पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परम सुंदरी

परमसुंदरी (कथा)


चाळीशी पार केलेल्या सुधाताई आज सकाळपासूनच सारख्या रडत होत्या. काय झाले? काही कळत नव्हते. बुध्द मुर्तीसमोर हाथ जोडून बोलत होत्या. "भगवंता आता तूम्हीच योग्य मार्ग दाखवा".

मुलगा बारावीला, मुलगी दहावीला आणि मिस्टर देखील शासकीय विभागात अधिकारी, सगळे चांगले असतांना काय घडले असावे? असा अंदाज घेण्यासाठी डॅाक्टरांनी विचारले, " काय त्रास होतो सांगा ताई?"

सुधाताई म्हणाल्या, "माझे मिस्टर रात्री दोन वाजेपर्यंत चैटींग करतात मोबाईलवर, कोणासोबत बोलतात, माहित नाही, विचारले तर उत्तर देत नाही, मुले मोठी झाली आता त्यामुळे मी वाद घालत नाही, त्या दिवशी एका लग्नात मात्र त्याने मर्यादा सोडली. त्याच्या एका मैत्रिणीसोबत हातात हात घालून सर्वांसमोर फोटो काढले. एवढेच नाही, तिला सोडायला तिच्या घरी गेले, तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले, आता मला त्रास होत आहे. माझी सहनशक्ती संपली आहे."

डॅाक्टर म्हणाले, "सगळ काही ठिक होईल, काळजी करू नका, ही औषध वेळेवर घ्या, मिस्टरांना आतमध्ये पाठवा."

मिस्टर आतमध्ये आले. डॅाक्टर म्हणाले, "सुधाताईंनी टेन्शन घेतले आहे, नेमके काय झाले? सांगाल का?"

मिस्टर हसतहसत म्हणाले, "तिला नाटक करायची सवय आहे. काही त्रास होत नाही, संशयी स्वभावाची आहे ती, बरे वाटेल मेडीसीनने, चला येतो मी"

इतके बोलून तो निघून गेला. आता सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असे सुधाताईने ठरविले होते. मुलांना देखील परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागली होती. सुधाताईने तिच्या मुलीला स्नेहाला वडीलांवर लक्ष ठेवायला सांगितले. दोन दिवसातच वडीलांचे सगळे डिटेल्स रिपोर्ट तिने आईसमोर आणून ठेवले. तिचे नाव माधूरी,वडीलांचा बचपन का प्यार, आता पचप्पन का प्यार झाला आहे. इतर अनेक लोकांसोबत बोलते." मुलगी बोलत होती. सूधाताई ऐकत होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुधाताईने दार उघडले. श्रीवल्ली दारात उभी होती. क्षणभर काय करावे? काही सुचले नाही. स्नेहा म्हणाली, "मम्मा कोण आहे?" सुधा म्हणाली, "श्रीवल्ली बसा."

सुधाने कोकम शरबत बनवले. दोघी जणी शांत बसल्या होत्या. सुधा पुन्हा भूतकाळात हरवली.

आपल्या नवऱ्यासोबत रात्री चैंटींग करणारी हीच बाई, भरपुर मेकअप करून बसलेली, आधुनिक ड्रेस, नजरेनेच सर्वांना घायाळ करणारी अदा, मनमोहक डोळे, आकर्षक बांधा, चित्तवेधक गाणे, स्टेटसला कायम वेगवेगळे पहेराव घालून फोटो, कधी जिन्स तर कधी नववारी घालून फोटो, इतक सगळ पुरूषाच मन विचलित करण्यासाठी पुरेस होतं

भाऊजी आणि जाऊबाईच भांडण श्रीवल्ली वरून झाल होतं.

भांड्यांची आदळाआपट, भाऊजी दारू पिलेले होते. त्यामुळे त्यांनी एक चापट जाऊबाईला मारली. सर्विसला असून निमुटपणे नवऱ्या चा मार खाणे हा विशेष गुण तिचा होता. शेवटी सुधाताईलाच त्यांचे भांडण मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

सुधाताई म्हणजे अगदी मवाळ, सोज्वळ, प्रेमळ काकूबाई, सर्वांची काळजी घेणारी, तिच्या मुलीच्या भाषेत जागृत तीर्थरूप देवस्थान, कर्तव्यदक्ष गृहीणी अशी तिची प्रतिमा होती. 

सुधाताईने तिच्या जावेला विचारले, "काय गं सुरेखा, काय झाल रात्री दोन वाजता भांडायला?"

सुरेखा रडत रडत सुधाताईच्या गळ्यात पडली. आणि म्हणाली, "ताई तूम्हीच बोला, कोण आहे श्रीवल्ली? रात्री दोन वाजेपर्यंत हा माझा नवरा चैटिंग करतो तिच्यासोबत, हे बरोबर आहे का?"

"माझे देखील मित्र आहेत, मी देखील वाटर पार्कला जाते, नाचते, गाते, खाते, पिते परंतू असे रात्रभर चैटिंग करत नाही.

सुधाताई छोट्या गावातून मुंबई मध्ये लग्नानंतर आली होती. मुंबई मध्ये बहूरंगी, बहुढंगी बेगडी लोक पाहून तिला किळस वाटली.  सुधाताई तिला म्हणाली, " पुरूषाची जातच तशी असते, चांगली सर्विसवाली बायको आहे, तरी देखील रात्री बोलायला दुसरी बाई हवी कशाला?"

भाऊजी म्हणाले, "वहिनी तूम्हीच सांगा बोलणे हा अपराध आहे का? माणसाने मनोरंजन करू नये, सुखदु:ख वाटून घेऊ नये का? सुरेखाचा गैरसमज झाला, श्रीवल्ली गरीब बिच्चारी आहे. ती सर्वांसोबत बोलते बघा, दाजीसोबत, भाऊसोबत अगदी मनमिळाऊ आहे, शिवाय नात्यात आहे, आमची हक्काची मामाची मुलगी आहे. तिच लग्न कमी वयात झाल होतं तिचे मुले मोठी आहेत. नवरा आजारी असतो. स्वत: ची तब्येत तिने फीट ठेवली आहे. तिचे दु:ख ती कोणाला सांगणार वहीनी? मनमोकळेपणाने जगणे गुन्हा आहे का? बाईच बाईची शत्रू असते. पुरूषाला बाईच मन कळू शकतं, फक्त मानसिक आधार मिळतो तिला काही चुकल का वहीनी?"

सुधाताई म्हणाली,"बरोबर आहे भाऊजी".

सुरेखा चिडली, "काय बैलासारख मान हलवून होकार देता ताई? महागड्या साड्या, मोबाईल तिला घेऊन दिला त्याच काय? तूमच्या मिस्टरांना आवरा त्यांनी देखील काहीतरी पाठवल तिला, सटवीच्या गोड बोलण्यावर फिदा झाले आहेत सगळे, कुणासाठी अंगप्रदर्शन करून स्टेटसला व्हिडीओ टाकते, विचारा तिला, दु:खाच भांडवल करून पुरूषांना वापरते का?"

भाऊजींनी पुन्हा एक चापट मारली तिला, सुधाचे डोके गरगर करायला लागले.भाऊजी म्हणाले, "तू खोटे बोलतेस"

सुरेखा म्हणाली, "तू खोटे बोलतो, ही बघ कुरियरची पावती, हे बील"

सुधाताई मनातल्या मनात गाथा म्हणू लागली, इतिपी सो भगवा अरहं, सम्मासम्बुध्दो, विज्जा चरण संपन्नो लोकविदू, अनुत्तरो, पुरिस धम्मसारथी, बुध्दं नमामी.

भाऊजीचा मोबाईल वाजला, रिंगटोन ऐकून सुधाताईचे डोके गरगर करायला लागले.

रिंगटोन वाजत होती. हाय मेरी परम, परम, परम, परम, परम सुंदरी.................

सुधाताईने दोन ग्लास पाणी आणल, भाऊजी बोलत बोलत बाहेर गेले. सुरेखाने पाणी पिले आणि म्हणाली, "तूम्ही जाऊन झोपा ताई, किचन आणि मुलांकडे फक्त एवढच लक्ष देऊ नका ताई, नवरा काय करतो, लक्ष ठेवा, सगळे पुरूष एका माळेचे मणी असतात. बाई पाहिली की विरघळले, घरची बायको यांना क्षुल्लक वाटते, बाहेरची बाई म्हणजे आभाळातून नक्षत्र पडल्यासारखे वाटते. मला तर एवढ्या शिव्या येतात तोंडात, भो‌‌...... मायची..... ".

सुधाताई म्हणाली, "सुरेखा शांत हो, शिव्या देऊन काय मोठा पुरस्कार मिळणार आहे का? पुरूषांनी शिव्या देण्याच लायसन काढले आहे. बाईला नाही शोभून दिसत, आपण बायका म्हणजे दावणीला बांधलेल्या जनावरागत आहोत"

सुरेखा हात जोडून म्हणाली, "किती दिवस? आपली वाघनखे, आपल चिलखत, शिंगे, धारदार दात ही हत्यार कधी मेल्यावर बाहेर काढायची? छत्रपती शिवबाला घडवणारी बाईच होती. आपलेच नवरे कसे काय शेण खातात?  पुर्वीसारखा जमाना आता नाही. नवरा मेला म्हणजे बायको मरत नाही, तिला जगण्याचा अधिकार आहे".

सुधाताई म्हणाली, "अग गावाकड असा बोभाटा करत नाहीत, नात्यांचा जीव गुदमरतो मुंबई मध्ये, नात्यांचे मूल्य कोणी जपत नाही, निर्जीव झाले सगळे"

एवढे बोलून ती निघून गेली.

सुरेखा मनातल्या मनात म्हणाली, सुधाताई म्हणजे आलीया भोगासी, असावे सादर अगदी अशा आहेत, इथे देव माझा साधा, भोळा आणि भोगी विषयांचा सोहळा या ऐवजी त्याचा विषयांवरच डोळा असे पाहिजे. देवाला सगळे भोग, देवीला कोंबडे, बकरे, इथे स्वत: स्वत: साठी जगायला वेळ नाही, देवांचा विचार करायला सवड कुठ? पैसा हाच देव मोठा.

इतके बोलून ती झोपली. 

सुधाताई अनेक दिवसांपासून श्रीवल्लीच्या शोधात होती. शेवटी एका लग्नात ती आली. सुधाताईने तिच्यासोबत सेल्फी काढला. आणि सरळ हातात हात घालून तिला घरी घेऊन आली.

कोकम शरबत संपले होते‌.

सुधाताई म्हणाली, "श्रीवल्ली तू खरोखर सुंदर आहेस, अगदी वेड लागल आमच्या घरात सर्वांना"

श्रीवल्ली म्हणाली, "आपण दोघी सारख्या वयाच्या आहोत, बहिणी आहोत, बोल मोकळेपणाने"

श्रीवल्ली म्हणाली, "मी तूमच्या नवऱ्याच्या मामाची मुलगी, मी दहावी नापास झाले आणि लग्न झाले माझे वयस्कर माणसासोबत, ख्रिश्चन लोकांसोबत राहून मनमोकळेपणाने वेशभूषा करण्याची सवय झाली मला, माझे पार्लर खूप मोठे आहे. मेकअप करण हा माझा छंद आहे. फिटनेस मला आवडतो. अनेकजण फिदा होतात माझ्यावर, स्वत: साठी जगायला शिकल पाहिजे."

सुधाताई म्हणाली, "तूझ तत्वज्ञान सगळ ठिक आहे. पण आमच्या कुटूंबातील माणसांकडून भेटवस्तू तू घेतेस त्याच काय?"

पर्समधून सेंट आणि लिपस्टिक काढत ती म्हणाली,"असल्या फालतू, बोगस वस्तू मी घेत नाही बैंडेड वस्तू वापरते मी, तूझा नवरा गावठी आहे, बोलण्याची, वागण्याची पध्दत नाही, कशी राहतेस तू, तूझे तूलाच माहिती,"

"पुढील महिन्यात मी विदेशात सेटल होणार आहे. मला फोन कर शील का? साधी भोळी राहू नको, स्वत: ला आरशात बघ, स्वत: साठी जगायला शिक. जग सतत बदलत असते, त्यामूळे सुंदर दिसते. क्षणाक्षणाला आपण बदलतो ही जाणिव ठेव." 

एवढे बोलून ती निघून गेली.

जाता जाता तिचा फोन वाजला,सुधाताईला रिंगटोन ऐकू आली. 

हाय मेरी परम, परम, परम, परम,  परम सुंदरी...........


प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू