पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भलरी

भलरी

सद्या गावाकडे सुगीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकर्याच्या मुला बाळासहित सर्व कुटुंब च शेतीच्या कामात गढून गेले आहे. पै पाहुण्यांच्या भेटीगाठी, लग्नाच्या बैठका , समारंभ सारं काही पुढे ढकलण्यात आले आहे.

काढणीचा हंगाम सुरू झाला की मला माझ्या लहानपणी चे दिवस आठवतात .
ज्वारीच्या काढणी च्या वेळी भलरी म्हंटली जात असे .शेतकऱ्यांचे जीवनगाणे म्हणजेच ही भलरी ! निरक्षर लोकांची कविता म्हणजेच ही भलरी ! ज्वारी काढताना हाताला फोड येतात ते फुटून त्यातून रक्त वाहू लागते , हाताला चिंध्या बांधून आपल्या कारभार्याच्या खांद्याला खांदा लावून करभारीन आपल्या जोडीदाराचा व ईतर साथीदारांचा उत्साह वाढविण्यासाठी आपल्या रापलेल्या सुरात म्हणते

*नवरा बायकोची जोडी*
*काढीती जवारी*
*हात उचल राया*
*मी म्हणते भलरी*.......

मग आपल्या हाताच्या वेदना विसरून तिचा जोडीदार ही तिला अशी छान दाद देतो

*तुझी माझी जोडी*
*बघतो सारा गाव*
*तू मस्तानी माझी*
*मी तुझा बाजीराव*

भलरीत अनेक प्रकार आहेत . जशी श्र॔गारिक भलरी गायली जाते तसा अध्यात्मिक ही बाज असतो या भलरीला !

*साळू तिथं बाळू*
*साळू तिथं बाळू*
*चंद्रभागा पाणी तुझं*
*नेवाशाची वाळू*....
*अबीर बुक्का घ्या घ्या*
*अबीर बुक्का घ्या घ्या*
*देवाजीच्या दर्शनाला*
*रस्ता मला द्या द्या* !

अशा प्रकारे भलरी गात ज्वारी काढली जायची.

शेतात एक मोठे गोल रिंगण केले जायचे. पाणी मारून जमीन ठोकूण निब्बर केली जायची .मग शेणाने सारवून ती स्वच्छ केली जायची त्या रिंगनाच्या मधोमध एक जाड, गोल.व उंच लाकूड रोवले जायचे त्या लाकडाला मेढ म्हणतात .व त्या गोल रिंगनाला म्हणतात खळे ! त्या खळ्या भोवताली ज्वारीच्या पेंढ्या आणून टाकत व ज्वारीची कणसे मोडून त्या खळ्यात ढीग घातला जाई ! नंतर त्या मेढीला बैलांना बांधून गोल फिरविले की कणसातील दाणे वेगळे झाले की ते वार्यावर उफणले जाई ! ही झाली रास तयार !
मग ती रास पायली या मापाने मोजून पोत्यात भरली जायची !

मोजणीची सुरूवात अशी करीत !
लाभ ,शुभ , बरकत , डोईवरा मग पाच , सहा ......!
मग संथ्याकाळच्या वेळी दिवेलागणीला बैलगाड्या भरून ती जवारी घरी आणली जायची . बैलाची पुजा , घरधन्याला निरांजने ओवाळून मग ज्वारी घरातील बळदात ठेवली जायची किंवा कणगीत ठेवली जायची
!
मित्रांनो काळ बदलला , यांत्रिक युग आले आहे आता महिनाभर चालणारी सुगी तीन तासात संपू लागली . भलरी ची लकेर तर कुठेच ऐकू येईनाशी झाली आहे .
असो , कालाय तस्मे नमः

*अरविंद कुलकर्णी* , पिंपरखेडकर
*9834114379*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू