पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अमृततुल्य चिंचवणी

◆अमृततुल्य-चिंचवणी◆◆

 

 "अगं वहिनी, अभय च्या लग्नात वैशूला "सवाष्ण"  म्हणून नाही न  घेता येणार!

ती अक्षय तृतीयेच्या दिवशी "वहरी" बसलेली नाहीये!  मागच्यावर्षी अक्षय तृतीया झाल्यानंतर त्यांचे लग्न झालयं नं! 

       आत्या म्हणाल्या...अगं वैशु यावर्षी तुम्ही दोघेजण अक्षय तृतीयेला आमच्याकडे  "वहर " म्हणून बसायला या !आतापासूनच आमंत्रण देऊन ठेवते.म्हणजे पुढे तुला कुठल्याही लग्नकार्यात स्ववाष्ण म्हणून मान मिळेल नवरदेवासोबत रहाण्याचा….. असे पुर्वीचे  बोलले जाणारे संवाद अजूनही आठवतात.. आता त्या सगळ्या पारंपरिक पद्धती बदलल्या.पुर्वी सारखं लोकांत जाणं येणं कमी झालं.आता बरेच लोक अक्षय तृतीयेला आपल्या घरी आपल्या पूर्वजांच्या नावाने पानं पूजतात.नवीन कळशी आणुन पुजतात... 

       वैशाख शुद्ध तृतीयेला "अक्षय तृतीया "असे म्हणतात. वर्षातील अतीमहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस आहे. यादिवशी आपल्या "पितरांच्या" नावाने म्हणजे पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालण्याची पद्धत आहे. विदर्भात लग्न झालेल्या नवीन जोडप्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी " वहर"म्हणून बसण्यासाठी जेवणाचे विषेश निमंत्रण देतात.

 "अक्षय" याचाअर्थ कायम स्वरूपात रहाणारे म्हणजे दान असो की पुण्य कमावण्यासाठी करण्यात येणारे कार्य आणि म्हणुनच यादिवशी संपत्ती खरेदी करणे सोने खरेदी करणे अशासारख्या गोष्टी केल्या जातात . आपल्या पारंपारिक सणांमध्ये विशेषतः  या दिवशी आपल्या पितरांच्या म्हणजे पुर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थ तयार करून आपल्या पूर्वजांच्या नावाने व्यक्तींना जेवायला बसवतात.पुर्वजांपैकी आधी स्त्री सवाष्ण निधन पावली आणि त्यानंतर षुरूषाचे निधन झालेले  असल्यास , स्त्रीपुरुष दोघांच्या नावाने नवीन जोडप्याला किंवा नातेवाईकांना बोलावणं करून ,त्यांचे पाय धुवात. स्त्रीला हळदीकुंकू लावून व पुरुषाला गंध लावून हार घालून त्यांचा यथोचित मान करतात. आपल्या पूर्वजांच्या ठिकाणी त्यांना मानून त्यांचा सन्मान करण्यात येतो व घरातील लहान थोर मंडळी त्यांच्या पाया पडुन आशीर्वाद घेतात. 

या दिवशी केलेले दान "अक्षय दान" म्हणून समजले जाते. आपल्या  पूर्वजांच्या नावाने दान करण्याची पद्धत असल्यामुळे आमंत्रित जोडप्याला जलपुर्ण कुंभ म्हणजे  नाजूक 

मानेची  लालमातीची पाण्याची कळशी किंवा तांब्याची कळशी देण्याची पद्धत आहे. ही कळशी पाण्याने भरन त्यात वाळा घालून वरच्या झाकणावर कुरडई, सायपापड मिऱ्याचा पापड असे पदार्थ ठेवून देवाजवळ त्याची पुजा करून ते दान देण्यात येत असे  तसेच नवीन कपडेही देण्यात येता असे आता त्या प्रथालोप पावल्या आहेत.

या अक्षय तृतीया च्या दिवशी जेवनात काही विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. खास करून त्यामध्ये गव्हाच्या चिकापासून बनवल्या जाणाऱ्या "कुरडई आणि सांडया" याचे विशेष महत्त्व आहे.

या कुरड्या -सांडया बनवायची फार किचकट  प्रक्रिया आहे.  गहू आणि तांदूळ वेगवेगळे तीन दिवस पर्यंत भिजत घालायचे.त्याचे रोज पाणी बदलायवचे. मला आठवते आमच्या आई कडे किंवा त्यानंतरहीच्या काळामध्ये जेव्हा मिक्सर वगैरे नव्हते त्यावेळी तीन दिवस भिजलेले तांदूळ आणि गहू काढायचे त्यानंतर  पाट्यावर त्याचा चीक निघेपर्यंत ते वाटायचे.

एका मोठ्या पातेल्यात पांढरा स्वच्छ पातळ कापड गुंडाळून तो चीकगाळून घ्यायचा.  गव्हाचा चीकापासून कुरडया  आणि सांडया करण्यासाठी गव्हाच्याचिकात तांदळाचा चिक मिसळावा लागतो.

 आठवते ते आई,आजी चिक शिजवायची ऐका खाटेवर पांढरेशुभ्र धोतराचे कापड अंथरूण त्यावर साच्याने सुबकपणे गोल आकाराच्या कुरडया पाडल्या जायच्या.त्या फुलांसारख्या कुरडयावाळेपर्यंत पाखरं व जनावरांपासुन त्याचा बचाव करण्याची जवाबदारी आम्हा बालसैनिकांची असायची.आम्हाही हातात लांब काठी घेऊन राखण करत बसायचो. 

सांडया करण्यासाठी जास्त मेहनत लागायची. त्याकाळी चुलीवर स्वयंपाक असायचा. भर उन्हाळा  त्यात धगधगत्या चुलीवर मोठ्या पातेल्यात पाणी घालुन कापड बांधून चुलीवर  ठेवायचे.ताटाच्या खोलगट भागात पोळीच्या आकारात चिक पसरवायचा आणि  चुलीवरच्या ताटाला वरचा चिक वाफेने सुकेपर्यंत ठेऊन लगेच उलट्या बाजूने ठराविक वेळेपर्यंत वाफेवर शिजू द्यायचे आणि एखाद्या मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ते ताट  ठेवायचे. ती वाफेवर शिजवलेली सांडयी 

 दोन भाग एकमेकाला चिटकू नये म्हणून हळुवार काढुन एखाद्या मोठ्या "परड्यावर" म्हणजे  विशेषकरून वाळवणासाठी  कांबीपासून  तयार  केलेली  पसरट आकाराची वस्तु.  ……मोठी कसरत असायची.आताही हे जिन्नस केल्या जातात.आजकाल  विकतही मिळतात.

अक्षय तृतीयेला आपले नेहमीचे पारंपरिक पदार्थ तर असतातच. लाडु,करंजी,साटोरी, वडे, मिऱ्याचे पापड, कोशिंबिरी हे सगळेपदार्थ असतातच पण या दिवशी "चिंचवणी" या पदार्थाचा विशेष मान असतो. अहाहा , काय त्या "चिंचवणी" ची चव अगदी "अमृततुल्य" ! या चिंचवणीचा उल्लेख गजानन महाराजांच्या विजय ग्रंथातही आहे.

 विशेष म्हणजे "चिंचवणी "हा पदार्थ वर्षातून एकदा या अक्षय तृतीयेच्या दिवशीच केल्या जातो .कारण  वैशाखा पासून अगदी कडक उन्हाळा सुरू होतो आणि या चिंचवणी मध्ये टाकलेले जे पदार्थ असतात ते आपल्या शरीराला थंड करण्यास मदत करतात. त्यादिवशी  गोड चिंववणीसोबत कुरडई पापड  खाताना जिभेला आनंद व मनाला थंडावा देऊन जाते.

           माझ्या माहेरी चिंचेचे एक भलंमोठं झाड  होतं. उन्हाळा आला की त्याच्या वाळलेल्या चिंचा तोडल्या जायच्या. चिंचेचे वाळलेले टरफल काढायचं .टरफल काढून त्या चिंचांना एखाद्या दगडाने ठेचून त्यातले चिंचोके खेळण्यासाठी वेगळे काढले जायचे. कोणाचे जास्त चिंचोके के जमा होतात यासाठी आम्हा बहीणभावंडांमध्ये चढाओढ असायची. माझी आजी म्हणायची जो जास्त चिंच फोडेल त्याला माझ्याकडून पंचवीस चिंचोके बक्षीसहे चिंचोके  खेळण्यासाठी कामी यायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मधे.  आम्हीही आनंदाने ते काम करायचो ,अगदी ऐखादा  कीलोचा डबा भरेल ईतके चिंचोके प्रत्येकाकडे जमा असायचे.

आणि  चिंच फोडून झाली की आजी त्याला मीठ लावून वर्षभरासाठी वाळवून डब्यात भरून ठेवायची.  नविन निघालेली चिंच गोडसर असते. चिंचेला ऐका बारीक काडीला गुंडाळून ते  चिंचेचे बोबटु  खातांना जिभ टाळुला लावून विशिष्ट आवाज करून एकमेकांकडे बघून मिटक्या मारत चघळण्यास फार मजा वाटायची लहानपणी.

 तर  "चिंचवणी" बनवण्याची पद्धतही खासच आहे. विदर्भातला उन्हाळा आधीच कडक. उन्हाळ्याच्या दिवसात ही चिंचवणी खायची .चिंच ही ऊष्ण पदार्थात मोडते,त्यामुळे त्याची दाहकता कमी करण्यासाठी  त्याच्यात विशेष घटक टाकून ती तयार केली जाते.हे विशेष घटक म्हणजे त्याची उष्णता कमी करण्यासाठी "गहूला व कचूला"नावाची  विषेश वनस्पती टाकली जाते. हे या अक्षय तृतीयेच्या एक दोन दिवसातच बाजारात विकायला असतात. चिंचवणी करण्यासाठी सगळ्यात आधी सकाळी  चिंच भिजत घालून ठेवायची आणि ऐका वाटीत थोडी खसखस, थोडं खोबऱ्याचा तुकडा, थोडे तांदूळ,गवला कचुला ,वाळ्याचेमुळ, हे जिन्नस भिजत घालायचे. दोन-तीन विड्याचे पान त्यात  प्रमाणानुसार काथ ,चुना लावून ठेवायचे ,थोडसं जायफळाचा तुकडा .लवंग ,विलायची

तुप आणी गोड होण्यासाठी  त्यात  भरपूर गूळ घालतात. तांदळासोबत भिजवलेले  सगळे पदार्थ व विड्याचे पान हे सगळे जिन्नस मिक्सर मधून वाटून अगदी बारीक करून चिंचेच्या काढलेल्या गरामध्ये एकत्रित करायचे. त्यानंतर पातेल्यात तूप घालून लवंग विलायची ची फोडणी करून त्यात  चिंचेचा गर टाकायचा प्रमाणानुसार पाणी घालायचे.त्याला उकळी आली की त्यात मग योग्य प्रमाणात गूळ घालायचा आणि भरपूर उकळु द्यायचं... वरून त्यावर चारोळी टाकायची. "गहूला कचुला" या सुगंधित  वनस्पतीमुळे चिंचवणीचा  एक वेगळाच सुगंध दरवळतो.  हा पदार्थ जेवढा थंड होईल किंवा शिळा होईल तेवढी जास्त त्याची गोडी वाढते.

लिहिताना सुद्धा तोंडाला पाणी सुटते या "अमृततुल्य चिंचवणीची" आठवण काढून…

लग्न झाल्यानंतर माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी आम्हा दोघांना अक्षय तृतीयेला "वहर" म्हणून जेवायला बोलावले होते तेव्हा माझ्या आजीच्या हातची चिंचवणीची चव अजूनही  माझ्या जिभेवर रेंगाळते. आम्हीही हे सगळे पदार्थ करायचो.  पण तेव्हा तो 50 जणांचा जेवणाचा कार्यक्रम . ते "वहरी" बसलेले  दोन तीनजोडपे ,"पितर" म्हणून बसणाऱ्या दोनतीन व्यक्ती तो थाटमाट ,ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बारावाजेपर्यत पंगत बसली पाहिजे म्हणून  बायकांची चाललेली लगबग, वेळेत स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून उडालेली बायकांची तारांबळ लहान मुलांचा गलका.बैठकीत बसलेल्या घरच्या थोरा मोठ्यांसाठी जेवणानंतर खाण्यासाठी तयार केलेले विड्यांच्या पानाचे तबक. तयार सगळं सगळं डोळ्यासमोर येते आणि आठवते ती आठवणीतली अक्षय तृतीया आणि ती आजीच्या हातची "अमृततुल्य चिंचवणी"

********************************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू