पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

समिक्षा

नाठाळाच्या माथी हाणू काठी : विद्रोहाची पारदर्शक मशाल


वेदांत प्रकाशन डोंबिवली यांनी २० नोव्हे. २०२१ रोजी प्रकाशित केलेला प्रातिनिधीक कवितासंग्रह म्हणजे नाठाळांच्या माथी हाणू काठी हा आहे. विद्रोही विचारांची पारदर्शक मशाल प्रत्येक पान वाचतांना जाणवते. जेष्ठ कवी नामदेव ढसाळ यांच्याच वैचारिक वारसा आपण पुढे नेत आहोत. हे प्रतिबिंब, प्रतिनिधीत्व सदरचा काव्यसंग्रह वाचतांना जाणवले. शाईचा दौत, लेखणी, आवळलेल्या अनेक हातांच्या मुठा या मुखपृष्ठातून प्रभावी आणि परिणामकारक  समूहासह संघटित होण्याचा संदेश देतात. सदरच्या काव्यसंग्रहाला डॅा. श्रीपाल सबनीस सरांची प्रस्तावना मिळाली आहे. संपादकीय मनोगत संपादक अमोल घाटविसावे यांनी अभ्यासपुर्वक मांडले आहे. उपसंपादकीय मनोगतातून सुभाष वाघमारे यांनी विद्रोही भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.मनोगतीय आभार सुभाष गवळी यांनी मांडले आहे. चंद्रकात वानखेडे, डॅा. नयनचंद्र सरस्वते, हृदयमानव अशोक, हबीब भंडारे यांचे अभिप्राय सदरच्या काव्यसंग्रहात आहे. अमोल घाटविसावे, सुभाष गवळी, मधुरा खाडे, अतुलकुमार ढोणे, सुभाष वाघमारे, डॅा. सुनील वैद्य, डॅा. नंदकिशोर दामोधरे, राजू वाघमारे, रामहरी वरकले यांच्या विद्रोही कवितांची पारदर्शक मशाल म्हणजे सदरचा कवितासंग्रह आहे. मराठी साहित्य विश्वात विद्रोहाचा ठसा उमटविण्यात सदरचा कवितासंग्रह यशस्वी ठरला आहे. अशी जाणीव वाचकाला या कवितांमधून होते. संत तुकारामांच्या संघर्षातील प्रक्षोभक प्रतिक्रियांची ओळ सदरच्या कवितासंग्रहाला समर्पक ठरली आहे. प्रत्येक पिढीत नाठाळ प्रवृत्तीची माणस असतात. त्यांना सरळ करण्यासाठी ही वैचारिक काठी पुरेशी ठरते.

जेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या काही ओळी सदरचा काव्यसंग्रह वाचतांना वाचकांना सहज आठवतात.

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना

किंवा तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी

विद्रोही विचारांनी भारत देशाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवले आहे हा इतिहास साक्ष पुरावा, संदर्भ आज हातात घेऊन स्वाभिमानाने लेखणीचा आवाज सर्वत्र न्याय हक्कासाठी घुमतो आहे. हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. विद्रोही कवी अमोल घाटविसावे यांच्या एकूण सोळा कवितांचा समावेश यामध्ये आहे.

अंतिम युध्द, अस्वस्थ वेदनेचे बंड, शिव-शाहू-फुले-आंबेडकर, बींग विश्वाच्या निर्मात्याचं, विटंबना माणूसकीची, काळ्या मण्याची ढाल, निर्भया, गुंठा, सरोगसी जमात अशा विविध विषयाच्या आशयसंपन्न, दर्जेदार, परिवर्तनवादी विचारांची पेरणी करणार्या कविता आहेत. वाचकाला समाजाचा पारदर्शक आरसा दाखविण्याचे सामर्थ्य, कसब, कौशल्य, चिंतन, मुल्यांकन सदरच्या कवितासंग्रहात आहे. ही विशेषता या संग्रहाची आहे. लेखनाची भाषाशैली दैनंदिन जीवनातील असल्याने वाचकाला सहज आकलन होते. ही दुसरी विशेषता आहे. एकाच विद्रोही दिशेने सर्व कवितांचा प्रवास, प्रवृत्ती, प्रवाह यातून निर्माण होणारे खंबीर, कणखर प्रतिनिधीत्व अर्थातच तुकारामांची वैचारिक काठी आहे हे तिसरे वैशिष्ट्य दिसून येते. चला तर आज आढावा घेऊया नाठाळांच्या माथी हाणू काठी या प्रातिनिधीक कवितासंग्रहाचा, वाचकांच्या भावविश्वात सदरच्या काव्यसंग्रहाचे स्वागत करत जाणून घेऊया प्रत्येक विद्रोही कवितेची पारदर्शक मशाल जी समाजातील कुप्रवृत्तीला विचाराने नष्ट करणारी ठरेल. 

घेऊनी हाती क्रांतीची मशाल

जाळून टाकावा गाभारा वर्णव्यवस्थेचा

कर्मकांडाचा, अंधश्रध्देचा कराव नागडं, काढावी धिंड व्यवस्थेची

चौकाचौकातून वाजत गाजत

विद्रोही कवी घाटविसावे यांचे व्यवस्थेचा बुरखा फाडणारे विचार वाचून वाचक अंतर्मुख बनतो. प्रत्येक जण सोईनूसार धर्म, जात, भेद पाळत गुलाम मानसिकता वाढवतो. हूकूमशाही प्रवृत्तीची पाठराखण करतो. हे वैश्विक सत्य आहे. बळी तो कान पिळी हा पुरातन, सनातन अलिखित कायदा आज देखील कायम आहे. हे लोकशाही प्रतिक वापरून कवी वाचकांपुढे त्यामागील पार्श्वभूमी समर्थपणे सादर करतो. ही विशेषता या संग्रहाची आहे. अस्वस्थ मन हे जिवंतपणाची प्रतिबिंब आहे. अस्वस्थ वेदनेचे बंड या कवितेत कवी लिहीतात

यंदा पेरावे म्हणतो अस्वस्थ मन

काळ्या भुईच्या उदरात

प्रसावी कुस वेदनेची

घ्यावा जन्म शब्दांनी

बळीच्या ओठात

धराव बाळस कवितेने सुटावं

अन्याय, अत्याचाराला, गुलामगिरीला फोडीत

घेऊन जोतीबांचा आसूड हातात

(पृ.५५)

विद्रोही विचार हे बदलत्या काळाचे प्रतिबिंब आहे. हे विचार स्वीकार केल्याशिवाय वैश्विक समतेच्या मुल्यांकन पुर्ण होऊ शकत नाही.

विचारायचा आहे जाब तुला

का रे बाबा सारी तुझीच लेकर ना,

बाप म्हणवतोस स्वतः ला जगाचा

पालनहार, दिसत नाही का तुला

प्रेतांचा खच, देहांची राख

पोरकी झालेली माणसं, विधवा माय

उध्दवस्त संसार, सगळीकडे हाहाकार

अत्याचार, भ्रष्ट्राचार, बलात्कार

(पृ.५७)

पिढ्यानपिढ्या तेच सनातनी विचारांचे पिढ्या नष्ट करणारे गुलामीचे चिंतन कवीने मांडले आहे. ही विशेषता या संग्रहाची ठरते. किती दिवस कोणी उध्दार कर्ता येईल हा खोटा आशावाद मनात बाळगायचा, आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार आहोत. हा बुध्दाकडे जाणारा आदर्श या कवितेच्या संवादातून वाचकाच्या काळजाला थेट भिडतो, सहज भावतो. वैज्ञानिक युगात देखील समाज अंधश्रध्देच्या दलदलीत अडकला आहे. हे वास्तव कवी मांडतो. तेव्हा अण्णाभाऊ साठेंच्या काही ओळी आठवतात.

चिखलात रूतून का बसलास ऐरावत

जग बदल घालूनी घाव

सांगून गेले मला भिमराव

लोककलेविषयी चिंतन यामध्ये आहे. स्त्री पुरूष समानतेचे बीज कवितेत आहे. निर्भया विषयी करूणेने भरलेले काळीज कवितेत आहे. व्यापक, वैश्विक दृष्टीकोनातून कवी आपले विद्रोही चिंतनगर्भ, परिवर्तनीय विचार वाचकांसमोर मांडत आहे. हे वाचतांना महापुरूषांविषयी कृतघ्न पिढी, स्त्री भ्रुण हत्या करणणरा वांझ समाज आणि नैतिक दृष्टीकोनातून मांडलेले निकष, वेदनेचे अस्सल स्वरूप हे या स़ंग्रहाचे वैशिष्ट्य ठरते.

विद्रोही कवी सुभाष गवळी यांच्या कविता व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित करतात.

का रोजचं इथं कुलबर्गी, पानसरे

आणि दाभैळकरांच्या चिता पेटणार?

काल शिवशाही आणि आज लोकशाहीची अब्रुही

हीच जनावरं भर चौकात लुटमार

मग सांग बहुजना तु झोपलेल्या रात्रीला

तांबडं कधी फुटणार?

पारदर्शक विचारांची मशाल पुन्हा या ठिकाणी पेटतांना दिसून येते. ज्ञानाची पहाट येण्यासाठी महहपुरूषांना संघर्ष करावा लागला. आणि आपण सहजतेने लोकशाहीचा खून दिवसा ढवळ्या पाहतो. परंतू याविरोधी सामूहिक आवाज मोजक्याच लोकांचे येतात असे होऊ नये त्यासाठी हि वैचारिक लढाई विचारांनेच लढावी लागणार आहे. कोणत्याही विशिष्ट वर्गाचा शिक्का ज्ञानावर, प्रामाणिक निष्ठेवर नाही या ठिकाणी माणूसच माणसाला उघडनागड करतो‌ माणूसच माणसाच्या प्रवृत्ती दाखवतो. उजेड पेरणार्या सर्वच कविता आहेत. माणूस हाच केंद्रबिंदू प्रत्येक कवितेचा आहे. विद्रोही कवितेची भाषा परिवर्तनाला जन्म देणार्या ठरतात. बळीचा बकरा बहूजन समाजाला बनवून त्यावर सत्ता गाजविणारी येथील व्यवस्था आहे हे सत्य स्वीकार करावे लागते. चिळकांड्या वेदनेच्या या कवितेत कवी गवळी लिहीतात,

दु:ख मनातील कष्टकर्यांचे

किती इथे मी मांडावे

फितूर होते भाकर जेव्हा

पोटासंगेच का भांडावे

शोषितांच्या भूक तहानेचे नेतृत्व करणारे विचार मानसिक गुलामीने खचलेला, पछाडलेला बहूजन वर्ग, त्यांचा अधिकार मागणारा गगनाला भिडणारा आवाज ही विशेषता या संग्रहाची आहे. प्रत्येकाचा वाटा देशात आहे. बहूजनांच्या जीवावर सत्ता, हूकूमत गाजवू नका अन्यथा विद्रोही काठी दंड दिल्याशिवाय राहणार नाही. हे वैचारिक प्रबोधन, क्रांतीचे सुत्र प्रत्येक कवीने मांडले आहे.

ताबा ही कविता रोखठोक, प्रभावी संवाद साधणारी ठरते.

झाली देऊळे उदंड

दानपेट्या गब्बर झाल्या

अगडबंब पोटावरती

चरबीच्या लाटा आल्या

तू मोजत बस फासोळ्या

बघ जुळतय का कुठ काही

मेंदूवरती आमच्या

आमचाच ताबा नाही

(पृ.८४)

या देशातील विदारक कटू सत्य नाठाळ व्यवस्थेला काठी हाणत कवीने मांडले आहे हे वैशिष्टय़ संग्रहाचे ठरते.

एकूण बारा कविता विद्रोही कवी गवळी यांच्या आहेत. प्रत्येक कविता संदर्भित भाष्य बहुजन समाजावर करते.

नवी आशा, नवी दिशा

फुले, शाहू, बुध्द दिलात

पण आम्हीच झाले गद्दार

तूम्ही दिलेला स्वाभिमान

आम्ही दिड दमडीला विकला

कुणी त्यांच्याच दावणीला फेकला

(पृ.८५)

आशयसंपन्न आणि गुलाम मानसिकतेविरूध्द आवाज उठविणारा सदरचा कवितासंग्रह आहे. जेष्ठ कवी नामदेव ढसाळ यांचाच वारसा कवितेच्या वैचारिक पाश्र्वभूमीवर दिसून येतो.

हे तथागता....

तूच आहेस इथला खरा जगज्जेता

तूच आहेस आमचा खरा मार्गदाता (पृ.९१)

तथागतांना दिलेल्या उपमा भावस्पर्शी आणि डोळस बुध्दीच्या आहेत. जागृत विचारांची वैचारिक मशाल ही कविता वाचकांसमोर सादर करते. समाज मनाचे भान आणि जाण सदरच्या कवितासंग्रहात आहे.

विद्रोही कवयित्री मधुरा खाडे यांच्या पंधरा कविता संग्रहात आहेत‌.

प्रकाशाची निर्धास्त वाट, की दिव्याचा आभास?

सन्मान विचारांचा शुध्द तुसडा भास

(पृ.९४)

वरील ओळीतून जग हे खरोखर आभासासारखे आहे असे दाखविणारे लोक स्वार्थी बनून स्वतः बैनरवर मोठे होत असतात. हे सत्य मांडले आहे.

वाट हरवली बघता बघता

दिशेस पडली 

कधी पेटते गरिबा घरची

एका वेळी चूल

(पृ.९७)

मी वाट सोडली आहे

मी जात सोडली आहे

मज बांधून ठेवणारी

मी गाठ सोडली आहे

(पृ.११०)

अस्तित्व शोधणारा, पुरता खचून गेला

शोषून सत्य सारे अनुभव रचून गेला

मोठा जगात मी अन् मोठीच माझी शानं

कर्तृत्व शून्य करते ही अमानवी तहान

(पृ. १११)

विद्रोही कवयित्रीने वास्तव जीवन रेखाटले आहे. यानंतर अतुलकुमार ढोणे यांच्या गझल प्रकारातील कवितांचा समावेश यामध्ये आहे. 

जमवून ठेवला बघ भरपूर माल कोणी

बनले गुलाम बाबा बनले दलाल कोणी

व्यवस्थेचे सत्य मांडणारी गझल आहे. 


बहुजनांच्या बळावर सत्ता नाचते हे सत्य मांडले आहे.

मारा उड्या कितीही मुर्दाड लोकहो

ही झोपडी हिर्यांना जन्मास घालते


जातीविहीन चर्चा करती उगाच ते

पण मात्र राजकारण जातीय चालते

(पृ.१२३)

फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीचे खरे वारसदार झोपडीत जगणारे बांधव आहेत हे नाकारता येत नाही.

येत्या युगापुढे तू खंबीर चाल आता

या षंढ संस्कृतीला मातीत घाल आता


मी स्पष्ट बोलण्याची केली जशी मुजोरी

मज वापरून त्यांनी केले हलाल आता

(पृ.१२८)

विद्रोही कवी सुभाष वाघमारे यांच्या विद्रोही कविता देखील पारदर्शक मशाल वाचकांसमोर उभी करतात.

आधी माणूस आला

मग धर्म आला

धर्मासवे गर्व आला

तरी पण

धर्म माणसासाठी असतो

माणूस धर्मासाठी नसतो.

(पृ.१४३)

एकूण नऊ कविता विद्रोही कवी वाघमारे यांच्या आहेत.

डॅा. सुनील वैद्य यांच्या एकूण पंधरा कविता आहेत. अनेक कविता मुक्तछंदातील आहेत. 

विचार करतोय विद्रोह करावा तरी कशाचा?

इथल्या जिवंत माणसाचा

इथल्या मुर्दाड माणसाचा

(पृ.१५९)

काल तुला वाघ केल होत

आज तु पुन्हा शेळी झालास

(पृ.१६१)

मानवी चमचे ही एक जमात आहे

त्यांचं वर्गीकरण अपृष्ठवंशीय वर्गात कराव लागतं

(पृ.१६९)

अशा प्रकारे प्रत्येक कवितेत विद्रोहाची मशाल पारदर्शकपणे वाचकांना समाजाचे खरे स्वरूप दाखविण्यात यशस्वी ठरते. अशा काव्याचा विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमात समावेश असणे ही काळाची गरज ठरते.

यानंतर डॅा. नंदकिशोर दामोधरे यांच्या एकूण अठरा कवितांचा 

 संग्रहात आहे. 

गतिहीन चळवळ आणि चळवळ अनाथ झाली या दोन्ही कविता उल्लेखनीय आहेत. 

दौलत तुझी दिलेली केली लिलाव आम्ही

लाचार या समाजा दाता कुणी दिसेना

समाजातील वास्तवाचे अचूक चित्रण कवीने रेखाटले आहे.

बंदीस्त भीम केला पुतळ्यात आज आम्ही

गाणे निळ्या नभाचे गाता कुणी दिसेना

हे वास्तव चित्रण देखील समाजातील संकुचित प्रवृत्तीचे प्रतिबिंब ठरते. याशिवाय लढा एकतेचा, तुकोबा, किमया भीमाची, आजचा भारत, लेखणी तलवार होती, गोतमाची पाऊले, आग लावली पाहिजे या कविता देखील उल्लेखनीय आहेत. 

राजू वाघमारे यांच्या सतरा कविता यामध्ये आहेत.

कार्यकारणभाव ही कविता विशेष उल्लेखनीय ठरते. दलबदलू नेते, हाक एकीची, गरळ, विद्रोहाच्या वाटेवर, गोडबोले, लूट जनतेची, विळखा अंधश्रध्देचा, नातं कुंकू आणि मेणाचं, माझ्या देशात या कविता देखील उल्लेखनीय आहेत.

कित्येक जातात बळी

होते घराची राखरांगोळी

त्या अंधश्रध्देच्या वाटेवरी

पण काठावरील लोक

मरण आले देवाच्या दारी

म्हणून पुन्हा पुन्हा त्याच वाटेवरी

दुसरा बळी ढकलतात

(पृ.२०१)

रामहरी वरकले यांच्या सोळा कवितांचा समावेश यामध्ये आहे.

नवीन आशावाद देणारी कविता कवी सादर करतो.

नव्या नव्या युगाची बिकट वाट आहे

सांभाळून चला अंधार दाट आहे

(पृ. २२८)

याशिवाय आदिवासी तिथे जगत राहिल, समाज जगायला हवा, तालिबान पाकिस्तान, बरे झाले असते, विचारांची युध्दे, जयभिम, पेढ्या इतकीच जिलेबी गोड, मायबाप, बेहाल आहे, हरवल्या दिशा, विद्रोहाची शाई, लढा, अंधार दाट आहे या कविता देखील प्रबोधनात्मक आहेत.

रंग साऱ्यांच्या रक्ताचा जरी लाल आहे

तरी माणसाला केले जातीने बेहाल आहे

वर्णात माणसांना लोटून जात गेली

धर्मात माणसांना वाटून जात गेली

जातीपुढे समतेचा विचार फोल आहे

हे देशातील वास्तव चित्र कवीने योग्य भाषेत रेखाटले आहे.

संपुर्ण प्रातिनिधिक कवितासंग्रह गौरवास्पद, प्रेरक असा सर्व वाचकांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. संपादकाला नवीन साहित्य प्रवासाला अनेक शुभेच्छा आणि नाठाळाच्या माथी हाणू काठी या प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे मराठी साहित्य विश्वात स्वागत करते.

पुस्तकाचे नाव

नाठाळाच्या माथी हाणू काठी

संपादक

अमोल घाटविसावे

पृष्ठ २३०

मूळ किंमत  २५०₹

सवलतीच्या दरात  पोस्टल खर्चासहीत,रु २००/

फोन पे , गुगल पे  

अमोल घाटविसावे

9579923004

समिक्षण

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू