पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वळणावळणाच्या वाटा

वळणावरच्या वाटा

नागमोडी घाट
वळणा वळणाची वाट
नेत्र सुखविल , असा निसर्ग
रम्य तो निसर्गाचा थाट!

प्रवास म्हटलं,की सरळ रस्त्यासोबत वळणा वळणाचे रस्ते येतातच. किंबहुना वळणाच्या रस्त्यांनी प्रवासाची मजा वाढते. आगगाडी जेव्हा वळणाच्या रूळावरून जाते तेव्हा कधी काही पुढचे तर कधी मागचे डबे खिडकीतून डोकावल्यास दिसतात. तेव्हा ती वळणदार गाडी किती छान दिसते! भोवताली धुकं--- हाताला लागतील असे धवल श्यामल मेघ-- त्यातून येणारी सोनकिरणांची तिरिप--- पळणारी झाडे.-- कशासाठी पोटासाठी या गाण्याचा रेल्वेच्या तालावर धरलेला ताल--- मन किती आनंदून जाते नाही!

जिवनाचेही तसेच आहे. सरळसोट जीवनात मजा नाही.
वळणावळणाचे रस्ते हवेतच.‌ एखादे वळण आयुष्यात असे येते की जीवनच बदलून जाते जीवनातले वळण एक संधी असते. ती नेमकी ओळखून तिचा फायदा घेता आला पाहिजे. ते आव्हान स्विकारले पाहिजे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे ,तर मग जीवनाचे सोने व्हायला वेळ लागत नाही. ते वळण प्रगतीचा मार्ग खुला करून देते. यशोशिखरावर पोहचविते.
असे वळण आयुष्यात आनंद सुगंध भरते. यशाची फुले मार्गावर अंथरली जातात.त्यावरून चालतांना किती भारी वाटते न!
तर कांहीं वळणे ही वेदनादायी ही असतात. अशा वेळी खचून जाऊन चालत नाही. संकटांचे ढग कधी न कधी पांगणार असतातच.! धीर ,संयम धरायला हवा. कधी मुलांची करियर लाईन चुकते, कधी मुलं-मुली प्रेमात पडून फसतात. कधी नोकरीवर गदा येते तर कधी जीवलगांना गंभीर आजार होतो.
तो काळ --- ते वळण--- अगदी परिक्षाच पहाते. अशा वेळी शांत राहूनच ते दु:खद वळण पार करावे लागते.

वळणावर उभे राहून पुढे काय वाढून ठेवलंय-- जाऊ की नको--- अशी भिती बाळगून चालत नाही. काय सांगावे ?एखादे वळण आयुष्याला सुखद वळणही लावून जाईल. वळणावर चांगला जीवनसाथी ही भेटू शकतो.‌ मग त्या वळणदार मार्गावर प्रीतफुलांचा सडाही पडलेला असू शकतो. भोवताल प्रोत्साहन द्यायला निसर्गही बहरलेला असतो. हिरवाई,पाने फुले, निळे आभाळ-- निळे डोंगर,-- पक्ष्यांचा मधुकलरव, खळाळते निर्झर-- त्यांचे प्रीततराणे--- सगळे मनांत हिरवाई -- चैतन्य-- आनंद पेरून जातात. प्रीतसरींची बरसात---मनमोर मत्त होऊन नाचू लागतो-- रातराणी सुगंध भरते--- चांदणे --चांदवा -- प्रीती ला बहर आणतो. इंद्र धनुषी रंगांची उधळण होते. असे वळण नि असा वळणाचा रस्ता - जीवनात उत्साह -- चैतन्य भरतो
आज मैं ऊपर
आसमां नीचे
अशी स्थिती होते. हो न!


आयुष्याच्या प्रवासात कुणालाही न चुकणा रे वळण! जीवनाच्या सायंकाळी --- संध्याछाया दिसू लागल्या की--- अखेरच्या वळणावर आपणा सर्वांना च उभे रहायचे आहे. जीवनाचा पैलतीर दिसू लागण्याचा तो काळ! आपण आपली कर्तव्ये पूर्ण केलीत न! सगळ्यांशी चांगले वागले बोललो न! कुणाला दुखवले नाही न! नी अजाणता दुखवले असेल तर माफी मागता येते न! तेव्हा भितीचे काय कारण! हे वळणही खूप सुंदर आहे. याच वळणावर तर त्या जगन्नियंताची--- गुरूची भेट होणार आहे. जीवन सार्थकी लागणार आहे जीवाशिवाचे सुंदर मिलन होणार आहे. याहून सुंदर ते काय असू शकते?

मरणा तुझ्या स्वागतास
आत्मा माझा आहे सज्ज
पायघडी देहाची ही
घालूनी मी पाही वाट
सुख वेडी मी जाहले
देहोपनिषद सिद्ध झाले.

दुर्गाबाईंनी लिहीलेल्या या ओळींप्रमाणे आपणही सज्ज होऊ या. या वळणाचा आनंदाने स्विकार करू या.

तेव्हा जीवनप्रवासातली ही वळण enjoy करायला शिकलं पाहिजे. ही वळणे आनंद तर देतातच नि कांहीं चांगले गुणही अंगिकारायला लावतात-- जीवनाला योग्य दिशा देतात. जीवन समृद्ध करतात.ईशप्राप्तीची वाट मो क्षयकळी करून देतात.आणखी काय हवे हो! काय तर मग! अशा वळणाचे स्वागत करणार न!

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर
मो नं. 7020757854

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू