पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मकर सक्रांत

मकर संक्रांत

सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांत साजरी करतात.अस ज्योतिषशास्त्र सांगते. खगोलशास्त्राच्या अनुसार सूर्य जेव्हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करतो म्हणजेच दक्षिणायन मधून उत्तरायण होतो तेव्हा संक्रांत साजरी करतात.शास्त्रानुसार सूर्य जेव्हां दक्षिणायन असतो तेव्हा देवतांची रात्र असते आणि उत्तरायण होतो तेंव्हा देवतांचा दिवस सुरू असतो .म्हणजेच ६ महिने रात्र आणि ६ महिने दिवस असतो.दक्षिणायन म्हणजे
अंधाराचे प्रतीक आणि नकारात्मक समजले जाते. तर
उत्तरायण म्हणजे प्रकाशाचे पर्व आणि सकारात्मक समजले जाते. अशीही मान्यता आहे की संक्रांतीच्या दिवशी यज्ञात समर्पित केलेले द्रव्य ग्रहण करण्यासाठी देवता पृथ्वीवर येतात आणि त्याच मार्गाने पुण्यात्मा स्वर्गादि लोकात प्रवेश करतात.
सनातन मान्यता अशी आहे की सूर्यदेव याच दिवशी आपल्या पुत्राला म्हणजे शनिदेवाला भेटायला त्याच्या घरी येतात आणि त्याचा नकारात्मक प्रभाव दूर करतात.कारण सूर्याच्या प्रकाशापुढे,तेजापुढे कुठलीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना आणि दान केल्याने शनिचे दोष नाहीसे होतात.
एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की याच दिवशी भगवान विष्णूं च्या अंगठ्यातून गंगा निघाली आणि भागीरथाच्या मागोमाग जाऊन कपिल ऋषींच्या आश्रमातून समुद्रात जाऊन मिळाली.भागीरथाच्या पूर्वजांना म्हणजे महाराज सगरच्या पुत्रांना मुक्ती मिळाली होती. म्हणून या दिवशी बंगालमध्ये गंगासागर येथे कपिल ऋषींच्या आश्रमात मोठा मेळा भरतो.या दिवशी गंगासागरात स्नान करण्यासाठी लाखो लोक अजूनही जातात.
महाभारतात एक कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धानंतर पितामह भीष्म सूर्याच्या उत्तरायण होण्याची वाट पहात होते.सूर्य उत्तरायण झाल्यावर त्यांनी प्राण त्यागले होते.याचदिवशी यशोदामैय्याने श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी व्रत केले होते असाही एक उल्लेख आहे.
मकरसंक्रांतीला दान करण्याचे महत्व आहे असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे.या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यास दशसहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते.गरम कपडे,तीळ,कम्बल आणी तिळगुळाचे पदार्थ आणि खिचडी (तांदूळ, मुग आणि काळे उडद )दान केल्यास सूर्य देव आणि शनिदेव प्रसन्न होतात.त्यांची कृपा रहाते.
मकरसंक्रांति वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात-मकरसंक्रांति, तामिळनाडू आणि दक्षिण प्रांतात -पोंगल ,केरळ-मकरविलकू,कर्नाटक-एलु बिरोधु,
आसाम-बिहू,भोगली बिहू या नावाने साजरी होते.


रविराजाने संक्रमण केले
आली मकरसंक्रांत
तिळगुळ देऊनी ,गोड बोलूनी
करु या जग पादाक्रांत


सौ ऐश्वर्या डगांवकर.
इंदोर मध्यप्रदेश.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू