चिमण्या तशा थव्याने दिसतात. त्यातले जरासे गोल गुबगुबीत काळे करडे पट्टे  असलेले चिमणे असतात आणि थोडाश्या बारीक करड्या रंगाच्या या चिमण्या असतात. ते संशोधना अंती मला कळले. माझे संशोधन म्हणजे गुगल महाराज. आधुनिक महिलांचे सौंदर्याचे निकष  या चिमण्यादेखील पाळताना दिसतात.संध्याकाळच्या वेळेस दिवस मावळताना, या मातीत अंगाची घुसळण करतात आणि मातीत छोटासा खड्डा करतात. कदाचित मातीमध्ये अंगाची घुसळण करून त्यातून किडे बाहेर येत असतील व त्यांचा चिमण्या चट्टामट्टा उडवत असाव्यात. या चिमण्यांना  पाहिलं की लहानपणी मराठीच्या पुस्तकात असणाऱ्या आनंद यादवांच्या कथेची आठवण येते. चिमण्या आणि साप यांच्यामधील संघर्षाचा प्रसंग . लहानपणी माझे काका आम्हाला एक गोष्ट सांगायचे ,यात एक चिमणी यायची कोठारातील एकदा दाणा घ्यायची आणि भुर्रकन उडून जायची,मग दुसरी चिमणी यायची कोठारातील एक दाणा घ्यायची आणि भुर्रकन उडून जायची आणि ही न संपणारी गोष्ट ऐकून आम्ही पेंगाळून  झोपून जायचो. चिमणी कशी भुर्रकन उडते , मराठी भाषेची गंमत पहा, आता बघा ना हा भुर्रकन शब्दच, यात नादही आहे आणि दृश्यमानतादेखील आहे.  शाळेमध्ये एखादया तासाला बाई आल्या नाही की, आम्ही गप्पा मारत बसायचो. आमचा कल्ला एवढा व्हायचा  की, बाई यायच्या आणि ओरडून आम्हाला म्हणायच्या ,गप्प बसा गं चिमण्यांनो!

आमच्या जुन्या सोसायटीतून निघालेली पोपटांची वरात बागेत काही वेळ विश्रांती घेऊन पाम एकर्स पर्यंत मजल मारत असावी असे वाटते कारण संध्याकाळच्या वेळी देवळाजवळच्या उंबराच्या झाडावरून गुलमोहराच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडा पर्यंत या पोपटांची रपेट चाललेली दिसते. हे पोपट उडताना खूपच भारी दिसतात , जणूकाही एखादं हिरवकंच पान अलगद हवेमध्ये तरंगत चालले आहे असं भासते. खिडकीमध्ये पक्ष्यांना पाणी ठेवणाऱ्या एका मित्राने सांगितलं सूर्यफुलांच्या बिया ठेवल्या तर त्या खायला हे पोपट येतात ,कदाचित  आपल्या प्रमाणे हेही जिव्हालोलूप म्हणजेच चाटक्या जीभेचे असावेत.

की मला शांता शेळके यांच्या एका कवितेतल्या पुढील ओळी आठवतात,

     आंब्या वरती उतरला पोपटांचा थवा

      आले कुठून राघु बाई जाती कोण्या गावा?

इथे मला साळुंक्या  तर दिसल्याच पण  नेहमीच्या साळुंक्या पेक्षा थोड्या गडद रंगाच्या तपकिरी डोक  आणि त्यावर लव असणाऱ्या एका वेगळ्या प्रकारच्या साळुंक्याही Jungle Mainaमला दिसल्या. या साळुंक्यादेखील  जोडीने आणि गलकादेखील तोच.

आमच्या हॉलच्या खिडकीमधून दिसणाऱ्या आंब्याच्या झाडावर आणखी एक वेगळा पक्षी मी एकदा पाहिला अतिशय छोटासा पक्षी त्याची शेपटी पंख्यासारखी होती. हा पक्षी खिडकीच्या काचेवर येऊन टोच मारायचा. आपला चेहरा तो काचेवर न्याहाळत असावा. गुगल महाराजांकडे सर्च केल्यावर मला कळलं याचे नाव Fantail fly catcher हा पक्षीही कधीही एकटा नसतो शक्यतो जोडीने दिसतो.

एके दिवशी संध्याकाळी, नेहमीप्रमाणे माझ्या मुलाला पिवळ्या रंगाचे Eurasian Golden Oriel हे अतिशय सुंदर पक्षी दिसले. दोन-चार दिवसांनी संध्याकाळच्यावेळी हा पक्षी दिसतो.याचा रंग फारच आकर्षक आहे. त्याचे डोळे एखाद्या सुंदर तरुणीने केलेल्या आय मेकअप सारखे कोरीव दिसतात. याचे नाव रियल ओरियन याला मराठीमध्ये हळद्या म्हणतात असे माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले. मुंबईतील पवई तलावाच्या आजूबाजूला आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीमध्ये हा पक्षी मला दिसला.


आमच्या आंब्याच्या झाडावर एक अतिशय छोटा पक्षी आम्हाला कधी कधी दिसतो. हा छोटा म्हणजे किती छोटा असावा तर आपल्या मध्यमेच्या आकाराएवढा. परंतु याच नाव काही मला सापडले नाही. हा आकाराने लहानखुरा दिसत असला तरी ,ओरडताना मात्र त्याच्यात एवढी ताकद कोठून येते देव जाणे!

या पक्ष्यांबरोबरच दूरवर कधीकधी मला घारी मात्र दिसतातच.

इथे आढळणारा आणखी एक पक्षी म्हणजे बुलबुल Bulbul. नेहमीची ओळखीची शीळ ऐकल्यावर मला तो दिसलाच. परंतु या नेहमीच्या बुलबुलाबरोबरच आणखी एक वेगळ्या रंगाचा वेगळ्या प्रकारचा बुलबुल मला इथे दिसला. पक्ष्यांच्या यादीत मला त्याचे नाव आढळले.Bulbul whiskered

         पक्ष्यांना पाहता पाहता मला पक्षीनिरीक्षणाचा छंद जडला आहे. गर्द हिरव्या पालवी मागे लपलेला कोणतातरी पक्षी दिसावा त्याचा आवाज कानात साठवावा असं सारखं वाटत राहतं आणि  नजर सारखी भिरभिरत रहाते.



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू