पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घर दोघांचे

घर दोघांचं ...


गेली तीन वर्षे बघतोय.


गुढी पाडवा झाला की एखाद्या भल्या पहाटे चिवचिवाट करून ती दोघं आल्याची वर्दी देतात.


गेल्या वर्षी पडझड झालेल्या घरट्याची पहाणी करतात.

पाया तसाच शिल्लक असतो.


मग त्यांचं काम सुरू होतं.


इवल्याश्या चोचीत एक चिखलाचा बारकुला गोल गोळा आणायचा आणि पूर्वीच्या भिंतीवर चिकटवायचा.


एवढ्या कडक उन्हाळ्यात त्यांना मऊ माती आणि पाणी यांची जागा कशी माहित होते कुणास ठाऊक.

कदाचित पाणथळ जागेच्या कडेचा तयार चिखल पण आणत असतील.

अगदी सक्काळी सुरू झालेलं काम दुपार पर्यंत चालत.

मग ऊन वाढलं की ते कुठं तरी आडोशाला जात असावेत.


अशा असंख्य फेऱ्या होत राहतात आणि हळूहळू घर आकाराला येतं.

पहिल्यांदा गोल घुमट आकाराला येतो.

तो निमुळता होत जाऊन सगळ्यात शेवटी फक्त त्या दोघांनाच आत जाता येईल एवढाच निमुळता चिंचोळा रस्ता तयार केला जातो.


एवढ्या व्यस्ततेत त्यांना अन्न पाणी शोधायचा त्रास नको म्हणून आम्ही ज्वारीचे दाणे टाकतो आणि प्यायच्या पाण्याचं भांडं ठेवतो.

एखाद्या सकाळी दाणे आणि पाण्याला उशीर झाला की ते आमच्या खिडकीवर बसुन जोरात चिवचिव करून आम्हाला आठवण करून देतात.


दोन दिवस झाले त्यांच्यातली ती दिसत नाही.

म्हणजे आता ती अंडी घालून उबवायला बसली असणार.

तो तिला चोचीत चारा पोच करतो.

ती फक्त पाणी पिण्या पुरत खाली उतरते आणि परत लगेच अंड्यांवर जाऊन बसते.


वैशाखाच्या सुरुवातीस पिल्लांचा जन्म होत असावा.

ती दिसत नाहीत पण नीट लक्ष दिलं की त्यांची क्षीण किलबिल चाहूल ऐकू येते.


मग महिनाभर पिल्लांना खाऊ पिऊ घालणे आणि रक्षण करण्याचं काम दोघेही आळीपाळीनं करतात.


वैशाख संपला की कधी तरी जोराचा अवकाळी पाऊस पडतो.

रानात पाण्याची डबकी साचतात आणि एव्हाना झाडांना नवी पालवी पण फुटलेली असते.


पिलांच्या पंखात बळ आलेलं असतं.


एके दिवशी सकाळी ती दोघं आणि पिल्लं नकळत उडून जातात.

घरटं रिकाम होत.


हे लोक तिथं काय करत होते हे समजून घेण्यासाठी एखादी खारुताई घरट्यात डोकवायचा प्रयत्न करते आणि तिच्या वजनानं घरट्याच्या बराचसा भाग ढासळून धपकनखाली कोसळतो.


घराच्या पायाचा गोल घेरा मात्र तसाच शिल्लक राहतो.


आणि आम्ही पुढचं वर्षभर वाट बघत राहतो त्या दोघांच्या येण्याची ....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू