पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रस्तरातील भक्तिजल काव्य- आई अहिल्या

प्रस्तरातील भक्तिजल काव्य - आई अहिल्या

मौनातून केलेले असंख्य संभाषण किल्ल्यातील प्रस्तरखण्डांच्या साक्षीने आजही जिवंत आहेत. 

आई अहिल्या! होय, ती राणी असूनही, शासिका असूनही, तिला कधीच पाहिले नसूनही, फक्त मातीचे हे नाते! पण ती आज अस्तित्वात नसल्यावरही तिच्या डोळ्यातील आश्वासक भाव महेश्वरच्या किल्ल्यावरील असलेल्या दगड़ी घाटासारखेच खरे दिसतात आणि मनातून ’आई’ हेच निघते.

पुस्तकातून, ऎतिहासिक विषयांच्या वृत्तचित्र, कथा कविता किंवा प्रदर्शनातून आपल्या मनात तयार झालेली आई अहिल्येची मूर्ति आणि भौगोलिक रीत्या अशक्य असलेल्या भागामध्ये त्यांनी केलेले धार्मिक पुण्यकार्य बघता त्यांची वास्तविक कीर्ति, या दोघांमध्ये स्वप्न आणि वास्तव्य इतकाच फरक असावा.

आई अहिल्या फक्त शिवभक्त नव्हे, फक्त नर्मदा उपासिका नव्हे, फक्त एक समर्पित शासिका नव्हे तर त्या सुद्धा आई नर्मदेसारख्याच एक मानवरुपी प्रवाह होत्या. त्यांच्या प्रवाहाच्या तरंगांमध्ये सूर होते भक्तिचे, राजसेवेचे, प्रजावत्सलतेचे, सांस्कृतिक ठेवीचे, स्त्री समृद्धिचे आणि दूरदृष्टिचे!

धर्मकार्याला सर्वोपरि ठेवत असतांनाही आई अहिल्या आपल्या प्रजेसाठी कधीच भेद दृष्टि ठेवत नसे. त्या काळातील मर्यादित सोयींचा वापर करुन त्यांनी कलकत्ता, बनारस, काशी, गया, सोमनाथ, आयोध्या, मथुरा, हरिद्वार, द्वारिका, बद्रीनारायण, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी, जेज़ुरी सकट भारतातील असंख्य तीर्थस्थळांवर मंदिरे, घाट, बावड़ी, विहीर आणि धर्मशाळा बांधण्याचे काम केले. 

आजही इंदूर किंवा महेश्वरचा कोणी अस्सल व्यक्ति या विविध धर्मस्थळांवर आई अहिल्याबाई होळकर यांनी केलेले धर्मकार्य बघतो, तेव्हां आपण येथे सुद्धा आपल्या आईच्या पदराखाली किती सुरक्षित आहोत, हेच वाटत असते.

त्या काळात जेव्हां सत्तालोलुपता आणि स्वार्थाचा ताण्डव चहुंओर पसरलेला होता, तेव्हां ही धर्मात्मा, प्रेमळ, दूरदृष्टा आणि शिव समर्पित असूनही राज्य चालवण्यात चोख असलेली निस्वार्थ शासिका खरंच देवीस्वरुपाच होती. आजही ’पुण्यश्लोका अहिल्यादेवी’ या नांवाच्या गजरानेच इंदौर आणि महेश्वर येथील सकाळ होते, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात या नांवाचा उल्लेख बिनचूक असतोच.

स्त्रियांच्या सैन्यदलाचा वापर त्यांनी फक्त काहीतरी वेगळे करण्यासाठी नाही, तर राज्याच्या सुरक्षेसाठी सुद्धा केला होता. खरं पाहिलं, तर पेशवांसमोर एक सूचक वाक्य टाकून फक्त शब्दांच्याच जोरावर त्यांनी युद्ध जिंकले होते. 

"जिंकलास तर स्त्रियांच्या सैन्यासमोर जिंकला आणि जर हरलास तर!!"     

शब्दाची शक्ति यापुढ़े त्यांच्या ’शिवार्पण’ नावाने होत असलेल्या स्वाक्षरीत बसून राजाज्ञा होत होती आणि शिवपूजनाशिवाय अन्न ग्रहण न करण्याची आजीवन शप्पथ या संयमी शासिकेला दैवीय स्वरुप देत होती.

कोणाचीच नव्हती ती, तरीही सर्वांचीच होती! एखाद्या साम्राज्याला, तेथील सून, जी सार्वजनिक रीत्या कुठल्याही कसोटीवर शुभ किंवा समर्थ मानली जाणार नव्हती, तिने केवढ़े यश मिळवून दिले कि आज तेच साम्राज्य तिला देवीस्वरुप म्हणून तिच्याच आशीर्वादाच्या छायेत रममाण आहे. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शक्ति किंवा स्त्रीचे अधिकार यांचे याहून वेगळे उदाहरण जगात मिळणे शक्य नाही.

आई अहिल्या आपले श्वास श्वास निस्वार्थ सेवेला देऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या बुद्धिचातुर्याचे प्रमाण आजही बांधकामातील कौशल, दूरदर्शितेने तयार केलेले वस्त्रोद्योग जे आजही इंदौर आणि महेश्वरची ओळख आहेत, त्यांच्यात असलेले कौशल आणि विपरीत परिस्थितीतही खंबीरपणे सकारात्मक बदल करण्याची ताकद दर्शवतात.

फक्त धर्म, शासनच नव्हे, तर त्यांच्या काळात महेश्वर आणि तेथील किल्ल्याजवळचे संपूर्ण क्षेत्र हे साहित्य, मूर्तिकला, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात नावाजलेले होते. मराठी कवि मोरोपंत, शाहिर अनंतफंदी आणि संस्कृत विद्वान खुलासी राम त्यांच्याच कालखंडातील महानतम व्यक्तिमत्व होते.

ज्याप्रकारे लेकरासाठी त्याची आई काहीही करु शकते, आणि तिला त्याबदल्यात काहीही नको असते, त्याच प्रकारे, निस्सीम भक्तिभावाने अहिल्याबाईंने आपले कर्तव्य पार पाडले. आई नर्मदेच्या साहचर्यात कितीतरी पार्थिव शिवपूजन, जप, तप, धार्मिक अनुष्ठान करत त्या घडत गेल्या आणि घडवत गेल्या एका संस्कृतिला, एका संस्थानाला, एक संपूर्ण प्रजेला आणि त्यांच्या पुण्याईचेच प्रताप आहे कि आजही येथील निवासी त्यांना आई म्हणूनच शरणागतिला जातात.

त्यांचे कितीतरी अखण्ड दीप आजही त्यांच्या भक्तिभावातील शिव समर्पणाच्या राजस तेजाचा प्रताप त्याच उत्कटतेने करत आहेत ज्या उत्कट भावनात्मक हेतुने आई अहिल्याबाईने त्यांना प्रज्वलित केले होते. आज आई नर्मदेच्या तटावर सूक्ष्म स्वरुपात एक दैवीय तत्व वावरत असल्याचा भास कितीतरी लोकांना झाला आहे. तो नर्मदामाईचा प्रताप असो, कि आई अहिल्यादेवीचा प्रेमळ आश्वासक वावर, याबद्दल काहीच चर्चा कोणालाच कधी करायची नसते. पण घाटावर असलेल्या राजराजेश्वर मंदिराचा गाभारा जेव्हां ओंकाराने गुंजायमान होतो, तेव्हां आई नर्मदेच्या साक्षीने, शिवाष्टकाच्या शब्दांना जगत असतांना, आपल्या सर्व बाधा हरण करण्यासाठी आणि डोक्यावर सदाही प्रेमाचा आशीर्वाद देण्यासाठी, आई अहिल्याबाई तिथे असतात, हे क्षणार्धासाठी वाटून गेल्याशिवाय राहात नाही.

आज आईची जयंति! अहमदनगर येथील शिंदे कुळातून होळकरांकडे आलेली आई! शरीरानेच आली असेल ती! माझ्या मते, तिला तर रेवामाईनेच आपल्या प्रिय कन्या स्वरुपात हेरुन घेतले असेल आणि तिला आपल्या सोबत ठेवत जगत्कल्याणाच्या हेतुने ही लीला केली असेल.

आई अहिल्या, शुभ्रवस्त्र नेसलेली, हातात शिवपिण्डी आणि मुखावर भक्तिने मिळालेले सात्विक तेज. ही त्यांची नाही, आज आमची ओळख आहे. होय, आम्ही आई अहिल्येचे लेकरु आहोत, ती आमची आई आहे म्हणूनच आज आमचे श्वास रेवामाईच्या तरंगात मिसळतात आणि अहिल्यादेवीच्या आवारात विसावतात. तिच्या उपकारांची परतफेड नाहीच, ऋणी असणे सुखाचे.

 

अंतरा करवड़े

 

     

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू