पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक अविस्मरणीय घुट..

एक अविस्मरणीय घुट..

अशी ही डिश आहे की कुठल्याही 5 स्टार हॉटेल मध्ये न मिळणारी किंवा कुठल्याही हॉटेल मध्ये न मिळणारं हे अप्रतिम अस घुट माझी आज्जी बनवत असे.. साधारण 1968/69 च्या वेळेस
उन्हाळ्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीतच गावी जाणं होत असे..परेल ला जाऊन
आमचे आबा आणि वडीलधारी मंडळी 15/20 जणांचं रातराणी गाडीच रिझर्व्हेशन करायचे..
गावी जाणं म्हणजे एक विलक्षण उत्साहच असायचा.. कधी एकदाची तो दिवस येतो आणि आम्ही गाडीत बसून गावी जातोय असं होतं असे..
आणि तो दिवस येतो आणि आम्ही गाडीत बसून गावी निघतो.. तेव्हा जुन्या खंडाळा घाटात शिग्रोबाच्या देवाला गाडीतूनच नमस्कार करून पेंगत पेंगत गावी पोहोचतो.. जशी आम्हाला गावी जाण्यासाठी ओढ लागलेली असायची तशीच आमच्या आज्जीला मामाला आणि इतर नातेवाईकांना आमच्या येण्याची ओढ लागलेली असायची..
आम्हाला बघितल्यावर आज्जीचा चेहरा उजळून जायचा तिचा उर भरून यायचा..धावतच आज्जी च्या मिठीत कधी शिरायचो आणि ती तोंडावरुन हात फिरवत पटापट मुके घ्यायची.. मामा-मामी सुद्धा आनंदाने आम्हाला मिठीत घ्यायचे..
पोर भुकेली असतील म्हणत ती चुलीपाशी जायची.. चुलीतल लाकूड पुढे सरकवत मामी ला चार हिरव्या मिरच्या लसूण उडदाची डाळ आणायला सांगे..
उडदाची डाळ धुवून मडक्यात शिजायला ठेवी.. तोपर्यंत मामी चुलीवर आधान ठेऊन मक्याचं पीठ काढून त्यात आधान घालून मक्याच्या भाकर्या करायला घेई..
आमची आज्जी गप्पा मारत मडक्यातल्या डाळ डावानेच घोटून घेत असे..
डाळ शिजत आल्यावर मडक खाली उतरवून ठेवी.. आणि फोडणीसाठी घेतलेलं मिरच्या, लसूण तिथेच ठेवलेल्या पाट्यावर ठेचून घेई..
थोडसं भांड्यात तेल टाकून त्यात जिरे ठेचलेलं मिरची लसणाचा गोळा टाकी.. आणि जो काय त्या फोडणीचा घमघमाट सुटे कि पोटात भूकचे कावळे अधिकच ओरडू लागे..
असो नंतर त्या फोडणीत शिजलेली उडदाची डाळ घालत.. थोडा वेळ शिजत ठेवायची..
तोवर मामी ताट वाढायला घ्यायची..
ताटात घुट आणि मक्याची भाकरी..अहाहा.. अप्रतिम..
माझ्या आज्जी सुगरण तर होतीच पण तितकिच प्रेमळपणे आग्रहाने खाऊ घालणारी सुध्दा..
पण आज अस घुट घरी बनवलं जातं पण तिच्या हाताची चव काही औरच होती..
अस हे घुट..
त्याची सर आत्ताच्या कुठल्याही पदार्थात मिळत नाही..आज मुंबईत काय मिळत नाही.. सारं काही मिळतं पण घुट कुठेही मिळत नाही..


सौ.प्रेरणा प्रभाकर हडवळे..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू