पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आढावा प्रयोगशील एकांकिका

प्रयोगशील एकांकिका : तत्वविचारांचा संग्रह 


ललित पब्लिकेशन मुंबई यांनी १६ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केलेले सुंदर मुखपृष्ठाचे पुस्तक म्हणजे प्रयोगशील एकांकिका हे आहे. डॅा. प्रदीप सरवदे आकादमी  ऑफ थिएटर आर्टस       मुंबई विद्यापीठ या क्षेत्रात प्रतिभासंपन्न अभिनेता व दिग्दर्शक आहेत. प्रा. वामन केंद्रे माजी संचालक राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली यांचा अभिप्राय सदरच्या पुस्तकाला मिळाला आहे. या संपादन कार्याची भूमिका मांडतांना त्यामागील पार्श्वभूमी संपादकाने उत्तम प्रकारे स्पष्ट करून सांगितली आहे. एकच अंक असणाऱ्या नाट्यप्रकार म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे.  सामान्यत: एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार मानला जातो. १६८२ ते १८३२ या  काळात तंजावरमध्ये मराठी एकांकिकेचे लेखन व प्रयोग होत असत. या कालखंडामध्ये तंजावरच्या भोसले राजांनी विशेषत: व्यंकोजी भोसले यांचे पुत्र शहाजी राजे यांनी मराठी रंगभूमीला दिलेले योगदान महत्वाचे आहे. पाश्चात्य साहित्याशी आपला परिचय होण्याआधीपासूनच आपणास एकांकिका रचना व त्यातील प्रयोगशीलता यांची जाणीव होती हे विसरता येणार नाही. हरिभाऊ आपटे यांनी जबरीचा विवाह हे एकांकी प्रहसन लिहीले व त्याचा प्रयोग केशवराव दाते यांनी केला. मराठी एकांकिकामध्ये संस्कृत, तंजावरी पुढे इंग्रजी परंपरेपासून ते स्वतंत्र्योत्तर काळापर्यंतच्या या वाटचालीमध्ये प्रयोगतंत्राच्या दृष्टीने कालानूरूप बदल होत गेला परंतू ही एकांकिका पुरेशी समाजाभिमुख झाली नाही व मुख्य नाट्य प्रवाहापासून अलिप्तच राहिली. ही खंत संपादकीय भूमिका मांडतांना संपादकाने व्यक्त केली आहे. संपादन हा साहित्याचा कणा मानला जातो. कारण यामध्ये निवडक अशा साहित्यकृतीला घेऊन आत्मचिंतन आत्ममंथन संपादक सादर करत असतो. इतरांमधील सृजनशीलतेला वाव देणे. इतरांमधील जाणिवा उणिवा अधोरेखित करणे हे जिवंतपणाचे प्रवाहीपणाचे लक्षण साहित्य क्षेत्रात मानले जाते. प्रबोधन आणि परिवर्तनाचा शोध बोध हा एक जीवन प्रवास रंगभूमीवर मानला जातो. जीवन जगण्याची कला रंगभूमी उजागर करत असते. शेक्सपियरच्या नाटकातील जगावे की मरावे हा प्रश्न असो किंवा नटसम्राट मधील कुणी या वादळाला घर देता का घर? हा संवाद असो वाचक, प्रेक्षक, रसिक अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. सर्जनशील प्रतिभेच्या एकांकिकारांनी लिहीलेल्या एकांकिकांचे व या संपादन कार्याचे वाचक, प्रेक्षक, रसिक नक्कीच स्वागत करतील कारण हा केवळ एकांकिकांचा संग्रह नसून तत्वविचारांचा संग्रह आहे. यामध्ये एकूण सात एकांकिकांचा समावेश करण्यात आला आहे. अश्म, गांधी बात, दुसरा पॅनल, ग्लासनोस्त, नोव्हम, लैला, अंधे जहाॅं के अंधे रास्ते असे विविध विषय घेऊन डॅा. अरूण मिरजकर, नामदेव मुरकुटे, विजयकुमार राख, डॅा. प्रदीप सरवदे, महेंद्र खिल्लारे, योगेश मार्कडे, उर्मी अशा लेखकांनी विविध कलाकृतीचे सादरीकरण वाचकांसमोर ठेवले आहे. शेवटी लेखकांचा परिचय देखील दिलेला आहे.‌ अश्व ही एकांकिका एका सुनसान बेटावर वाचकांना घेऊन जाते. त्याठिकाणी प्रो. प्रभाकर, ललित, डॅा. शर्मिष्ठा, पायलट शर्मा हे पात्र वाचकांना भेटतात. अभ्यासदौरा करण्यासाठी आलेले लोक विमान दुर्घटनेमुळे अनपेक्षित बेटावर अडकतात आणि जीवन मरणाचा प्रश्न सुरू होतो. तत्वज्ञान आणि वास्तव जीवन यामध्ये होणारा संघर्ष हा कालबाह्य ठरतो. कारण हा संघर्ष हा सनातन आणि पुरातन स्वरूपात सृष्टीच्या अणूरेणूत विखूरलेला आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. शर्मिष्ठा या पात्राच्या माध्यमातून आलेला संवाद वाचकला अंतर्मुख करतो. शर्मिष्ठा म्हणते, बुध्द अन्नपाण्यावाचून उपाशी राहिला पण तो बुध्द होता म्हणून तो तरला.... मी नाही जगू शकत पाण्याशिवाय..... (पृ. २४)

तत्वज्ञानाचे, विज्ञानाचे ग्रंथ शेवटी जाळले जातात. पाण्याचा प्रश्न आयुष्यात महत्वपुर्ण ठरतो, जीवन कसे जगावे याचे भान ही एकांकिका देऊन जाते. त्यासाठी वाचकांनी प्रयोगशील एकांकिका हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे, कारण कलात्मकतेला एक नवीन दिशा देण्याचे प्रभावी कार्य यातून घडत आहे ही जाणीव वाचतांना मिळते. गांधी बात या एकांकिकेत विजू, राणी, मोहनजी, बापू आजच्या बदलत्या काळाचे प्रतिबिंब दाखवतात. भूमिका बदलल्या तरी तत्व मात्र बदलत नसतात. हे यातून दाखविले आहे. प्रत्यक्ष रूपाने आपण एकांकिका बघत आहोत. असे वाचकाला जाणवते. तत्वासाठी विकले जाणारे लोक यामध्ये दिसतात. बदलत्या काळाचे प्रतिनिधीत्व यामध्ये दिसून येते. दुसरा पैनल एकांकिकामध्ये बाई आणि बाबा या माध्यमातून काळ वेळ कितीही बदलला तरी राजकारणाचे शिकारी मात्र बदलत नसतात. ही ठाम भूमिका लेखकाने मांडली आहे. ग्लासनोस्त हा पद्माकर तामगाडगे यांचा कवितासंग्रह आहे. यावर आधारित सदरची एकांकिका आहे. जगभरात घडणाऱ्या विध्वंसक घटनांची ही मालिका आहे. धार्मिक दंगली, हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, दहशदवादी हल्ले एकूणच माणसाला भयभीत, दु:खी, अस्वस्थ करणार्या घटनांची ही मालिका आहे. सुर्यकुळाचे वंशज मेंदू आणि विचार या प्रभावी माध्यमातून लेखकाने पात्र साकारले आहे. ही विशेषता या एकांकिकेची आहे. मेंदू म्हणतो, अरे या भूमीत बुध्दाच्या धम्माचे तत्व कणाकणात मुरले. मातीचा वसा तूटणार कसा? (पृ.१०७)

वाचकांना तल्लीन करणारी प्रभावी एकांकिका आहे. महेंद्र खिल्लारे यांची नोव्हम एकांकिका वेगळा विचार घेऊन येते. मार्केटिंग जगाचे  दाखविणारी एकांकिका आहे. लैला या एकांकिकेचा विषय पाणी आणि जीवन हा आहे. जीवन जगण्यासाठी आजच्या जाहीरातबाजीच्या काळात उच्चशिक्षित तरूणांच्या कल्पकतेचे कस लागतांना दिसतो. शिल्पा सावंत यांची शेवटची एकांकिका देखील संवाद माध्यमातून प्रभावी ठरते. संपुर्ण प्रयोगशील एकांकिका विविध विषयाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते हे वाचतांना लक्षात येते. सदरच्या पुस्तकातील एका़ंकिकेचा प्रयोग, भाषांतर, माध्यमांतर यासाठी संबधित लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.  वैचारिक मेजवानी देणार्या या पुस्तकाचे मराठी साहित्य विश्वात स्वागत करते आणि संपादकाला पुढील साहित्य प्रवासाच्या अनेक शुभेच्छा देते. 

पुस्तकाचे नाव 

प्रयोगशील एकांकिका भाग १

संपादन

डॅा. प्रदीप सरवदे

पृ.१८१

मूल्य २००₹

प्रकाशन 

ललित पब्लिकेशन मुंबई

संपर्क 8879039143

समिक्षण

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू