पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महिला दिनानिमित्त

महिला दिनानिमित्त

बाईच्या जातीला चूल आणि मूलच सांभाळावं लागतं ही म्हण खूप जुनी आहे.पण ती खोडून टाकण्यासाठी २० व्या शतकात वेगवेगळ्या देशांत जी
क्रांती झाली तिच्यासमोर पुन्हा एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक
मंदीच्या परिणामांना जग सामोरे जात आहे .सर्व ठप्प झाले आहे.खरंतर याचा फटका स्त्री व पुरूषाला समान
रित्या बसायला हवा होता.पण तसे न होता सर्व जगातच
पुरूषांच्या तुलनेत कितीतरी जास्त संख्येने महिलांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत.भारतात पुरूष कामगारांच्या तुलनेत महिला कामगारांना फार मोठया प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आत्तापर्यंत शहरांमध्ये मुले सांभाळण्यासाठी पाळणाघरांची पूरक व्यवस्था उभी असल्याने नवरा व बायको नोकरी करणाऱ्या कुटुंबात दोघांची सारखीच
जबाबदारी मानली जात होती.पण ही कल्पना भ्रामक,फसवी असल्याचे कोरोनाकाळात सिद्ध झाले आहे.अनेक महिलांवर पूरक व्यवस्था नसल्याने नोकरी सोडायची वेळ आली.वर्क फ्रॉम होममध्ये घर सांभाळणे,मूल सांभाळणे,घरातील वयोवृद्धांची काळजी
घेणे.,या गोष्टींची जबाबदारी महिलांवरच येऊन पडली.तरी या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ती काम करत होतीच .तरीसुद्धा तिच्यावर असलेल्या ताणामुळे ती कंपन्यामध्ये अप टू द मार्क काम नाही करत म्हणून तिला घरी बसवण्यात आले.
खूप शिकलेल्या स्त्रियांना देखील नव-याचे वेतन चांगले आहे ,नोकरी करण्यापेक्षा मुलांची व घराची जबाबदारी सांभाळावी असा दबाव घरातूनच आल्यावर काही महिलांनी नोकरी सोडल्याचे आढळले.पुरुष प्रधान
संस्कृतीत पुरूषांच्या प्रतिष्ठेचे एवढे अवडंबर माजवले गेले आहे की कोटुंबिक हिंसाचारांपासून मुलींवर होत असणा-या अत्याचारांच्या अनेक घटनाही त्या अवडंबराखाली दाबल्या जातात.समाजात वावरताना,
कामाच्या ठिकाणी महिलांना समान वागणूक मिळतेच असे नाही आणि ज्या ठिकाणी ती मिळते ते एक उपकार केल्याची जाणीव देऊन .
एखाद्या बाईचं व्यक्त होणं,तिनं तिची आवड जपण यासाठी तिला खूप काही सहन करावं लागतं.सर्जनशील
व्यक्तिमत्वाची बाई मग ती लेखिका, संशोधक, अभिनेत्री, गायिका वा खेळाडू असो तिला कुठल्याही
क्षेत्रात काम करतांना अनेक आव्हानांना सामोरं जाव लागतं.पुरुषांच तस नसतं.यशस्वी पुरूषामागे बाईचा हात असतो अस आवर्जून सांगितलं जातं,पण महिलेच्या बाबतीत मात्र बहुतांश वेळा ही परिस्थिती नसते.बाईने कुठवर उडी घ्यायची याचा निर्णय दूसरच कोणीतरी घेत असतं.तिला आवडणारे काम कुठवर करायचे याचे अलिखित नियम अजूनही कुटुंब व समाजाने ठरवलेले आहेत .एक चौकट आखून दिली आहे, त्या चौकटीला धक्का लागताच ती बाई बंडखोर ,जास्त शहाणी समजली जाते. मग तिला सामाजिक बंधनात नितीनियमांची भिती दाखवून दिली जाते. एका अर्थाने
तिचे पंख कापले जातात.कठिण परिस्थितीत सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याच्या तिच्या जिद्दीमुळे व तिच्या क्षमतेमुळे जरी ती कौतुकास्पद ठरत असली तरी अशी
संधी फार कमी महिलांना मिळते ,त्याला कारण आपला पुरूषप्रधान समाज.बहुतेक घरांमधून बायकाच या गोष्टीला जबाबदार असतात त्यामुळे पुरूषाना चांगले फावते.
आज विविध क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत ,
पण त्यासाठी त्यांना बरेच काही सोसावे लागत आहे.
राजकारणातील स्त्रियांचा वावर ही गोष्टी जूनी झाली आहे.शहरांपेक्षा खेड्यातील बायका जास्त जागरूक आहेत अस म्हटलं तरी हरकत नाही. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी पण अनेक स्त्रिया कार्यरत आहेत.
कोविडवर लशीचा उतारा शोधून काढण्यात या शतकात
महिला संशोधकांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.विसाव्या शतकात सर्व आघाड्यांवर महिलांनी आपले वर्चस्व मिळवले ,परंतु संशोधनाच्या क्षेत्रात त्या
काहीशा मागे राहिल्या होत्या.२१व्या शतकात कदाचित त्या पुढे येतील अशी आशा वाटत आहे .संशोधनाच्या कार्यात महिला मागे असण्याचे कारण पाहिले तर डॉ.गोडबोले यांनी 'विमेन इन सायन्स ' या निबंधात असे म्हटले आहे की,शाळेपासून महाविद्यालयापर्यंत गणित आणि विज्ञान शिकवणा-या महिला, शिक्षिका किंवा प्राध्यापिका असतात. पीएचडीपर्यंतसुद्धा शिकलेल्या महिला आढळतात. पण संशोधन करताना खूप कमी दिसतात. त्याचे कारण असे की तोपर्यंत शिक्षण सुविधा सुलभ असते.परंतु हेच मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या
शिक्षणासाठी भरपूर खर्च येत असल्याने घरात मुलीपेक्षा मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची वृत्ती जास्त आढळते.मुलींचे लग्न करुन देण्यात येते .मग कौटुंबिक
जबाबदाऱ्या वाढल्याने महिला संशोधनाकडे फार कमी वळतात. याला कारण परत आपला पुरुषप्रधान समाज
आडवा येतो.त्यामुळे महिलांना हवी ती संधी ,हवे तसे
वातावरण देण्यात आपल्या समाजाने ,देशाने प्रयत्नशील
राहिले पाहिजे '.बाईने केवळ संसार सांभाळून जे करता येईल तेवढेच करावे 'ही मानसिकता बदलली पाहिजे .
स्वतःच्या पायावर उभे असणे म्हणजे केवळ नोकरी करून पैसा कमविणे नव्हे,तर आत्मसन्मान कुटुंबातली
व समाजातली प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास ज्यातून प्राप्त होतो त्यासाठी स्त्रियांनी आपला पाय घट्ट रोवला पाहिजे.
समाजात स्त्री आणि पुरूष या दोघांसाठीही समान व्यवस्था असणे गरजेचे आहे व हीच काळाची गरज आहे.नुसतं एक दिवस महिलादिवस साजरा करण्यात किंवा एकमेकांना शुभेच्छा देण्यात काहीच अर्थ नाही. त्याकरता तिच्या गरजा ,तिच्या समस्या,तिची योग्यता
लक्षात घेऊन तिला हवी तशी संधी देऊन तिला प्रोत्साहन देणे जास्त गरजेचं आहे.


सौ ऐश्वर्या डगांवकर .
मो .नं. ९३२९७३६६७५.इंदूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू