पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वांग्याची भाजी

:वांग्याची भाजी:

मला येत नाही हे शब्द आईच्या कोषात नव्हते . बाहेरच्या जगाची ओळख वडिलांनी करून दिली तर संसारातील धडे आईने कडक शिस्तीत गिरवून घेतले . पुढे संसारात पडल्यावर त्याचे महत्व लक्षात आले. एकदा तर गम्मतच झाली.
बाजारात गेल्यावर ह्यांच्या कडून जास्त वांगी आणली गेली. घरी आल्यावर एवढ्या साऱ्या वांग्याचे करायचे काय ? हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. आई पुण्याला मी भुसावळला.आता सारख्या, फोनच्या वगैरे सोई पण नव्हत्या तेव्हा . सौ.आईचं डाळ'वांग मात्र अप्रतिम व्हायचं. बुद्धीला ताण दीला. ,पहिल्या दिवशी आई डाळ वांग कसं करायची ?,काय काय घालायची? हे आठवून आठवून केलं एकदाचं डाळ'वांग . दुसऱ्या दिवशी भरली वांगी केली.आणि तिसऱ्या दिवशी रस्सा केला...कांदा,बटाटा,वांग् घालून ..तरी पण द्रौपदी च्या थाळीसारखी टोपलीत ४,५ वांगी उड्या मारतच होती.आता काय करायचं बाई या वांग्याचे? भलमोठं प्रश्नचिन्ह उभंच...
आणि मग एकदम ट्यूब पेटली. आईने केलेल्या मिक्स डाळी वापरून केलेली वांग्याची रस्सा भाजी करायची.आणि अगदी २च चमचे प्रत्येकी तांदुळ ज्वारी बाजरी गहू तूर मूग ह.डाळ व 1, चमचा उडीद डाळ पाव वाटी शेंगदाणे आणि लसूण, सुक्या लाल मिरच्या,कोथिंबीर अगदी सगळं थोडं थोडं घेऊन भाजून वाटून केलेली चविष्ट रस्सा भाजी आठवली. पदर बांधला .सगळ्या डाळी दाणे, धान्य भाजून वाटून रस्सा तयार केला. अग बाई....हे सगळं वाटताना भाजलेले तांदूळ वाटायचे राहिलेच की.! वाटलं,जाऊ दे...टाकू तसंच. थोडेसेच तर आहेत. होतील एकजीव आपोआप. असा विचार करून फुललेल्या दगडी कोळश्याच्या शेगडीवर भाजीचा हंडा चढवला. भाजी शिजतं आली.आज काय मग बेत? असं म्हणत सगळे जण उत्सुकतेने आंत डोकावले. मी थंडपणे उत्तर दिले. "आज शेवटच्या वांग्याची वेगळ्या प्रकारची रस्सा भाजी केली आहे". सगळे नाक उडवत बाहेर पळाले.
ह्यांना बोलायला काही जागाच नव्हती. कारण किलो -दोन किलो वांगी ह्यांनीच तर आणली होती. माझ्या चेहऱ्या कडे न बघता ह्यांनी पण पळ काढला .पण भाजीचा सुगंध काही लपत नव्हता. .१२ वाजले ,पंगत बसली आणि बापरे !! वाढताना लक्षात आलं ,भाजीत न वाटलेल्या तांदुळाचे प्रमाण जरा जास्तच झालंय. आणि एकजीव न झालेले अखंड तांदूळ माझ्या कडे डोळे वटारुन बघताहेत ,असं वाटलं मला. चार घास खाऊन ,कसं बसं जेवण उरकून "आई आम्ही खेळायला जातो गं"असं म्हणून मुलं पसार झाली . पण हे मात्र भाजी चिवडत बसले होते. शेवटी न राहवून त्यांनी विचारले "आजचा वांग्याचा प्रकार जरा वेगळा वाटला. कुठं मासिकात वाचला कीं कुणी शिकवला ? नाही म्हणजे,नक्की काय आहे ? वांग्याची भाजी ? का वांगीभात ? काय म्हणायचं ह्याला? सबंध तांदूळ घालून माझ्या चारी मुंड्या आधीच चित झाल्या होत्या. तरीपण मी ठसक्यात उत्तर दील ",आमच्या कडे ह्याला मसाला वांगी रस्सा भाजी म्हणतात. आणि माझी आई पण अशीच भाजी करते.
ह्यांचा घास हातातच राहिला.आ वासून ते माझ्या कडे बघतच राहिले. आता हीच्या आईने म्हणजे....आपल्या, सासुबाईंनीच शिकवले म्हणजे....जाऊं दे . न बोललेलेच बरं . अशा धुर्त विचाराने शेवटचं एकच राहिलेले वांग आ वासलेल्या तोंडात ह्यांनी कोंबल. आणि मी हुश्श करून सुस्कारा सोडला.

नंतर पुण्याला गेल्यावर हे वांगी पुराण मी अगदी जसं च्या तसं आईपुढे मांडलं , आणि म्हणाले ",ए आई अशीच सांगितली होतीस ना गं मला तू ही भाजी करायला ?मी तसं ह्यांना सांगूनही टाकलयं.
आई काम करताकरता थबकलीच .पुटपुटली"कार्टीने तिच्या बरोबर ,जावयां समोर माझीही अब्रू घालवली".जावई म्हणाले असतीलं ' वा रे वा! आपली सुगरण बायको आणि तिची आई हणजे आपली सासू खरंच किती सुगरण असेल ." सौ.आईला नुसत्या कल्पनेनेच लाजल्या सारखं झालं. आणि योगायोग असा की हे नेमके त्याच दिवशी पुण्याला यायचे होते. आई मधील सासू जागी झाली. झटकन माझ्या हातात पिशवी कोंबत ती म्हणाली "लौकर जा आणि वांगी घेऊन ये. अगं पण पुन्हा वांगी ? हे वैतागतीलच .माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आई म्हणाली,"पळ लवकर आणि ताजी क,छोटी,काटेरी वांगी आण." कंटाळा तर खूप आला होता,पण आईपुढे डाळ शिजणार नव्हती. एकदाची चरफडत वांगी आणली. आणि जरा टेकले. लोडावर लोळण फुगडी घेऊन माहेरपणाचा विसावा घेणार इतक्यात ,आई साहेबांचं फर्मान "इकडे ये.आणि मी भाजी कशी करतेय आणि तांदुळाचं वगैरे प्रमाण किती घेतीय ते बघ जरा ".
झक्कत उठले आणि आई समोर बसले.बघता बघता सगळी धान्य डाळी शेंगदाणे वगैरे थोडं थोडं घेऊन भाजून वाटून रसरशित मसाला तयार होऊन चमचमीत भाजी तयार झाली सुद्धा.
सबंध घरभर भाजीचा घमघमाट सुटला होता. ह्याच भाजीचा भुसावळ ला आपण केवढा घोळ घातला होता. आणि तो तर प्रकार मसाला भाजी नव्हे तर मसाले भातच होता ग बाई!.आणि पाणबुडी सारखे अखंड तांदूळ त्यांत बुड्या मारत होते.पण आता ही आईने केलेली भाजी रस्सेदार आणि कित्ती छान दिसतीय .
१२ वाजले. हे जेवायला उठले. हात धुवायला मोरी पाशी गेले.तेव्हा टाॅवेल द्यायचे निमित्त करून मी पण हळूच ह्यांना सांगितलं,"अहो!आज जेवणांत वांग्याची भाजी आहे. मी जेवढं हळू सांगितलं तेवढे हे जोरात ओरडले...."का य? वांग्याची भाजी ?
आमच्या घरात स्वतंत्र बाथरूम हा प्रकार नव्हताच. तिन्ही बाजूला पडदे लावून आमचं वाॅशरूम सजलं होतं. हा..मोरी मात्र आरामात बसून अंघोळ करण्या इतकी ऐसपैस होती.तिथेच भल मोठ्ठ तांब्याच तपेल होतं. वहिनींने लखलखीत घासलेला बंब , आईने कोपऱ्यात त्रिकोणी तिवई सह व्यवस्थित बसवला होता.
तर काय सांगत होते....हे " काय ? करून ओरडल्या मुळे शरद आप्पांला माझ्या मोठ्या भावाला वाटलं की, ह्यांना बंबाचा चटकाच बसला की काय? तो म्हणाला ",काय झालं बाळासाहेब?बंबाचा चटका बसला कां?.हे गडबडले,ओशाळले. "एवढ्या सगळ्या गोंधळात मी कशाला थांबतीय तिथे. वांग्याच्या भाजीचं पिल्लू सोडून मी पळच काढला. आई जवळ जाऊन उभी राहिले, तर आई गालांतल्या गालांत हंसत होती . 'त'वरून ताकभात ओळखण्याइतकी ती नक्कीच हुशार होती.
पानावर बसल्यावर हे सौ.आईला म्हणाले,भाजी जरा कमी करता का वाटीतली ? हा इशारा मला होता. मुकाट्याने वाटी उचलून त्यात फक्त दोनच चमचे भाजी वाढून मी वाटी ह्यांच्या पानात ठेवली . पहिला वरणभात संपला. आणि भाजी भाकरी घेऊन ह्यांनी घास तोंडात घातला .आणि डोळे च कीं हो विस्फारले. एक सेकंदात वाटी रिकामी झाली पण . आणि उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले," वा!वा! काय मस्त झालीय भाजी अगदी अप्रतिम . खूपच छान . नाहीतर आमच्या कडची बाईसाहेबांनी केलेली भाजी. नव्हे वांगी भात च झाला होता तो .नको नको...ती आठवणच नको.
ति.आई चटकन पुढे झाली आणि म्हणाली,"असं नका हं म्हणू .ही भाजी तुमच्या बायको नेच केली आहे. ".मी पण पुढे होऊन म्हणाले,"हो पण आईच्या देखरेखीखाली झालीय ही भाजी. त्यावर ह्याचं उत्तर" सासूबाई शिष्याला अजून पक्क तयार करा . आज तुम्ही केलीतं नां अगदी तशीच .योग्य प्रमाण घेऊन केलेली चवदार भाजी कशी करायची ते सांगा तुमच्या लेकीला. म्हणजे भुसावळला गेल्यावर नवीन प्रयोग होउन आमच्या पोटावर अत्याचार नको वाह्यला

तर अशी होती लक्षात राहण्यासारखी वांग्याच्या भाजी ची कथा. माझी आई .सुगरण, चविष्ट स्वयंपाक करणारी संसारदक्ष ,संसाराचा समन्वय साधणारी. होती . आईच्या वांग्याच्या भाजीची चव हे अजूनही विसरले नाहीत . खरंच खूप चविष्ट स्वयंपाक करायची माझी आई . मग तुम्हीच सांगा , 'मी तरी कशी विसरेन ही
'लहानपणीची ' आईच्या हातची चव '

लेखिका -सौ राधिका ( माजगावकर ) पंडित पुणे 51

---^---^----^--

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू