पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निळा.... निळाई

- निळा.....निळाई -
खूप दिवसांनी मी मैत्रिणी कडे गेले होते.अचानक मला दारात पाहून तिला खूप आनंद झाला. तिने मला हाताला धरून आत नेले आणि सोफ्यावर बसवले. मी सोफ्यावर जाऊन बसत नाही.... तोच तिची चार वर्षाची मुलगी नेत्रा " मावशी ऽ " म्हणत धावत धावत माझ्याकडे आली..... गोरीपान..... गोबरे गाल.... नाकावरून ट्रेन गेल्याने चपटे झालेले .... पिटुकले नाक..... वाऱ्यावर भुरभुरणारे....रेशमी बाॅबकट केलेले ब्राऊन केस आणि परी सारखा घातलेला सुंदर गुलाबी घेरदार फ्रॉक....आणि मुख्य म्हणजे लक्ष वेधून घेणारे तिचे निळे डोळे. या गोड परीला पाहता-पाहता माझी नजर तिच्या डोळ्यावर स्थिरावली अन त्या डोळ्यांच्या निळाईत मी खोल खोल जाऊ लागले.मला काही समजत नव्हते. इतक्यात " स्मिता , अगं कुठे तंद्री लागली आहे ? कॉफी घे....गार होते आहे. " मैत्रिणीच्या हाकेने मी निळाईच्या डोहातून बाहेर आले.बघते तर परी माझ्याकडे पाहून आपल्या गोबऱ्या गालातून खुदूखुदू हसतेय.
खरेतर सारेच रंग मनाला मोहवितात . पण निळा रंग माझ्या मनाला जास्त आकर्षित करतो. मनावर खोलवर रुतलेला.....मनाला मोहविणारा...... मनाला भावणारा.... रंग निळा .त्याची निळाई मनाला खोल खोल घेऊन जाते.जसं समुद्राची निळाई खोल....खोल गेल्यासारखी वाटते.आकाश ..... किती किती वर जा.... ते संपतच नाही.ते निळे आकाश वर वर गेल्यासारखे वाटते.
या सृष्टीत विविध रंगांची उधळण झालेली दिसते.प्रत्येक रंग वेगळा .... प्रत्येकाचा गुण वेगळा .....भाव वेगळा.पण जेंव्हा हे मुळचे सातही रंग एकत्र येतात.... तेंव्हा इंद्रधनुष्य बनते.आणि ते इंद्रधनुष्य ???? त्या निळ्या आकाशात तोरण म्हणून लागते तेंव्हा त्या आकाशात आनंदाचा सोहळा चालू असतो....झिमझिमणारा तो पाऊस आनंद घेऊन धरेवर येतो. अन् सारी सृष्टी मोहरते .... हिरव्या पानातून.....सुंदर फुलांतून गोड हसून त्या निळ्या आकाशाच्या आनंद सोहळ्यात ती सहभागी होते.सर्वांच्याच मनावर...हृदयावर त्या इंद्रधनुष्याचे प्रतिबिंब उमटते.आणि तन - मन प्रफुल्लित होते.
त्या इंद्रधनुशातीलच निळा रंग जलतत्वाचे प्रतिनिधित्व करतो.त्यामुळे पाण्याचे सारे गुण त्या निळ्या रंगात असतात.निळा रंग पाण्यासारखा चंचल....गतीमान असतो.....तो जिवनदायी शक्ती देतो.
आकाशाची निळीई ही नक्कीच आकर्षक वाटते. आकाशही निळाईच्या वेगवेगळ्या शेड्स फेकत असतो . झुंजूमुंजूची पहाटेची निळाई हळूहळू फिकी होत जाते. रवी आकाशात येतांना लाल - सोनेरी - भरजरी रंगांची उधळण करत आकाशात येतो अन् त्या निळ्या आकाशाला वेगळीच झिलई देऊन सजवत असतो.
सुर्य जसजसा वर येऊ लागतो तसतशी ती रंगीत झिलई जाऊ लागते. आणि नंतर आकाश निळेशार दिसू लागते. समुद्रावरही ही निळाई पसरते . दूरवर पाहिले तर क्षितिज रेषाच अस्पष्ट झालेली असते. अस्पष्ट कसली ती दिसतच नाही.
समुद्रातून बोटीने जाताना तर खाली समुद्राची निळाई आणि वर आकाशाची निळाई आणि मधे आपण.... दूरवर दुसरे काही दिसत नाही. नकळत मन घाबरते व किनारा शोधू लागते . जेंव्हा दूरवर पक्षी दिसतात तेंव्हा हुश्श ऽ वाटते.
दुपारी रवी रागाने आग ओकत असतो. पण आकाश आपले शांत राहून मनाला दिलासा वाटेल अशी हलकीशी निळाई देत असतो.
आकाशाचे आपल्या धरतीवर भारी प्रेम असते. तो सारखे टक लावून तिच्याकडे बघत असतो. पण जेव्हा धरतीकडे बघतांना मध्ये झाडं येतात. तेंव्हा त्याला धरतीचे नीट दर्शन होत नाही. तेंव्हा तो झाडांच्या फांद्या मधून .....पानांमधून आपली निळाई फेकत.... फ्लाईंग किस देत असतो. धरती आपली उगाच लाजते.पण ती निळाई....ती आपल्या हृदयात साठवते.
सायंकाळी रवी परत आपले अस्तित्व.... आपले वर्चस्व दाखवायला सुरुवात करतो.आकाशाच्या निळाईवर विविध रंगांचा शेला पसरवून त्याच्या निळाईला झाकू पाहतो. सागरालाही आपले रंग देऊन त्यावरची निळाई झाकू पाहतो. पण त्याला कळत नाही त्याच्या गमज्या.... किती वेळ चालणार ?.... शेवटी खरंच रवीला माघारी जाता जाता त्या रंगीत शेल्याला गुंडाळून जावेच लागते. मग परत आकाशात उरते ती फक्त आणि फक्त निळाई . सारे जग त्या निळाईत डुबू लागते.
नंतर आकाशाची निळाई गडद गडद होत जाते.... काळपटते .....त्यावर एक एक चांदणी आपल्या अंगावर सुंदर चंदेरी शेला पांघरून..... नाजूक सुंदर पदन्यास घेत.... प्रवेश करते. आणि बघता बघता या गोपींनी सारे आकाश उजळते.या गोपी आल्या मग कृष्णही येणारच.तो कृष्ण.... सुंदर चेहऱ्याचा चंद्रही येतो.त्यांची रासक्रीडा सुरू होते आणि धरतीवर चांदणचुरा पडू लागतो. या चंदेरी प्रकाशामुळे सूर्य नसूनही आकाश काळे भासतच नाही. त्यात एक वेगळीच निळाई चमकत असते. तीच चंदेरी निळाई धरतीवर.... झाडाझुडपांवर.....झऱ्यांवर पसरते .खडकांवरून खळखळणाऱ्या झऱ्यांवर जेंव्हा ही चंदेरी निळाई पडते.... तेंव्हा जणू ते झरे निळे चंदेरी पदर वाऱ्यावर उडवत पायातले पैंजण रुणझुणवत नृत्य करीत आहेत असे वाटते. ती सर्वत्र पसरलेली चंदेरी निळाई मनालाही मोहविते.
अशा रात्री समुद्राकाठी , चंदेरी वाळूत बसून समुद्राच्या लाटा पहाव्या. त्या लाटा रात्र असूनही कधीच काळ्या भासत नाहीत. किनाऱ्याकडे येतांना त्या लाटावर चंदेरी निळाई स्वार झालेली असते.या लाटा खळखळ करत किनाऱ्यावर येतात आणि शंख - शिंपल्यांबरोबर चंदेरी निळाई किनाऱ्यावर पसरवतात.
एक सांगू ....?....आपल्या या विशाल निळ्या आकाशालाही खूप काही सोसावे लागते . आणि त्यामुळे कधीकधी त्याचे मन भरून येते . मग त्याच्या निळाईवर काळे ढग जमू लागतात आणि एक वेळ अशी येते की,त्याचे ते सोसलेपण पाण्याच्या रूपाने वाहू लागते . पण त्यामुळे आकाशाचे मन शांत होते.... स्वच्छ होते आणि पुन्हा सुंदर निळाई त्यावर विलसू लागते.या निळाईतून आकाश सुंदर स्मितहास्य करत आहे असे वाटते आणि तेच आपल्यालाही प्रसन्न करते.
म्हणूनच अशी ही सुंदर निळाई कधीही.... कुठेही मनाला मोहवितेच.

- स्मिता भलमे
- 9421058149
- 20/3/2022

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू