पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शांत अणि आनंदी हिरवाई

“पानगळ आणि सुक्या कचऱ्या बरोबर वाईट प्रवृत्ती पण होळीत जाळली

सुख शांती, मैत्री आणि आनंदा साठी अनेक रंगांची उधळण केली”. 

खरं तर आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण एक वैज्ञानिक महत्व डोळ्यापुढे ठेवून ठरवले असावे असेच वाटते. होळी हा आपला सगळ्यात शेवटी येणारा सण आहे. पण स्पर्धेचा विषय असल्याने पहिले त्याचे महत्व घेतले. आता शेतकर्‍यांची काही पिके तयार होऊन घरी आलेली असतात. त्याच बरोबर धान्य व चारा काढून काही पाचोळा शिल्लक राहतो ,  प्रत्येक झाडाची पानगळ होत असल्याने पानांचा ढीग साठलेला असतो,  नविन चारा घरात आल्याने जुना व गुरांनि खाऊन टाकलेला चारा, असे अनेक जैव कचर्‍याचे ढीग जमा झालेले असतात, जे  जाळण्याशिवाय पर्याय नसतो. आणि हा सगळा कचरा प्रत्येकाने वेग वेगळा जाळण्यापेक्षा एकत्र जाळून  उत्सव साजरा केला जातो. अग्नि देव आपल्या खूप उपयोगी पडतो, म्हणुन त्याची पूजा करून त्याचे आभार मानले जातात आणि कचराहि जाळला जातो. या ऋतूमध्ये येणाऱ्या पळसाच्या किंवा ,  काही फुलांचा नैसर्गिक रंग करून अग्नि म्हणजे होळी शांत केली जाते. तसेच ह्या दिवशी प्रत्येकाला  मनसोक्त  भिजवून आनंद घ्यायला परवानगी असते. मोहक रंग बघायला, एकमेकांवर उधळायला खूप छान वाटते. या सुंदर रगांमधील  “माझा आवडता रंग आहे हिरवा”

पानगळ संपते न संपते तर प्रत्येक झाड नवीन वर्षाच्या स्वागताला नवीन पालवी घेऊन तयारच असते. प्रत्येक झाडाचा रुबाब वेगळाच असतो, कोवळ्या पानांचे सौंदर्य, हिरवा रंग, आकार, जणु गुढीचे स्वागत करायला तोरण बनून  तयार असतात. कित्येक झाडांना छोटी फुले, कळ्या आल्याने त्याचे महत्त्व विशेष वाढते.

चैत्रपालवी बरोबरच उन्हाची काहीली पण हातात हात घालून येत असते आणि प्रत्येक झाड त्यासाठी नवीन पालवीने दाट भरून शांत सावली द्यायला जणु सज्ज असते. अनेक पक्षी त्यावर विसावतात, प्राणी आणि माणसेही झाडाखाली निवांत बसतात. झाडांच्या पानांचा हिरवा रंग डोळ्यांना थंडावा देतो, आणि  सावली जीवाला गारवा देते. अनेक फळे जसे द्राक्ष,  मोसंबी, संत्री, काकडी, कलिंगड प्रत्येकाचा हिरवा रंग वेगळा असला तरी डोळ्यांना थंड आणि पोटाला शांत करतात. अगदी हिरवट पिवळे लिंबू तर किती सुंदर रंग बदलत असते आणि कडक उन्हातही आपल्याला शांत करत असते. उन्हाळ्यात भाज्यांची कमी कैरीच्या अनेक प्रकारांनी भरून निघते. खरच किती शांतता पोटाला पण  “हिरवा रंग देत असतो”.

कडक ऊन आणि वैशाख वणवा यामुळे  सगळे अगदि बेजार झालेले असतात.  आता पुर्ण सृष्टीला पावसाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. पक्षी आपले घरटे बांधून सज्ज होतात, आपण पण शेतीची मशागत करून हिरीरीने पावसाची किंवा पहिल्या पावसाची वाट बघत असतो. आपली धरती माता पण जागो जागी भेगा करून पावसाच्या पाण्याला साठवण्यासाठी सज्ज असते.  आणि अचानक वादळांची पळापळ चालू होते. एकाच ठिकाणी न बरसता ते पण सगळी कडे बरसण्यचा प्रयत्न करत असतात. त्यांना इकडून तिकडे नेण्याचे काम वारा चोख बजावत असतो. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करुन पाऊस जणु आपण येत असल्याची वर्दीच देत असतो.  संपूर्ण सृष्टी पाहिल्या पावसाचे स्वागत करायला तयारच असते. माती तर भरभरून सुंदर वास सगळ्यांना देऊन पावसाचा आनंद अक्षरशः लुटत असते.  त्यात काहीही दुजाभाव नसतो, कोणीही या आणि आनंद घेऊन जा.  कुठलाही पक्षपात न करता पाऊस पूर्ण पृथ्वीला शांत करतो. 

पावसाच्या आनंदात आपली धरतीमाता लगेचच सुंदर हिरव्या रंगाचा शालू नेसून पुढे येणाऱ्या सणांचे स्वागत करायला तयार असते.  पहिला सण नागपंचमीचा, शेतकऱ्यांची अनेक पिके जणु ‘हिरवा कलर कोड’ असल्यासारखी वेगवेगळ्या हिरव्या शेडचे कपडे घालून, कोणी छोटी फुले लावून तर कोणी छोटी फळे घेऊन तयार असतात. पाले भाज्या काय, पावसाळी भाज्या काय, बाजार तर हिरव्या रंगाने बहरलेला असतो. त्यातच जरा जंगल सफर केली, तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटलेच समजा. कितीही दुर दुर बघितले तर हिरवा रंग लांबच लांब पर्यंत मनमोहक आणि आकर्षक दिसत असतो. आपल्या प्रत्येक सणाला आघाडा, दुर्वा, केवडा, आंब्याच्या पानांचे तोरण,  कलशावर नागवेलीची पाने, पूजेला आणि दारात केळीचे खांब... प्रत्येकाचे वेगळे महत्व. पण  “रंग ततोच आनंद आणि भरभराटी देणारा हिरवा”. अगदि तयारी बघूनच मन प्रसन्न होते. कुठल्याही कार्याची सुरुवात शांत आणि प्रसन्न मानाने झाली, तर कार्य निर्विघ्नपणे पार पडते हे निश्चितच.

पावसाळा संपत नाही की वेध लागतात हिरव्या गार तुलसी विवाहाचे, आणि त्यापाठोपाठ घरातील कार्याला सुरुवात होते. शुभ कार्यात तर स्त्रियांच्या हातातील हिरव्या बांगड्यांना विशेष महत्व असते. प्रत्येक शुभ कार्याला आमच्या कडे सुवासिनी, माहेरवाशीण आणि कुमारिकांचा हिरव्या बांगड्या भरुन विशेष मान केला जातो. नव्या नवरीला तर हिरव्या चुड्या शिवाय बोहल्यावर चढायची परवानगीच नसते. लग्नात कडू कारल्याच्या वेलाला विशेष महत्त्व आहे. त्याच्या सुंदर हिरव्या पानांमुळे मांडवाची शोभा वाढते. म्हणून वरमाय कितीही रुसली असली तरी हिरव्या मांडवाखालून गेल्यावर ती शांतच होते. सगळ्यांना  “शांत करायची जबाबदारी हिरव्या रंगाने”  घेतली आहे.  

पुरुषांना हिरव्या भाज्या, विड्याची पाने, हिरवा चाफा वेड लावतात, तर स्त्रियांना हिरव्या बांगड्या साडी, चोळी, हिरवा खण विशेष आवडीचा. मानाच्या विहिणींना, सवाष्णींना नेहेमी हिरवी साडी देऊन शांत केले जाते. त्या रंगाचा तो गुणच आहे. हिरवी साडी बघितल्यावरच एक प्रकारे मन प्रसन्न होते. असा हा “सुंदर हिरवा रंग प्रत्येकाला सुख शांती आणि भरभराटी देतो”. 

 

सौ वृषाली किशोर मुळे 

9833306701

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू