पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भालचंद्र नेमाडे : महाराष्ट्रभूषण

१९६३ या वर्षी प्रकाशित झालेल्या "कोसला" या कादंबरीने अखिल महाराष्ट्रात ज्यांनी खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य सृष्टीत "१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक " अशी ज्यांची प्रतिमा झाली; ते साहित्य अकादमी (१९९१), ज्ञानपीठ (२०१५) पुरस्कार विजेते महान मराठी साहित्यकार श्री. भालचंद्र नेमाडे यांना या वर्षीचा महाराष्ट्र टाईम्सचा, प्रतिष्ठेचा " महाराष्ट्र भूषण" पुरस्कार काल दि. २४/०३/२०२२ रोजी सन्मानपूर्वक प्रदान झाला. 
      भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म दि.२७/०५/१९३८ रोजी सांगवी, ता. यावल, जिल्हा जळगाव येथे झाला. वृत्तीने जन्मतः बंडखोर असल्याने त्यांचे वडिलांशी पटत नसे. वडिल जे सांगत त्याच्या नेमके उलट त्यांचे वागणे असे. 
     ' कोसला ' ही बहुचर्चित कादंबरी त्यांनी वयाच्या पंचविशीत लिहिली. यानंतर बिढार(१९६७), जरीला(१९७७), झूल(१९७९) अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून पुण्यात शिकायला आलेल्या तरुणाचे आत्मकथन असे या 'कादंबरी चातुष्टयाचे' स्वरूप आहे.
      भालचंद्र नेमाडे यांनी कादंबरी बरोबर काव्यलेखन आणि समीक्षा लेखनही केले. देखणी व मेलडी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या काव्य संग्रहांचे हिंदी, इंग्रजीत अनुवादही झाले आहेत.
      अगोदरच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास तीस वर्षांनी त्यांनी 'हिंदू' ही बहुचर्चित कादंबरी लिहिली. नेमाड्यांच्या हिंदू या कादंबरीवर प्रचंड टीका झाली पण त्याहूनही अधिक या कादंबरीचे भरघोस स्वागतही झाले. साहित्यातील बंडखोर वृत्ती, परखड पण साक्षेपी लिखाण, वस्तुनिष्ठतेला अग्रक्रम आणि लोकभाषेतून साहित्यरचना या लेखन वैशिष्ट्यांमुळे नेमाडे सर्वकालीन वाचकांना आपलेसे वाटतात. स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक असणारे नेमाडे, "जी,जी, महान व्यक्तीमत्वे या देशात होऊन गेली त्यांनी स्वभाषेतून शिक्षण घेतले होते हे लक्षात घ्यावे. इंग्रजी हटवणे हे ज्ञानपीठाहून मोठे आहे"; असे विधान 
परखडपणे व्यक्त करतात.
      रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करणाऱे नेमाडे, आपल्या समृद्ध परंपरा विषयी चिकित्सक आहेत. या बंडखोर साहित्यिकाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कधीही हजेरी लावलेली नाही. 'साहित्याची भाषा ' हे त्यांचे भाषाविषयक तात्त्विक चिंतन करणारे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते. 
      देशीवादाची संकल्पना मांडणाऱ्या नेमाड्यांनी देशीवादाचा सातत्याने आग्रह धरला. "पुण्या-मुंबईकडची जंगले नष्ट झाली; मात्र ईशान्येकडची जंगले अजूनही टिकून आहेत; का ते लक्षात घ्या. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे पुण्या-मुंबईकडच्या लोकांनी देशीवादाला दिलेली सोडचिठ्ठी हे याचे कारण आहे;" असे नेमाडे म्हणतात.
      हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांनी हिंदुत्व म्हणजे केवळ धर्मवाद नाही; तर ती सर्वसमावेशक अशी संस्कृती आहे; हे लक्षात ठेवावे; असे मत नेमाडे स्पष्टपणे मांडतात.
      नेमाडे यांना 'बिढार'साठी ह.ना. आपटे पुरस्कार (१९७६),' झूल या कादंबरीसाठी यशवंतराव चव्हाण पुरस्कार, (कराड- १९८४) ), साहित्याची भाषा ' साठी नरहर कुरुंदकर पुरस्कार (१९८७), देखणी काव्यसंग्रहासाठी कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१) तसेच ना.धों. महानोर पुरस्कार(१९९२), महाराष्ट्र फाउंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (२००१), कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (२०१३), असे अनेकविध पुरस्कार मिळाले.
      श्री. भालचंद्र नेमाडे यांना टीका स्वयंवर या टीका ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने (१९९१), आणि हिंदु या कादंबरीसाठी साहित्य क्षेत्रासाठी सर्वोच्च मानला गेलेल्या ' ज्ञानपीठ ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
      दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी २०१६ मध्ये "उदाहरणार्थ नेमाडे" हा भालचंद्र नेमाडे यांच्यावरचा डॉक्युफिक्शन चित्रपट निर्माण केला आहे.  
      महान साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना महाराष्ट्र टाइम्सचा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!


      *सर्जेराव कुइगडे*

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू