पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

होळी रे होळी

होळी रे होळी!

(शब्दांकन-ज्योति -अलोणे)

"ओय काकी …..! द्याना 2-4 लाकडं एवढा मोठा गाडा तं पडलाय तुमच्या अंगणात!

         "काय रे !अजून होळीला आठ दिवस बाकी आहे आतापासूनच तुम्ही निघाले लाकडं गोळा करायले ?" 

          काकी....! ऐक दिवस फिरून जमा होत नाही न लाकडं,कोणी आज देते कोणी दोन दिवसानं बोलावते...घरोघरी फिरा लागते ,जमा करा लागते लाकडं! होळा आन होळीदोन दोन पेटवा लागते ना! किती मेहनत करा लागते आमाले ,आता होळीचा एवढा मोठा सण त्याच्यात बी लाकडं द्दायले मागपुढं करता, काकी तुमा लोकांसाठी तं होळी पेटवतो."                        मागून घोगऱ्या आवाजात मोठ्याने कुणीतरी बोलल्ं!
         विकत घेतलेली लाकडं देतांना काकूच्या थोडं जीवावर येत होतं, पण होळीसाठी मागत आहे म्हटल्यावर समोर पडलेल्या लाकडाच्या गाड्यातुन दोन बारकी लाकडं निवडून पोरां समोर टाकत त्या खेकसल्या "हां ,हे घ्या लाकडं ,अरे इंधन आहे आमचं ते, आत्ता दोन दिवसापूर्वी गाडा विकत घेतला आहे फुकट नाही मिळत ना गाडा , लाकूडतोड्या मिळाला नाही म्हणून लाकडं अंगणात ठेवली आहे,लाकडं फोडल्या गेली असती तर तिकडे घरात नेऊन ठेवली असती तुमच्या डोळ्यांन दिसू दिली नसती , आता होळीच्या दिवशी चोरी नाही करायची लाकडाची हां,सांगून ठेवते, तुमचा काही भरोसा नाही, का रे पोट्ट्यांनो ऐकलं ना!जंगलात जाऊन काऊन नाही तोडून आणत होळीसाठी लाकडं !घरचं इंधन मागत फिरता ! चार दिवस आधी इंधन संपलं म्हणून शेजारच्या बाई कडून चार लाकडं उसनी मागून आना लागली होती !  कुरकुर करून कशीतरी दिली तीनं. त्याच्यातय तीनं ते तिडतिडं लाकुड दिलं होतं नुसतं तडतड करत होतं चुलीत घातलतं... काकून शेजारणी वरचा राग पोरान समोर व्यक्त केला...
काकीनं गाड्यातून काढून समोर फेकलेली  काडीवजा लाकडं दोन बारक्या पोरांनी हातात घेतली. एक टोक जमिनीवर टेकवून ते रस्त्याच्या मातीतून ओढत निघाले. त्या बारक्या लाकडाने मातीवर उमटलेले वाकडेतिकडे ओरखडे मागे वळुन बघतांना त्यांना मजा वाटत होती. 
         अबे, तिथं नका जाऊ बे! तो बुढा लई खुसट हाय अंगावर धाऊन येते ते , मांगच्या येळी पायलं नाई का ,पुढं चाला !
           कोणाच्या घरी होळीसाठी लाकडं मिळते ,आण कोण हाकलून लावते नाही हे पोराईले चांगलं माहीत होतं...
"काय रे मन्या या बाईकडे आलं का नेहमी अशीच भणभण करते , होळी पेटवासाठी तिले लाकडं मागीतली कां…
       "लई कंजूस हाय ते! पण होळी च्या नावाने देते…"
"अबे ,सुभ्या तिकडं गल्लीत पाहिलं का तिच्या, एक तुटकी खाट पडलेली आहे ...रात्री येऊन गूपचाप घेऊन जाऊ ,बसन बोंबलत ते"...टल्या हळुच बोलला..
"नाई बे ... राहू दे !  दुरुस्त करून घेईन ते ,गरमीत बाहेर निजाले कामी येईन त्यायच्या!"

    "घरच्या कोणाचे असे शिव्या शाप घेऊन होळी नाही पेटवायची आपल्याले बाबा ,जे दिलं ते चुपचाप घ्यायचं अन् होळी पेटवायची आपण...." कुणाचे तरी समजदार वक्तव्य..... 
                        "त्या टालावर चालता कां? तिथं लई मोठी मोठी झाडाचे खोडं पडलेले पाईले मीनं..... एखादा मोठा खोड मांगुन पाऊ !"

"हां चाला तिकडे जाऊ!"
म्हणत टोळकं गावाबाहेरच्या लाकडाच्या टालावर पोहोचलं. टालातल्या मोठमोठ्या खोडांचं प्रत्येकजण निरीक्षण करू लागलं. कोणत्या मोठ्या खोडाची मागणी करायची आता टालाच्या मालकाकडे म्हणून.... टाल मालकाने  दिलेलं तेच मोठ लाकूड मधोमध ठेऊन होळी रचल्या जात होती..
टालाचे मालक समोरून येताना दिसताच ,घोळका मालकाजवळ पोहोचला. मालक दिलदार स्वभावाचे एक वयस्क ग्रुहस्थ होते . खुर्चीवर आरामात बसत ते म्हणाले
"काय रे होळी आली का जवळ निघाली तुमची टोळी बाहेर!
अरे काही अभ्यास बिभ्यास?का नुसत्या टवाळक्या?
टालाचे सत्तरऐक वर्षाचे असणारे काका दरवर्षीच मुलांना होळीसाठी लाकडं काढून देत.
              काकांनी  केलेल्या  चौकशीने मुलं खुष झाली ...एका लहानश्या चतऱ्या पोराने संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं, धिटाईने समोर होत तो काकाच्या पाया लागला.                         "काका आशीर्वाद द्या आम्हाला !आम्ही चांगल्या रीतीने पास होऊ म्हणून... काका दरवर्षी तुम्ही दिलेल्या लाकडानं आमची होळी मोठ्या आकाराची होते…
ते बघून बाकीची पोरही समोर होऊन काकाच्या पाया लागली.
टालवाल्या काकाने सर्वांना भरभरून आशीर्वाद दिला ... म्हणाले, मस्ती च्या वेळी मस्ती करा पण परीक्षेच्या वेळी अभ्यास करा ,चांगल्या मार्काने पास व्हा, चांगल्या नोकऱ्या करा अरे देशाचे भविष्य आहात तुम्ही पोरं!
          काका !तिकडं मोठ्ठ झाडाचं लाकूड किती वर्षापासून पडून आहे, तुमाले त्याच कायी काम नसन तर द्या ना आमाले होळी पेटवाले....
                      अबे ! त्या लाकडावर नजर नको ठेवू , महागडं लाकूड आहे ते , पाहिजेत दुसरे लाकडं देतो मी  !
                           असे संवाद त्याकाळी ऐकू  यायचे. मुलंही कधी हक्कानं तर कधी जबरदस्तीने ,तर कधी चोरून होळीसाठी लाकडं जमा करायची कुठलाही संकोच न बाळगता.... आणि मग आठ दिवसापासून घरोघरी फिरत लाकडे जमा करून होळीच्या दिवशी मुलं होळा अन् होळी अशा लाकडाच्या दोन मोठ्या होळ्या रचल्या जायच्या... मुहूर्त पाहून होळी पेटवली जायची सगळेजण नैवेद्य आरती करुन होळीची पूजा करायचे ,होळीला नारळ अर्पण करायचे. रात्रभर होळी पेटत राहिली पाहिजे म्हणून पोरं रात्री सगळीकडे निजानीज झाल्यानंतर कोणाच्या कंपाउंडचे तुटलेले लाकडी फाटक, तर कोणाची लाकडी खाट ,कोणाची खुर्ची असं लाकडाचं सामान गुपचुप घेऊन यायचे आणि होळीत टाकायचे रात्रभर होळी पेटवत ठेवायचे. होळीकडे  लक्ष ठेवण्यासाठी जागरण करायचे, मस्तीला उधाण यायचं ,मजा वाटायची त्यांना त्या गोष्टीमध्ये!                                           दुसऱ्या दिवशी त्या होळीचा निखाऱ्यावर पाण्याचे छोटे-छोटे हंडे ठेवून लोक पाणी गरम करून आणायचे आणि ते आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने आंघोळ करायची, म्हणजे थंड पाणी बाधून सर्दी पडसं होणार नाही असा समज होता.. ऊन्हाळ्याची सुरवात झालेली असायची आणि त्या दिवसापासून मग थंड पाण्याने आंघोळीला सुरुवात व्हायची.... काही लोक शांत होत असलेल्या होळीतील जळते निखारे आणून घरच्या आंघोळीचे पाणी तापवायच्या चुलीत आणून टाकायचे....
धुळवडीच्या दिवशी बोंब मारायची पद्धतही होती... होळी रे होळी पुरणाची पोळीअन्……... 

       त्या होळीसाठी जमवलेल्या लाकडातुनच "घाण माकड" खेळ खेळला जायचा.ऐका छोट्या ओंडक्याला मध्यभागी होल करून त्याला जमिनीत पक्क्या बसविलेल्या लाकडावर ठेऊन मुलं लाकडाच्या दोन बाजूने बसायची काही मुलं ते लाकूड गोल गोल फिरवायचे."मेरी गो राऊंड "सारखे…

सणांच्या निमित्ताने मन भूतकाळात जातं आठवुन जातात त्या ऐक ऐक आठवणी!                                        "गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा…...
******************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू