पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझेच आकाश समीक्षण

समिक्षण


"माझेच आकाश"

एक काव्य अविष्कार…


काव्यसंग्रह 

कवयित्री - सौ. पुष्पा सदाकाळ

प्रकाशन - ज्ञानसिंधू प्रकाशन

पृष्ठसंख्या - २००

किंमत - रू. २००/-




नमस्कार रसिक काव्यप्रेमी..

आपणास कळविण्यास खूप आनंद होत आहे. सौ. पुष्पा सदाकाळ यांचा "माझेच आकाश" हा काव्यसंग्रह वाचनात आला. कविता वाचताना अंतरीचे शब्द स्वस्थ बसू देत नाही व यासाठीच काव्यसंग्रहासाठी या प्रतिक्रिया!!..


कवयित्री पुष्पा सदाकाळ यांचा पहिलाच काव्यसंग्रह.. साहित्यिकांचे एक स्वप्न असते आणि ते किती आनंददायी असते हे त्यांनी मनोगतातून उल्लेख केला आहेच. पण संवेदनाशील कवयित्रीची साहित्याशी असणारे अतूट नाते हे मनोगतातील पहिल्या काव्यपंक्ती पासून ते शेवटच्या पृष्ठापर्यंत दिसून येते. मनोगताची सुरूवात काव्यमय करत वाचकांच्या मनाचा वेध घेणारे शब्द..


शब्द फुलांच्या पराग गंधातुनी

सात्विक फुलली शब्द चांदणी

प्रतिभेचे विविध कंगोरे घेऊन

तेजस्वी झळकते साहित्य अंगणी


आदरणीय गुरूंना वंदन करत त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे पाठबळ कवयित्रीसाठी महत्वपुर्ण आहेत, हे त्यांनी नमूद केलंय. कवितांचा प्रवासाबद्दल सांगताना त्या म्हणतात, "आयुष्यात सुखदुःखाच्या काट्या फुलांना तुडवत अनुभवाची शिदोरी ही कवितांमधून शब्दबद्ध झालेत."

काव्यसंग्रहासाठी श्री शरद पाटील यांच्या शुभेच्छा तर ख्यातनाम श्री गजानन तुपे (कवी, गझलकार, लेखक, पत्रकार) यांची विस्तृत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. 

गणपती बप्पाला वंदन करून काव्यमय प्रवासाला सुरूवात केली आहे. श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊलींच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या कवयित्री मग माऊलींची गुणगाण पुढील कवितेत करताना 

माझी माऊली ज्ञानाई 

निवृत्ती सोपान मुक्ताई 

सोबती इंद्रायणी माई 

भली आळंदीची पुण्याई 

या कवितेतून आनंदी दर्शन सहज होऊन जाते. अशाच काही भक्ती रचना मन प्रसन्न करून जातात. या भक्तिरसातील एक राग लटका 'रूसवा रखुमाबाईचा' या कवितेतील भावलेल्या ओळी

आता तरी हास ना जराशी

नजर सावळ्याकडे वळवूनी 

विठू जरी विश्वाची माऊली

तरी शक्ती त्याचीच तू म्हणूनी…

काव्यसंग्रह शिर्षकाला समर्पक 'माझेच आकाश' ही कविता..! 

फक्त माझेच आकाश

तेथे मी शुक्रचांदणी 

पंख लेऊन स्वप्नांचे 

विहरते नभांगणी

कवी कल्पना अभासी जगतात रमताना एक नवा उन्मेष जागृत करतो. कवयित्रीचे शब्दांवरील प्रेम हे प्रत्येक कवितेतून दिसून येते. 

'माझा गाव' या कवितेतून थेट ग्रामीण जीवनाचा साज दिसून येतो. 


जरी असेल नसेल

तरी पुस्तक हसेल

माझी ओळख कविता 

पान पान ते देईल..


प्रत्येक साहित्यिकांची एक सुप्त इच्छा असते की आपला शब्द सुगंध पुस्तक रूपात दरवळत रहावा अगदी अनंत काळासाठी. वरील ओळीतून तो भाव जागृत होतो.

कवयित्रीने काव्याच्या विविध प्रकारावर प्रकाश टाकला आहे. त्यापैकीच 'जोगवा'. जोगवा हा एक देवीला आळवण्याचा भक्तिमय प्रयत्न. 


उदो उदो करीत अंबेचा 

जोगवा जोगवा मागते आईचा..


यामधील प्रत्येक चरणात जी भक्तिमय साद घातली आहे त्याला शब्दच नाहीत. मला आवडलेला हा जोगवा.. 


परडी तुझी गं हातावर

कृपा बरसू दे संसारावर 


याला नाद असावा संबळाचा..अशी सुरेल गेय रचना.

कवयित्रीचे शब्द कधी आजीच्या मांडीवर बसतात तर माहेरची ओढ दाखवतात. मग कधी भुपाळी तर कधी अभंग!!.. 

प्रितीचं मोरपीस अलवार फिरताना..


पायी पैंजण छम छम

हाती बिल्लोर खणखण 

कुणी छेडला मल्हार राग 

धुंद गंधीत सारे क्षण..


अशा काही धुंद कविता मन मोहित करतात.

'श्रावणमास' खरंच हा महिना कवींना आकर्षित करतो आणि यांच्या या कवितेत घननीळा श्रावण मन हिरवे करून जातो..

विडंबन काव्याचा प्रयत्न देखील खूप छान केलाय.. 

आई बद्दल कितीतरी काव्ये आहेत पण बापा बद्दल लिहायला शब्दच सापडत नाही पण यांच्या बाप या कवितेत या भल्या माणसाचे चित्रण खूपच छान मांडलेय.  

अष्टाक्षरी मध्ये असणारी रचना..


घाम घरात भिजतो

बाप राबतो शेतात 

ऊन वाऱ्याची ना पर्वा 

स्वप्न जागवी मनात


बाप कधी कोणाला कळलाय का? एक छान कविता..!


तू… नि… मी…


एक मनोहारी प्रेमरसात न्हालेली कविता.. 

तू… गोड गुलाबी हसावे 

नि… मी तुज न्याहळावे 


असं तू आणि मी यांची सांगड सुंदर शब्दात साध्य केलंय.

'माझा मरणाचा फेरा चुकावा' शिवाला केलेली आळवणी तर संग्रहातील हास्य कविता बायकोदेवीची आरती एक विनोदी कविता आपले भाव बदलून जातात. 

एकूण ९७ कवितांची मेजवानी. प्रत्येक कवितेतून कवयित्रीची कल्पना शक्तीची प्रतिभा दिसून येते. निसर्गाशी असणारी जवळीक ही अलवार शब्दात पकडली आहे. 

सौ. पुष्पा सदाकाळ यांचा साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!! 

आपण सर्वांनी या काव्य संग्रहाचे स्वागत करावे व आवर्जून वाचावा असा सुंदर संग्रह.


काव्यसंग्रह शाॅफीजेन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.



श्रीकांत दीक्षित, पुणे.

8805988172




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू