पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आभास

               .....आभास.......

 

रात्रीचे दोन वाजून गेले असतील, संपूर्ण वाड्यातील निरव शांतता आणि  तो रातकिड्याचा आवाज काय तो फक्त अंधाराच्या साक्षीला होता. सगळीकडे सामसूम पसरलेली असतांना अचानक वाड्यातील दक्षिणेकडील शयनगृहातून आवाज आला,

 

" कोण आहे? कोण आहे?... उषा अचानक बेडवर गाढ झोपेतून बरळत उठली.तिला क्षणभर काय झालं ते कळालच नाही. ती पुरती घाबरली होती.

कपाळावर आलेला घाम पुसत ती इकडे तिकडे बघू लागली. तेवढ्यात तिच्या आवाजाने बाजूला झोपलेला उमेशही उठला.

"काय झालं उषा, घाबरलीस का?

तू ठीक आहेस ना? " उमेश ने विचारले.

उषाचा घसा कोरडा पडला होता.

तिच्या अंगाचा थरकाप अजूनही थांबत नव्हता.

उमेश  किचन मध्ये जाऊन तिला पाणी घेऊन आला.

तिच्या पाठीवर हात ठेवत तिला पाणी देत विचारले,

"काय ग, काय झालं झोपेत बडबडलीस का?

"होरे, मला खूप भयानक स्वप्न पडले ." उषा.

"पडतात अशी कधीतरी भीतीदायक स्वप्न..."चल झोप आता... रात्रीचे दोन वाजलेत."उमेश.

रत्नागिरी मधील हया कोकणी वाड्यात  राहायला आलेल्या उमेश आणि उषा ला आज बरोबर तीन महिने झाले होते. पण काल मात्र उषा पहिल्यांदा इतकी घाबरलेली दिसली.

चारही बाजूंनी असलेली मजबूत भिंत आणि मधोमध बांधलेला हा वाडा तसा खूप सुंदर होता.

अगदी समोर विहीर आणि आंबा, फणस व चहूबाजूनी असलेली नारळाची झाडं वाड्याच जणू सौंदर्य होती.

सकाळी नाष्टा करतांना उमेश ने विषय काढला.

"अग काल तू अचानक झोपेत घाबरलीस? तुला आठवतंय ना?"

"अरे हो, अरे काल मला खूप विचित्र आणि भयानक स्वप्न पडलं.

स्वप्नच होत ते , पण अगदी खरं दृश्य वाटल." उषा.

म्हणजे नेमक काय पडलं स्वप्न?

उमेशला तिच्या घाबरण्याचे कारण जाणून घ्यावेसे वाटले.

"अरे,मला स्वप्नांत एका महिलेचा रडण्याचा आवाज येत होता, तिला कोणीतरी मारतय आणि त्या वेदनांनी ती बिचारी मदत मागतेय पण कोणी मदतीला येत नव्हत.

हे सगळं दृश्य मी बघत होते. तिच्या रडण्याचा आवाज मला असह्य होत गेला.ती मला अंदूकशी दिसतही होती पण मी तिला मदत करू शकत नव्हते.

"अग, स्वप्न पडतात कधी कधी अशी.

आपण दिवसभरात जो विचार करतो तेच विचार एकत्र होऊन त्याचे एक स्वप्न बनते आणि त्याला एक आकार मिळतो.

स्वप्न वैगेरे काही खरी नसतात. उमेशने तिची समजूत काढली.

"अरे,मग स्वप्न खरी नसतात तर वाटणारी भीती ही का खरी असते.?

उमेशकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

"चल जास्त विचार करू नको आणि हो,झोपतांना मन शांत ठेवून झोपत जा." उमेश ने नाष्टा आटोपून कामावर निघण्याची तयारी चालू केली.

वाड्यात एकटीच असलेली उषा मात्र आता थोडी घाबरली होती. तिला राहून राहून नको म्हटलं तरी स्वप्नातील दृश्याचे विचार सारखे  समोर दिसायचे.

तीन बेडरूम चा मोठा वाडा आणि वाड्याच्या पाठीमागे असलेल्या बागेत तिला आता जायला भीती वाटायला लागली.

माणूस घरात एकटं असलं की नको नको ते विचार मनात येतात. निर्जीव वस्तू अचानक वेगळ्या रूपाने सजीव दिसायला लागतात. तिला मात्र बेडरूम मध्ये बसवत नव्हत.

व्हरांड्यात येत तिने सकाळी शेंगा निवडायला घेतल्या आणि दिवसाच्या कामाची सुरवात केली.

 

एक दिवस आड गेला असेल, तिसऱ्या दिवसाच्या रात्री ती पुन्हा झोपेतून घाबरून उठली.

"उमेश, उमेश कोण आहे बघ?.

उमेश ला लगेच लक्षात आल की ही झोपेत आहे आणि आपल्यालाच हाक मारतेय..

ताबडतोब त्याने तिला आधार दिला आणि तिच्या खांद्याना पकडले..

"उषा घाबरू नकोस.. " उमेशने तिला सांगूपर्यंत तिला कळाले होते आपण झोपेतून बरळत उठलोय..

उमेश च्या हाताला धरत ती म्हणाली..

" उमेश मला का अशी भीतीदायक स्वप्न पडतात?..

काय होतय काय नेमक मला? उमेशही थोडा घाबरला होता.

उमेश पुन्हा तीच स्त्री दिसली. परंतु सगळं खूप भयानक वाटत होत.

तिच्या वेदना मला बघवत नव्हत्या.

 या वेळी तिच्या प्रसूती वेदना मला बघवत नव्हत्या,मला सगळं दिसत असतांना सुद्धा मदतीला जाऊ शकतं नव्हते. ती मला मदतीसाठी बोलवत असतांनाच मला समजले की मी स्वप्नात आहे.

आता उमेशही विचारात पडला .

एवढ्या दिवसात अशी गाढ झोपेतून कधी न उठणारी उषा हल्ली अशी अस्वस्थ का झाली याची त्याला चिंता वाटू लागली.

त्याचेही दिवसभर कामात मन लागत नव्हते.

उषा घरी वाड्यात एकटीच असल्यामुळे तिलाही वाडा जणू खायला उठायचा.

उषा यावेळी पहिल्यांदा कोकणात राहायला आली. कोकणातील वाडे, त्यांचे रहस्य,काळीजादु आणि भुताटकी च्या गोष्टी ती ऐकून होती मात्र ती स्वतः याचा अनुभव घेईल असे तिला कधी वाटले नाही.मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी राहिलेली मुलगी तिकडे एकदम बिनधास्त होती मात्र इकडे आल्यापासून ती थोडी मनातून थोडी खचून गेली . बोलायला सोबत कोणी नाही, वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आणि आता हया रात्रीच्या भीतीदायक स्वप्नाचा प्रकार सगळं कस विचित्र झालं होत.

 

"तुला शंका वाटत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन यायचे का?

उमेश ने तिला सुचवले.

म्हणजे तुझे मानसिक समाधान ही होईल आणि असे का होतेय हे पण कळेल ". उमेशला तिची झालेली अवस्था बघवत नव्हती. ती सारखी एका गूढ विचारात दिसायला लागली.

 

शनिवारची ती रात्र...

आज मात्र ती शांत झोपेत असतांनाच अचानक रडायला लागली. शेजारी झोपलेला उमेशने कुस वळवून बघितले त्याला वाटले उषा जागी आहे आणि रडतेय...

बघतो तर काय....

ती झोपेतच रडत होती. अश्रू नाही की संवेदना!! फक्त हुंदके देऊन रडणाऱ्या उषा कडे बघून उमेश चक्राऊन गेला.

तिची होणारी अवस्था बघून उमेशला सुद्धा आता हा प्रकार सहन होईनासा झाला.

या आठवड्यात तिसऱ्यांदा हा प्रकार बघून तोही बावरून गेला होता.

कित्येक वेळाने तिचे रडणे कमी होऊन गेले आणि ती तशीच झोपी गेली. उमेश रात्री बराच वेळ यावर विचार करत बसला.

सकाळी उठल्या उठल्या उषा ने उमेशला मिठी मारून रडायला सुरवात केली.

उमेशला समजले होती की परिस्थिती थोडीशी गंभीर आहे.

" उषा, थोडा धीर धर... हे बघ आपल्याला समजत नाही आहे की तुला नेमक अस का होतय.?

हा परिसरही आपल्याला नवीन आहे आणि ही माणसेही!!

उमेश, त्या महिलेने मला खूप अस्वस्थ केलंय रे ".

काल तर चक्क तिच्या झालेल्या बाळाचा आणि तिचा दोघांचा रडण्याचा आणि मरणप्राय वेदनांचा आवाज ऐकून मीच रडत असतांना मला दिसत होते.

तुला सांगू उषा.. रात्री मी तुला झोपेत रडतांना बघत होतो. मी तुला उठवणारच होतो पण नंतर तू रडायचं थांबलीस. उमेश ने तिला कालचा किस्सा सांगितला.

"उमेश,मी ते दृश्य बघूच शकत नव्हते आणि सहनही करू शकत नव्हते.

इतके ते मला खरे वाटत होते.

 

उषा आणि उमेशच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती परंतु अजूनही घरात पाळणा हलला नव्हता.

उमेशच्या लक्षात आले, हिच्या हया विचारांनी आता ती पूर्णपणे गुरफटून गेली आहे. सतत आपल्या अपत्याचा मनातून विचार करणारी आणि स्वतःला दोष देणारी उषा आता मानसिकरित्या सुद्धा खचून चालली होती.बहुतेक त्याचाच परिणाम झाला असावा असे मत उमेशचे झाले.कित्येक डॉक्टर आणि दवाखाने करूनही आजपर्यंत काही उपयोग झाला नव्हता. देवांचे नवस, पूजा,उपवास काय नको नको प्रयत्न ते दोघांनी केले होते पण यश येत नव्हते.

 

" काळजी करू नको. सगळं ठीक होईल. " तिच्या डोकयावरून हात फिरवत त्याने तिची समजूत काढली.

 

आज वाडा सोडून बरोबर दोन महिने झाले होते .दोघेही त्यांचे फॅमिली डॉक्टर वैधवी यांच्या कॅबीन मध्ये बसलेले.

"अभिनंदन उषा....

तुम्ही आई बनणार आहात..."

डॉक्टर वैधवी नी आनंदाची बातमी दिली.

ही बातमी ऐकताच दोघेही अगदी खूष झाले. कित्येक वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हलणार होता.कधी आपल्या आई वडिलांना याची बातमी देऊ असे त्यांना झाले.

"पुन्हा एक महिन्यांनी या तपासायला."

डॉक्टर वैधवीनी हसत सांगितले.

वाडा सोडल्यापासून दोघेही तसे खूष  दिसत होते.

हॉस्पिटल मधून बाहेर पडताच उषा चा भाऊ समीर बाहेर भेटला.

ताई कशी आहेस?

दाजी तुम्ही कसे आहात?

अग,मी तुम्हालाच शोधत होतो तेव्हा कळाले की तुम्ही डॉक्टरांकडे आला आहात.

अग, आजची पेपरची ही बातमी वाचली का?

नाही रे?

आज काय विशेष बातमी बाबा ?

अग, तुम्ही दोन महिन्यापूर्वी राहत असलेल्या वाड्याच्या घर मालकाला पोलिसांनी मुंबईत अटक केलीय...

"काय सांगतोस काय? दोघेही आश्चर्य चकित झाले.

अग हो की, एक वर्षांपूर्वी त्यांची  गरोदर पत्नी प्रवासात बेपत्ता झाली होती त्याचा पोलिसांनी छडा लावलाय..

दोघांना काही समजेनाच.

 

अग त्या निष्ठुराने तिचा खून करून तुम्ही राहत असलेल्या वाड्यामध्ये  तिचे प्रेत पुरून ठेवले होते.

काल हा सगळा प्रकार पोलिसांनी उघड केला. कालच त्याला पोलीस  वाड्यात घेऊन आले होते. त्याच्या समोर समक्ष त्याने सर्व जागा दाखवली आणि खुनाची कबुली पण दिली.

उषा आणि उमेश दोघेही एकमेकांकडे पाहताच उषाने उमेशला मिठी मारून रडायला लागली.

उषाचा भाऊ मात्र अनभिज्ञ्पणे त्यांच्या कडे बघत होता.

फक्त त्या दोघांना मात्र हे सर्व रहस्य उलगडलं होत.

 

©® प्रकाश फासाटे.

मोरोक्को.

212 661913052

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू