पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असते गरज सोबतीची

व्हॅलेंटाईन डे - निमित्त
- असते गरज सोबतीची -

सख्या, आपले नेहमी प्रमाणे कांदेपोहे खाऊन..... तुझे नी माझे लग्न जमले.लगेच आपण लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलो. पण आपला नवरा कसा असेल.... कसा वागेल याबद्दल धाकधूक वाटत होती.
पण.... पण सख्या, तू माझ्या जीवनात आलास आणि जिवनात दिवस - रात्र मनांगणात चांदणे फुलू लागले. जीवनात सुख आणि आनंद कसा शोधायचा ते तु मला शिकवलस..... समरसून जगायला तू शिकवलस.
तुझे ते धबधब्यासारखे खळाळून हसणे.... हसतांना मिस्किलपणे माझ्याकडे बघणे.....मग हळुवारपणे जवळ येऊन माझ्या गालाशी लगट करणाऱ्या बटीला दूर सारणे.सारेच मनमोहक.... तुझ्या या रांगड्या पण हळव्या रुपाकडे बघत राहावेसे वाटायचे. पण डोळे मात्र नकळत मिटून, पापणी मागे तुझे रूप साठवायचे.
संसाराच्या सुखदुःखात तू नेहमीच साथ दिलीस. माझ्यासारख्या घाबरट.... थरथरणाऱ्या वेलीला भक्कम आधार दिलास.आंधळ प्रेम न करता मला स्वावलंबी बनवलस. मला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलंस. माझ्या यशाचा सन्मान केलास. तू पुरुष असूनही समईच्या ज्योती सारखं शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारे..... तुझं ते सात्वीक प्रेम नेहमी माझ्याबरोबर असतं. जगण्याची नवीन उमेद देतं.कधी माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तू ते पापणीच्या काठावरून जिरवायतोस.
सख्या, अरे मला प्रेम करायला तूच शिकवलंस. प्रेमाची रेशमी शाल उबदार करायला देखील तूच शिकवलस.धुंदावलेल्या रेशमी बंधनात आपण नकळत बांधले गेलो.... कसं....कधी.... काही कळलंच नाही.प्राजक्तासारखा तू माझ्या आयुष्यात नेहमीच दरवळत राहिलास.
चांदण्या रात्री फिरायला नेले, तेंव्हा त्या अंबरात किती नक्षत्रे सजली होती.चंद्राच्या मिस्किल हसण्याने तारका जमिनीवर पडू लागल्या.त्या तारकांच्या धारांमधे मला तू चिंब भिजवलेस.
पहाटेच्या वेळी धुक्याच्या निरव शांततेतून समुद्राकाठी जातांना आपल्या पावलांनी ती शांतता भंग तर पाहणार नाही असे वाटायचे. पण थोड्याच वेळात सोनेरी किरणे चौफेर उधळण रवी वर यायचा.... अन् त्या समुद्रावर लाल सोनेरी रेशमी वस्त्र पसरवून समुद्राशी एकरूप व्हायचा. ते दृश्य तुझ्याबरोबरच अनिमिष नेत्रांनी पाहिले आणि मनी साठवले . असे कितीतरी सोनेरी क्षण आपण मिळून उपभोगले.
आता पर्यंत जीवनात येणाऱ्या सुखदुःखात तुझी निरपेक्ष साथ मिळाली. जीवनात तुझ्या प्रेमामुळे सप्तसूर गवसले.आता पुढच्या आयुष्यात तुझी अशीच सोबत राहू दे .....मुलं त्यांच्या संसारात रमतील.नातवंडांचेही यांचे वेगळे विश्व निर्माण होईल. तेव्हा मात्र तू मला ....अन् ....मी तुला....त्या वेळी हाती आठवणींची बकुळीची फुले ठेवून....त्याचा सुंगध घेत आपण जगायचं. आणि हो , पण आपलं वय वाढलं की आपण जेष्ठ होऊया पण म्हातारे व्हायचे नाही हं ! म्हातारे व्हायचे तर कोणाचा तरी आधार शोधावा लागतो.तसे व्हायला नको.आपण आहोत एकमेकांना.....खरेच माणसाला गरज असते ती सोबतीची ! ती शेवटपर्यंत लाभावी असेच वाटत असते सोबती शिवाय माणूस म्हणजे पानां शिवाय रुक्ष झालेला वृक्ष.....

स्मिता भलमे
9421058149
12 / 2 / 22

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू