पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बळी

 

         पहाटं पहाटंच मोबाईलची रिंग वाजली. अचानक रिंग ऐकून शेसाभाऊ जरा दचकलेच. शेसाभाऊच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. काहीबाही अघटीत तर घडलं नसंल ना? उगाच शेसाभाऊच्या मनात नको ती शंका डोकावून गेली. मोबाईल जवळ घेऊन पाहिला तर, डोळे चोळता-चोळताच संतारामचं नाव शेसाभाऊला स्किरीनवर दिसलं. एक दीर्घ जांभई देतच त्यानं बोलायला सुरुवात केली. तिकडून तार स्वरात संताराम म्हणाला "काही कळलं का शेसाभाऊ?" असं म्हणताच अंथरुणातुन खडबडून जागं होत शेसाभाऊ उठून बसले." म्हणाले काही नाही कळलं बुवा...!काय झालं? " तिकडून संताराम म्हणाला, "वाड्यातला भिवसा गेला अचानक.....!!"  "अरे बापरे...!! भिवसा गेला....!!"भिवसा गेल्याचं ऐकून शेसाभाऊचं तर अवसानंच गळून पडलं होतं.

             भिवसा हा वाड्यातला लहानग्या तात्याचा मोठा पोऱ्या. पोरगा स्वभावाला लई नादर. बारावी शिकलेला.  त्यापुढचही शिक्षण घ्यायची त्याची लई इच्छा होती. पण तात्यानं त्याला काही पुढं शिकूच दिलं नाही. घरचं बापजाद्याचं चार-पाच एकर वावर होतं. वावरातल्या विहिरीला चांगलं पक्क पाणी होतं. त्यामुळं त्यांनं इथच गावात राहून घरच्या वावरात राबावं, असं तात्याला वाटायचं. शेसाभाऊ बाहेरगावी नोकरीला असले तरीही, वर्षातून कधी-मधी त्यांचं गावाकडं येणं-जाणं व्हायचं. शेसाभाऊ गावात आल्याची खबर भिवसाला कुठून कळायची माहीत नाही. पण खबर मिळताच शेसाभाऊ जिथं असंल तिथं शेसाभाऊसमोर भिवसा दत्त म्हणून उभा राहायचा.  म्हणायचा "चला शेसाभाऊ घराकडं चहा घ्यायला." भिवसाचा आग्रहच एवढा जबर असायचा की, शेसाभाऊला त्याला मोडा घालता येत नसे. घरी वाड्यात गेल्यावर चहा-नाष्टा जेवणाचा भरपूर आग्रह करायचा. भिवसाचं शेसाभाऊवर लई जीवापाड प्रेम होतं. भिवसा अन शेसाभाऊ दोघंही बालपणापासून एकाच वर्गात शिकलेले.... एकमेकांसोबत एकत्रच खेळलेले ..... एकत्रच गुरं ढोरं चारायला माळावर घेऊन गेलेले ..... एकत्रच अंगत-पंगत करून जेवलेले .....एकत्रच माडीवर अभ्यासाला बसलेले..... एकत्रच शाळेच्या बेंचवर बसलेले ..... त्यामुळं भिवसाचं अन शेसाभाऊचं नातं जणू एक जीव घट्ट झाल्यासारखं होतं. भिवसाचा बाप अन शेसाभाऊचा बाप एकमेकायचे लंगोटी यार होते. त्यामुळं त्यांच्या दोघायतलं नातंही अगदी जिगरी दोस्तायसारखंच फुललं होतं.

             घरची चार पाच एकर जमीन. त्यातही राबणारी माणसं आगाऊची. त्यामुळं कितीही माणसं एकसोई रानात राबली तरी जे पदरात पडायचं तेच पडे. म्हणून भिवसाच्या डोक्यात बाहेर दूर कुठंतरी मोठ्या शहरात कामाला जायचा किडा सारखा वळवळत असायचा. एव्हाना गावातला समवयीन मित्र धनुराम पुण्याजवळील एम.आय.डी.सी. फॅक्टरीत कामाला जाणार असल्याची कुणकुण भिवसाला लागलीपण होती. म्हणून त्यांनही आपलं बाडबिस्तार आवरून धनुराम सोबत फॅक्टरीत जाण्याची जय्यत तयारी केली होती. ह्या गोष्टीला घरच्यांचा स्पष्ट विरोध होता. पण भिवसा पुण्याजवळील फॅक्टरीत काम करायला जाण्याच्या मुद्द्यावर ठाम होता.

           धनुराम,भिवसा अन पंचक्रोशीतले एक दोघं,असे सारेजण मिळून पुण्याजवळच्या फॅक्टरीत कामाला लागले होते. दरम्यानच्या काळात घरच्या लोकायनी धनुराम, भिवसा यांचे दोनाचे चार हात करून मोकळे झाले होते. इकडं गावाकडं पावसाळा सुरू झाला की, सुगीच्या कामाला सुसाट वेग यायचा. टायमाला मजूर मिळायचं नाही. म्हणून ते आपापल्या बायकांना सुगी संपेपर्यंत गावाकडं शेतीच्या कामासाठी ठेवायचे. शेतातलं कापूस बोन्ड वेचून झालं की, आपापल्या बायकांना सोबत घेऊन पुन्हा परत जायचे. असा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता. पुन्हा चार सहा महिन्यांनी सहकुटुंब गावाकडे यायचे. जो काही पैसाअडका साठवून ठेवलेला असायचा. तो आणून बापाच्या हवाली करायचे.

           भिवसानं मोठ्या कष्टानं कमवून आणलेले पैसे पाहिले की, तात्या खूप खुश व्हायचे. पोराच्या कर्तबगारीचं त्यांना लई कौतुक वाटायचं. पोटचा पोरगा हाताला आल्यावर कोणत्या बापाला खुशी होत नाही? तसं पोराच्या कमाईनं तात्याचं मनही आनंदात न्हाऊन निघायचं. चार सहा महिन्याला असंच भिवसा साचलेले पैसे घेऊन घरी यायचा. काही त्याच्या कमाईचे अन काही शेतातल्या उत्पन्नाचे पैसे मिळून बऱ्यापैकी रक्कम जमायची. मग तात्या पहिल्या साली विहीरीचं, दुसऱ्या साली जागेचं काम करी. कधी मळनीयंत्र घे....माळावरचं शेत घे..... शेतात पाईप लाईन कर..... असं करत करत आता तात्याची गाडी चांगलीच बळावली होती.  गरीबीत चाचपडत-चाचपडत जगणारं एक घर आता भावकितही चांगलं उठून दिसत होतं. एकंदरीत भिवसाच्या कुटुंबाला पूर्वीपेक्षा आता चांगले दिवस आले होते. लहानगा रावसा आता हळूहळू शेतीच्या कामात तात्याला हातभार लावू लागला होता. हलके भारी कामं करू लागला होता. तात्याची गाडी आता सुसाट धावू लागली होती. 

            यावेळेस भिवसा एकटाच फॅक्टरीत कामाला गेला होता. सुगीच्या टायमाला शेती कामात मदत होईल म्हणून बायकोला त्यांनं गावाकडंच ठेवलं होतं. सुगीच्या हंगामात दरवर्षी तो असंच करायचा. एरवी पायलीचे पसा मजूर सापडायचे. पण सुगीच्या हंगामात मजुरायचा नेहमीच तुटवडा जाणवायचा. घरच्या बराबर शेतात राबायला आपलं हक्काचं माणूस होतं, म्हणून तो बायकोला घरी ठेवून फॅक्टरीत एकटाच निघून जायचा. फॅक्टरीत कामाला जाऊन त्याला आता चांगले चार-सहा महिने झाले होते. यावेळंला एकटाच असल्यानं जमापुंजीही जरा बर्‍यापैकी साठली होती. दसरा-दिवाळी तोंडावरच आल्यानं घरच्या सगळ्या मंडळीसाठी त्यानं कपडालत्ता खरेदी केला होता. कामाच्या ठिकाणाहून काही दिवसांची सुट्टी घेऊन तो आता तडक गावाकडं निघाला होता. यंदाची दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरी करायचा बेत त्यानं आखला होता.

          घड्याळाचा काटा बराबर नऊवर येऊन ठेपला होता. बस गावात येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात धुळीचे लोट अंगावर घेऊन बस एकदाची बसस्टॅन्डवर येऊन थबकली. एक-एक करत माणसं बस मधून उतरत होती. भिवसाही सोबत आणलेलं आपलं बाडबिस्तार घेऊन खाली उतरला होता. समोर दिसणाऱ्या मित्रमंडळींना हसत-हसतंच हाय, बाय, नमस्कार-चमत्कार करत, तो आता तडक घराकडं निघाला होता. बसस्टँड पासून घर बरंच अंतरावर होतं. तो पायी-पायीच घराकडं निघाला होता. मधेच मारुतीच्या पाराजवळ भावकितल्या चुलत भावानं, केरबानं त्याला गाठलं. केरबा त्याला म्हणाला "काय भिवसा......!! काय चाललंय बेट्या....!! तू एकटाच काम करू करू मर फॅक्टरीत. इकडं गावाकडं काय मजा सुरू आहे, तुला कळतं का काही?" असं म्हणून भिवसाच्या कोऱ्या करकरीत निशंक डोसक्यात केरबानं शंकेचा चेंडू फट्टदिशी फेकला, अन केरबा आल्यापावली चालता झाला. केरबाला जे साध्य करायचं होतं ते त्यानं साधलं होतं. भिवसाचं मस्तक तिथंच पाराजवळ चांगलंच झानानलं. हाय होल्टेज वीज अंगावर पडून कडकड  कडाडावी तसं तो उभ्या-उभी पेटला होता. कधी घर जवळ येतं अन कधी नाही असं त्याला झालं होतं. रस्त्यावरून चालताना रस्ता गरंगरं फिरत असल्याचा भास त्याला होत होता. आपोआप त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. तो रस्त्यानं जातांना आपलेच दात-ओठ खात काही तरी बडबड करीत घराकडं चालला होता. "इथं गावाकडं घरी काय मजा सुरू आहे." या एकाच वाक्यानं त्याच्या सुपीक डोक्याची विकेट घेतली होती. संशयाचं भूत त्याच्या नसानसात संचारलं होतं. आपण फॅक्टरीत कामाला, अन इकडं आपली तरणीबांड बायको आपण शेती कामाला मदत म्हणून गावाकडं ठेवली. तिच्याबद्दल तर केरबाला काही म्हणायचं नसंल ना? सुचवायचं नसंल ना? असं त्या मायमाऊलीबद्दल भिवसाच्या मनात नको नको त्या शंकांचं काहूर पेटलं होतं. केरबानं सांगितलेले त्या एकाच वाक्यातील कडवट बोल त्याच्या संवेदनशील मनाला जाऊन भिडले होते. कुसळासारखे आतल्याआत सलत होते. हातापायातलं आवसान गळून पडलं होतं. भावकीतल्या केरबाला जो काही डाव साधायचा होता. त्याचा तो साधून पूर्ण झाला होता. भिवसाच्या डोक्यात संशयाचं भूत सोडून तो मोकळा झाला होता. भिवसाचं घर शीरमंत होतय, पुढं पुढं जातय. हे चुलत भाऊ केरबाला  देखवत नव्हतं. म्हणून त्यांनं भिवसासोबत असा खुनशी-कपटी डाव खेळला होता.

            तेव्हापासून भिवसाच्या डोक्यावर जो काही मानसिक आघात झाला. परिणाम झाला.त्यातून तो काही शेवटपर्यंत सावरलाच नाही. तात्यानं भिवसा दुरुस्त व्हावा म्हणून लाखो रुपयांचा चुराडा केला. अनेक मोठमोठ्या दवाखान्याच्या पायऱ्या झीजवल्या. पण तो काही त्यातून अखेरपर्यंत सावरू शकला नाही. खूप गोळ्या औषधं त्यांनं खाल्ली. गोळ्या औषधांचा पावर आहे तोपर्यंत तो नॉर्मल माणसासारखा वागायचा. गोळ्या संपल्या की पुन्हा काही दिवसानं त्याला फेरं यायचंच. घरच्यांसाठी भिवसा आता नेहमीसाठीच मेंटल केस बनून राहिला होता. त्यामुळे कधीकधी ते त्याच्याकडं लक्ष द्यायचे तर कधीकधी कामाच्या धबडग्यात दुर्लक्षही करायचे.

        त्या दिवशीही भिवसाच्या बाबतीत असंच काहीतरी कमी-जास्त झालं होतं. नेहमीचंच रडगाणं म्हणून घरच्यांनी त्याचं काही मनावर घेतलं नव्हतं. त्याला नियमित गोळ्या औषध सुरू होतीच, पण कधीकधी त्याचं संतुलन जरा जास्तच बिघडायचं. त्यामुळं तो स्वतःच्या जीवाचा त्रागा करून घ्यायचा. म्हणून त्यांनं म्हणे, त्या दिवशी रागारागानं एकसोई भरपूर गोळ्या गिळल्या होत्या. त्यातच तो गतप्राण झाला होता. 

          भिवसा गेल्याची बातमी संतारामनं पहाटं-पहाटंच शेसाभाऊला दिली होती. शेसाभाऊ आता तडक गावाकडच्या रस्त्याला लागले होते. बालपणीच्या त्यांच्या निखळ मैत्रीचा. मिञप्रेमाचा तो संपूर्ण कालपट शेसाभाऊंच्या डोळ्यासमोर चालचित्रासारखा तरळत होता. एक होतकरू, तरणाबांड पोरगा. हळूहळू कासवगतीनं, नव्या उमेदीनं, घर नेटान पुढं नेऊ पाहणारा नवयुवक, भावकीच्या विखारी वृत्तीमुळं, जळाऊ प्रवृत्तीमळं, खेळलेल्या खुनशी, कपटी डावामुळं, आज त्या विघातक मनोवृत्तीचा "बळी" ठरला होता.

 

                                     -भानुदास धोत्रे

                                      परभणी

                                      7972625086

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू