पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कथासंग्रह समिक्षा बठ्ठा बजार येडास्ना

बठ्ठा बजार येडास्ना : अस्सल खान्देशी कथासंग्रह


अहिरानी भाषेतील साहित्याच्या अभ्यासकाने वाचलेच पाहिजे असे उत्तम संवादाचे, उत्तम कथाशैलीचे उत्कृष्ठ पुस्तक म्हणजे बठ्ठा बजार येडास्ना हा कथासंग्रह आहे. कस्तूरी प्रकाशन अमळनेर यांनी प्रकाशित केलेला कथासंग्रह ५सप्टेंबर २०१३रोजी प्रकाशित झालेला आहे. कथालेखक गोकुळ बागुल हे नाव कायी माय अहिरानी कादंबरीमुळे साहित्य क्षेत्रात गाजलेले नाव आहे. बाळायन विनोदी कथासंग्रह , माझा विध्वंस करा, शलाका, निष्पाप या कादंबर्या, साहेबाची टांग विनोदी कथासंग्रह, तसेच बाल साहित्याचे लेखक गोकुळ बागुल यांचा हा दुसरा कथासंग्रह आहे. प्रा. डॅा. फुला बागुल धुळे यांची प्रस्तावना सदरच्या कथासंग्रहाला मिळाली आहे. अनेक पुरस्कार लेखकाला मिळाले आहेत. मनोगतात लेखक म्हणतात, "जीवन जगण्याच्या रहाट गाड्यात या आमच्या अती सामान्य तळागाळातल्या शिलेदारांच्या दस्तावेजाची नोंद कुठल्याही इतिहासात होणार नसली तरी ह्या माझ्या छोट्याश्या कथानकाद्वारे त्याच्या जगण्याचा लढा येणाऱ्या भावी पिढीला जीवनदायी ठरेल. प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही."

प्रेरणादायी ठरेल असाच आशयसंपन्न, अनुभवसंपन्न कथासंग्रह लेखकाने वाचकांसमोर सादर केला आहे. अहिरानी भाषेची मजबूत पकड हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. एकूण अकरा कथा या संग्रहात आहेत. बठ्ठा बजार येडास्ना, चुल्हानं लाकूड, त्यास्ले शिकानं नई शे, खरच मी येडा नही शे, मायाजाल, ज्वार माय, उम्मेद, माय, मुखोटा, पडजी, किंमत या कथांचा समावेश यामध्ये आहे. एका वेडसर माणसांची गोष्ट म्हणजे बठ्ठा येडास्ना बजार ही कथा आहे. वास्तविक जीवनात या वेडसर माणसाचे शब्द खरे ठरतात, हा अनुभव लेखकाला मिळाला. 

"हाउ देशी दारून्हा आड्डा से का....?"

तो आस बोलता बरोबर मन्हा संताप व्हस.

"उनी आंजू...! हावू आम्हना जयगुरू यायमसायाले देशीन्हा आड्डा म्हनस...?"

"अरे पागल.....! हाऊ देशीन्हा आड्डा नही. हाई जयगुरू यायमशाया से. ह्या आखाडाम्हा आम्ही यायम करतस."

(पृ.१४)

"हाउ आखाडा से का...?"

तो आस्सं बोलस, तसा टपरीवरन्हा त्या दहा पंधरा तोंडे जोरम्हा हाशी उठतस. तो मन्हाकडे दखीस्नी बोलस म्हनीस्नी म्हाले उत्तर देन्हं भाग व्हत

"अरे पागल...! हाउ आखाडा नई.  हायी नगरपालिका से...!"

(पृ.१७)शेवटी लेखकालाच प्रश्न पडतो, "येडं कोन...? हाउ येडा का जग.....? कोन्ही कोन्हले येड म्हनो....? बठ्ठा बजार येडास्ना....!"

समाजजीवनाचे वास्तव भान आणि जाण देणारी मर्मस्पर्शी कथा अस्सल अहिरानी भाषेत कथाकाराने सादर केली आहे. भाषा हेच प्रमुख बलस्थान या कथासंग्रहाचे आहे. या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील प्रादेशिक भाषेचा गोडवा, म्हणी, शब्द, उच्चारानूसार भाषा मांडण्याचे सामर्थ्य, आणि विशेषत: वाचकांना शेवटपर्यंत खान्देशी लोकजीवनाचे दर्शन घडविणारी अस्सल भाषेवरील पकड हे वाचकांना जाणवते. चूल्हानं लाकूड या कथेत स्त्रीजीवनाचे दर्शन यशस्वीपणे घडविले आहे. ग्रामीण भागात आज देखील उपेक्षित, दुर्लिक्षित स्त्री जीवन आहे. याचा संदर्भ पुरावा म्हणजे हा अनुभवावर आधारित ही कथा आहे. 

दारूड्या नवर्याला कंटाळून हातातील नोट शेवटी त्याला देणारी एक आई, एक पत्नी कथाकाराने रेखाटली आहे. 

"आते तुन्हा दवापानीले असी फाटेल नोट चालाव नई, मन्हा दारूपानीले मातर आस्सी फाटेल नोट चालस....! नुसती चालावं नई.... ती ते देसाडम्हा दुकानवर दौडी....!"

(पृ.२६)

शेवटी मुलगाऔषधपाण्याअभावी मुलगा मरण पावतो. 

त्यास्ले शिकानं नई से....! या कथेत शिक्षण व्यवस्थेचा चेहरा कथाकाराने दाखविला आहे. शिक्षणासाठी किती पैसा कसा मोजला जातो याचे वास्तव वर्णन यामध्ये आहे. 

"रामजी, त्या हेडमास्तरले बलावं....!"

आप्पासाहेब हुकूम सोडस.

"सर...आजू शाळेत आले नाहीत...!"

(पृ.२९)

"त्यान्हं काय से.... गोपीचंद नाना सध्या साया मास्तरन्हा मार्केट रेट अकरा लाख रूप्या से. तूम्हीन म्हना घरन्हा म्हनीस्नी निदान दहा लाख ते द्या....!"

(पृ.३१)

मुलांना रागवू नका, मारु नका त्यांना शाळा शिकायची नाही हे अगदी सहजतेने कथाकार वाचकांना पटवून देतो.

"आंधडे सर, त्यास्ले शिकानं नई से.....! तूम्हले दर महिनाले पगार कमावना से....! पोर्हेस्ले जास्त शिकाडान्हा भानगडम्हा पडू नका."

अशा प्रकारे ही कथा वास्तव जीवनाचे स्वरूप दाखवण्यात यशस्वी ठरते.

धुळे जिल्ह्यातील एक अनुभव खरच मी येडा नई से....! या कथेत कथाकाराने मांडला आहे.

नारायण तांबोयीची ही कथा वाचकांना अंतर्मुख करते. आदीवासींची उपेक्षित अवस्था शासनदरबारी आहे हे पाहुन तो दु:खी होतो. तो मुख्यमंत्र्यासोबत बोललो असे सांगतो. गावातील मुले त्याला वेडा म्हणून चिडवतात. शेवटी स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक उपेक्षित ठरतो असे वर्णन कथाकाराने केले आहे.

त्याच्या घरी फोटो पाहून कथाकार आश्चर्यचकित होतो. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान नेत्यासोबत नारायण तांबोयीचा फोटो असतो. जगाने वेड्यात काढलेली माणस पुस्तकाच्या धडयात सापडतात. या वाक्याची आठवण या ठिकाणी येते.

"साहेब....! खरच मी येडा नई से....! पन मी या देसवर आनि आठना नेतासवर येडासारख प्रेम कर हो....!"

(पृ.४३)

त्याचे शब्द ऐकून वाचक प्रभावित होतो. अस्सल खान्देशी भाषा वाचक मनावर प्रभुत्व गाजविते. कथा लेखन शैली, कथाबीज, संवाद कसब या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे कथा उच्च दर्जेला पोहोचते. कथाकार लेखन शैलीत अचूक परीक्षण, निरीक्षण यामुळे समाज जीवन रेखाटण्यात यशस्वी ठरतो.

मायाजाल या कथेत भुसावल सुरत पैसेंजरचा सुंदर प्रवास रेखाटला आहे. एक आई मुलासाठी काय करू शकते? याविषयी वास्तव चित्रण रेखाटले आहे. 

"आजी, कोठन्ही से....?"

एकदंर आजी तोंडवरथून अहिरानी पट्टीनी वाटस."

"आम्हीन चोपडाले र्हातस....!"

आजी डोकावर पदर ल्हीसन मन्हासे बोलस.

"मगं डोया नई तपासात....? ईतला दुरथून उनी आधिक डॅाक्टरले डोया दखाडत नई...?"

मी तिल्हे ईचारस. तसी ती उफडायी उठस.

"नई रे बा....! मन्हा डोयाले काय धाड भरनी...? मन्हा डोया चांगला सेतस...! त्या मन्हा एकुलत्या एक पोर्यान्हा डोया अंध्या व्हयी ग्यात. त्यान्ही खटपट कराले मी आठे डाक्टरकडे येल से."

(पृ.४६)

मन्ही तिन्हासे बोलानी हिम्मत व्हत नई. मन्हा डोया भरी येतस. ती मातर निरागस भावथून बठेल व्हती. तिन्हा संताप कोन्हावरच नई व्हता. नियती तिल्हे कबुल व्हती‌. बहुतेक कवी आपला मायन्हा उपकार फेडासाठे कविता करतस. पन आठे हायी माय कवितान्हा मायाजाल पल्याड दिखत व्हती

(पृ.४९)

अशा प्रकारे शेवटी आईची महानता सांगणारी ही कथा कथन शैलीमुळे श्रेष्ठ ठरते.

ज्वारी माय या कथेतून शेतात काम करणारी माणस वेळेवर मिळत नाही म्हणून आशावादी बोलणारा संतोष नाईक आणि निराशावादी बनणारा शेतमालक यांच्या विचारसरणीवर प्रकाश टाकणारी वास्तव कथा आहे. समाजजीवनाचे वास्तव दर्शन ही विशेषता या कथासंग्रहाची आहे.

त्यास्नं बोलनं आयकीसन मी चूपचाप बठस. माय संतापस.

"कसाले वाढायी द्या....? जो सौदा झाया तो पक्का...! नउ डोया ज्वार दिस्नी तुम्हीनं काम करावं नईत ते काय आख्खी ज्वार आम्हीन मजुंरीम्हा वाटानी का....?"

(पृ.५७)

संतोष नाईक हे पात्र प्रभावी ठरते.

शेतीजीवनाची व्यथा मांडणारी कथा म्हणजे उम्मेद हि कथा आहे.

शेतीसाठी राब राबणारी माय आणि मुलाचे विचार यात फरक दिसून येतो. वाचकांना अंतर्मुख करणारी कथा आहे.

"आन्ना...... तू मन्ही तबृयेतनी कायजी करू नको.....मी कधी मरी गवू तरी म्हाले आठे, ह्या आंबाना धाव खाले बायी फुकी टाकजो. काही मोठं क्रियाकर्म करी जास्त कर्जबाजारी व्हवू नको....!"

(पृ.६७)

मायचे हे शब्द प्रभावी ठरतात. आयुष्य मातीसारखेच असते. हा मौल्यवान तत्व संदेश ही कथा वाचकांना सांगून जाते.

माय या कथेत देखील शेती जीवनाची व्यथा मांडली आहे.

यामधील एक वाक्य वाचकांच्या हृदयाला स्पर्श करते.

"सालदारन्हा आनिक  तुन्हा बापना भरोसावर हायी खेती व्हवावं से का....? मी से म्हनीस्नी येवढं तरी पीकस.....!"

हे वाक्य प्रभावी ठरते. संपुर्ण ग्रामीण स्त्री जीवनाचे प्रतिनिधीत्व यामध्ये दिसून येते.

आजन्ही बठ्ठी रात जागी काढेल व्हती. बठ्ठी रातम्हा मानूसस्ना स्वभावना येगयेगळा म्हाले उमजेल व्हतात.

(पृ.९५)

मुखोटा या कथेतील वरील वाक्य आहेत. नईम नावाच्या ड्रायव्हरने दाखवलेली माणुसकी त्याला किती महागात पडते, याविषयी सविस्तरपणे वास्तव वर्णन केले आहे.

पडजी या कथेत देखील निजामने दंगलग्रस्त वातावरणात दाखवलेली माणुसकी अंतर्मुख करणारी ठरते.

जात, धर्म, यापलीकडे माणुसकी श्रेष्ठ ठरते. हा प्रभाव वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो.

किंमत या कथेत ब्राम्हण आणि न्हावी यामधला जातीभेद शाळेतील पुस्तक वाचणारा नायकाचा मुलगा याच्या शब्दांमुळे लक्षात येतो. आणि महात्मा फुले यांचे विचार वाचून नायक निर्भिड बनतो. बोलू लागतो. हे श्रेय शिक्षणाचे आहे. हे परिवर्तन गावागावात दिसले पाहिजे अशी अपेक्षा महापुरूषांची होती. मात्र गावागावात मात्र जातीपातीचे घाणेरडे राजकारण पसरले. ही शोकांतिका ठरते. सर्वच कथा अंतर्मुख करणार्या ठरतात.

संपुर्ण कथासंग्रह अस्सल खान्देशी भाषेत असल्याने खान्देशी वाचकांना पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. जीवनमुल्यांचे अनुभव कथन करणार्या कथा आहेत.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ साठी एम. ए. पार्ट टू च्या खान्देशातील मराठी साहित्य हा पर्याय पेपर सुरू केला आहे‌. यासाठी सदरच्या संग्रहातील किंमत आणि मुखवटे या दोन कथांची निवड झाली आहे. कथाकाराचे अभिनंदन करते. कथाकाराला  साहित्य प्रवासाच्या अनेक शुभेच्छा आणि कथासंग्रहाचे मराठी साहित्य विश्वात स्वागत करते.

पुस्तकाचे नाव 

बठ्ठा येडास्ना बजार

लेखक

गोकुळ बागुल

किंमत

१३०₹

पृष्ठ १२४

प्रकाशन

कस्तूरी प्रकाशन अमळनेर जळगाव

संपर्क

9422276140

समिक्षण

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू