पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सीमेवरचा योद्धा

----  सीमेवरचा  योद्धा ---

 

       (युद्ध कथा वर्णन )

 

 

14×2 = 26 ??

 

हे अस होऊ शकत का?

 

हो... मित्रांनो...होऊ शकत. हेच  बरोबर आहे.

वरचे अंक हया तारखा आहेत.आणि तारखांच्या नजरेतून बघितले तर कसे बरोबर आहे याची तुम्हाला थोडी कल्पना येईल.

 

तुम्हाला 2019 वर्षामधील फेब्रुवारी महिन्यातील 14 आणि 26 या तारखा आठवताय का?चला तीन वर्ष मागे जाऊया....!!!

..

..

..

 

तीन वर्षांपूर्वी..

 

14 फेब्रुवारी 2019

 

 हा दिवस जगामध्ये सगळीकडे

' प्रेमाचा दिवस ' म्हणून साजरा केला जात असतांना,त्याच दिवशी  जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाची एक बस अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ल्यात उडवली आणि त्यात 40 हून अधिक आपले भारतीय जवान शहीद झाले. या प्रेमाच्या दिवशी त्यांनी कित्येक कुटुंबियांना , मुला बाळांना पोरक केलं केलं . हा प्रेमाचा दिवस रक्तरंजित काळ्या  दिवसात बदलून गेला . आमच्‍या सैनिकांच्या देहाचे तुकडे सर्वत्र विखुरली होती.  रस्त्यावर  जागोजागी  पडलेली त्यांच्या अवयवांची तुकडी आणि अर्धवट जळालेली शरीरे पाहून काळीज पिळुन गेलं . हा हल्ला आतंकी संघटन जैश ए मोहम्मद ने घडवून आणला होता.

 

 ह्या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची  लाट तर होतीच पण त्याही पेक्षा बदल्याची भावना जास्त होती.वीर मरण प्राप्त झालेल्या 40 पेक्षा जास्त सीआरपीएफच्या जवानांचा बदला घेणे गरजेचे होते.

 

 

26 फेब्रुवारी 2019 :

 

26 फेब्रुवारी, पहाटे तीन वाजून 30 मिनिटांनी भारतीय हवाई दलाने त्याचा  बदला घेतला. पाकिस्तानी हद्दीत घुसून अतिरेकी असलेल्या तळांवर अचानक हल्ले केले आणि त्यात 250 पेक्षा जास्त अतिरेकी मारण्यात भारतीय हवाई दलाला यश मिळाले.

 

14 तारखेला झालेल्या हल्ल्याचा दुप्पटीने घेतलेला बदला म्हणजेच 26 तारीख !!

 

पाकिस्तान या घटनेतून शांत बसणार नाही हे भारतीय हवाई दलाला माहित होते.पाकिस्तानच्या हल्ल्याची भनक दुसऱ्याच दिवशी लागली .

 

जेव्हा पाकिस्तानने आपल्या सर्व हद्दीतील सिव्हिलीयन विमानांचे उड्डाण बंद केले तेव्हा ही बातमी भारतीय हवाई दलापर्यंत पोहचायला वेळ लागला नाही .

 खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय वायुसेनेने आपल्या चार सुखोई व दोन मिराज 2000 लढाऊ विमानांना लगेच सतर्कतेचा इशारा दिला. हि विमान त्या वेळी गस्तीवरच होती.

 पीर पंजाल पर्वत रांगावर उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा पहारा डोळ्यात तेल घालून चालू होता . त्याच वेळी पाकिस्तानातील रफिकी व सरगोधा हवाई तळावरून पाकिस्तानची F-16 फायटर विमान बदला घेण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत होते.

 

 ऐकून 24 विमानांच हे पथक संपूर्ण तयारीत भारतावर आक्रमणाच्या पवित्र्यात निघाले. त्यात अकरा F-16 फाल्कन तर तेरा

JF- 17 थंडर विमाने होती. सकाळी नऊ वाजून 45  मिनिटांनी त्यांनी भारताच्या सीमेकडे झेप घेतली . राजौरी तील कलान घाटीमध्ये LOC ची लक्ष्मण रेखा  पार करण्याचा त्यांचा प्लॅन होता. तिथूनच नौशेरा ब्रिगेड मुख्यालय व नगरोटा मधील पंधराव्या सैन्यदल तुकडीच्या हेडक्वार्टर वर हमला करण्याचा सुद्धा प्लॅन त्यांनी आखला होता.

 

 पाकिस्तान एअर फोर्स ने बरोबर सकाळी दहा वाजता टार्गेट टाईम निवडला,कारण ही वेळ शिफ्ट बदलण्याची वेळ होती आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपलं टार्गेट साफ करू शकतो व पुन्हा पाकिस्तानात येऊ शकतो अस पाकिस्तानी एअर फोर्स ला वाटल.

 

"ज्या वाटेने ते चालले होते ती वाटच आम्ही बनविली होती हे कदाचित त्यांना माहित नसेल." आमची एअर फोर्स त्यांच्या एक पाऊल पुढे होती.

 

24 पाकिस्तानी विमानं पैकी आठ विमान नगरोटा च्या दिशेने निघाली ही पाकिस्तानची एक चाल होती आणि इंडियन एअर फोर्स चे लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्याचा मनसुबा होता.

 सकाळच्या नीरभ्र आकाशात आपली सीमा ओलांडताच जम्मू जवळ भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 विमानांनी पाकिस्तानी विमानांवर बी व्ही आर ( बियाँड व्हिसि्युअल रेंज ) मिसाईल सोडले ही मिसाईल खूप दूर अंतरावरून फायर करता येतात जेव्हा  टार्गेट खूप दूरवर असते किंवा डोळ्यांनी दिसत नसले तरीही !!

 

 सततच्या होणाऱ्या हल्ल्याने पाकिस्तानी विमानांना आत येणे शक्य झाले नाही आणि ते परत माघारी फिरले. ही त्यांची चाल भारतीय वायुसेनेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा सारखीच होती कारण याच वेळी खरा हल्ला करणाऱ्या विमानांचा एक ग्रुप यात चार लेझर गाईडेड बॉम्ब घेऊन  गुपचूप LOC पार करून नौशेरा च्या बाजूने उत्तरेकडून चाल करून आले परंतु त्यांना ठाऊक नव्हतं हिंदुस्तानी भूमीवर त्यांचा कर्दनकाळ त्यांची वाट पाहत आहे, भारतीय हवाई दलाची चार सुखोई विमान त्यांचीच वाट बघत होते.

भारतीय महिला स्क्वॉड्रन  लिडर मिंटी अग्रवाल त्या वेळी ड्युटीवर होत्या. त्यांनी ताबडतोब मेसेज करून मीग विमानाच्या  अतिरिक्त मदतीची मागणी केली तोपर्यंत त्या पाकिस्तानी विमानाच्या हालचालीवर लक्ष ठेवूनच होत्या ,लगेचच ORP (ऑपरेशन रेडी प्लॅटफॉर्म)वर उभी असलेल्या चार विमानांनी  आकाशात झेप घेतली.1000 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने दहा ते बारा मिनिटात 200 किलोमीटर अंतर पार करून चार  मिग -21 बायसन तेथे पोहचले.त्यापैकी  एका विमानात होते विंग कमांडर अभिनंदन वर्थमान .!!

  

 स्क्वॉड्रन लिडर मिंटी अग्रवाल यांनी अभिनंदन यांना पाकिस्तानी विमानांच्या हालचालीची संपूर्ण माहिती दयायला सुरवात केली.

 

 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर पहिल्यांदा पाकिस्तानने आपल्या शत्रूवर कमीत कमी चार AIM 120 C -ARAAM मिसाईल सोडली. परंतु पाकिस्तानला भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि ताकदीची कल्पनाच नव्हती. आमचा प्रत्येक पायलट हा शूर तर होताच, शिवाय मरणाला न घाबरणारा होता. आमची सुखोई विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होती.NIIP बार्स रडारने  सुसज्जित सुखोई 30 MKI , जे पंधरा हवाई टार्गेट एका वेळेस ट्रॅक करू शकत होते आणि त्यापैकी चार ला एकाच वेळी उडवण्याची क्षमता ठेवते अशी विमान भारतीय हवाई दलाच्या ताफयात होती. भारतीय वायुसेनेची हीच खरी विशेषता आहे.

 

पाकिस्तानी जेट विमानांची आपल्या मिग विमानांना बघून पचारण धारण बसली आणि त्यांनी परत माघारी जाण्याचा निर्णय घेतला. ठरवून आलेल्या हल्ला ते करू शकले तर नाहीच पण जीव मुठीत घेऊन पळून जावे लागले. जातांना मात्र त्यांनी काहीतरी नुकसान करावे म्हणून  लेझर निदर्शित बॉम्ब ने एक स्थानिक पूल उडवला.

 

Dog fight :

 

अभिनंदन ने मात्र त्यांचा पाठलाग चालू ठेवला . ते पाकिस्तानी विमानांना परतून लावण्यासाठी शर्थिने प्रयत्न करत होते . जीवाची पर्वा न करता आणि सतर्कतेने त्यांनी एक पाकिस्तानी F-16 विमान टार्गेट वर घेतल.

अभिनंदनच्या मिग -21  बायसन ने पाकिस्तानी विमानांचा पाठलाग सुरू केला.जेव्हा हा पाठलाग चालू होता तेव्हा विंग कमांडर अभिनंदन ने ईबॉल मार्क 1 ने  F-16 विमान लॉक  करण्यात यश मिळवले म्हणजे पाकिस्तानचे ते विमान उडणार हे नक्की होते,पण त्याच वेळेस त्यांना इंडियन एअर फोर्स  कंट्रोल रूम ने रेडिओवर संदेश पाठवला की,

 

",शत्रूवर हल्ला करू नये लगेच परत

यावे ".

 

सैन्य नियमाच्या नुसार तुम्हाला LOC पार करण्यास परवानगी नसते  जरी तुम्ही शत्रूचा पाठलाग करीत असाल तरीही.!!

पाकिस्तानी पायलट ने लॉक काढण्यासाठी आपले विमान वेगाने वरच्या दिशेला उडवले पण तरीही ते अभिनंदनच्या तावडीतून  सुटू शकले नाही आणि तो पायलटही लॉक काढू शकला नाही.

 

अगदी अचूक वेळी  अभिनंदनने आपले R-73 मिसाईल फायर केले. इतिहासात पहिल्या वेळेस F-16 सारख्या अमेरिकन विमानाला ला हवेतच एका भारतीय पायलट ने उडवले होते.अभिनंदन ने F-16 मधून पाकिस्तानी पायलटला इजेक्ट होतांना बघितले  आणि त्याचं विमान खाली कोसळून तुकडे तुकडे झाले.

त्या विमानातील पाकिस्तानी पायलट शहाज उद्दीन ने पाकिस्तानाच्या नौशेरा भागात पॅराशूट लँडिंग केले, पण तेथील जमावाने त्याच्या वर भारतीय पायलट समजून हल्ला केला आणि त्याला प्राण गमवावा लागला. पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच देशाच्या पायलट चा जीव घेतला होता. 

 

या सर्व गडबडीत अभिनंदन चे विमान 7 ते 10 किलोमीटर LOC च्या आत POK मध्ये आले होते.वेगाने केलेल्या दिशेत बदल आणि भारतीय सीमेत परत येण्याच्या प्रयत्नात त्यांनी आपल्या विमानाला वरच्या दिशेने नेले परंतु त्याला खूप उशीर झाला होता जमिनीवरून पाकिस्तानी अँटी एअरक्राफ्ट गन फायरिंग करत होते. त्याच वेळी F-16 पळून जाताना पाठीमागे मिसाईल सोडत होते.  त्यातील एक मिसाईल अभिनंदनच्या विमानाला मागच्या बाजूला येऊन धडकलं, त्यांना आपल विमान सांभाळणं अवघड झालं शेवटच्या क्षणाला  त्यांनी इजेक्ट बटन दाबून त्यातून  बाहेर उडी घेण्याचा निर्णय घेतला . त्या वेळी तो नक्की म्हणाला असेल,

 

" हौसला बुलंद रखो मेरे यारो,

धरती अपनी हो या दुश्मन की....

अगर है हिम्मत  तुझमे,

तू लौटेगा वापस कसम भारत माँ की..   ".

 

पॅराशूट लँडिंग :

 

फायटर विमानातून इजेक्ट होणे ही वाटते तितकी सोपी किंवा सहज प्रक्रिया नाही. जेव्हा विमानाला आग लागते किंवा अलर्ट अलार्म वाजायला लागतो त्या वेळी पायलट ला हा निर्णय काही सेकंदात घ्यावा लागतो. ही अतिशय जोखमीची क्रिया असते. यातून वाचण्याची शक्यताही खूप कमी असते.

Ejection प्रोसेस मध्ये सगळ्या क्रिया या ठरल्याप्रमाणे काही सेकंदात होतात.

पायलटच्या  सीट जवळ समोर एक इजेक्ट हॅन्डल असते.त्याला सीट फायरिंग हँडल म्हणतात.

 

जेव्हा त्याला इजेक्ट व्हायचे असते त्याला एका विशिष्ट पद्धतीत बसावे लागते. जेव्हा पायलट इजेक्ट हँडल ओढतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती असलेले फायबर ट्रान्सपरन्ट कवच(त्याला canopy म्हणतात )उडून जाते. सीटच्या खाली एक्स्प्लॉसिव्ह कार्टीज असते जे सीट ला वरती घेऊन जाण्यास मदत करते त्या नंतर संपूर्ण सीट वरच्या दिशेला फेकले जाते. त्याच वेळी leg restraint system ऑन होते जी पायलट चे पाय विमानाच्या तुटलेल्या भागाच्या धडके पासून संरक्षण करते.

त्याच वेळी विमानाचा असलेला वेग आणि उंची किती आहे त्यावरून मुख्य पॅराशूट किती वेळानंतर उघडेल हे ठरवले जाते. कारण त्यासाठी हवा विरळ असून चालत नाही.

 

सीट च्या खाली रॉकेट मोटर पॅक असतात ते सीट चा वेग मर्यादित करतात कारण पायलटला विमानाचा वेग प्राप्त झालेला असतो. नंतर काही सेकंदाने जे सीट असते ते पायलट पासून वेगळे होते आणि आकाशात पायलट स्वतःच्या पॅराशूट ने वेगळा होतो,या पॅराशूट ला ही वरती आणखी एक छोटे पॅराशूट असते त्याला Drouge म्हणतात हे पुन्हा खाली येण्याचा वेग कमी करत आणि मेन पॅराशूटचे मोशन स्लो करण्यास मदत करत आणि पायलट जमिनीवर सुरक्षित लँड होतो. यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी पायलटला spine injury होण्याची मोठी शक्यता असते.

 

अभिनंदन ची POK त लँडिंग :

 

अभिनंदन पॅराशूट ने ज्या जागी उतरला ती जागा होती पाक व्याप्त कश्मीर मध्ये हुराणगाव. जिल्हा भिंबर !!

डोंगराळ चढ उतार जमीन,नदी नाले आणि मोठ मोठी दगडे असलेला हा जंगल प्रदेश!

उतरतांना अभिनंदनच्या पाठीला खूप मार लागला होता परंतु तो मात्र जमिनीवर उतरण्यात यशस्वी झाला.

किती दुर्दम्य साहस आणि किती ते धाडसी काळीज !!

मनात किंचितही भीती नाही , जो प्रसंग येईल त्याला देशासाठी सामोरं जाण्याची तयारी हाच एका सैनिकांचा विशेष गुण असतो.

 पाकिस्तान सारख्या देशाच्या भूमीवर इतक्या मोठ्या संकटातून उतरून जनतेमध्ये असलेला भारताबद्दल रोषाचा त्यांना सामना करायचा होता.

 

उतरल्यानंतर तो काही वेळ तो तसाच पडून होता. नंतर त्याने लगेच स्वतःला सावरले व जवळील रिव्हॉल्वर ने स्वरक्षणासाठी तो तयार झाला. थोड्याच वेळात त्या गावातील काही लोक त्याचा शोध घेत त्या ठिकाणी पोहचले, कारण बऱ्याच लोकांनी त्याला पॅराशूट ने खाली येतांना बघितल होत.

 

अभिनंदनने त्यांच्या कडे पाण्याची मागणी केली. 

रहिवाश्यानी त्याला सांगितले की आमच्या जवळ आत्ता पाणी नाहीए . तेव्हा अभिनंदनने त्यांना विचारले,

"यह भारत है या पाकिस्तान? ".

 त्या लोकांनी त्याला खोटं सांगितलं.

" यह इंडिया है. " एक जण उत्तरला.

हे ऐकताच अभिनंदन ला आनंद झाला त्याने " जय हिंद, जय हिंद " चे नारे दिले .

परंतु ते पाहून एक बुजुर्ग पाकिस्तानी ला ते सहन झाले नाही.

तो म्हणाला ", यह भारत नही, पाकिस्तान है."

अभिनंदनला अंदाज आला होता. जय हिंद ला कोणी प्रतिसाद दिला नाही तेव्हाच अभिनंदन ने ओळखले होते.

तो तडक उठला आणि त्या जमावापासून दूर निघाला. दूर दिसणाऱ्या एका नाल्याजवळ येऊन थोड पाणी पिला व नंतर जवळील गोपनीय कागद, नकाशे यांचा बोळा करून चावायला सुरवात केली,उद्देश हा की शत्रूच्या हाती आपल्या देशाची कोणतीही माहिती मिळू नये. अभिनंदन अगदी सगळ्या गोष्टी वायुसेनेत शिकवलेल्या नियमानुसार करत होता.

तेथील जमाव एव्हाना त्याला पकडायला जवळ येऊ लागला होता,तेवढ्यात त्याने रिव्हॉल्वर रोखून जवळ येऊ नका म्हणून सर्वाना बजावले.

 जमावातील एकाने जवळ असलेल्या रायफलने एक राऊंड त्याच्या पायाजवळ फायर केला. परंतु लगेचच तेथे आर्मीचे लोक आले त्यांना पाहिल्यावर आता सरेंडर व्हायला हरकत नाही म्हणून त्यांनी रिव्हॉल्वर जमिनीवर ठेवले व हात वरती केले.

जवळ असलेला जमाव त्याच्यावर तुटून पडला आणि त्यांनी अभिनंदला मारायला सुरवात केली त्याचा चेहरा रक्तभंबाळ झाला होता.

तेवढ्या वेळात पाकिस्तानी आर्मीचे दोन ग्रुप तेथे पोहचले.

पाकिस्तानी मेजर मोहिज याला अभिनंदन ने सांगितले की,

", मेजर मी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान.. इंडियन एअर फोर्स कमांडर ,27981. मी सरेंडर होतोय... मला या लोकांपासून वेगळ करा. "

अस म्हंटल्यावर मेजर मोहिज ने त्यांना आपल्या ताब्यात घेतले व जमावापासून वाचवले. कारण जमावाने हल्ला करून त्यांचा जीव सुद्धा घेतला असता. पण एका सैनिकाला युद्धाचे नियम माहित असतात.त्या नियमानुसार मेजर मोहिज ने त्यांना संरक्षण दिले.

परंतु अभिनंदनचा व्हिडिओ सगळीकडे वायरल झाला होता . भारत सरकारने पाकिस्तानाला स्पष्ट शब्दात सुनावले की तुम्ही जिनेवा कराराचे उलंघन केले आहे. "कोणत्याही युद्ध कैद्याला अमानुषपणे मारहाण करता येत नाही."

पाकिस्तानला आपली चूक कळाली होती. ताबडतोब अभिनंदनला मेडिकल ट्रीटमेंट देऊन चहा आणि चौकशीचा नवीन व्हिडिओ पाकिस्तान सरकारने शेअर केला.

 

अभिनंदनची चौकशी आणि चहा चा कप :

 

अभिनंदन फक्त 4 तास हे पाक आर्मी सोबत होते तर जवळ पास 44 तास ISI सोबत रावलपिंडी मध्ये होते. या दरम्यान त्याला खूप त्रास ही सहन करावा लागला. ISI  तर त्याला म्हणाले होते की आता तुला तुमची RAW सुद्धा वाचवू शकत नाही.

अभिनंदन ला पाहुणचार देतांनाचा व्हिडिओ जाणूनबुजून बनवला गेला जेणेकरून त्याला आम्ही  चांगली वागणूक दिली आहे हे जगाला समजावं, परंतु तेथेही अभिनंदने त्यांना चोख उत्तर देऊन  गार केले.

 

पाकिस्तानी अधिकारी : तुझं नाव काय आहे?

अभिनंदन : विंग  कमांडर अभिनंदन.

पाकिस्तानी अधिकारी :  तुम्हांला आमच्या आर्मी कडून कशी वागणूक मिळाली?

अभिनंदन : पाकिस्तानी कॅप्टन ने माझे जमावापासून संरक्षण केले आणि मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांनी मला संरक्षण दिले.

मी खरंच खूप प्रभावित झालो.

पाकिस्तानी अधिकारी : विंग कमांडर, तुम्ही भारतातल्या कोणत्या ठिकाणाहून आहात?

अभिनंदन : मी हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे का? माफ करा, पण मी हे नाही सांगू शकत.

मी भारतातील दक्षिणेकडील खालच्या भागात राहतो.

पाकिस्तानी अधिकारी : तुम्ही विवाहित आहात का?

अभिनंदन : हो मी विवाहित आहे.

पाकिस्तानी अधिकारी :आशा करतो, तुम्हाला दिलेला चहा आवडला असेल.

अभिनंदन :चहा खूप छान झालाय धन्यवाद!!

पाकिस्तानी अधिकारी : आता काही मुद्द्याची प्रश्न विचारतो, तुम्ही कोणते विमान उडवत होता.

अभिनंदन : माफ करा, पण मी हे सांगू शकत नाही. पण मला खात्री आहे की तुम्हाला विमानाचे तुटलेले तुकडे सापडले असतील.

पाकिस्तानी अधिकारी :  तुमचा नेमका उद्देश काय होता ?

अभिनंदन : माफ करा, पण मी हे सांगू शकत नाही.

अभिनंदनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातांना गाडी मध्ये सुद्धा खूप माहिती काढण्याचे प्रयत्न केले पण त्यांनी काहिही उत्तर दिले नाही त्यावर ISI चा अधिकारी म्हणाला तू सांगितले नाही तरी तुमचा भारतीय मेडिया सर्व माहिती देतोय तू कुठला आहेस? तुझे वडील सेनेत कोण होते? तुझ्या परिवाराबद्दल सर्व माहिती तुमचा मेडिया च सांगतो आहे.....

विचार करा.. त्यावेळी अभिनंदन ला किती वाईट वाटले असेल.?

पाकिस्तान वर अभिनंदन ला सोडण्यासाठी भारताचा राजकीय दबाव इतका होता की त्यांना अभिनंदनला सोडावे लागले.

 

1 मार्च 2019:

अखेर 1मार्च ला रात्री 9.00 नंतर पाकिस्तानने अभिनंदन ला वाघा बॉर्डर वरून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्या वेळी त्यांच्या सोबत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन जॉय थॉमस कुरियन व त्यांच्या सोबत एक महिला होती. कित्येक लोकांना वाटले की ती त्यांची पत्नी आहे, पण वास्तविक त्या होत्या डॉ. फारिहा बुगती.!!

 त्या पाकिस्तानी ऑफिसर होत्या विदेश विभागाच्या( भारतीय ) डायरेक्टर हया पदावर होत्या.

आजही पाकिस्तानी वायुसेनेच्या संग्रहालयात अभिनंदनचा वायुसेनेचा ड्रेस, हत्यारे आणि इतर वस्तू ठेवलेल्या आहेत त्या बघून प्रत्येक पाकिस्तानी त्यांच्या शौर्याचे कौतुक करतो.

 

जय हिंद.

 

- प्रकाश फासाटे.

मोरोक्को.

212661913052

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू