पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अपुरी इच्छा

अपुरी इच्छा

मालतीताईंना कावळा हा पक्षी आवडत नसे. त्यांना कावळ्याचा काळा रंग, तसेच त्याचे ते सतत काव काव करणे अजिबात आवडत नसे. एखाद्या दिवशी खिकडीत कावळा आला तरी त्या राग राग करीत त्याला हुसकून लावत. चिमणीला म्हणून त्या खिडतीत तांदूळ घालत असत, पण तेच दाणे कावळे खायला आले की, मात्र त्या कावळ्यांना हाकलवत असत. मधुकरराव म्हणत, ‘‘अगं खाऊदेत ना कावळे, तेही बिचारे मुके जीवच आहेत ना?’’ पण नाही मालतीताईंना काही ते पटत नसे. 

लहानपणी गोष्ट ऐकतानाही चिमणीचं घर मेणाचं कावळ्याचं घर शेणाचं असं वाक्यं ऐकलं की, त्या जोरजोरात टाळ्या पिटत असत म्हणे, तसंच एकदा कावळा शिवलेल्या आईला त्या शिवल्या म्हणून त्यांनी आईचा चांगला मार खाल्ला होता. नको त्या वेळी हा कावळा आईला शिवलाच कसा? आणि आई घरातून तो कावळा शिवण्यासाठी बाहेर केव्हा गेली होती? असा विचार ते बालमन करत होते. पण उत्तर सापडलं नव्हतं. तेव्हापासून तर त्या कोवळ्या वयातही त्या कावळ्याचा अगदीच राग राग करू लागल्या होत्या आणि पुढे पुढे तर तो राग वाढतच गेला. तसं बघायला कावळ्याने त्यांचं एक मार खाण्याशिवाय काहीच नुकसान केलं नव्हतं. ते मार खाणंही लोकांनी कावळ्यावर लहान मुलांना फसवण्यासाठी लावलेला आरोप होता. बिच्चारा कावळा. आणि कालांतराने मालतीताईंनाही त्यात कावळ्याचा काही दोष नव्हता हे कळलं होतं, पण त्याच्यावरचा राग गेला नव्हता एवढं खरं. 

नाही म्हणायला दुसरा प्रसंग म्हणजे एकदा कॉलेजमध्ये त्या सुंदर ड्रेस घालून गेल्या होत्या. एका झाडाखाली सर्व मित्र-मैत्रिणी गप्पा मारत बसले असता नेमकं यांच्याच ड्रेसवर कावळ्याने आपले विधी उरकले आणि त्यांचा भडका उडाला. कावळ्याच्या या आठवणीने तर त्या काळ्यानिळ्या होत असत. तेव्हा मधुकरराव त्यांना चेष्टेने म्हणत असत, ‘‘अगदी चिडलेल्या कावळीणीसारखी दिसतेस.’’ त्या आणखीनच चिडत असत. खूप वेळा मधुकरराव त्यांना म्हणत असत, ‘‘इतका राग बरा नव्हे, तुझ्या दहाव्याला कावळा शिवणार नाही, आम्हाला त्रास होईल.’’ 

तेव्हा त्या म्हणत, ‘‘नकोच शिवायला, तेव्हाही मला त्या कावळ्याचा स्पर्श नको, कसा येतो तेच बघते.’’ अत्ता मधुकररावांना मालतीताईंचं हेच वाक्यं आठवत होतं. कोकणात त्यांचं मोठं घर होतं. घराच्या मागे मालतीताईंचं दहाव्याचं कार्य सुरू होतं. मधुकरराव पिंडाला नमस्कार करत होते. हिने आयुष्यभर कावळ्याचा राग राग केला, कावळा हिला शिवणारच नाही, शिवायलाही नको नाहीतर त्या कावळ्याचं काही खरं नाही असं त्यांना वाटत होतं. 

त्यांनी वर आकाशात बघितलं. एक कावळा घिरट्या मारत होता, पण पिंडाजवळ यायचं धाडस करत नव्हता. सर्व लोक मालतीताईंनी पिंड घ्यावा म्हणजे आपण आपल्या पोटपुजेला मोकळे म्हणून वाट बघत होते. काही लोकांना त्यांचा कावळ्यावरचा राग माहीत होता, ‘‘ही बाई काही पिंड घेणार नाही.’’ असं ती लोकं म्हणत होती. 

कावळा बर्‍याच वेळा खाली येऊन हूल देत होता. आदल्या दिवशीच एका जख्खड म्हातार्‍या माणसाच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता, म्हणजे तिथे एकही कावळा फिरकलाही नव्हता आज निदान कावळा आला तरी आहे मग उगाच कशाला मागे का वळा? थोडी वाट पाहू असं सर्वांचं मत होतं. 

मधुकरराव मनात म्हणत होते, ‘‘पिंड इथून उचलायला हवा, त्याला कावळा शिवता कामा नये.’’ पण हे ते उघडपणे म्हणू शकत नव्हते. शेवटी कावळ्याने आपली चपळाई दाखवली आणि मालतीताईंच्या पिंडाला तो शिवला. मधुकरराव हताश झाले, पण बाकीची मंडळी खूश झाली.  आता त्यांच्या पोटातले कावळे खूश होणार होते. ‘‘म्हटलंच होतं की नाही शिवणार कावळा!’’ असं उगाचंच चार-दोन बायका आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणत होत्या. 

 मधुकर रावांच्या जवळून कावळा उडत निघून गेला आणि समोरच्या झाडावरच्या फांदीवर बसला तो आपल्याकडे बघून हसतोय असं मधुकररावांना वाटलं त्यांना वाटलं जणू तो म्हणतोय, ‘‘कशी अद्दल घडवली मालतीताईंना? शिवलोच की नाही?’’ 

सगळी मंडळी जेवूनखाऊन आपल्या घरी निघून गेली.  मधुकरराव रात्री आपल्या खोलीत निवांत झोपले असता, मालतीताई स्वप्नात आल्या आणि म्हणाल्या, 

‘‘कावळ्याने माझ्या पिंडाला शिवू नये ही माझी इच्छा अपुरीच राहिली.’’ 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू