पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चंद्रमौळी झोपडी

चंद्रमौळी झोपडी.


_लेखिका- सौ. राधिका माजगावकर पंडित._


       तो मुलगा तसा फार मोठा नव्हता आणि फार लहानही नव्हता. बाबा लवकर गेले त्याचे, म्हणून आई हेच सर्वस्व होतं त्याचं. झोपडपट्टीत राहणारी ती माऊली कशीबशी पैशांची जुळवणी करून पीठा मीठा ची जोड देत होती, तिच्या फाटक्या संसाराला.

       एक दिवस काय झालं कोण जाणे, नेहमी शांत असणारा तो मुलगा, म्हणजे अंतू, कुणीतरी डिवचलं म्हणून बिथरला. त्याने हट्ट धरला. "आत्ताच्या आत्ता मला पैसे हवेत म्हणजे हवेतच. मला एक वस्तू हवी आहे आणि ती मिळालीच पाहिजेल मला, आणि अगदी आजच."

       कनवटीला लावलेले पैसे चाचपडत आई म्हणाली, "आहेत रे बाळा पैसे, पण ते बाम आणण्यासाठी ठेवले होते. आज पंधरा दिवस झाले खूप कंबर दुखतीय रे माझी. उद्या आजारी पडले तर कामं सुटतील ना बाबा आपली."

        इरेला पेटलेला अंत्या  गुरगुरला, "काहीच मनासारखी वस्तू आणून देत नाहीस तू आई मला. कधीही काहीही मागितलं तरी नाहीच म्हणतेस." 

        फुरंगटून बसलेल्या बाळाकडे बघून आईला कीव आली आपल्या बाळाची, आणि चीड पण आली तिला आपल्या परिस्थितीची. अखेर तिने कनवटीची छोटीशी बँक त्याच्यापुढे रिकामी केली आणि त्याला जवळ घेत ती माऊली म्हणाली, "एकच गोष्ट ऐक बाळा माझी, कुठलीही गोष्ट, वस्तू घेताना मनाशी दहा वेळा विचार कर की 'माझं ह्या वस्तूवाचून काही अडणार आहे का?' आपल्या प्रामाणिक मनाला प्रश्न विचार, आणि प्रामाणिकपणेच स्वतःशी उत्तर देऊन तु ती वस्तू खरेदी कर आणि मगच ती घरी आण."

        रुसला, रागावला, हट्ट केला तरी, मातृभक्त, आई वेडा मुलगा होता तो. जत्रेच्या मोह नगरीत गेला तरी प्रत्येक दुकानापुढे उभं राहताना आईने सांगितलेला मनाला विचारायचा प्रश्न तो मनात जागवत होता. सारी दुकानं धुंडाळून झाली. अंधार पडायला लागला. मनाशी पडलेल्या प्रश्नातून एकच सूर निघत होता, 'नाही, नाही अडणार माझं या वस्तू वाचून. मग मी ही वस्तू का घेऊ ?'

      दमल्यावर ते लेकरुं पायरीवर बसलं. समोर हातगाडीवर तळणीत भजी खदखदत होती. खमंग वास सुटला होता. 'घ्यावा का एक पुडा? आई पण खाईल. तिच्यासाठी पण नेऊ या.' विचारांच्या प्रश्नोत्तरांच्या भोवऱ्यात तो अडकला. त्याक्षणी त्याला आठवलं. 

       मग पुन्हा त्याच्या मनात विचार आला. 'नको नको, आईला दमा आहे. तेलकट वासामुळे तिला त्रास होईल, खोकला येईल'. शिवाय शिंकाळ्यात शिळी भाकरी त्याची वाट बघत असेल. ती वाया जाईल ना! नको नको, काही अडलंय का या भज्यांवाचून  माझं?' 

       भजी खाण्याचा मोह आवरून तो ताडदिशी उठला. आणि समोरच्या मेडिकल स्टोअर च्या पायऱ्या चढू लागला. त्याने दुकानदाराला विचारलं, "दादा, कंबर दुखी थांबण्यासाठी एखादं चांगलं औषध आहे का हो? द्या ना मला." त्याने किंमत विचारली. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. पैशाचे गणित बरोबर जमलं होतं. त्याला आनंद आणि समाधान वाटलं..

        आता तो धावतच घराकडे निघाला. मनात विचार आला, 'जत्रेमध्ये फिरण्यात फालतूक वेळ घालवला आपण. किती उशीर झालाय. आई वाट बघत असेल. कंबर दुखीने हैराण झाली असेल, आपण जत्रेतली दुकानं फिरून पायपीट करण्यापेक्षा आई साठी औषध घ्यायला हवं होतं. कसं सुचलं नाही हे आपल्याला ?'

       लगबगीने घरात शिरतांना अंतूला आईचा कंबर दुखीने बेजार झाल्याचा, विव्हळण्याचा आवाज आला. त्याला आणखीनच अपराध्यासारखं वाटलं. 

       तो आईजवळ गेला. त्याला जवळ घेऊन आईने विचारलं, "काय रे बाळा! जत्रेच्या  बाजारात मिळाली का तुला हवी ती वस्तू ?"

       आईच्या कुशीत शिरत तो म्हणाला, "नाही आई, मला हवी ती वस्तू जगाच्या बाजारात नाही मिळणार. ती घरातच मला मिळेल, आणि ती सुद्धा तुझ्या हृदयात, तुझ्या स्पर्शात. आई, लक्षात आलयं माझ्या, तुझ्या वाचून प्रत्येक क्षण अडणार आहे माझा. तुझ्याशिवाय दुसरं काहीहीं नकोय मला. माझ्यासाठी तूच मोठी गोष्ट आहेस. दुसरी कुठलीच गोष्ट नकोय मला." असे म्हणून तो आईला बिलगला.

         बाहेर चांदणं निथळत होतं. झोपडीच्या छिद्रातून प्रकाशाचा कवडसा आत आला आणि मग त्या झोपडीचा चंदेरी महाल झाला. अंतूची आई त्या महालाची, चंद्रमौळी झोपडी ची महाराणी होती. आता तर ती राजमाता जिजाऊ झाली. मुलावर चांगले संस्कार करून त्याला योग्य वळण लावणारी ती राजमाता, आता आपल्या शिवबाला परिस्थितीशी लढा देत वाढवणार होती. कर्तुत्वाने त्याला मोठं करणार होती, अगदी खूप मोठ्ठ, शिवाजी राजांच्या सारखं.

      चंद्राच्या चांदण्यात चंद्रमौळी झोपडी झळाळत होती, आणि त्या चंदेरी दुनियेत ती मायलेकरं विसावली होती. आपणही यांच्या समाधानात समाधानी होऊ या का ? 

       अखेर अंतूला त्याची आवडती गोष्ट, त्याचं सुखनिधान मिळालं होतं, आणि आई! आई ला आपल्या गुणी समजूतदार  बाळाची समजूत पटल्याचा आनंद झाला होता.

 _*©सौ. राधिका (माजगावकर) पंडित,*_

पुणे,  8451027554

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू