पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चैत्र गौरी

चैत्र गौरी


चैत्र महिन्याती शुद्ध तृतीया. पार्वती शंकरासह माहेरी येते. तिचे हे माहेरपण अक्षय तृतीये पर्यंत असते. लेक माहेरी आली की, तिचा आईला लेकीसाठी, जावयासाठी काय करू आणि काय नको असे होऊन जाते. आणि ही तर साक्षात जगत जननी आदिमाया अन्नपूर्णा.तिच्या येण्याने सर्व वातावरण प्रसन्न
होते .मग तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. तिच्या येण्याप्रित्यर्थ घरोघरी उत्सव
साजरा केला जातो .मग ह्या कौतुकात, सरबराईत माहेर पणाचा एक महिना कसा निघून जातो कळतच नाही. सासरी जाण्याचा दिवस जवळ जवळ येतो. मग आई आपल्या लेकीची कौतुक नातेवाईकांमध्ये करायला आसुसलेली असते. त्या साठी ती हळदी कुंकू चा कार्यक्रम ठरवते सगळ्या आया, बाया, मुली, सुना यांना आमंत्रण जातात. उंची मखमली गालिचे अंथरले जातात. घरात एका कोप-यात मातीचा डोंगर बनवून त्यावर कधी किल्ला बनवायचा.आरास रचायची .त्यावर मातीचे सैनिक ,पशुपक्षी ,पाण्याच तळं बनवण्यात बालगोपाळ मंडळी रमायची.मग तिथेच चैत्रगौरीला कधी झुल्यात तर कधी पाटावर,किंवा चौरंगावर बसवायच . तिच्याभोवती सुंदर रागोळी सजायची.फुलोरा टांगला जायचा. त्यात विविध प्रकारच्या पापड्या,चिरोटे, करंज्यांचा नैवेद्य दाखवला जायचा.बाहेर अंगण रांगोळ्यांनी भरून जाते. खाण्याची तर रेलचेल असते.चविष्ट अशी आंब्याची डाळ, फिकट हिरव्या रंगाचे साखर, मीठ, विलायची, बर्फ घालून केलेले आणि काचेच्या ग्लास मध्ये शिगोशीग भरलेले थंडगार फेसाळलेले कैरीचे आंबट - गोड पन्हे त्यावर केशर . मोगऱ्याचा भरगच्च गजरा, सानुल्या हाताच्या आकाराचा बत्ताशा तांबूस पिवळ्या रंगाची भिजवलेल्या चण्याची ओटीची रास, केवडा - खस अत्तराचा घमघमाट, गुलाब पाण्याचे सुगंधित तुषार.जरीकाठी साड्या घालून डोक्यावर भरगच्च मोग-याचा गजरा घालून बायका तयार व्हायच्या. बांगड्यांचा नाजूक किणकिणाट, नवविवाहितेला केलेला उखाण्याचा आग्रह.लहान मुलींचे खणाचे परकर पोलक घालून नटण -मुरडण.नंतर एकमेकींच्या आग्रहाने सर्व सुवासिनी उखाणे घ्यायच्या.हसण्या खिदळण्याच्या आवाजात सारा परिसर नादमय व्हायचा.कोणी गाणे म्हणायचे. एकूणच काय आनंदी आनंद. मग यथेच्छ डाळ करंजी पन्ह्याचा आस्वाद आणि मग समारोपाची सुगंधी सुपारी.अहाहा!चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाचा थाटमाट काही वेगळाच असतो.या हळदीकुंकवाची एक विशेषता ही पण असते की हळदीकुंकू झाले की नंतर पुरूषांना पण डाळकरंजी खाण्यासाठी आमंत्रण दिले जाते. मग पानसुपारीचा कार्यक्रम होतो.तस म्हणायला गेल तर चैत्राच हळदीकुंकू पण त्यात सर्व भाग घ्यायचे.रस रंग गंध घेऊन आलेल्या चैत्रगौरी मनाला नवचैतन्य देऊन जातात.
चैत्रगौर म्हटली की मला माझ्या लहानपणीची आठवण येते.माझ माहेर धुळ्याचं.तिथे चैत्र महिन्यात देवीची जत्रा भरायची.एक महिना असायची.मग दर शनिवार
रविवारी जत्रेत मोठी माणसं आम्हाला घेऊन जायची .तिथे रहाटपाळण्यात बसायचो.तो पाळणा उंचावर गेला की आपण सा-या जगाचे राजा असल्याची भावना मनात यायची .खाली पाहिले की सारे जग आपल्यासमोर थिटे भासायचे.बर्फाचा गोळा ,भेळ,ऊसाचा रस,कुल्फी एक ना अनेक गोष्टींची मागणी करत जत्रेत तासनतास फिरायचो.पाय दुखले की वडिलांच्या खांद्यावर बसून फिरायला एक आगळीच मजा यायची.प्रंचड गर्दी असायची.मोठ्यांचे हात घट्ट पकडून असायचो.हात सुटला तर हरवून जाण्याची भिती मनात सतत असायची.त्या गर्दीत दरवेळेस कोणी लहान मुल हरवायचच.मग एकच धावपळ व्हायची.कोणाला तरी ते लहान मुल सापडायच .मग पोलीस कर्णावरून सूचना
द्यायचे.मग त्याचे आईवडिल त्याला धपाटे मारायचे.मग त्या मुलाच रडण आणि ते थांबावं म्हणून परत त्याला बर्फाचा गोळा दिला जायचा.
सर्व सावळा गोंधळ असायचा पण त्यातही मजा
यायची.आज चैत्रगौरीवर लिहीताना हे सर्व क्षणार्धात नजरेसमोर आल.पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत मन रमलं.बालपण हे
रम्य असत !


सौ ऐश्वर्या डगांवकर. इंदूर
मध्यप्रदेश
मो. नं 9329735575.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू