पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अशीही एक सावित्री

अशीही एक सावित्री


पौराणिक काळातील, यमाच्या पाशातून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण सोडवून आणणाऱ्या पतिव्रता सावित्रीची कथा सर्वांना माहीतच आहे. पण मी एक वेगळीच कथा सांगणार आहे. पौराणिक कथेपेक्षा पूर्ण वेगळी . पण ही सुद्धा सावित्रीच आहे ह्या बाबत तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल अशी खात्री आहे .
सोनोग्राफीच्या रिपोर्ट वर नुसती नजर टाकताच डॉक्टरांच्या अनुभवी नजरेने क्षणार्धात निदान केले आणि पतीला बाहेर थांबवून , बरोबर आलेल्या पत्नीलाकेबिन मध्ये बोलवून गंभीर चेहर्‍याने निदान सांगितले,
" टर्मिनल कॅन्सर . लास्ट स्टेज . थोडेच दिवस उरलेत . "
जन्मभर पतीच्या (आता सत्यवान म्हणते ) खांद्यावर डोके ठेवून निर्धास्तपणे जगत आलेली ती ( आता सावित्री ) घट्ट डोळे मिटून निदान ऐकत असलेली -खाड्कन भानावर आली . उघडलेल्या डोळ्यांतून दोन अश्रू ओघळले . निर्धाराने डोळे पुसले . ईश्वराला हात जोडून तिने स्वीकार केला आणि उभे राहून पदर खोचला . तो कायमचाच .
डॉक्टरांनी सत्यवानला आत बोलावले ,
" काळजीचे कारण नाही . आजींना सर्व कल्पना दिली आहे . आणखी काही चाचण्या करुन आपण खात्री करून घेऊ या " .
सत्यवान काही बोळयाने दूध पिणारे लहान बाळ नव्हता . डॉक्टर रिपोर्ट बघत असतांना त्याच्या हुषार नजरेने मामला गंभीर आहे हे केव्हाच ओळखले होते . मृत्यूचे त्याला भय नव्हते पण काळजी होती आपल्या नाजूक, परावलंबी सावित्रीची . हिचे पुढे कसे होणार ?
त्याने हळुवार प्रेमाने तिचा हात हातात घेतला. " चल ! निघू या !."
निदान न ऐकताही त्याने सगळे ओळखले होते .
आजपर्यंत साध्या ब्रेडची किंमत माहीत नसलेली सावित्री मूकपणे भराभर अनेक आडाखे बांधत होती . पुढे उभ्या ठाकलेल्या झंझावाताला कसे तोंड द्यायचे ? डॉक्टर, दवाखाने , विविध चाचण्या , संभाव्य ऑपरेशन , खर्चाची हातमिळवणी , घर कसे चालवावे अशी विविध भुते तिच्या भोवती फेर धरून नाचू लागली . परंतु डगमगून चालणार नव्हते . सत्यवानला सावरायचे होते . ती एकदम भानावर आली आणि शांतपणे एकेका प्रश्र्नाची उकल करू लागली .
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्यांच्या सुखी संसाराची घडी विस्कटली होती . नेहमीची शांत सुरळीत दिनचर्या पार बदलून गेली . त्याच्या रुंद छातीवर डोके टेकून निश्चिंतपणे रात्रभर झोपणारी ती आता रात्र रात्र जागून काढू लागली . त्याला शांत झोप लागावी म्हणून !
रात्री साडे अकरा ते सकाळी ५ अशी जेमतेम झोप . त्यात पण निदान तीनदा उठायचे . तो तिला त्रास होऊ नये म्हणून मुकाटयाने वेदना सहन करत राही . पण त्याचे कण्हणे झोपेतही तिला ऐकू येई . ती उठून त्याला वेदनाशामक गोळी देई . प्रेमाने कपाळावर हात फिरवून, पुसटसे चुंबन घेऊन झोपी जाई . हळूहळू तो खूप अशक्त होत होता . अंगावरचे पांघरूण छाती पर्यंत ओढण्याचे त्राणही उरले नव्हते . मग ती उठून हलकेच त्याचे पांघरुण गळपापर्यंत ओढून देई . तो कृतज्ञतेने तिच्याकडे पाही . डोळ्यात अश्रू येत . पण ते सुद्धा तिलाच पुसून द्यावे लागत . त्याचे डोळे पुसून ती बिछान्यात जाई पण झोप कशी येणार ? तिच्या डोळ्यातील आसवे उशी भिजवत राहत .
मध्येच दोनदा गरम पाण्याने हॉट बॅग्ज भरून त्याच्या पायांजवळ व पोटाजवळ हलकेच ठेवायच्या कारण अंगातील रक्त कमी झाल्याने त्याला थंडीने हुडहुडी भरायची . तो तिला त्रास नको म्हणून उठवायचा नाही तरी गजर न लावता ती आपोआप उठून हे सर्व करायची.
पहाटे ५ ला उठून स्वतःचे आन्हिक उरकून सावित्री दिवसभराच्या सेवेसाठी सज्ज व्हायची .
सकाळचा रुटीन म्हणजे - त्याच्या पोटात पाणी व्हायला सुरुवात झाली होती म्हणून रोज प्रथम पोटाचा घेर मोजायचा . नोंद करायची कारण विशिष्ट इंचांपर्यंत घेर वाढला की दवाखान्यात अडमिट करून पाणी काढावे लागायचे . मग वजन , ताप , बी.पी नाडी चेक करुन नोंदी करायच्या . मोठी नोंद वहीच तिने बनवली होती . नंतर घोटभर चहा , अर्धे बिस्कीट , वेदनाशामक गोळया - त्याची विश्रांति . ती ज्यूस, नाश्ता , सूप इ.इ तयारी . असो.
तो निमूटपणे भोग भोगत होता . विनातक्रार !
तिला मात्र नेहमी प्रमाणे देवासमोर बसून पूजा करायला वेळ मिळत नव्हता . पण मानसपूजा अखंड चालू असायची . देवाकडे मागणार नाही तो माणूस कसला ? तिचे एकच मागणे,
" देवा त्याच्या यातना , वेदना कमी कर ! ह्यातून माझ्या सत्यवानला मुक्ती दे ! त्याची सेवा करण्या साठी मला शारीरिक शक्ती दे । मानसिक बळ दे । अखेर पर्यंत उभी ठेव ! "
आणि खरंच ! देवाने तिची प्रार्थना ऐकली . दहा महिन्यात तिला साधी एक शिंक सुद्धा आली नाही . तिचे २० किलो वजन कमी झाले पण शारीरिक, आत्मिक बळ साथ देत राहिले .
यमराज सुद्धा खाली मान घालून स्वतः चोरपावलांनी येऊन सत्यवानाचे प्राण अलगद घेऊन गेला . (जणू काही यमराजालाही अपराधी वाटत होते . )
पौराणिक सावित्रीप्रमाणे सत्यवानाचे प्राण सोडवून न आणता ह्या सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण हळुवार पणे यमाच्या स्वाधीन केले .
खोचलेला पदर तसाच ठेवून ती मूक आसवे ढाळत प्रार्थना करत होती,
" जन्मोजन्मी मला हाच सत्यवान मिळू दे देवा हाच आशीर्वाद आज वट पौर्णिमेच्या दिवशी तुला मागत आहे."


सुलभा गुप्ते
१४ जून २०२२ . पुणे
वटपौर्णिमा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू