पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्यात खळबळ माजवणारी चार अक्षरे: सा डे सा ती

कुठलीही प्रस्तावना न देता कादंबरी सुरु होते, हाच सर्वात मोठा 'प्लस प्वाइंट'.

डॉ. गोगटे, शहरातील एक नावाजलेले आणि सन्माननीय चिकित्सक! शस्त्रक्रियेत पारंगत! त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक सोपी (त्यांच्या साठी सोपी) सर्जरी सुरू असते.. आणि अचानक कांप्लिकेशन्स येतात... पेशंटची एक व्हेसल कापली जाते... त्याला रक्ताच्या आणि डॉक्टरांना घामाच्या धारा लागतात!  प्रयत्न पणाला लावून डॉ. गोगटे त्या सर्जरीला सुखरूप पार पाडतात... आणि खिन्न अवस्थेत घरी परततात....जेवताना घडलेला प्रसंग ते आपल्या समजूतदार संगिनी शारदेला सांगतात.... आणि त्यांच्या स्वयंपाकीण बाई त्यांची साडेसाती सुरू झाली आहे, आणि आता काही ही चूक नसताना देखील असे प्रसंग उद्भवत राहणार असे सांगते. आणि इथपासून सुरू होते एक अतिशय रोचक कथा "साडेसाती".......

अर्थातच डॉ. गोगटे एक चिकित्सक असल्याने त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नसतोच.... पण एका पाठीमागे एक प्रसंग घडत जातात आणि डॉक्टरांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते....
डॉ. गोगटे ह्यांच्या आयुष्यातील घडामोडी, त्यांच्या ह्या खडतर प्रवासात त्यांच्या समजूतदार अर्धांगिनीचा बळकट आधार, विज्ञान आणि आधात्म ह्या मधली तफावत, एकीकडे साडेसातीचा प्रभाव सिद्ध करणारे शुभचिंतक आणि दूसरी कडे आत्मविश्वास वाढवणारे सोबती...
डॉ. निशिकांत श्रोत्री ह्यांनी एक-एक पात्र अतिशय अभ्यासपूर्वक लिहिला आहे.
प्रत्येक पात्राचे चरित्र चित्रण करताना डॉ श्रोत्री ह्यांनी अतिशय सखोल अभ्यास केला आहे. 

डॉ. गोगटे, शारदा, गोपाळराव, डाॅ. जोगळेकर सर्वच पात्र आपली छाप सोडतात. 

चिकित्सकीय क्षेत्राचा त्यांचा अनुभव कादंबरीच्या संवादातून स्पष्ट होतो. अतिशय प्रवाहपूर्ण आणि सहजपणे संवाद लिहिले आहे.
ते वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि नकळतच ते पात्र आपलेसे होतात... डॉ. गोगटे आणि शारदेची केमिस्ट्री सुंदर माडली आहे.
खूप संघर्ष करून एक "सेल्फमेड इमेज" आणि समाजात प्रतिष्ठा स्थापन करणाऱ्या एका प्रामाणिक आणि मनाने अतिशय भावनिक व्यक्तिमत्त्वाची ही सुंदर कथा!
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. श्रोत्री ह्यांनी एकदाही ही गोष्ट बरोबर, ती चूक किंवा विज्ञान खरे आहे की आधात्म हे पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही.
वाचताना एकदासुद्धा त्यांनी साडेसाती वर विश्वास किंवा अविश्वास दाखवला नाही. एका डॉक्टराच्या आयुष्यातील एक "फेज़" त्यांनी त्रयस्थपणे अतिशय रोचक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे.
नवल प्रकाशनाद्वारे प्रकाशित ह्या पुस्तकाचा आकार आटोपशीर आहे, मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. एखाद्या लांब प्रवासात एकाच बैठकीत वाचणारी ही 'इंटरेस्टिंग' कादंबरी.


डॉ. श्रोत्री ह्यांच्या एक भल्या मोठ्या साहित्यिक प्रवासाचा हा एक टप्पा संपूर्ण प्रवास करण्याची, त्यांचे संपूर्ण साहित्य वाचण्याची ओढ निर्माण करून गेला. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद!

ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू