पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बोवारा

 कथा : संजय व्ही. येरणे.

 

बोवारा

 

   मायेनं आजपण हाताले तेल जिरवून देतांनी म्हणलं, "लयंच दुखते का रे बापू? आरं सोडून देणं हे काम. कायले करतस तं? भेटत असन तं दुसरं काम पाह्यं. रातदिन हात दुखते, हात दुखते म्हून घरी आला का बोंबलतेस. कधीमंधी त्या फार्मसितल्या गोळ्या पण खातेस, पण रोजचंच तुह्यं हे...! आये, शुभे... त्या कोनोड्यात उल्लूकसा झेंडूबाम असन तं पाह्यं, आन बरं! तो तरी याच्या हाताले जिरवून देतो."

   माय अशीच रोज काही न काही पटरत माह्या हाताले तेल जिरवून देवाची. माह्यं हात लई भारीच दुखत व्हतं. पण बोंबलून का फायदा बाप्पा! रातभर दुखण आनं सकारी आणखी ताजतवानं वाटन. हे रोजचच....

   म्या रातीले घरी आल्यावर हातातली मेनकापडाची थैली मायले देल्ली. लहान बहीण शुभांगीनं त्या थैलीतले अन्न काढून ठेवलं. दोघ्या मायलेकी त्याच अन्नावर पोटभर जेवल्या. म्या लग्नातूनच जेवून आल्यानं फक्त आता थकल्यानं निजायचंच राहिलं व्हतं. निजायच्या अगदूर म्याच हात दुखत असल्यानं मायेले तेल लावून दे म्हणलं. न आता तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला व्हता.

   कधीमधी तं ह्या माह्या अश्या सडल्या जिंदगानीचा तरास येवाचा. वाटे, 'सालं, का आपलं हे जगणं व्हय!' आसं जगण्यापरीस तं अळात जीव देवून टाकावा. जनावरापेक्षाही लई बत्तर दिस आले. डोऱ्यात पाणी येवाचं पण मायले दाखवून काय फायदा?

   तिह्यं तेल जिरवून व्हताच म्हणलं, "राहू दे न वं, होते ना! जा आता झोप, मालेपण झोप येत हाय."

   "उद्या कनच्या गावला जाणार आहेस रं वाजवाले? हाय का कोठं कारयकरम."

   "हाय नं, उद्या त्या विरलीच्या पाटलाच्या पोरीचं लगन हाय."

   "बरं बाप्पा! जा, पण एवढा हात दुखते तं कायले वाजवाचं रे जोरानं, थोडासा विसावा तरी घेत जावावा. नाहीतं पुढं कसं करसीन ह्या हातानं."

   "आवं माले का होते, तू दिसभर दंडात जाऊन वाकून-वाकून काम करतेस तवा तुह्यी कंबर दुखते न, तसच माह्यंपण हाय."

   "आरं लई शहाणा हायेस बाप्प्पा... आता तुह्यं लगन जूडलं, घरी सूनबिन येईल. या शुभीचे पण दोनाचे चार हात व्हतील, याचीच वाट पाह्यंत हाय. पण का माहीत कधी तुमचा योगायोग जुळून येईल तं. एवढ्या पोरी पाह्यतून तुह्यासाठी, पण आजकाल आपल्या गरिबीचे हाल पाहून कोणीबी पोरगी देवाले, नं मांगाले तयार नाय."

   "आवं तसच हाय, गरिबाचा कोठं जमाना राहिला हाय आता. कोण पोरगी देणार माले, ना बरुबर कामधंदा, ना रावाले चांगला घरदार, ना शेतीवाडी. या खेड्यात राहून कसंबसं जगणं हाय. कंचापण पोरीचा बाप आजकाल पोरगं मालदार हाय का पाह्यंते. माह्यं जाऊ दे, पण ह्या शुभीचं तरी लगन जुडल तं बेस व्हईल. गरीब का गुदा, कोणता पण पोरगा भेटल तं चिंता संपल. मग म्या आपलं पाह्यत बसीन.

   मायेले म्या अस्याच लग्नाच्या गोष्टी काढल्यानं काहीबाही सांगत बसलो व्हतो. रातचे दहाक वाजले असंन, घरात घड्याळ नसल्यानं अंदाज लावूनच आम्ही येळ ओळखायचो.

   शुभीनं बोतऱ्या हातरल्या. माय तेलाची वाटी बाजूला ठेवून शुभीनं हातरलेल्या बोतरीवर जाऊन निजली. मालेपण आता दिवसभराचा थकवा आल्यानं, लांब पाय करत म्या खाटेवर आंग पसरलो व्हतो.

   खोपाटातला दिवा मायेनं बंद केला. सप्पा अंधारही अंधार झाल्यानं म्या डोरे मिटले. आता ढाराढूर झोप लागल असंच वाटत व्हतं. पण कायची झोप येते, सालं, या जिंदगानीचा ईचार रातदिन येवाचा. झोपलं का कितीक रात उघड्या डोऱ्यानं सपन पाहण्यात जावाचं. लई येळपर्यंत मनात काहीनंबाही ईचार येवाचे. आनं म्या मनाले सजवतच रावाचो. आजपण झोप न येता असच ईचार येत व्हते.

   'सालं, आपण बोवारा म्हून जन्माले आलो का? गरीब घरात, गरीब मायबापाच्या पोटी जन्मलो, हा जगण्याचा शापच असन का? गरीबाचे पण काळ निंघते म्हणतेत पण कई निंघणार. कई नवी वाट भेटणार? आता पस्तीस वर्षाचा घोडा झालू. पण पाचसालापासून लगन करीन म्हणलं तं कोणीबी पोरगी देवाले तयार नाय. का म्हणून असं? तं गरिबी हाच कारण...'

   'म्या आपल्याच मनाले समजावायचा. उद्या तरी नशीब उजडतील. चांगले दिस येतील. अरेच्चा! तो मोदी म्हणे, "अच्छे दिन आने वाले है|" कोठले का? नं कोठले का? सप्पा श्रीमंतायचेच अच्छे दिन आले हायत.'

   डोऱ्यात आता चुरचूर आग होऊ लागली व्हती. डोळे मिटून पण झोप येवाले येळच लागत व्हता. मनात दिसभराचे काम नं सारं काही जसाच्या तसं आठवत व्हतं.

   'आज सावरगावले त्या रोमीच्या लग्नाले वाजवाले गेलतून. तव्हा कसं नाचत व्हते समधे. सालं, कुठून पैसा आणत असतीन हे लोक? मस्त महागड्या गाड्याघोड्या, त्यायची शानशौकीन, नाचनं, खाणंपेणं, आनं लग्नातलं मटकनं, चांगलं आंगभर सोन्यानाण्याने नटून-थटून मस्त हासत खेळत असतेत श्रीमंतायच्या बायका, पोरी.'

   म्या धुमाल डीजे पार्टीत रोज ढोल वाजवले जावाचो. एका कारयकरमाचे दोनशे रुपये मजुरी भेटाची. नाय तं आमच्या खेड्यापाड्यात कोठली आली मजुरी. म्हणून म्या डीजे मालकाले भेटून कामाले लागलो. आता आमच्या डीजे पार्टीत पंचवीस जण कामाले होते. एक-एकजन कॅसीओ, तबला, साऊंड सिस्टिमवर रावाचे, एक गाडीवर ड्रायवर, एक दीनवाजी, एक कमी जास्त मदतीले आनं दोन जण फुलवारीचे लाईट पकडाले रावाचे. आनं आम्ही बाकी सप्पा लोकं ढमढम ढोल बदडवायचो. म्या तालासुरात ढोल वाजवाले दोन महिन्यातच शिकून घेतलो. आता चार सालापासून याच मालकाकडं ढोल वाजवाले जात हाय.

   धुमाल पार्टीत ढोल वाजवणं लई कठीण काम व्हतं. चांगली लगनाची वरात दोन-तीन तास नाचून-नाचून लगनाच्या मांडवात पोहचाची. तवा हात नं हात दुखाचे.

   "आज मेरे यार की शादी है|" असं कनचंपण गाणं सुरू करून धुमाल पार्टीचा ढोलताल सुरू होवाचा. तव्हा नवरदेवाकडील पाव्हणं पोरंबारं मस्त ताल धरून नाचू लागाची. कईकई 'चांगलं जोरात वाजवा नं बे!' म्हणून शिव्याशाप देवाची. बरेचसे लोकं तं दारू पेवून धिंगाणा कराची. पण त्यायले कोण का म्हणणार? आपलं काम हाय तं करत रावाचं एवढंच...

   "सालं, किती पैसा उडवतेते लगनावर, विनाकारणचाच हा खर्च नाही का? कोठून एवढा पैसा येत असन, मोठ्या थाटामाटानं लगन केलं का इज्जत वाढते म्हणतेत. त्यायचं बी बरुबर हाय. पैसा हाय तं कुठूनतरी नास करावाच लागल नव्हं..."

   म्या खाटंवर निजल्या-निजल्याच अशा ईचारात किती नं किती वेळ गडून जावो. एवढं हातपाय दुखत असतानी पण लवकर झोप यायची नाय. समदी मनात चिंता न कायच्याबाही ईचार येवाचे.

   सालं, आपण पण श्रीमंत असतो तं. आपणबी चांगल्या श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माले आलो असतो तं. आपण बी असंच मिजास केला असता का?

    'आरं हॉ! ती पोरगी कोणाची हो का तं? पहादेखाले मोठी गोरीगोमटी व्हती. बारीक-बारीक हातपाय, लंबीलंबी गुलछडी सारखी. मोठी बेस वाटली. ढोल वाजवता वाजवता तिच्याकडं एकसारखं पाहत राहावंसं वाटे. सालं लईयेळ तिच्याकं पाहातच रायलू.

    'किती नशा चढल्या सारखी नाचत व्हती!'

    "नाना नाना नारे... नारे, नारे....सड्डेनार...," गाण्याचा ताल धरून पुढं झिंगझिंगाट कराची. पक्की सैराटच वाटली मले. तिह्या नाचण्यानं तं सप्पाले ताव येत व्हता, बिनपेताच नशा चढत व्हती आनं समदे तीह्यासोबत लगट करत नाचत व्हते. तिह्ये मायबाप लगनात असतील तर त्यानले का वाटत असल आपल्या पोरीबद्दल. हेच का यायची संस्कृती हाय. व्हय, आता आपल्याले असं वाटते पण या लोकायची हेच संस्कृती.... एन्जॉय, मिजास का म्हनतेत तसं.'

   'आनं काहो ते, त्यायच्या बायायच्या गऱ्यात किती सोन्याचे दागिने घातले व्हते. जस्या स्वर्गातल्या सुंदरा म्हनतेत तसं. सोन्यानं मढलेल्या अप्सराच वाटत होत्या. जरीकाटाच्या त्या महागड्या साड्या, कपडे, पोरायचे सूटबूट आणि डोकस्यावर किरायाने घेतलेले फेटे....'

   "ए बजाव रे जोरसे...! साले हराम का पैसा लेते क्या?" कोणीतरी अंगात दारू चढल्यानं आमच्यावं जोरानं खेकसत शिवी हासडली व्हती. पण का कराचं? आता राग आला म्हून आपण दातओठ खाऊन गुमान रावा लागे.

   हे आसं रोजचच पाचवीले पूजलं व्हतं. सालं ह्या दारूनं त पूरता सत्यानाश केला हाय. जवान-जवान माझ्यासारखी पोरं पोटात रिचवून असे नाचतेत, असे लगनात एन्जॉय करतेत. मलेपण वाटे एखाद्या दिस घेऊन पाहावी का? पण नाय... असं वंगाळ शौक कोण करल. कधीमधी माह्ये सोबती म्हणतेत घेणंरे उल्लूकसी. पण म्या नाय म्हणतो. त्यायच्या चार हात दूर जातो. काही आमचे वाजवायचे सोबती पण पेतेत देशी दारू. पण ह्या श्रीमंत लोकायची इग्लींश दारू महागाची रायते, यायले नाही जमणार हेंदडा दारूचा शौक.

   "दारू पेल्ली का रात्रभर प्रश्न, समस्या सब संपतेत. कोठला ईचार पण येत नाय. मनात धुंदी चढल्यानं सारं काही संपते. चिंता, दुःख थोडा येळ का असेना माणूस मुक्त होते. शांत झोप लागते. म्हणून तं पेतो."  माह्या सोबती गणेश नेहमीच माले सांगते. असो बाप्पा! आपल्याले काहो. ज्याचा त्याचा तो प्रश्न.

   रात्री एकदोन तास ईचारात पडलो व्हतो. माय, बहीण ढाराढूर निजली व्हती. पण माले तं या चिंतेनंच खाऊन टाकलं व्हतं. कई येणार चांगले दिस...

   व्हय, किती साला हा लगनावर खर्च करतेत. आपलं लगन जुळलं तं. आपण तं या जन्मात असं लगन लावूच शकणार नाय. कुठून आणाचा एवढा पैसा. गऱ्यात हार टाकून नवरी आणाची एवढंच....

   काही पोरं तं पोरीले पटवून लगन कोर्टात करतेत. पण आपल्याले कई पटन का पोरगी? गरीब पोरायवर कोण मारल लाईन. कोण करल लव का फव. हे समधं श्रीमंतातच चालते. श्रीमंतांयचे हे चोचले हायत. गावातली ती शांता, किती सुंदर हाय पावादेखाले. म्या तीच्यावं लई येळ लाईन मारून पायलो. पण तिनं कोठं आपल्याले भाव देल्ल्ला का? नाय ना! पुढं तीह्यं चांगल्या घरी लगन जुळलं.

   सालं, आपलं नशीबच बोवारं हाय. बोवारं म्हून जन्माले आलो, बोवारं म्हून मरण येणार, संपली जिंदगानी येथच.

   लगनात पोटभर जेवण केलून. कॉफी, चायनीज, नुडल, गुपचूप, चहा, थंडा, रसगुल्ले, गोडधोड, आनं वीस-पंचवीस येगयेगळे पदार्थ, भातभाजी, सुवाऱ्या बनवले व्हते. पाचशे लोकायले दोनक लाख रुपयाचा जेवण टेंडर असन. हॉल पण किती मोठा, बगीचा सजवला व्हता. चांगलं हॉलही लाख, दीडलाख रुपयाचा असन. सोनं-नाणं, कपडेलत्ते, घोडागाडी, आमचा डीजे धुमाल, फोटोशुटींग, द्रोणकॅमेरा, टीव्ही पडदा, जानेयेणे, आनं सटरफटर खर्च, दहाक लाख रुपयाचा खर्च.  

   नवरदेव लगन मंडपात येताच नवरीला पण मस्त नाचतगाजत, फटाके उडवत स्टेजवर आणलं व्हतं. नवरीच्या डोऱ्यावर काळाकाळा चष्मा लावून तिच्या आजूबाजूले गाण्याच्या तालावर ताल धरून नाचणाऱ्या पोरी, छम्मकछल्लो वाटत होत्या.

   कसं आनंदानं बोलत व्हती सगळे. हासत होती, खिंदळत व्हती. कुणाले पण दुःख, समस्या असन असं वाटतच नोव्हतं. किती पुण्यवान असतील नाय का हे लोकं? सालं, मागच्या जन्मात पाप केलं असन तं या जनमात असं आमच्यासारखं उकीरड्यावर जनम व्हतो. किड्या मुंग्या सारखा जगावा लागते. असं म्हणतेत. खरं असन का हे? सब सालं थोतांड हाय हे भविष्य. पण मनाले सजवासाठी असंच म्हणतेत नवं.

   लगन लागलं नं जेवाले गेलो तवा परफ्युम, अत्तराचा वास ड्रेसमधून आला. कोण नाय भूलणार अशा पोऱ्यायले. पण आपली लायकीच नाय तं त्यायच्याकडे पाहून का फायदा बाप्पा?

   रातचं लगन असो का दिसाचं. म्या लग्नातून पिशवीत मायबहिणीसाठी थोडसं अन्न मागून आणो. मायेले पण बेस वाटे. आता म्या रोजरोज वाजवाले जातो तव्हा हे मोठेमोठे कॅटरसवाले देतेत बिचारे अन्न घरी नेवाले. नायतरी कितीतरी अन्न उरते, नासाडी होते, म्हून आम्हाले घेऊन जा म्हणतेत. आज पण म्या जेवण घेऊन आलो व्हतो.

   निजल्या निजल्याच म्या दुखऱ्या हाताले दाबून पाहिलं. हात ठणकणं थोडं कमी झालं व्हतं. थोडंस बरं वाटत व्हतं. लगनातलं खाऊन नरड्याले कोरड पडली व्हती. म्या हळूच उठून माठातलं पाणी प्यायले गेलो. गिलासाचा आवाज व्हताच माय मांजरबिंजर असन म्हून जागी झाली. खाडकन उठून ईकंतिकं पाहू लागली. तिले म्या दिसलो.

   "अजून नाही झोपलास का रे? जास्तच दुखते का हात? मायेनं माले पुसलं व्हतं.

   "नाय वं तहान लागली म्हून उठलो." म्या मायेले म्हणलं आनं पाणी पेवून खाटंवर पुन्हा निजाले गेलू.

   "बरं बाप्पा, जा झोपून जा, पुन्हा सकारी वाजवाले जावा लागते नं." 

   म्या खाटेवर आंग टाकलो. डोरे बंद केले. पण डोऱ्यात झोप येता येईना. हा श्रीमंतायचा नजराना डोऱ्यासमोर येतच व्हता. बारबार त्या पोरी, पोरं, माणसं, बायका, त्यायचा नाच, धिंगाणा, फटाके, सोनंनाणं, त्यायचा हासना-खिंदडना, त्यायचा वरातीवर नोटा उडवणा, डोऱ्याम्होरं आठवत सामोर येत व्हतं. डोऱ्याम्होरं तेच तेच चित्र समोर येत व्हतं. आनं डीजेच्या तालावर लागलेली गाणी, म्युझिक जशीच्या तशी मेंदुले झिनझिन्या देत व्हती.

   "चलो जावो दिल्ली, मुंबई, आगरा...

   नही मिलेगा ऐसा घागरा...."

   "ले गई... ले गई...

    दिल मेरा, ले गई... "

   "तू मुझे कबूल.... मैं तुझे कबूल....

    इस बात का गवाह......"

   सालं, किती-किती गाणे डोक्याले, मेंदुले झिनझिन्या देत व्हते. हातानं ढोल बदडवाचा. ताल धराचा नं ढोल बदडवत नाचाचं.

   "बजाव... बजाव, वन्स मोर...!" नं त्यायचा तो धिंगाणा.

   झालं, चांगलं लगन झालं. किती सुखात आनंदात राहत असतीन हे जोडपे? पैशाच्या राशीवर नाचणारे हे लोक, पैशाच्या पलंगावर झोपतेत तव्हा त्यायले कसं वाटत असन? मखमली नरम-नरम पलंगावर हनीमून....

    सालं, दिमागाचा सप्पा भेजा झाला हाय. फुटते का रायते तं....

कधीमधी वीट येते या जिंदगानीचा... वाटते अळात जाऊन लवावं. एकदाचं संपवावं जीव, सारं दुखणं... पण पाठची बहीण, मायेचं कसं व्हणार....? कसंतरी आपण आहो म्हून ही भिकारडी जिंदगानी पुढं सरकत हाय. मरून तरी कोणता फायदा व्हणार...? नाय आपल्याले जगावच लागल, नाय आपले लगन झाले तरी, बहिणीचे चार हात करासाठी गरीबगुदा पोरगा पाहून तिले उजवावच लागल. एकच सपन हाय आता.... या दुनियेसारखं आपणबी मोठं व्हाचं, हा कामधंदा सोडून दुसरा कामधंदा करावाचा.

   "पण कणचा धंदा? एवढा पैसा कोठून आणाचा? कोठलातरी मार्ग भेटला तं! अरेच्चा, म्हणतेत नं 'भगवान के घर देर है| अंधेर नही|' साला, माह्या जीवनाचा अंधार, अंधारच रायणार का? कव्हा दूर होणार अंधार? भेटणार का आपल्याले ह्या श्रीमंत लोकांसारखं सूत्र..."

   पुनःपुन्हा तेचतेच प्रश्न, डोरे मिटता मिटेना.... ती घाम सांडवू सांडवू नशा चढल्यागत नाचणारी बारकी पोरगी... पक्की डोऱ्यात सलते हाय...

    उद्या माह्या बहिणीचे पण असंच लगन व्हईल, तो खेड्यावरचा गरीबाचा पोरगा पाहून गेला हाय... त्यानं होकार देल्ला तं लई बेस व्हईल...

   म्या कूस पलटवली. पुन्हा डोरे मिटले. हात तसाच दुखत व्हता. त्यापेक्षाही मनाले झोंबलेले दुःख, किती मोठं हाय? हे कोणाले ठाऊक नाय.... माझ्या रातीच्या राती अस्याच उलटत व्हत्या. तेवढ्याच माह्या मायेच्या रातीही अस्याच डोरे मिटून उलटत.... आनं डीजेचे वाजवलेले गाणे मनाले आनंद देण्यापरीस बारबार आठवत मेंदुले झिनझिन्या पोचवत डोकं ठणकावत रावाचे. डोरे लागता लागेना.... ईचार संपता संपेना...

   पुन्हा सकारची आस राहाची... उद्याचा दिवस अशाच आसेवर पुढंपुढं..... हा बोवारा जनम घालवासाठी.....

 

संजय व्ही. येरणे.

नागभीड, चंद्रपूर

९४०४१२१०९८

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू