पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाणी हेच जीवन

आज २२ मार्च जागतिक पाणी दिन आहे. पाण्याचे महत्व सांगणारी ही छोटीशी गोष्ट नक्की वाचा.


पाणी हेच जीवन


     जयच्या शाळेला मे महिन्याची सुट्टी होती. अभ्यासाला बुट्टी असल्याने जयची स्वारी खूप खुश होती. मित्रांसोबत वेगवेगळे खेळ खेळणे, कधी सिनेमा तर कधी बालनाट्य बघणे, मित्रांसोबत भेळपुरी,पाणीपुरी, चाट, मिल्कशेक, आइस्क्रीम इत्यादी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणे चालू होते. शाळेची घाईगडबड नसल्याने जय अगदी निवांत होता. मे महिन्यातल्या अशाच एका रविवारी जय स्नानगृहात शॉवर खाली निवांत अंघोळ करत होता. अंघोळीसोबत गाणे म्हणण्यात जय अगदी तल्लीन झालेला होता. त्याला वेळेचे काही भानच नव्हते. " अरे जय, किती वेळ शॉवर खाली अंघोळ करतो आहेस. पुरे झाले आता. " आईच्या या उच्च रवातील बोलण्याने जयची समाधी भंग पावली. " हो आई, आलोच बाहेर. " असे म्हणून जय मनाप्रमाणे अंघोळ करून बाहेर आला.

     स्वयंपाक घरातून खमंग वास येत असल्याने जयने आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे वळवला. "आई, आज रविवार स्पेशल काय बनविले आहेस?" जयच्या या प्रश्नावर आई म्हणाली," आज छोले भटुरे आणि तांदळाची खीर केली आहे." जय आनंदाने म्हणाला," वा! वा! अगदी फक्कड बेत आहे आज. " आई जयला म्हणाली," जय, जवळ जवळ अर्धा तास तू शॉवरखाली अंघोळ करत होतास. अंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरणे अजिबात योग्य नाही. " जय म्हणाला, " अगं आई, उन्हाळ्यात गार पाण्याचा शॉवर घ्यायला खूप मजा येते." आई म्हणाली," ते ठीक आहे. पाण्याचा वापर जपूनच केला पाहिजे." यावर जय म्हणाला, " आई, तुझे हे नेहमीचेच आहे. अगं एक दिवस जास्त पाणी वापरल्याने असे काय आभाळ कोसळणार आहे?" आईने जयला एक प्रश्न विचारला," जय मला सांग, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? " जय म्हणाला,"७१% आहे." आई म्हणाली, " बरोबर. या ७१ टक्क्यांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण किती आहे?" जय म्हणाला," पिण्यायोग्य पाणी ३% आहे. पण आई, आता परीक्षा संपलेली आहे. तू मला हे प्रश्न का विचारत आहेस?"

आई म्हणाली, " अरे फक्त परीक्षेपुरतेच नाही तर आपल्या जीवनातील पाण्याचे महत्व तुला कळावे म्हणून मी हे प्रश्न तुला विचारत आहे. आता मला सांग, हे ३% पाणी आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरतो?" जय म्हणाला," कपडे,भांडी धुण्यासाठी, सफाईसाठी, स्वयंपाकासाठी घरी वापरतो. औद्योगिक प्रकल्प, कारखाने, हॉटेल्स, हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाण्यापासून वीजनिर्मिती पण केली जाते."   

       आई म्हणाली," अगदी बरोबर, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे . शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते. वनस्पती, पशुपक्षी यांनाही आपल्यासारखेच पाणी लागते. आपले निसर्गचक्र हे पाण्यावर अवलंबून असते. उन्हाळा आला की नद्या,तलाव, पाणवठे यातील पाणी आटते. धरणातील पाण्याचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. आपल्याला नळ सोडला की पाणी मिळते, पण खेड्यापाड्यात, छोट्या गावात, पाडे आणि वस्त्यांमध्ये लोकांना पाण्यासाठी खूप वणवण, खूप पायपीट करावी लागते. या लोकांचे पाण्याविना खूप हाल होतात. उन्हाळा सुरू झाला की टॅन्करने गावोगावी पाणी पुरवठा केला जातो. टॅन्कर आला रे आला की बादल्या, हंडे, कळशा , पाईप घेऊन हे लोक अक्षरशः धावत सुटतात. पाणी मिळविण्यासाठी या लोकांची आपसांत भांडाभांडी, मारामारी होते. पाण्याच्या अभावामुळे या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते."

       जय म्हणाला, " आई, एवढा विचार मी केला नव्हता. आता तू ज्या पद्धतीने मला गावातील लोकांचे पाण्यासाठी होणारी वणवण वर्णन करून सांगितलीस त्यावरून या विषयाचे गांभीर्य माझ्या लक्षात आले आहे. यापुढे पाण्याचा वापर मी जपूनच करीन. " आई म्हणाली," अलीकडे पाऊसही उशीरा सुरू होतो. अशावेळी धरणातील पाणीसाठा तळ गाठतो आणि मग पाणी कपात केली जाते. दोन वर्षांपूर्वी पाऊस उशीरा चालू झाल्याने आपल्याकडे पाणी कपात होऊन एक दिवसाआड पाणी येत होते. विसरलास की काय? " जय म्हणाला, " हो आई, मी विसरलोच होतो ही गोष्ट. बरे झाले तू मला आठवण करून दिलीस. यापुढे मी पाण्याचा वापर विचारपूर्वक करेन." आई म्हणाली," पावसाचे पाणी आपण साठविले पाहिजे. पावसाचे बरेचसे पाणी रस्त्यांमधून, गटारांमधून वाहून जाते. आपल्या घराच्या टेरेसमधून जाणारे पाणी आपण टाक्यांमध्ये साठवून ठेवले पाहिजे. यासाठी प्रत्येक गृहससंकुलात Rain water harvesting सारखे प्रकल्प राबविले पाहिजेत. गावागावांत मोठे खड्डे खणून त्यात पावसाचे पाणी साठविले पाहिजे. यामुळे पाणी जमिनीत झिरपून भूजल पातळी उंचावण्यासाठी मदत होईल. तसेच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे खूप आवश्यक आहे. यामुळे पावसाचे प्रमाण वाढून भूजल स्तरपण वाढेल. हे प्रयत्न सामूहिक रितीने करणे हे सध्याच्या काळात खूप आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात आपल्या सर्वांना मोठ्या पाणीटंचाईला सामारे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही."

       जय म्हणाला," हो आई, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी व्यवस्थापनात खारीचा वाटा उचलला तर ही चळवळ उभी राहील. तू मला सांगितलेले पाण्याचे महत्व मी माझ्या मित्रांनापण सांगेन. आज एका महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर तू मला माहिती दिलीस म्हणून खूप धन्यवाद देतो. आता मला कडाडून भूक लागली आहे. जेवायला वाढ पटकन." आई म्हणाली," लगेच वाढते तुला जेवायला."  ...... आणि आईने बनविलेले छोले भटुरे व तांदळाची खीर खाण्यात जय दंग झाला.


लेखिका :- ऋजुता देशमुख

       

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू