पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पहिला पाऊस

पहिला पाऊस

अल्पना आपली सॅक सांभाळत कॉलेजला जायला निघाली. फर्स्ट इयर सायन्सला होती ती. आता हळूहळू बाईक शिकत होती. एकदा का व्यवस्थित आई-बाबांच्या मनाप्रमाणे बाईक चालवायला यायला लागली की तिला ही बाईक मिळणार होती. तोपर्यंत बसने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्यांदा तिला खूप कंटाळा यायचा, पण नंतर सवय झाली. ती बसमध्ये चढणार तोपर्यंत तिला तो दिसला. तसा नेहमीच दिसायचा. उत्कर्ष.. त्यांच्याच कॉलनीत राहणारा. तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असणारा उत्कर्ष. पहिल्यांदा तोही तिच्याबरोबर बसमध्ये असायचा, पण अलीकडे त्याने नवीन मोटारसायकल घेतली होती.
लहान असताना अगदी एकत्र खेळणारे उत्कर्ष आणि अल्पना आता मोठे झाल्यावर मात्र एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला संकोच करीत असत. जुजबी बोलणंच झालं तर झालं नाहीतर नाही हेच खरं. त्याचं ते रुबाबात मोटारसायकलवरून जाणं अल्पनाला खूप आवडू लागलं होतं. पण काही वेळा तिच्या मनात यायचं, किती दुष्ट आहे हा? आपल्याला विचारत ही नाही, ‘‘की बाई, येतेस का माझ्याबरोबर? माझ्या कॉलेजवरूनच तर पुढे जातो हा.’’ तिची बसमध्ये चढायची लगबग आणि त्याच वेळी त्याची तिथून जायची वेळ कधीही चुकत नव्हती.
अल्पना कॉलेजला पोहोचली. कॉलेजची लेक्चर्स झाली. मैत्रिणींबरोबर गप्पा झाल्या. तिला खूप मैत्रिणी होत्या, पण नेमकं तिच्या भागात राहणार्‍या कोणी नव्हत्या. पावसाचं चिन्हं दिसू लागलं होतं.
‘‘चला मी पळते. नाहीतर पावसात अडकेन.’’ म्हणत अल्पना बसस्टॉपवर पोहोचली आणि अचानकच पावसला सुरुवात झाली. धुवाधार पाऊस पडू लागला. नशीब शेडमध्ये तिला आत बसायला जागा मिळाली. ती शेडमध्ये शिरली आणि पाच मिनिटांतच तिला उत्कर्ष दिसला. मोटारसायकलवर पाऊस चुकवत चाललेला, पूर्ण भिजलेला. ‘अचानक पाऊस आल्याने रेनकोट वगैरे काहीच बरोबर नसणार..’ तिच्या मनात विचार आला. तेवढ्यात त्याने मोटारसायकलला ब्रेक लावला आणि आडोसा म्हणून बस शेडमध्ये घुसला.
‘‘भिजलास की..’’ अल्पना पटकन म्हणाली.
‘‘हो ना अचानक आला पाऊस आणि थांबायलाही कुठे जागा नव्हती.’’ उत्कर्ष म्हणाला.
‘‘हो ना नशीब मी इथे आले आणि पाऊस सुरू झाला.’’
मग दोघांच्या गप्पा झाल्या. पाऊस असल्याने रिक्षाही मिळत नव्हती. बसही आली नव्हती. त्यामुळे दोघांकडेही भरपूर वेळ होता. हळूहळू पावसाचा जोर कमी होऊ लागला. तोही घरी जायला निघाला तो तिला विचारणार,
‘‘येतेस का माझ्याबरोबर?’’ तेवढ्यात नेमकी तिची बस टपकली.
तिलाही काही समजेना. काय करावं? पण ती बसमध्ये चढायला पुढे गेली.
याचे ‘‘येणार का?’’ हे शब्द तिथेच रेंगाळले.
निदान या पावसामुळे बोलणं तरी झालं. तिच्या मनात विचार आला.
ती बसमध्ये चढेपर्यंत हा तिथेच थांबला. ती बसमध्ये बसल्यावर तिने बाहेर नजर टाकली. त्याने हात करून उद्या भेटू अशी खूण केली. तिच्या चेहर्‍यावर गोड हसू उमटलं.
बाहेरचा पाऊस केव्हाच थांबला होता, पण मनात मात्र प्रेमाचा पाऊस कोसळत होता.


सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू