पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वामी तीन्ही जगाचा...

- आई -
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी !

एकदा उन्हाळ्यात गावी जात असतांना भर दुपारी कशी कोणास ठाऊक बस बंद पडली. वैशाखातले ऊन..... सूर्य आग ओकत होता. रस्तेही तापले होते. त्यामुळे बसही तापली होती. बस मधला उकाडा वाढत होता. बसमधील सारे प्रवासी उकाड्याने हैराण झाले होते. म्हणून हळूहळू सारेच बसमधून उतरले आणि झाडांची सावली बघून सारेच त्या झाडांच्या शीतल छायेत उभे राहत होते. मीही बस मधून उतरून एका झाडाखाली उभी राहिले.
सहज समोर लक्ष गेलं..... समोर रस्त्याचे काम चालू होते. काही पुरुष व बायका खडी टाकण्याचे काम करीत होते. तिथे जवळच एका कडूनिंबाच्या घनदाट सावलीत एक ६/७ वर्षाची मुलगी .…..मळकट ....ढगळ फ्रॉक घातलेली.,....केसांचा रबरबॅड लावून बांधलेला बो ..... पण त्यातून बाहेर आलेले केस तिच्या चेहऱ्यावर वाऱ्याने येत होते. आणि ती हाताने ते बाजूला सारत होती . दुसरीकडे एका सहा सात महिन्याच्या....मळकं झबलं घातलेल्या..... मुलाला खेळवत होती.बाळ छान आपलं बोळकं दाखवून हसत होतं.बाळच ते....गोंडस आणि गोड......काळे सावळे असले तरी.....खेळता खेळता थोड्याच वेळात ते बाळ रडू लागलं.ताई त्याला उगं करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याला कडेवर घेऊन फिरवत होती. शेवटी तेथे उभी असलेल्या एका बाईने त्याला घेतले. तिनेही त्याला उगं करण्याचा प्रयत्न केला. पण बाळाचे रडणे थांबेना. डोळ्यात पाणी.....नाकात शेंबूड..... उलट्या मुठीने नाक डोळे चोळत बाळ रडत होतं......
त्याचं रडणं ऐकून, रस्त्याचे काम करणाऱ्या, त्याच्या आईने जवळ असलेल्या बादलीत आपले हात धुतले आणि पदराला हात पुसत ती बाळाला घ्यायला धावली. ती जवळ येताच बाळ तिच्याकडेच झेपावलं. तिने पटकन त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. नंतर तिने आपल्या मळकट, फाटक्या पदराने त्याचे तोंड पुसले. बाळ तिच्या चेहऱ्याला हात लावून.... वाकून तिच्याकडे बघून छान आपले बोळके दाखवत खदखदून हसत होतं. त्यावेळी आईला ते बाळ जगातील सर्वात सुंदर बाळ वाटत होतं. बाळाने आपल्या आईचा स्पर्श ओळखला आणि त्याचं रडणं थांबलं होतं.
लगेच आईने जमिनीवर बसून त्याला मांडीवर घेतले. त्याच्या अंगावर पदर झाकला आणि त्याला ती अमृतपान करू लागली. दोघांचे चेहरे तृप्ततेने फुलले होते. दोघेही कुबेराहून श्रीमंत झाले होते.
खरंच. त्या बाळाला, आईच्या कष्टाने खरखरीत झालेल्या हातांचा स्पर्श बोचला नाही का ?...... कसा बोचेल ?...तो एका आईच्या मायेचा, प्रेमाचा स्पर्श होता.... स्वर्गसुखाहूनही सुखावह असा तो स्पर्श ....... आत्मा व ईश्वर यांचा संगम झालेल्या त्या आईचा तो स्पर्श होता.
एक स्त्री जेव्हा आई होते आणि तिचे बाळ तिच्या कुशीत येते तेव्हा....
. अहो ऽ कोणी पाहिले का जगातील सर्वात सुंदर चित्र ?......अहो ऽ हेच ते जगातील सर्वात सुंदर चित्र...... आईच्या कुशीत असलेलं बाळ.....
बाळ आईचा स्पर्श ओळखतो . त्याला तो प्रिय असतो . मग ते हात एखाद्या सौंदर्यावतीचे मुलायम हात असो वा मजुरी व कष्ट करून खरखरीत झालेल्या कामगार स्त्रीचे हात असो, बाळाला तो आईचा स्पर्श गुलाब पाकळ्यां सारखाच मुलायम भासतो.
बाळाला भूक लागली किंवा त्याला काही लागलं तर तो न बोलताही आईला, त्याला काय हवं ,त्याला काय होत आहे हे सारं तिला कळतं. त्यासाठी तिला कुठल्याही डिग्रीची गरज नसते. कारण बाळा विषयीचे प्रेम , माया तिच्यात इतके ओतप्रोत भरलेले असते की , ती अगदी बाळमय झालेली असते.
तिचे बोट धरून बाळ पहिले पाऊल टाकते आणि नंतर सारं जग पायाखाली आणण्यासाठी ते आयुष्यभर धावत असते. बाळाचा पहिला शब्द 'आई ' असतो . तो शब्द ती ऐकते आणि तिला स्वर्गसुख लाभल्यासारखे वाटते.
ह्या बाळाबरोबर आईही बाळ होते. त्याच्याबरोबर बोबडे बोल बोलते. त्याच्याबरोबर खेळते. छान छान बडबड गीत गाऊन त्याचे मन रिझवते. त्यामुळे बाळाचा पहिला सवंगडी आईच असते. शिवाय आई त्याचं सर्व ऐकते होते म्हणून तो राजा अन् आई त्याची गुलाम . पण त्यातही तिला आनंद असतो . त्याच्यावर ती प्रेमाच्या फुलांची उधळणच करीत असते.
बाळाला पहिला ' श्री ' आई शिकवते .नंतर पुढेही ती त्याला जीवनातले धडे शिकवत असते. त्यामुळे त्याचा पहिला गुरु आईच असते. जसजसा बाळ मोठा होऊ लागतो, तसतसा आईला मित्र मानणाऱ्या, बाळाला अनेक मित्र मिळतात. त्याचं विश्व विस्तारत जातं...... आईच्या पदरामागे लपणारा तो .... आईकडे हट्ट करणारा तो...... आईच्या गळ्यात हात टाकून " You are the best Mom in the World" म्हणणारा तो ...... अशा या तो कडून अनेक चुका होतात ....पण ती आई असते ना ?.... वेळप्रसंगी मन घट्ट करून ती कडक होते. पण नंतर ती त्याला चुका समजावून सांगते त्याला वळण लावते. त्याच्यावर उत्तम संस्कार करते. त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते. आदर्श नागरिक बनवते. आणि त्याच्याबरोबरच त्याला आपल्या प्रेमाच्या पंखाखाली घेते. तिचे मनच सागरा सारखे विशाल असते. प्रेमाचा तो सागर कधीही आटणार नसतो. मग ते बाळ मुलगा असो वा मुलगी ...तिला, त्याला वाईट जगापासून वाचवायचे असतेच पण त्याबरोबरच त्याने या जगात घट्ट पाय रोवून नंतर आत्मविश्‍वासाने उंच भरारी घ्यावी असे तिला वाटत असते.
उंच भरारी घेऊन त्याने एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकावे.... जगाला दिपवावे असे तिला वाटत असते.... तिला असे नुसते वाटत नाही त्यासाठी ती त्याला आपले बळ तर देतेच ,त्याबरोबर आपल्या आशीर्वादाचे मोठे वलय ती त्याच्याभोवती निर्माण करते......... तिच्या श्रद्धा व भक्ती पुढे देवही ते वलय तोडू शकत नाही .एवढे हे आईच्या आशीर्वादाचे बळ बळकट असते.
बाळाला मोठे करतांना आई बरोबरच वडिलांचेही मोठे योगदान असते हे मान्य करावे लागेल. पण काही दुर्दैवी स्त्रियांना पतीचे सहकार्य लाभत नाही..... कारण नवरा बायकोची लग्नाच्या वेळी गाठ बांधतात, तेंव्हा दोघेही वचनं घेतात...
संसारात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतात..... पण एक लक्षात घ्यावे..... लग्नाच्या वेळी नवऱ्याचे उपरणे त्याच्या खांद्यावर असते. त्याची गाठ स्रिच्या पदराला बांधतात. नवरा खांद्यावरचे उपरणे केव्हाही, कधीही फेकून जाऊ शकतो.... पण स्री ती गाठ सांभाळत घर सावरते.... घरातील माणसांना सांभाळते. अशी ही आई 'स्री 'असली तरी ती खंबीरपणे आपल्या बाळाच्या पाठीशी उभी राहते. तिचे 'आईपण ' तिला दहा हत्तीचे बळ देते. बाळासाठी ती कोणत्याही संकटांना तोंड देते. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बाळाला खाऊ घालते. अशावेळी वाटते..... आईच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच त्याच्या पाठीशी असतो .
हे सारं करतांना आईला पुढे मुलांकडून काही अपेक्षा असते का ?... नाही हो..... कोणतीही आई मुलांशी कधीही सौदा करत नाही....ती निरपेक्ष भावाने त्यांच्यावर प्रेम करत असते.....माया करत असते. अर्थात तेही तिच्या कडून आपोआपच होत असते..... फक्त मुलांनी सुखी रहावे..... ते सुखी तर ती सुखी....ते दुःखी तर ती दुःखी ....ती परमेश्वराजवळ स्वतःसाठी काही मागणार नाही पण आपल्या मुलांसाठी सर्व सुखं व उदंड आयुष्य मागत असते.
उतारवयात मात्र तिला एवढेच वाटत असते की, आपल्या या बाळाने कितीही कामात असलं तरी 'आई '. अशी हाक मारून तिच्याशी दोन शब्द बोलावे... क्षणभर तरी तिच्या मांडीवर डोके ठेवावे... आणि ....आणि तिने आपला थरथरता, सुरकुतलेला, हात त्याच्या केसातून फिरवावा....बस तिला दुसरे काही नको असते.
अहो ऽ हीच आईच्या रुपाने ईश्वराने मानवाला दिलेली एक अमुल्य भेटआहे.....ठेव आहे..... म्हणूनच तिचे मोल जाणून तिला खूप खूप जपायचे.
आई माझा गुरू
आई कल्पतरू
सौख्याचा सागरू
आई माझी !

- स्मिता भलमे
9421058149
9 /5 /2021

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू