पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

*दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा ।*
*पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।*

रामायण ही भारताच्या मौलिक भाव भावनांची भागीरथी आहे. काळ जसजसा पुढे सरकला तसतशी ही भागीरथी विश्वव्यापी झाली. रामायणात आलेले राजधर्म, यतिधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म आणि या परस्पर संबंधांना नियत करणारे सर्व हृदय धर्म हे जगभरातील भाषांमध्ये झिरपत जाऊन रामायणाची गोडी सर्व जगाला लागली.
आपल्या भारत देशात ईश्वरच वारंवार अवतार घेतो असे नाही; तर त्याचे चरित्र देखील युग धर्माला अनुकूल असा अवतार घेत असते. वाल्मिकींचे मूळ रामायण, दक्षिणेकडील कवी कंबन यांचे रामायण, उत्तरेकडील तुलसीदासांचे रामायण, महाराष्ट्राचाच विचार करायचा तर एकनाथांचे भावार्थ रामायण, कृष्णदास मुद्गल यांचे रामायण, मोरोपंतांची १०८ रामायणे, लक्ष्मणराव पांगारकर यांचे कविरामायण, डॉ. मराठे यांचे झोपाळ्यावरचे रामायण, डॉ. कुलकर्णी यांचे प्रसाद रामायण, तसेच कवी ग.दि.माडगूळकरांचे अखिल महाराष्ट्राला वेड लावणारे गीत रामायण असे रामायणाचे अगणित अवतार झाले; पुढेही होत राहतील.
कवीश्रेष्ठ ग.दि.माडगूळकरांच्या गीत रामायणाचे वैशिष्ट्य हे की, त्यातील स्वर सौंदर्य उलगडून दाखवायला सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या सुमधुर संगीताची साथ लाभली.
गदिमांनी रामायणातील एकेका कथेचा भाग एकेका व्यक्तीच्या तोंडून, याप्रमाणे एकूण छपन्न गीतांतून आपले गीत रामायण शब्दबद्ध केले आहे. या गीतांमधून गदिमा करुण, वीर, रौद्र, अद्भूत इत्यादि रसांची उधळण करतात. प्रेम, कर्तव्य, सेवा, वात्सल्य, बंधुत्व, शत्रूत्व अशा विविध मानवी विकारांचा नि भाव भावनांचा गुंता हलके- हलके सोडवून दाखवितात. रामायणाचे मोठेपण सांगताना गदिमांनी हनुमंताच्या तोंडून "जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नित रामायण" असे रामायणाचे महात्म्य सांगितले आहे.
गीत रामायणात प्रभु रामचंद्रांच्या तोंडी, खालील सात गीते आहेत. १."दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आंहे जगती पुत्र मानवाचा", २." उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी?" ३."मी धर्माचे केले पालन, वालीवध ना, खल निर्दालन", ४." सुग्रीवा, हे साहस असले, भूपतीस तुज मुळी न शोभले ", ५."आज का निष्फळ होती बाण, पुण्य सरे की, सरले माझ्या बाहुंमधले त्राण?", ६." किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूते, लीनते, चारुते सीते" आणि ७."लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची";
यातील, श्रीरामांच्या आदर्श चरित्राचा सम्यक व सर्वांगीण प्रत्यय देणारे नि मानवी जीवनातील आदर्शांची व इतिकर्तव्यांची मानव जातीला शिकवण देणारे "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे गदिमांच्या गीत रामायणातील सर्वोत्कृष्ट नि सर्वाधिक लोकप्रिय गीत आहे. गदिमांचे भावोत्कट शब्द आणि स्वररत्न सुधीर फडके यांचे सुमधुर स्वर -संगीत यांमुळे "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे गीताने महाराष्ट्रातील तमाम रसिकांना वेड लावले.
वनवास सुरू झाल्यावर अनपेक्षितपणे झालेल्या भरत भेटीच्या प्रसंगी श्रीरामांनी भरताला जो उपदेश केला ; त्याचा मतितार्थ वाचकांना उलगडून दाखविणे आणि त्यातून प्रभु श्रीराम आणि स्वमातेच्या स्वार्थी वागण्याने व्यथित झालेला, अत्यंत निर्मळ मनाचा, त्यागी नि कर्तव्यपरायण भरत या दोघांच्या आदर्श व्यक्तीमत्वांचा वाचकांना परिचय करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे.
रामास वनवासात धाडून माता कैकयीने रामायणातील आदर्शवत वर्तनांना खिंडार पाडले. त्यावेळी भरत व शत्रुघ्न हे दोघे आजोळी गेले होते. भरत आजोळाहून परत आल्यावर पित्याचा मृत्यु आणि राजकुलातील प्रचंड उलथापालथ घडविणाऱ्या नाट्यमय घटना ऐकून तो स्वमातेवर प्रचंड संतापला. श्रीरामांना परत आणण्यासाठी तो ससैन्य रामाच्या भेटीला गेला. सेना सोबत घेऊन येण्यामागे श्रीराम, सीता आणि आपला वध करणे हा कैकयीपुत्र भरताचा उद्देश असू शकतो; असे वाटून लक्ष्मण त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाला. श्रीरामांनी लक्ष्मणाला रोखले. भरताने व्यथित अंतःकरणाने श्रीरामांच्या पायांस मिठी घातली; पितृनिधनाची दुःखद वार्ता अवरुद्ध कंठाने श्रीरामास कथन केली. "आपण अयोध्येस परत चला नि राज सिंहासनाचा स्वीकार करा!"असा घोषा भरताने श्रीरामांकडे लावला. भरताचा शुद्ध हेतू समजल्यावर श्रीरामांनी भरतास ऊराऊरी कवटाळले. श्रीरामांनी यथाकाळ वडिलांचे श्राद्ध केले.
"माझ्या आईच्या मूढपणामुळे व वडिलांच्या पत्नीप्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावे लागले; अयोध्येस परत चला!" असा हट्ट भरताने श्रीरामांकडे धरला; तेव्हा वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देत श्रीरामांनी भरताला त्याचा कर्तव्य धर्म, समजावून सांगितला; हा उपदेश ग.दि. माडगूळकरांनी "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" या गीतातून अत्यंत प्रत्ययकारीरीत्या आपल्यापर्यंत पोचवला आहे. तो असा,
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मानव वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

श्रीराम भरताला म्हणाले," भरता, मी सांगतो ते नीट समजून घे. आपल्या प्रारब्धात जी दुःखे आपल्या वाट्याला येणार असतात; ती आपणाला भोगावीच लागतात; आपली त्यापासून यत्किंचितही सुटका नसते; कारण मनुष्यमात्र त्याबाबतीत स्व-आधीन नसतो तर पराधीन असतो.
भरता, तुझे जे काही अपसमज झाले आहेत ते प्रथम दूर कर. माझा राज्यत्याग आणि वनवास हा माझ्या पूर्वजन्मींच्या संचिताचा प्रभाव आहे; त्यासाठी माता-पित्यांना जबाबदार धरणे उचित होणार नाही.
जीवनातील उलथा पालथ हा मानवी जीवनाचा स्थायीभाव असतो. माणसाची कधी भरभराट होते तर कधी पतन होत असते. माणसाने कितीही धन संचय केला तरी अंततः त्याचा नाश ठरलेला असतो. मीलनानंतर वियोग किंवा वियोगासाठी मीलन हाही जगाचा एक नेमच असतो.
जन्म नि मृत्यू यांचा जोडा जन्मजात असतो. आपल्याला समोर जे जे दिसते, त्याचा कधीतरी विनाशच होणार असतो; मग स्वप्नात दिसणाऱ्या फळांची प्राप्ती झाली नाही म्हणून शोक का आणि कशासाठी करायचा?
जे जाणते आहेत त्यांची मती, मरण, मृत्यु या कल्पनेपाशी येताच कुंठित होते; आता हेच पहा, पिताजींचा मृत्यु आणि तुझे इथे या वनवासात येणे या घटना जरी अकस्मात असल्या तरी अतर्क्य म्हणता येणार नाहीत.
म्हातारपण नि मरण कुणालाही चुकलेले नाही; दुःख कधीच भोगावे लागले नाही, असा मनुष्य या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. जे जे वर्धमान म्हणजे वाढत जाणारे असते, ते ते वाढता वाढता कायमच क्षयाच्या मार्गाला म्हणजे उतरणीला लागत असते. हा निसर्गनियम आहे हे कायम लक्षात ठेव.
जीवनात योगायोगांना फार महत्व असते. समुद्रात दोन ओंडके अचानक एकमेकाजवळ येतात, एक जोरदार लाट येते नि ते दोन ओंडके दूर फेकले जातात; माणसांचेही असेच असते; ती अशीच काही क्षणांसाठी एकमेकाजवळ येतात; अकल्पितपणे काही तरी अघटित घडते नि पुन्हा न भेटण्यासाठी ती दूर फेकली जातात.
भरता, आता विलाप नको करू; डोळे पूस. नियतीने तुझे नि माझे मार्ग वेगळे केले आहेत; तू अयोध्येत राजा हो; कारण तुझ्या नशीबी राजपद व माझ्या नशिबी वनवास ठरलेला आहे.
मी मागे फिरावे हा हट्ट तू सोड; तुला राज सिंहासन सांभाळायचे आहे; तेव्हा हा असा तपस्व्यासारखा वेष परिधान करणे उचित नाही; आपणा दोघांनाही पित्याच्या आज्ञेचे पालन करायचे आहे; तू राजवेष परिधान कर आणि डोक्यावर मुकुट घाल.
अयोध्येच्या राज्य संपदेचा निदानआता तरी तूच स्वामी आहेस; कारण चौदा वर्षांचा वनवास भोगल्याशिवाय मला अयोध्येस परत येता येणार नाही; हे त्रिवार सत्य आहे; ते मला, तुला, स्वीकारावेच लागेल.
भरता, आता तुम्ही कोणीही या वनात परत येऊ नका. माझ्या मनात तुम्हा सगळ्यांविषयी अलोट प्रेम आणि आदरभाव सतत जागता राहणार आहे हे ध्यानात घे; तू कुशलतेने राज्यकारभार करून अयोध्येचा मान व नाव- लौकिक वाढवावा हीच आता माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे.
भरताची समजूत पटलेली दिसली तरी भरतासोबत आलेले ऋषिगणदेखील श्रीरामांना अयोध्येस परत चला नि राज्याभिषेक करवून घ्या! असा जेव्हा पराकोटीचा आग्रह धरू लागले. तेव्हा त्या सर्वांना नकार देत, श्रीराम म्हणाले, "भरता पित्याच्या आज्ञेने मला वनवास आणि तुला सिंहासन मिळाले आहे; तू परत जा आणि अयोध्येचे राज्य कर, हेच धर्मोचित आहे; पित्याच्या आज्ञेनुसार चौदा वर्षे वनवास भोगून मी सीता-लक्ष्मणासह अयोध्येत परत येईन, निश्चिंत रहा; श्रीरामांनी असे भरताला वचन दिल्यावर श्रीरामांच्या पादुका राज सिंहासनावर ठेवून श्रीराम परत येईपर्यंत विश्वस्त भावनेने राज्यकारभार पाहण्याचे ठरवून भरत अयोध्येस परतला.
वाचकहो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीतातून आपण प्रभू श्रीराम आणि भ्राता भरत यांच्या आदर्श व्यक्तित्वाचा परिचय करून घेतला; आज रामनवमी . श्रीरामांचा जन्मदिन. रामनवमीच्या या पावन पर्वावर आपण प्रभू रामचंद्रांचे नाम स्मरण करूया!
जय राम श्रीराम जय जय राम।

*सर्जेराव कुइगडे*

राम नवमी, दि. १०/०४/२०२२

;

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू