पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी कोरोनाग्रस्त होतो तेव्हाची गोष्ट

मी कोरोनाग्रस्त होतो तेव्हाची गोष्ट...

*लेखक ~सर्जेराव कुइगडे*

दि. २१ डिसेंबर २०२१, सकाळचे ९.३० वाजलेले. दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडले. पाच सहा जणांचा एक चमु दाराबाहेर उभा होता. एका मुलीने सांगितले," शेजारच्या बिल्डिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत; खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सगळीकडे कोरोना चाचण्या करत आहोत. माझी तपासणी झाली; नंतर घरातल्या सगळ्यांची तपासणी झाली. थोड्यावेळाने माझ्या मुलाला त्यांनी बाहेर बोलावले आणि सांगितले; बाबांची टेस्ट पॉझिटिव्ह आली; बाकी सर्व निगेटिव्ह आहेत.
बलाढ्य शत्रूपासून बचाव करायचा तर शत्रूला आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही. कोरोनाची जीवघेणी साथ आल्यापासून ही नीती मी गेली दोन वर्षे अवलंबली होती. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच मी घराबाहेर पडत होतो. कुठल्याही सभा, समारंभात, अगदी जवळच्या लग्नकार्यासही जात नव्हतो. एवढी खबरदारी घेऊनही कोरोनाने मला गाठलेच कसे? हा प्रश्न माझ्यासह सर्वांनाच पडला.
प्रत्यक्षात मला सर्दी नि थोडा खोकला होता; ताप आलेला नव्हता; ऑक्सिजन पातळी ९९ इतकी होती; म्हणजे अतिशय सौम्य लक्षणे होती. मी आजारपणाला अजिबात घाबरत नाही. जीवावरचा प्रसंग असला तरी त्याचा धीराने मुकाबला करायचा; ही वृत्ती मी अंगी बाणविलेली असल्यामुळे आता कोरोना आपल्या राशीला आला आहेच; तर याच्याशी मुकाबला करून याला चारी मुंड्या चीत करायचेच; एवढे मात्र मी ठरविले.
कुणाच्याही हाकेला तत्परतेने ' ओ 'देणाऱ्या मित्रवर्य समीर बागवान यांना फोन करून त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी वाशीच्या कोविद सेंटरमध्ये भरती व्हा; असे सांगितले. समीरनी केंद्र प्रमुख डॉक्टर वसंत माने यांच्याशी संपर्क साधून पुढची सर्व व्यवस्था केली; शिवाय फोनवरून माझी डॉक्टरांशी भेटही घडविली. मला न्यायला बस आली नि मी लगोलग वाशीच्या कोविद सेंटरमध्ये भरती झालो. आता दहा दिवस माझा पत्ता वॉर्ड सी, बेड क्र. १८, वाशी कोविद सेंटर, वाशी, नवी मुंबई. हा असणार होता.
नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडकोने पूर्णतया वातानुकूलित असलेले, अतिशय उच्च दर्जाचे व कलात्मक असे भव्य प्रदर्शन व व्यापार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल, बिझिनेस सेंटर, फूड कोर्ट व प्रशस्त पार्किंग झोन अशा सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत.
कोरोना साथीचा जोर वाढल्यानंतर नवी मुंबई महा नगरपालिकेने याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वाशी कोविद सेंटर सुरू केले आहे. या कोविद रुग्णालयात १२०० बेड्स असून डायलिसिस सेंटर, पॅथालॉजिकल लॅबोरेटरी, एक्स-रे, ऑक्सिजन पुरवठा अशा सर्व आवश्यक त्या सोयी येथे युद्धपातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, या कोविद सेंटरमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, औषधे, नाष्टा, जेवण विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते.
अत्यंत संवेदनशील आणि मनमोकळ्या स्वभावाचे डॉक्टर वसंत माने हे या सेंटरचे केंद्रप्रमुख असून डॉक्टर्स , परिचारक व इतर कर्मचाऱ्यांची त्यांनी तयार केलेली टीम अतिशय विनम्र व सेवाभावी असल्याने कोरोना रुग्णांना इथे चोवीस तास तत्पर सेवा मिळते; याचा मला इथे दाखल होता क्षणी, लगोलग पडताळा आला.
आल्या आल्या चार पाच जणांच्या वैद्यकीय पथकाने माझा ताबा घेतला. एक डॉक्टर रक्ताचा नमुना घेऊन डायबिटीस चाचणी घेत होते; दुसरे पल्स रेट नि ऑक्सिजन पातळी तपासत होते, तिसरे रक्तदाब पाहात होते; पथक प्रमुख मला इतर काही आजार आहेत का? मी कोणती औषधे घेतो? ही सर्व माहिती विचारून लिहून घेत होते; मला तातडीने कोणती औषधे द्यायची याच्या सूचना देऊन झाल्यावर आम्ही तुमच्या आसपास आहोत; किंचितही काही त्रास झाला तर सांगायला अनमान करू नका असे हसत मुखाने सांगून पथक आपल्या जागी गेले.
थोड्या वेळाने चहा आला. मी बिन दुधाचा, बिन साखरेचा काळा चहा घेतो; मनात म्हटलं, हे घर नाही. काही दिवस आपल्या सवयी बाजूला ठेवायच्या. संध्याकाळी लांबच लांब पॅसेजमध्ये चकरा मारल्या. परत आलो पडून राहिलो. मनीष इथला वाॅर्डबाॅय. भारीच प्रेमळ, त्याच्याशी माझे सूर लगेच जुळले. का ते माहित नाही, पण चांगली माणसे मला नेहमीच धार्जिणी असतात.
डॉक्टरांची फेरी झाली. पुन्हा रक्तदाब, ऑक्सिजन व शर्करा पातळी , पल्स रेट वगैरे तपासण्या झाल्या. खोकल्यासाठी कफ सिरपची बाटली, रात्री घ्यायच्या गोळ्या वगैरे देऊन या औषधांबरोबर मी नेहमी घेत असलेली औषधेही चालू ठेवायची, अशा सूचना मिळाल्या. आठ वाजायला अजून थोडा अवकाश होता. मनीष जेवणाची पाकिटे वाटत वाटत शेवटी माझ्याकडे आला. जेवणाची पाकिटे असलेली प्लॅस्टिकची मोठी पिशवी त्याने कॉटवर अंथरून त्यावर जेवणाचे पाकिट ठेवले. म्हणाला, "आता आरामात जेवा, सांडले तरी बिछाना खराब होणार नाही. मनीष सर्वात शेवटी माझे पाकिट का घेऊन आला, त्याचे रहस्य हे होते. जेवण मांसाहारी होते, इथे आठवड्यातून तीन दिवस नाष्टा व जेवण मांसाहारी असते. जेवण भरपूर, म्हणजे माझ्या रोजच्या जेवणाच्या जवळ जवळ दुप्पट असल्याने, मला संपणारे नव्हते. अर्धे जेवण उरले ते टाकून द्यावे लागले. संसर्गाच्या भीतीमुळे ते आधी बाजूला काढून ठेवता येत नाही; कुणाला देताही येत नाही; याचे वाईट वाटले.
आज उत्तरायण सुरू झाले होते. आता दिवस उत्तरोत्तर मोठा होत जाणार होता. जीवनात आलेले हे कोरोनारूपी अंधाराचे सावट कमी-कमी होत जाऊन जीवनातला प्रकाश वाढेल याचे शुभ सूचन तर नव्हे हे ! असा विचार मनात येऊन गेला. सगळी औषधे घेतली व बेडवर आडवा झालो. साडेनऊच्या दरम्यान डॉक्टर रक्तदाब व ऑक्सिजन पातळी तपासून गेले. सर्दी- खोकला कमी झाला होता. लगेच झोपून गेलो. रात्री बाराच्या दरम्यान जाग आली. डासांनी चेहरा घेरला होता. डासांसोबत रात्र काढली. दुसरेदिवशी ओडोमॉस मागवून घेतला.
बावीस तारखेचा दुसरा दिवसही असाच गेला. रात्री बारा वाजता माझा मोबाईल वाजला. तेवीस तारीख लागली होती. तेवीस डिसेंबर रोजी माझा 'सत्तेपे सत्ता' म्हणजे ७७ वा वाढदिवस होता. माझ्या घरच्यांचा फोन होता.
कोविद सेंटरमध्ये रुग्णाला त्याचे कुटुंबीय भेटू शकत नाहीत; त्यामुळे माझा या वर्षीचा वाढदिवस कुटुंबियांच्या सोबत नव्हे; तर चेहऱ्यावरचे हसू लोपल्याने मरगळून पडलेल्या रुग्णांच्या सान्निध्यात व हॉस्पिटलमधल्या नर्सेसच्या हातातील ट्रे मधील रोग्यांना घाबरविणारी इंजेक्शनची सिरिंज, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी तपासणारी साधने, थर्मामीटर, चिमटे, स्टॅंडवर अडकविलेल्या सलाईनच्या बाटल्या, ऑक्सिजनच्या नळ्या, या सगळ्यांचे नकोसे वाटणारे नित्यदर्शन घडविणाऱ्या आणि स्पिरिट व फिनेलच्या वासाने संपृक्त झालेल्या त्या विशिष्ट वातावरणात, सुना सुना जाणार होता; याचा सर्वांना खेद वाटत होता.
सकाळी आठ वाजल्यापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फोन यायला सुरुवात झाली. नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलो. सुमारे ७५० कर्मचारी असलेल्या एका राज्यस्तरीय बॅंकेच्या मुख्य कार्यालयात नोकरीतील शेवटची तेरा वर्षे जनरल मॅनेजर या उच्चपदावर कार्यरत होतो; मोठा जनसंपर्क असल्याने मोबाईल सतत चालू होता.
मला कसलाही त्रास जाणवत नव्हता; सर्दी खोकलाही गायब झाला होता. आपले आजारपण हे निव्वळ सोंग झालंय, असेच मला वाटू लागले होते. परिणामी मोबाईलवर मोठ्या उल्हासाने मी शुभेच्छा स्वीकारत होतो. मित्रांशी गप्पा मारीत होतो. या आनंदी, खेळकर वातावरणाला ग्रहण लागू नये म्हणून मी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहे हे मात्र कोणाला सांगतही नव्हतो. बाराच्या दरम्यान ड्युटीवरील डॉक्टर बाई आल्या. दटावणीच्या स्वरात म्हणाल्या," सकाळ पासून पाहातेय, तुमचं मोबाईलवरचे बोलणे थांबतच नाही. तुम्ही पेशंट आहात हे विसरून गेलात काय? मोबाईल स्विचॉफ्फ करा; नाहीतर मला तो काढून घ्यावा लागेल; नाईलाजाने "आज माझा वाढदिवस आहे," हे डॉक्टरांना सांगावे लागले. तेव्हा डॉक्टर बाई हसत हसत मला शुभेच्छा देत निघून गेल्या. माझा मोबाईल दुपारी साडेतीनपर्यंत चालूच राहिला.
मोबाईल वाजणे बंद झाले. मनामध्ये थोडी उदासी दाटून आली होती. आज पहिल्यांदाच नेहमीसारखा वाढदिवस साजरा होणार नव्हता. वाढ दिवसाचे औक्षण, नातवंडासोबतचे केक कापणे हे काही आज माझ्या नशिबी नव्हते. सकाळपासून मोबाईलवरचे बोलणे चालू असल्याने थकलो होतो; म्हणून बेडवर आडवा झालो. क्षणार्धात डोळा लागला.
कुणीतरी मला हलवून जागे केले. संध्याकाळ झाली असावी. डोळे किलकिले करून पाहिले तर सगळे डॉक्टर्स, परिचारक यांनी माझ्या बेडभोवती गर्दी केले होती. सिनियर डॉक्टरांच्या हातात पुष्पगुच्छ होता. सकाळच्या डॉक्टरबाईंच्या हातात स्वहस्ते तयार केलेले चित्ताकर्षक शुभेच्छा पत्र होते. हा चमत्काराचा मला झालेला साक्षात्कार होता. "नवल वर्तले ग माई उजळला प्रकाशु ।
मनाचिया अंधाराचा होतसे विनाशु ।"
अशी माझ्या मनाची अवस्था झाली होती.
कोविद सेंटरमध्ये सर्वांनी मिळून माझा वाढदिवस अत्यंत उल्हासाने साजरा केला. काय सांगू! माझ्या जीवनातील अतिआनंदाच्या क्षणांपैकी एक क्षण मी अनुभवत होतो. डॉक्टर मंडळींकडून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. एवढ्यात केंद्र प्रमुख डॉक्टर वसंत माने यांचाही फोन आला. त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "कसलीही अडचण आल्यास मला केव्हाही फोन करा; "असे सांगितले. त्यांना बहुधा समीर बागवान यांच्याकडून माझ्या वाढदिवसाचे वर्तमान कळाले असावे. नंतर फोटोसेशन झाले. या मंडळींनी माझ्याबद्दल जे प्रेम,आदर नि सद्भावना दाखविली, त्याने मी अतिशय भारावून गेलो.
या सगळ्या शुभचिंतकांचे आभार कसे मानावेत, तेच मला कळत नव्हते. माझा स्वर कातर झाला होता, डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. कोविद सेंटरमध्ये उत्साहाने साजरा झालेला माझा हा अनोखा वाढदिवस आयुष्यात मी कधीही विसरणार नाही.
दरम्यान सी.बी.डी.च्या आश्रय वृद्धाश्रमातून एक वरिष्ठ नागरीक माझ्या शेजारील बेडवर आले. वयाने माझ्याहून खूप लहान होते. निवृत्तीपूर्वी एका परदेशी कंपनीत वरिष्ठ इंजिनीयर होते. इंजिनीयर झालेला त्यांचा मुलगा अमेरिकेत आपल्या कुटुंबासह मजेत राहात होता. बापाबद्दल त्याला फारशी आस्था नसावी. वडिलांना याची काही मदतही होत नसावी; असे त्यांच्या बोलण्यातून कळत होते. एम्. डी. झालेली मुलगी मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिनीयर डॉक्टर आहे. स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तीच वडिलांचं सर्व करीत होती. यांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांना लघवीवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. डायबिटीस प्रमाणाबाहेर वाढलेला होता. बहुतेक वेळ ते झोपलेलेच असत. मोबाईल चार्जर वगैरे बऱ्याच गोष्टी हे गृहस्थ विसरून आले होते. मी त्यांना माझा मोबाईल वापरायला देत होतो. माझ्या परीने मी त्यांना मदत करीत होतो. हे गृहस्थ जीवनाला कंटाळले होते. मला मरण का येत नाही? हे वाक्य ते उठता- बसता मला ऐकवत होते. जगणे मरणे परमेश्वराच्या हातात असते; जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा; अशी मी त्यांची सतत समजूत घालत होतो.
आयुष्यात पैसा कमावला पण मानसिक स्वास्थ्य लहानपणी सुद्धा मिळाले नाही; अशी त्यांची तक्रार होती. ते आपली कैफियत सांगत होते. " वडिलांना क्रॉनिक डायबिटीस होता. आई त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. वडिल गंभीर आजारी असताना ती हट्टाने माहेरी निघून गेली होती. त्या धक्क्याने वडिल गेले. आईच्या मावसभावाने आधार दिला. आमचे पालन पोषण नीट व्हावे; म्हणून स्वतः लग्न केले नाही. पण आईचे आमच्या संगोपनाकडे अजिबात लक्ष नव्हते. तिला तिचे महिला मंडळ , किटी क्लब यातच अधिक स्वारस्य होते. बऱ्याच वेळा आम्हा मुलांना वेळेवर जेवण देखील मिळत नसे. मामाचा आधार नसता तर आमचे काही खरे नव्हते. खरं सांगू! स्वतःच्या जन्मदात्या आईबद्दल इतकं कडवटपणे बोलणारा हा पहिलाच माणूस मी बघत होतो.
एकदा माझ्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन आला होता. पण हे गृहस्थ त्याच्याशी फारच तुटकपणे बोलले. मुलगी अधून मधून फोन करून बाबांकडे लक्ष द्या. असे मला सांगायची. इथे त्यांचा डायबिटीस ५०० वर पोहचला. मग मुलीने त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये हलवायचा निर्णय घेतला. स्वतः ॲम्बुलन्स घेऊन आली. मनीषबरोबर मीही त्यांना सोडायला बाहेर गेलो; तेव्हा त्यांच्या मुलीची भेट झाली. वडिलांना दोन तीन दिवस सांभाळले, त्यांना मानसिक आधार दिला; म्हणून माझे पुनः पुन्हा आभार व्यक्त करीत होती.
उर्वरित दिवसात " कल्पतरूची फुले- अध्यात्म व विज्ञान हे डॉ.ब.स. येरकुंटवार यांचे समजायला कठीण असलेले पुस्तक बरेचसे वाचून काढले. एखाद्या पिकनिकला जावे तसे माझे तिथले वावरणे होते. सकाळ संध्याकाळ तास-तासभर फिरण्याचा व्यायाम घेत होतो. आठव्या दिवशी चाचणी झाली मी पूर्णपणे बरा झालो होतो.
मी भरती झालो तेव्हा आमच्या वॉर्डात दहा पेशंट होते. शेवटच्या दोन दिवसात सगळा वॉर्ड भरून गेला. यात "आम्हाला काहीही झालेले नाही; उगीचच आम्हाला धरून आणलंय;" असे म्हणणारे खूप पेशंट होते. मास्क लावला पाहिजे ही शिस्तही बरेचजण पाळत नव्हते. उर्मट वागणारे, डॉक्टरांचा डोळा चुकवून तंबाखूचा बार भरणारे नि टॉयलेटमध्ये कुठेही तंबाखूच्या पिचकाऱ्या मारून घाण करून ठेवणारेही काहीजण होते; अशा सगळ्या पेशंटना आवरताना डॉक्टर लोकांची तारांबळ उडत असे; पण तशाही अवस्थेत डॉक्टर मंडळींच्या चेहऱ्यावरची स्मित रेषा कधी हरवताना दिसली नाही.
एकतीस डिसेंबरला मला डिस्चार्ज मिळाला. सकाळी सर्व डॉक्टर्स व परिचारक यांचे आभार मानून आणि अभिप्रायासाठी ठेवलेल्या तिथल्या पुस्तकात दोन पाने भरतील एवढा मोठा अभिप्राय कृतज्ञतापूर्वक लिहून आणि तिथल्या दहा दिवसाच्या वास्तव्यातील संस्मरणे आठवत कोविद सेंटरचा अश्रु भरल्या डोळ्यांनी मी निरोप घेतला. मनीष बरे वाटत नसल्याने आला नव्हता; त्याचा निरोप घेता आला नाही; याची रुखरुख मात्रमनात घर करून राहिली.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू