माई सिंधुताई
❝माई सिंधुताई❞
बेशुद्धावस्थेत गोठ्यात होताना प्रसुती
तुझ्या चहूबाजूने साऱ्या गायी हंबरती
लेकुरवाळी पाहून त्यांचं काळीज तुटे अती
प्राण वाचविणाऱ्या गायीप्रती तुही कृतज्ञ अती
गायीला दिलेल्या वचनाला जागून
गो रक्षणाची आण घेऊन
मुक्या जनावरांची तू माय झालीस....
पोटच्या पोरीला सांभाळू शकली असतीस
पण बेवारस मुलांवर अन्याय झाला असता
स्वत:च्या मुलीवर माया जागृत होऊन
अनाथांचा कधी सांभाळ झाला नसता
अश्या कैक विचारांनी काळजावर दगड ठेवून
पुण्याच्या सदनी तू ममता दाखल केलीस
जन्म देऊन वाऱ्यावरी सोडलेल्या
कैक अनाथांची तू माय झालीस....
मेल्यावरती शोक अपार
हयातीत कोण्हीही विचारत नाही,
मेल्याशिवाय खरेच गं माई
येथे कोण्हीही दखल घेत नाही...
जन्मदाती आईने पाठ फिरवली असून
कित्येक निराधार वृद्ध माता पित्यांची
घास भरवणारी तू माय झालीस....
शेण काढून स्रियांची कंबरडं मोडली जायची
तरीही त्या बदल्यात मजुरी ना मिळायची
दमडाजीला मिळणारी मिळकत केली बंद
त्याच्याविरुद्ध हिंमतीने तेव्हा पुकारून बंड
अडाणी गावकऱ्यांची तू नव नेतृत्व झालीस
चारित्र्याच्या संशयाहून झिडकावणाऱ्या अन्
शरणागती आलेल्या पतीची अखेरीस तू माय झालीस...
✍️||दे|व|भा|ऊ| |उ|बा|ळे||
५ जानेवारी २०२२
मो. ९७६७१७७१४१
°°°