पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आढावा मातीचा देह कथासंग्रह

मातीचा देह : माणूसकेंद्री कथासंग्रह


डॅा. सुभाष हरिबा कटकदौंड एम. डी. स्त्री रोग तज्ञ खोपोली जि. रायगड येथील प्रतिभासंपन्न वास्तववादी कथाकार यांचा कथासंग्रह म्हणजे मातीचा देह हा माणूसकेंद्री कथासंग्रह आहे. महाजन पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी जाने. २०२२ला सदरचा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील सर्वच कथा हृदयस्पर्शी आहेत. कारण या कथा अनुभवातून आलेल्या आहेत. ओघवती भाषाशैली, कथाबीजाचा योग्य वापर, आजूबाजूच्या बदलत्या परास्थितीचे भान, समाजहितचिंतक आणि प्रबोधनकार म्हणून भूमिका, प्रसंगावधानता, जागृत बुध्दीचा समतोल, मानवी जीवनाप्रती समर्पक भावनेतून सेवाभाव, सतत इतरांच्या कुशल, मंगल चिंतन करण्याचा ध्यास आणि सतत घडवित जाणारे आयुष्य, प्रेरक प्रसंग, ही गुणविशेषता या संग्रहाची मूल्यमापनाच्या निकषातून लक्षात येते. उत्तम कथाबीज, उत्तम संवाद आणि रोजच्या आयुष्याचे चित्रण असमान्य जीवन जगणारे सामान्य माणस हा गाभा या कथालेखनाचा आहे. डॅाक्टरांच्या भूमिकेतून दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टीकोन यामध्ये आहे. मानवी स्वभाव प्रवृत्तीचे वेगवेगळे दर्शन यामध्ये आहे. माणूस कशासाठी जगतो? या प्रश्नाचे उत्तर यामध्ये मिळते. समाजातील अनेक समस्यांना पर्याय कशा प्रकारे मिळवता येऊ शकतो. या अनुभवाचे कथास्वरूपात दर्शन घडते. ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी कथासंग्रहाचे स्वागत केले आहे. कथाकार एक कवी देखील आहेत. भिंतींनाही कान नाहीत हा त्यांचा काव्यसंग्रह २०१८या वर्षी प्रकाशित झाला आहे.कोकण मराठी साहित्य परिषद खोपोलीचे कोषाध्यक्ष कथाकार आहेत. श्री. सुधाकर चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड यांची प्रस्तावना सदरच्या कथासंग्रहाला मिळाली आहे. कथाकाराची पात्रे बोलकी, संयमी, विवेकी व सकारात्मक वृत्तीचे आहेत. ते वास्तवतेला कल्पनेच्या कोंदणात चपखलपणे बसवतात. असे मत रोहिदास पोटे माजी शिक्षण संचालक म. रा. पुणे यांनी व्यक्त केले आहे. नीतीमुल्य आणि स्त्री जाणिवा अधोरेखित करणारा सदरचा कथासंग्रह आहे. एका उच्च श्रेणीत वाचकांना घेऊन जाणारा सदरचा कथासंग्रह आहे. एकूण एकोणीस कथांचा यामध्ये समावेश आहे. डॅाक्टर, माझ गर्भाशय मला परत हवयं, मातीचा देह, घुसमट, दहा पैशांचे नाणे, शो मस्ट गो ऑन, पप्पा जो जो, रिकामा मंडप, कार्यकर्ता नेता, पाकिस्तानी जासूस, ओझं, मुखत्यार शेख, आठवणीतले आधारकार्ड, उमेद जगण्याची, मायेचा स्पर्श, शिळी भाकरी, भूत अशा विविध विषयाच्या माणूसकेंद्री कथा या संग्रहात आहेत.

नार्मल की सिझर या प्रश्नापासून ते सरोगसी मदर पर्यंत अनेक विषय चव्हाट्यावर मांडले जातात. अनेक स्त्री प्रश्न वेशीवर टांगले जातात, त्यावेळी धर्म आणि संस्कृतीच्या ठेकेदारांना गाढ झोप लागलेली असते ही शोकांतिका देशाची आहे. अशीच एक शोकांतिका पहिल्या कथेत कथाकार मांडतो. गर्भाशय नसलेली स्त्री समाज स्वीकारू शकत नाही. ती आक्रमक बनते. अनेक स्त्रिया या देशात मनोरूग्ण अवस्थेत जीवन जगतात. विशेषत: ग्रामीण भागात अज्ञान आणि अंधश्रध्देचा पगडा आज देखील कायम आहे. समाज या समस्येला कारणीभूत ठरतो. न्यूनगंड, कमतरता, सामावून घेण्याची आपली मानसिकता नाही. हे अनेक घटनांमधून समाज सिध्द करत असतो. स्त्री भृणहत्या असो की हूंडाबळी मानसिक दृष्ट्या खच्चीकरण हे ठरलेले असते. उषा या नायिकेचा भयग्रस्त निराशाजनक चेहरा पहिल्या कथेत कथाकाराने अधोरेखित केला आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मातीचा देह ही कथा देखील नात्यांची वीण स्पष्ट करणारी लक्षवेधक कथा ठरते. जून्या वाड्यातील संस्काराची जुळलेली नाळ उध्दवस्त वाड्यासोबत मातीच्या देहाला देखील कायमचा विसावा देते. हे हृदयस्पर्शी चित्रण यामध्ये केले आहे. पार्वतीबाई, मालतीबाई, माधवराव हे पात्र वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवितात. घुसमट या कथेत उच्च शिक्षित स्त्री देखील व्यसनाच्या आहारी जाऊ शकते याचे वास्तववादी रेखाटन मानसी काळे या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून कथाकाराने केले आहे. अनेक कथेतील नायिका अनेक प्रश्नांनी त्रस्त मार्ग शोधणार्या आशावादी आहेत. स्त्रियांची मनोभूमिका, वर्तनातील बदल चित्तवेधक ठरतात.डॅाक्टर आणि वकील यांच्यापासून आयुष्य लपविणे कठीण असते हा वास्तव अनुभव कथाकाराने प्रभावीपणे मांडला आहे. दहा पैशांचे नाणे ही कथा लेखकाच्या बालपणात वाचकांना घेऊन जाते. प्रामाणिकपणाची बीज बालवयात अधिक ठळकपणे रूजविली जातात, हा अनुभव यामध्ये साकारलेला आहे. शो मस्ट गो   ऑन ही कथा वाचकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाते. आपल वैयक्तिक सुख दु:ख बाजूला सारून डॅाक्टर रूग्णसेवा करतात याचा अनुभव कथाकाराने मांडला आहे. पप्पा जो जो, रिकामा मंडप या दोन्ही कथा वैयक्तिक जीवनातील लेकीचे आणि बहीनीचे मौल्यवान स्थान अधोरेखित करतात. कार्यकर्ता नेता यामध्ये गुंडागर्दी प्रवृत्तीला प्रसंगावधानता राखत योग्य वळण देण्याचे काम एक माणूस म्हणून आपण कशा प्रकारे हाताळू शकतो याचा अनुभव या कथेत मांडला आहे. पाकीस्तानी जासूस या कथेतील मनोरूग्ण स्त्री, आईला अवगत असलेली तेलुगू भाषा, महिला पोलीस हे चित्रण पारदर्शक ठरते.‌ स्त्रीजीवनातील कडू गोड प्रसंग आणि त्यातील मूल्यांकन असा भावनाशीलतेचा प्रवास या कथांमध्ये दिसून येतो. आईने उचललेले जबाबदारीचे ओझे ओझ या कथेत कथाकाराने रेखाटले आहे. मुखत्यार शेख ही कथा एका अनाथ मुलाच्या आयुष्याची आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्न अंतर्मुख करणारा ठरतो. त्याचा जीवनप्रवास हदय स्पर्शी ठरतो. जगण्याच्या उमेदीचे साक्षीदार कथाकार बनले आहेत. एका स्त्रीला मुलांसाठी जगावेसे वाटते हाच तिच्या विचारांचा सकारात्मक आणि आशावादी दृष्टीकोन तिचा आत्मविश्वास बनतो. भूत आणि सामाजिक भान या दोन वेगवेगळ्या कथा आहेत. अज्ञान आणि अंधश्रध्देला आपण स्वत: जबाबदार ठरत असतो. याचे वास्तव चित्रण भूत कथेत रेखाटले आहे. सामाजिक भान या कथेत एच. आय. व्ही सारख्या घातक गंभीर आजारामुळे आत्महत्या करणारी स्त्री रेखाटली आहे. समाजातील वास्तव नाकारता येत आहे हे सत्य कथाकाराने मांडले आहे. शिळी भाकर आणि श्रीखंड या दोन्ही कथेत गरीबीचे दिवस आठवतांना त्यामधील नात्यांची श्रीमंती कथाकाराने रेखाटली आहे. संपुर्ण कथासंग्रह पुन्हा पून्हा वाचावासा वाटतो. कारण हा आपला कथासंग्रह आहे असे वाचकाला सहज वाटते. यामध्ये आपले प्रतिबिंब आहे‌. आपले प्रतिनिधीत्व आहे. आपले प्रश्न आहेत. हे सहज जाणवते. अशा कथासंग्रहाची आवश्यकता महाविद्यालय स्तरीय अभ्यासक्रमात आहे.‌ मातीचा देह या कथासंग्रहाचे मराठी साहित्य विश्वात स्वागत करते. आणि नीतीमुल्य जपणारा कथाकार म्हणून डॅा. सुभाष कटकदौंड यांना पुढील साहित्य प्रवासाच्या अनेक शुभेच्छा देते.

पुस्तकाचे नाव

मातीचा देह

लेखक

डॅा. सुभाष हरिबा कटकदौंड

9561284408

महाजन पब्लिकेशन पुणे

संपर्क 9822977726

पृ. १६८

मूल्य ३२५₹

पहिली आवृत्ती

जाने. २०२२

समिक्षण

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू