पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चव

चव... 

 

मी दहावीत होते. मध्यप्रदेशातील एका लहानशा पण प्रसिद्ध शहरात माझे शिक्षण झाले. आठवी पर्यंत शाळा अगदी घराजवळ होती. नववीत आल्या नंतर जणू पंखच फुटले.. दूरच्या शासकीय शाळेत प्रवेश घेतला होता.. भर चौकातून आत जाऊन ती शाळा.. मोठा बाजार.. चाट चौपाटीच्या दुकानी..बाबांनी पॉकेटमनी द्यायला सुरुवात केली होती म्हणे सायकल पंचर वगैरे झाली तर जवळ पैसे हवे. ३०/- महिना! काय अप्रूप वाटायचं त्या काळी.. की हीचे बाबा हिला पैसे देतात! 

तर त्या पॉकेटमनीतून आठवड्यातून दोनदा तरी पाणी पूरी उडवायची... महिना अखेर जर जास्त पैसे उरले तर छोले टिक्की पण.. राजपूत चाट भंडार आणि भगवान सिंग चाटवाले आमच्या अगदी ओळखीचे झाले होते... आम्ही मैत्रिणी भर पावसात चिंब भिजत तिखटझाळ पाणी पुरी खायचो .. ती मजा काही औरच होती. काय चविष्ट ती चाट, त्या चवीचे वर्णन शब्दातीत आहे.. 

पण अजून एक स्वाद आहे जो आजवर माझ्या जीभेवर आहे, तो म्हणजे निपुणगे आजींच्या हातच्या पदार्थांचा. 

 शाळेच्या अर्ध्या सुट्टीत मैदानात नऊवारी साडी कपाळावर गोंदण असलेल्या, हातात जुने पितळी डबे घेऊन निपुणगे आजी यायच्या.. तो आमच्या इकडच्या माळवी मुलींसाठी कुतूहलाचा तर माझ्या साठी जिव्हाळ्याचा विषय होता. 

कारण ह्या भागात तो पेहराव नवीन होता पण मला तो माझ्या आजोळची आठवण करून देत होता. तर.. निपुणगे आजींच्या पितळी डब्यात कधी उकडलेले काळे चणे असायचे ज्यावर त्या मस्त बारिक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून पुडीत बांधून द्यायच्या. कधी उपमा.. कधी खमण.. तर कधी छोटे छोटे समोसे! अहाहा! रुपयाला एक समोसा! अतिशय चविष्ट पदार्थ असलेला तो पितळी डबा बघता बघता रिकामा व्हायचा! रोज एक डबा आणायचा, त्यातले पदार्थ विकायचे आणि तीच काय तर त्यांची कमाई..! 

 शाळेतील शिक्षक पण आजीकडून त्या वस्तू विकत घेत असत.. 

एकदा मी आईसाठी पण आणले समोसे.. आईला फार आवडले. मग आम्ही आजींना घरी पण बोलवायला लागलो. त्यावेळी आई आणि मी शिकवण्या घेत होतो. मुलं शिकून गेली की कधी कधी खूप भूक लागलेली असायची आणि निपुणगे आजी अन्नपूर्णेसारख्या हजर व्हायच्या..! 

कधी इडल्या..कधी खमण तर कधी मस्त उसळ घेऊन...! 

एका खोलीत घासलेटच्या स्टोव्ह वर सर्व पदार्थ बनवायच्या.. त्यामुळे पदार्थांना एक वेगळाच घासलेटचा वास येत असत... 

पण तरीही ते पदार्थ खूप चविष्ट लागायचे. 

माझी शाळा संपल्यावर पण बरीच वर्षे आजी घरी येत होत्या.... मग अचानक त्यांचे येणे बंद झाले. कुठे गेल्या कुणास ठाऊक! कोणी म्हणायचे त्यांचे मुलं शहरात छान नोकरी करतात, ती घेऊन गेली आजींना.. 

असे असले तर छानच! पण नंतर त्या कधीच भेटल्या नाही.. 

पण त्यांचा तो छोटेखानी पितळी जादूचा डबा नि त्यातील कमाल जिन्नस अजून आठवणीत आहे...... 

आणि खरंच लहानपणीची ही आठवण फार फार स्पेशल आहे! 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू