पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बजरंगबली

बालकथा

                 बजरंगबली

      

      उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या.यावेळी रोहन मामाच्या गावी जाणारी नव्हता.आजीच त्यांच्याकडे राहायला येणार होती.सगळ्या बालचमूमध्ये त्याला मनसोक्त क्रिकेट खेळायला मिळणार होतं.

      अजूनतरी कुठल्या उन्हाळी क्लासला घालायचं पालकांचं ठरत नव्हतं. मुलांना कुठल्या क्लासला घालायचं हे ठरविण्यासाठी रोहनच्या घरी महिलामंडळ जमलं होतं तोपर्यत मुलांना मनाला येईल तसं खेळता येणार होतं.घरात टीव्हीवर कार्टूनची मजा , व्हिडिओ गेम्स हेसुध्दा होतंच.

      सगळ्या महिला मंडळाची चर्चा ऐकत बसलेल्या रोहनच्या आजीने जमलेल्या महिलांना एक छान कल्पना सांगितली.

        मे महीन्यात उन्हाचा तडाखा वाढला आणी मुलांचं  दुपारचं क्रिकेट खेळण बंद झालं.रोहन गावाकडे जे बैठे खेळ खेळायचा ते त्याने आपल्या सर्व बाल मित्रांना सांगितले. मग मुलांनी रोहनच्या घरातच  चौपट,पत्ते,कॅरमचे डाव मांडायला सुरूवात केली. मुल एकीकडे खेळत असतांना आजी मोठ्या गोड आवाजात श्लोक म्हणत असायची.आज ती मारुती स्तोत्र‌ म्हणत होती.

   "भीमरुपी महारूद्रा | वज्र  हनुमान मारूती |

   वनारी अंजनीसूता |रामदूता प्रभंजना |"

 

          रिंकु,विनू,चिऊ सगळ्यांना आजीचे बोल ऐकत राहावे असे वाटायचे.रिंकुने तिला विचारले,

          "आजी,आजी हे काय म्हणतात तुम्ही,?"

"काही नाही,रे बाळांनो,मारुती स्तोत्र म्हणते आहे. तुम्हाला येत का म्हणायला.?"

"नाही,...आजी शिकवा ना आम्हाला."

"रोज माझ्यामागून म्हणांव लागेल.छान म्हटलं की मी गोष्ट सांगणार,"


"आजी सांग ना आधी गोष्ट".


" हीमॅन, स्पायडर मॅन कुठलीही सांगा."


"परीची नाहीतर राजा राणीची सांगता का?


" मुलांनो ऐका रे  मी‌ तुम्हाला हनुमानाची गोष्ट सांगते".


आजी गोष्ट सांगणार ह्या आनंदाने मुलं नाचायला लागली.


"आजी, हनुमान म्हणजे बजरंगबली ना."

"बरोबर,

"आजी ती सुर्याची गोष्ट सांग"


रोहन आजीला म्हणाला.

बरं  सांगते असं  म्हणताच  मुलं आजी भोवती गोळा झाली.आजीलाही सांगायचा हुरुप आला.

"अंजनेरी पर्वतावर केसरी नावाचा धाडसी राजा राहायचा.त्याची राणी अंजनी शिवभक्त होती. त्यामुळेच तिला शंकरासारखा तेजस्वी पुत्र होतो. आपल्या मुलाचं नाव ते मारुती ठेवतात. जन्माला आल्यापासूनच तो  खूपच चपळ,साहसी असतो.एकदा त्याला आकाशात लाल,पिवळ्या रंगाचे, गोल मोठे फळ दिसते. मारूतीला वाटते तो आंबाच आहे."


"पुढं काय होतं....!?


"मारुती त्या फळाला गिळण्यासाठी त्या फळाच्या दिशेने झेप घेतो. सगळी पृथ्वी, देवलोक घाबरतात.अनर्थ टाळण्यासाठी मग इंद्र त्याच्या वज्राने मारुतीवर प्रहार करतो.तो‌ मारूतीच्या  हनुवटीवर बसतो. मारुती  मूर्च्छित होऊन परत पृथ्वीवर  येतो."


" मूर्च्छित म्हणजे काय ग!?"


"म्हणजे थोडा वेळ ग्लानीत जाणे."


"अच्छा,....


सगळ्यात छोटया रिंकू ला हे समजत नाही की ते फळ हनुमानाला का खाऊ देत नाही. ती आजीला विचारते.


"हनुमानाला ते फळ खाऊ का देत नाही.?"


"अंग ते फळ नसतंच मुळी,तो तर सुर्य असतो. सूर्या पर्यंत झेपावणारा हनुमान हा एकमेव. त्याने जर सूर्याला गिळलं असतं तर सगळी पृथ्वी, पृथ्वीवर जीवन संपून गेलं असतं. इंद्रचा  प्रहार मारुतीच्या हनूवटीवर झाल्यामुळे त्याला वज्र हनुमान नाव पडते. तेव्हापासून मारुतीला सगळे हनुमान म्हणायला लागतात."


"हनुमानाला पवनपुत्र सुध्दा म्हणतात आजी"


  "हो तर, तो वायूच्या वेगाने उडू शकतो म्हणून त्याला वायुपुत्र ,पवनपुत्र म्हणतात. हनुमान खूप शक्तिशाली होता. श्रीराम प्रभू चा भक्त होता.रामायणातली  त्याची अजून एक गोष्ट सांगते मुलांनो"


" आजी सांग लवकर,खूप भारी वाटतेय ऐकायला."


"बरका,मुलांनो रावण जेव्हा सीतामाई ला अशोकवनात कोंडून ठेवतो,तेव्हा हनुमान तिच्या सुटकेसाठी रावणाच्या दरबारात जातो.अंहकारी रावण आणि त्याचं सैन्य हनुमानाच्या शेपटीला जाळण्यासाठी तेलात भिजलेले चिंध्या म्हणजे,जूने कपडे बांधतात.जसेजसे ते चिंध्या बांधतात  शेपटी मोठी, मोठी होत जाते. त्याच्या शेपटाला कपडे बांधून सैनिक थकून जातात.  शेपटी वाढत वाढतच जाते."

       ही गंमत ऐकून सगळी मुलं हसायला लागतात.


"ऐका मुलांनो खरी गंमत तर पुढेच आहे. रावणाचे थकलेले सैनिक हनुमानाच्या शेपटाला आग लावतात. आग लावता बरोबर हनुमान उड्डाण घेतो आणि रावणाची सोन्याची लंका जाळून टाकतो.लंका जळल्यामुळे रावणाचा अहंकाराला ठेच पोहोचते. श्रीरामाचा दूत जर इतका शक्तिशाली असेल तर स्वता श्रीराम किती बलशाली असतील,याची समज देण्यासाठी हनुमान अशी योजना करतो. तेव्हापासून हनुमानाला राक्षस आणि भूत घाबरायला लागतात."

"आजी  आता मी शाळेतल्या कार्यक्रमात  बजगरंबलीच बनणार आहे."विनूने हनुमानासारखं तोंड फुगवंलं.

"हॅ...हॅ...एवढा बारीक बजरंगबली! माहीत आहे का तो केवढा मोठा होता.!?"


"मोठा नाही काही, शक्तिशाली होता.केवढा उंच,पीळदार शरीराचा....

"अरे, मुलांनो असं भांडायचं नाही, हो बजरंग बली खूप शक्तिशाली,बलवान होता.  दुष्ट पुष्ट, पिळदार शरीरयष्टीचा होता. जो नियमाने मारुती स्तोत्र म्हणतो. त्याच्यासारखा व्यायाम करतो, तोसुद्धा त्याच्यासारखा शक्तिशाली होतो.त्याच्यावर श्री रामाची कृपा दृष्टी राहते. हनुमानाची उपासना केल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना  शक्ती मिळते.मनातील भिती‌ नाहीशी होते.त्यामूळेच शरीरही निरोगी राहते.

"किती शक्तीशाली होता ग आजी तो?"


" रामरावण युद्धात  नागास्त्रामुळे लक्ष्मण बेशुध्द होतो.त्याचे प्राण वाचविण्यासाठी, हिमालयातील संजीवनी ही औषधी आणण्याची जबाबदारी हनुमान घेतो.तो जेव्हा  हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर जातो तेव्हा त्याला संजीवनी बुटी  ओळखायला येत नाही. मग काय  तो आख्खाचा आख्खा  पर्वतच उचलून आणतो.इतकच नाही तर संजीवनीच काम संपल्यानंतर पर्वाताला पुन्हा परत त्याच्या पहिल्या स्थानावर परत नेऊन ठेवतो."


"हो,आजी‌ आता आठवलं रामायण सिरीयलमध्ये एका हातात‌ पर्वत घेऊन  आकाशात मजेत उडणारा हनुमान बघितला आहे मी"


"हया गोष्टी माहीती असल्या तरी आजीने सांगितल्यामुळे पक्कया लक्षात राहतील आता."


"आजीच्या तोंडून ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे पण,"


"आता रोज श्लोक नियमीत म्हणत चला. एक श्लोक एक गोष्ट  तुम्हाला रोज सांगत जाईल."


"बजरंगबली की जय"


सगळी मुलं एकाचवेळी ओरडली.

  

         आजी आणि मुलांचा संवाद सुरु असतांनाच,मुलांच्या आयासुद्धा त्यांना‌ शोधत तिथे येऊन बसतात. नेहमी दंगामस्ती करणारी मुलं शांतपणे एका जागी बसलेली बघून सगळ्यांना आनंद आणि नवल वाटतं.

    आता उन्हाचा ताप कमी झालेला असतो.उतरतीची‌ उन्ह अंगावर घेत, बजरंगबली की जय म्हणतच मुलं मैदानी खेळ खेळायला पळतात.


सौ.भारती देव.नाशिक.













       

         

         

         


        






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू