पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हुंड्यातून महिला मुक्त झाली आहे का?

हुंड्यातून महिला मुक्त झाली आहे का?


८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त वरील विषयावर मी माझ्या ऐकण्यात आलेले अनुभव सांगत आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा होऊन ६० वर्षे होऊन गेलीत . सरकारने हा कायदा करून फारच महत्वाचे पाऊल उचलले आहे.
पण खरोखर ह्या कायद्याचे पालन कोण आणि किती प्रमाणात करत आहे, ही विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
अगदी कालच माझ्या कामवाल्या बाईचा फोन आला.
" मॅडम ! आनंदाची बातमी सांगते तुम्हाला . माझ्या मुलीचे लग्न करून दिले . "
माझ्या चौकस स्वभावानुसार मी अनेक प्रश्न विचारले .
जुजबी प्रश्न :
१) काय करतो जावई , शिक्षण, वय, नोकरी , शेती, घरदार इ.इ.
कामवाली : "सगळं छान आहे मॅडम ! "
पुढे तीच खूप अभिमानाने सांगू लागली ,
" अडीच लाख हुंडा दिला मॅडम, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने . चांदीच्या वस्तू , १० भारीच्या साडया, १० सलवार सूट , संसाराच्या भांडीकुंडी, कपाट, बेड , टेबल खुर्च्या -- -- - "
ती अभिमानाने सांगत होती . माझी तर छातीच दडपून गेली .
" अगं ! इतके सगळे , लग्नखर्च , जेवणावळी ! वर हुंडा कशाला ? "
"काय करणार मॅडम ? आमच्यात द्यावेच लागते . मुलीचे लग्न म्हणजे हुंडा , खर्च आलाच . ९ ते १० लाख रुपये " .
मला भोवळ यायची वेळ आली .
" मग ! मुलाच्या लग्नात भरपाई केली कां? "
" नाही नाही मॅडम ! आम्ही हुंडा घेतला नाही . भावाचीच मुलगी सून करून आणली . भाऊ परिस्थितीने गरीब आहे . "
तात्पर्य काय तर गरीब वर्गात हुंडा प्रकरण चालूच आहे . पैसे किंवा सोने किंवा मोटर सायकल इ. ची मागणी असतेच .
नुकतेच एक छान उदाहरण वाचले . ऐन लग्न लागण्या च्या वेळी " नवरदेवाने " मोटर सायकलची मागणी केली अन्यथा लग्नास तयार नाही . "
ती बाणेदार वधू, मुंडावळ्या फेकून बोहल्यावरून खाली उतरली . " मीच अशा मुलाशी लग्नाला तयार नाही . "
त्याच मांडवात दुसरा तरुण विनाअट लग्नास तयार असलेला पुढे आला व त्यांचे लग्न पार पडले .
बहुतांश मोलकरणींच्या तोंडून पहिल्या प्रकारची उदाहरणे ऐकू येतात .
२ ) हुंडाबळी : लग्नाचे वेळी मागणी करायची नाही व नंतर माहेरून " हे आण ! ते आण ! " मागण्या सुरु होतात . नाहीतर मुलीला सोडून देण्याच्या धमक्या , मारहाण ! बिचारे आईवडील नाचक्की होण्याच्या भीतीने जमेल तेवढया मागण्या पूर्ण करतात . मुलीचे थोडक्यात लग्न झाल्याच्या आनंदावर केव्हाच विरजण पडलेले असते.
अगदी माझ्या शेजारच्याच बंगल्यात
राहणाऱ्या मोलकरणीच्या मुलीने तर आईवडलांची अगतिकता बघून आत्महत्या केली . ( आत्महत्या केली की सासरच्यांनी जाळून मारले ह्यावर अळीमिळी गुपचिळी ) वर मुलीचे चरित्र चांगले नव्हते हा आरोप ठेवला .
मन विदीर्ण झाले .
वरील दोन्ही उदाहरणे सत्य आहेत.
अशा अनेक घटना नित्य घडत असतात आपण वर्तमान पत्रात वाचतो, दूरदर्शनवर बघतो .
मध्यम वर्गीयांची कुतरओढ सांगायलाच नको.
श्रीमंतांचे वैभव प्रदर्शन वेगळेच !
मुलीच्या भारंभार हि -यांचे , सोन्याचे दागिने , महाग गाड्या इ.
वरवरून काही दिलेले दिसले नाही तरी ' आतून निरनिराळ्या नावांनी देणे चालूच असते . ' - हुंड्याचा वेगळा प्रकार !
विषयाच्या ओघात सांगायला अभिमान वाटतो की माझ्या कुटुंबात आजी, आई, काका , आत्या व मी स्वतः - सर्वांची लग्ने हुंडा किवा सोनेचांदी न घेता झाली .
मुख्य कारण सर्वांची प्रागतिक विचार सरणी, मुलगा - मुलगी समानता आणि शिक्षण .
माझ्या लग्नात तर,
"आम्ही काही घेणार नाही" अशी सासऱ्यांनी अटच घातली होती .
असो. मुद्दा असा की
आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी रोवलेली शिक्षणाची मुहूर्तमेढ किती दूरदर्शी होती हे लक्षात येते .
"मुलगी शिकली , राष्ट्राची प्रगती झाली " .
दुसऱ्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या अंगी निर्भीडपणा, बाणेदारपणा बाळगला पाहिजे . स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायांवर उभे
राहण्याचा आत्मविश्वास मुलींच्या ठायी जागृत राहिला पाहिजे . "
" हुंडा मागणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही " असे तिने ठासून सांगितले तरच हुंडा विरोधी कायदा यशस्वी होईल .
आजच्या महिला दिनी सांगावेसे वाटते ,
मुलींनो शिक्षण सर्वात महत्वाचे . जिजाऊ बना , झाशीची राणी , अहिल्या बाई , आनंदी जोशी, इंदिरा गांधी बना . उद्योजिका बना , शास्त्रज्ञ , अंतराळवीर, वैमानिक बना . कोणतेही क्षेत्र असो .
शिक्षणाचा मजबूत पाया, आत्मविश्वास , धडाडी, कर्तृत्व हीच तुमची शक्ती . यशाची खात्री .
हुंडा हा शब्दच शब्दकोषातून नष्ट करणे मुलींनो तुमच्या हाती आहे.
महिला दिनाच्या शुभेच्छा????


लेखिका
सुलभा गुप्ते
सिडनी
८ मार्च , जागतिक महिला दिन

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू