पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मोबाईल फोन नसते तर.....

मोबाईल फोन नसते तर .....

गेल्या सुमारे १८-२० वर्षात आपण सर्वजण मोबाईल फोन व स्मार्ट फोनशी इतके जोडले गेलो आहोत की आता जर आपण असा विचार केला की स्मार्टफोन आपल्या हाती नसता तर ?...फार काय पण....साधे आपलेच उदाहरण इथे मी देतो...कदाचित स्मार्टफोन अभावी आपण माझे फेसबुक फ्रेंडही झाला नसता व माझा हा लेख देखील आपण फेसबुकवर वाचू शकला नसता ! हा झाला एक दृश्य परिणाम ! त्याचे असंख्य फायदे सांगता येतील मात्र मी माझ्या माहितीप्रमाणे व कुवतीप्रमाणे मी मोबाईल फोनची उपयुक्तता इथे नमूद करतो.
मोबाईल फोनची सोलापुरातील सुरुवात तशी साध्या मोबाईल फोनने २०-२१ वर्षापूर्वी झाली. मला आठवते त्याप्रमाणे सन २००२ मध्ये मोबाईल फोन सोलापूरला सर्वप्रथम मी एका वकिलांच्याकडे पाहिला होता व तो तसा साधाच होता व त्यावर कॉल आला तर फोन कसा घ्यावयाचा, तो कसा धरावयाचा हे देखील सामान्यांना त्याकाळी माहीत नसावे व केवळ फोन घेणे वा फोन करणे इतकेच त्या फोनचे काम सीमीत असेल, असे त्याकाळी वाटे. कदाचित इतरही काही फीचर्स त्यामध्ये असावेत पण अनेकजण त्याकाळी त्याबद्दल अनभिज्ञ होते, असा तो काळ होता.
मात्र पुढील काळात त्यामध्ये खूप सारे वैज्ञानिक बदल झाले, विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात आले, इंटरनेटचा व वाय-फायचा वापर वाढला व पुढे जसा स्मार्टफोनचा वापर सुरू झाला तसा त्याचा वावर सर्वत्र सुरू झाला, पुढे आपण सर्वजण ' मोबाईल ' या उपकरणाशी इतके एकरूप झालो की मोबाइल शिवाय जगणं ही कल्पनाही आपण सध्या करू शकत नाही. ती सर्वांसाठीच एक अनिवार्यता झाली. अलीकडील १५-२० वर्षातील मोबाईल फोनची वैज्ञानिक सुधारणा समाजोन्मुख झाली व तिने समाजात नवचैतन्य तर निर्माण केलेच शिवाय तिच्या नानाविध उपयोगांनी सर्वांचे इच्छा-आकांक्षेचे अवकाश कवेत आणले व इतके समृद्ध केले की मोबाईल नसते तर ही कल्पना सुद्धा सर्वसामान्य माणूस सध्या करू शकत नाही.
स्मार्टफोन अभावी आमच्यासारख्या ज्येष्ठांची अवस्था काय झाली असती याची तर कल्पनाच न केलेली बरी. कारण ज्येष्ठांसाठी फेसबुकसारखे माध्यम खूप परिणामकारक ठरले आहे. अनेक नव-लेखक व नव-कवींचे नवनवीन साहित्य त्यातून वाचण्यास मिळते, काहींची नव-नवीन विचारवाक्ये वाचावयास मिळतात तर काहीजण त्यांना ज्या पद्धतीने व्यक्त होता येते त्याप्रमाणे व्यक्त होतात, त्यावरील यथायोग्य प्रतिक्रियाही वाचनात येतात शिवाय स्वयंलेखनाची स्फूर्ती देखील त्यामुळे मिळते. स्मार्टफोनमुळे समाजात सर्रास व्हाट्सअप्पद्वारे व फेसबुकद्वारे एकमेकांना गुड-मॉर्निंग व गुड-नाईटच्या शुभेच्छा देण्या-घेण्याचे जसे प्रस्थ वाढले तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छांचीही लयलूट होऊ लागली व याच माध्यमातून वाढदिवसाच्या केकची देवाण-घेवाणही एकमेकांकडे होऊ लागली व त्यामुळे समाजमनही त्यात तितकेच समरस झाले व रममाणही झाले. कोणत्याही स्मार्टफोन मधील असंख्य रिंगटोन्स व नानाविध वॉलपेपर्स हाताळताना एका रुपेरी दुनियेत आपण आहोत की काय असे भास होत राहतात.
मोबाईलने सर्वसामान्यांच्या सर्व सुखसोयी जशा मोबाईलवरील बोटाच्या टिपेवर आणून ठेवल्या तशीच करमणुकीची दालने देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली. आज सर्वत्र व्हाट्सअप्प, फेसबुक, यु-ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर, इ.स्मार्टफोनमधील सुखसोयी सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलमध्ये गेम्सचा जसा महापूर आला आहे तसेच विविध पाक-कृती, रांगोळीचे नमुने, फुलझाडी त्याचे प्रकार, खवय्येगिरीचे विविध प्रांतातील वैभव, असंख्य कवींच्या कविता, नवनवीन लेखांचे विविध विषयावरील लेख, विविध देशातील व प्रांतातील निसर्गचित्रे, हस्तकलेची व चित्रकलेची विविध रूपे त्यांचे विविध प्रकार याने आपले विज्ञान-विश्व समृद्ध केले आहे व त्यावर कळस म्हणणे मोबाईल मधील " गूगल ऍप " जिथे तुमच्या हर प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे क्षणात आपल्या पुढयात येतात, आणखी काय हवं ?
मोबाईल हे उपकरण जसे युवकांसाठी उपयुक्त आहे ते तितकेच बाल-गोपालांसाठी व किशोरवयीन मुलांसाठी गरजेचे ठरते आहे. ज्येष्ठांसाठी तर स्मार्टफोन वापर ही पर्वणी ठरते आहे. एक प्रकारे तो सर्वांसाठी जादूई दिवाच ठरतो आहे. या व्यतिरिक्त स्मार्टमोबाईल फोनचे व्यावहारीक उपयोग असे की, लाईट-बिल भरणे, टीव्ही रिचार्ज करणे, मोबाईल रिचार्ज करणे, ट्रेन रिझर्वेशन, बस तिकिट रिझर्वेशन, विमान तिकीट रिझर्वेशन, अशी पाळीत उभे राहून जी कामे करावी लागत ती घरात बसून एक क्षणात होऊ लागली. ऊन-वारा-पाऊस कशाचाही त्रास न होता स्मार्टफोन ही समस्त समाजासाठी विज्ञान संजीवनी ठरते आहे.
एक मात्र झाले की मोबाईलमधील विविध सोयी-सुविधांमुळे काही माणसे काही प्रमाणात आळशी व विलासी झाली. जेव्हा त्रासाविना काही गोष्टी सहजसाध्य होतात, तेव्हा शरीरात आळस बळावतो, शरीरात मेद वाढतो तो कमी करण्यासाठी जिमसारखी ठिकाणे शोधावी लागतात. आरोग्य तर टिकवावे लागतेच त्यामुळे विद्यमान तरुण पिढीला सध्याचा काळ जेवढा सुख-समाधानाचा, समृद्धीचा आहे तितकाच तो ताण-तणावाचा ही आहे, दगदगीचा आहे व संघर्षाचाही आहे.
मोबाईल फोन नसते तर.. ही कल्पना देखील कालबाह्य झाली आहे असे वाटते. कारण विज्ञानाची ही झेप एवढी मोठी आहे की तिथून मागे फिरणे केवळ अशक्यच नाही तर तसे होणे म्हणजे " एक पाऊल पुढे व दहा पाऊल मागे " येण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांचे विज्ञानाने उचललेले पाऊल समस्त मानव समाजाच्या उन्नतीसाठी उचललेले आहे त्यामुळे भूतकाळ आळवण्यात आता काहीही अर्थ उरला नाही व केवळ प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणे हेच समाजाचे ध्येय असणार आहे.
शेवटी कोणत्याही क्षेत्रात होणारे वैज्ञानिक बदल हे त्या बदललेल्या समाज सुधारणेचे प्रमुख वैशिष्ठ असते व तशी वाटचालच देशाला समृद्धीच्या मार्गाने पुढे नेत असते हे तितकंच खरं !

दि.१० मे, २०२२ सुधीर नारायण इनामदार ...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू