पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आंब्याचं देशी वान.....!!

           मी नेहमीप्रमाणेच काल बाजारात गेलो होतो. भाजीपाला न्याहाळता न्याहाळता बाजारात फेरफटका मारत होतो. इकडे तिकडे नजर भिरभिरत होती. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा पाठीवर दप्तर घेऊन जोरजोराने ओरडत होता. "तीस रुपयाला एक डझन आंबे.....!! तीस रुपयाला एक डझन आंबे.......!!" नकळत माझं लक्ष त्याच्या आवाजाकडे वेधलं गेलं. त्याची खेड्यातली आई एका टोपल्यांमध्ये बारीक बारीक आंबे घेऊन विकायला बसली होती. "आंबे घ्या आंबे....!!" म्हणून जोरजोरात ओरडणारा तिचा मुलगा बहुदा इथेच शहरात कुठल्यातरी शाळेत किंवा शिकवणीला जात असावा. कारण त्याच्या पाठीवर वह्या पुस्तकांची बॅग होती. त्याची आई आंबे विकायला घेऊन शहरातल्या आठवडी बाजारात आली होती. कदाचित हा मुलगा आईच्या मदतीकरिता तिथे आला असावा. असं एकंदरीत तेथील परिस्थितीवरून माझ्या लक्षात आलं.

            सर्वप्रथम माझं लक्ष वेधलं त्या टोपलीतल्या आंब्यानं. आंबे तसे आकाराने बारीक-बारीक आणि दिसायला हिरवेगारच दिसत होते. परंतु ते गवतात कृत्रिम पिकवलेले आंबे वाटत नव्हते. झाडावरच पिकलेल्या आंब्याचे पाडं असावेत असं प्रथमदर्शनी वाटत होतं. सहज कुतुहल म्हणून मी मुलाला विचारलं. तर तो म्हणाला "साहेब...! आमच्या शेतातला हा आंबाच असा आहे की,  त्याला उतरावं लागत नाही. पिकवावं लागत नाही. एकदा का तो पाडाला आला की, त्याची सर्व फळे झाडालाच पीकतात." असे म्हणताच आंबे विकत घेण्याचा मोह मला काही आवरेना. मग मीही भितभीतच तीस रुपयाला एक डझन आंबे खरेदी केले.  मनात एक शंका होतीच. हे आंबे गोड निघतील की आंबट?  पण तो मुलगा आंबे गोड असल्याचे पुन्हा पुन्हा निक्षुन सांगत होता. तो साक्षात शेतकऱ्याचाच मुलगा असल्यानं माझाही विश्वास बसला होता. नाहीतर व्यापारी लोकांयवर एवढा एकदम विश्वास बसत नाही माणसाचा. कारण व्यापारी आंबटालाही "गोड" म्हणूनच गोड-गोड बोलून विकतात.

          आंबे घरी आणल्यावर आंब्याकडे बायको-मुलं जरा आश्चर्यानं पाहू लागली. त्यांना वाटलं गोटी एवढुले हिरवे हिरवे आंबे अन हे काय घेऊन आलेत आज बाबा. नेहमी कसे चांगले  केशर, लालबाग, बदाम, हापूस, दशेरी आंबे आणतात. पण जेव्हा ते आंबे खायला बसले, तेव्हा त्या गोटीएवढ्या आंब्याचा गोडवा चाखून एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांना आता वाटू लागलं, बाबांनी असले हे हिरवे हिरवे आंबे जरा जास्तच आणायला हवे होते.

            तेव्हा त्यांना मी सांगितलं. बाळांनो...!! हा गावरान आंबा आहे. आता बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या कलमी आणि परदेशी वानांमुळं गावरान असलेलं हे देशी आंब्याचं वान आता बाजारातून जवळजवळ हद्दपारच झालं आहे. शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायात लाकडांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सेंट्रींग, खिडक्या, दरवाजे यासाठी लाकडांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे शहरातले लाकूडतोडे खेडोपाडी जाऊन आंब्याची झाडं विकत घेऊ लागली आहेत. तोडू लागली आहेत. आत्ताच्या ह्या नवीन पिढीची शेतकरी माणसंही त्यांच्या आर्थिक प्रलोभनांना बळी पडून वाड-वडिलांनी, धुऱ्या-बंधुऱ्यावर पिढ्यान-पिढ्या जतन करून ठेवलेल्या आंब्याच्या झाडावर, अमराईवर बिनदिक्कत कुऱ्हाड चालवू लागले. करवत चालवू लागले. उरलं सुरलं नुकसान या वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळामुळे झालं. दुष्काळ पडला की, जमिनीची पाणी पातळी खूप खालावते. त्यामुळे आंब्या सारख्या देशी झाडांच्या मुळांना पाणी पोहोचत नाही. मग ती उभ्या-उभीच वाळू लागतात. पूर्वी पाण्याचा उपसा बेतानंच व्हायचा. म्हणून ही झाडं उन्हाळ्यातही तग धरायची. पण आजकाल आपण विद्युत पंपाद्वारे विहिरीचा उपसा करतो. त्यामुळे जमिनीचं अपरिमित शोषण होतं. पण ते आंब्या सारख्या देशी वानांच्या मुळावर येऊन ठेपतं.

           मुलं कान देऊन ऐकत होती. मी काय म्हणतो हे त्यांना मनोमनी पटत होतं. देशी फळांमधला गोडवा काय असतो?याची चव त्यांनी आत्ताच चाखली होती. परदेशी वानांपेक्षा देशी वानांमधील गोडवा काही औरच असतो, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. याच उन्हाळ्यात ह्या देशी आंब्याच्या कोयिंची रोपे घरीच तयार करून, ह्या रोपांमधील काही रोपे घरासमोरील अंगणात लावायचा दृढनिश्चय त्यांनी मनामध्ये पक्का केला होता. उरलेली रोपे पै-पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना वाटप करून त्यांचं रोपण व संगोपन करण्याचा आग्रह त्यांनी संबंधिताकडे करण्याचं ठरवलं होतं. आपल्याच भूमीत आपल्याच वाडवडिलांनी परंपरेनं टिकून ठेवलेलं, परंतु काळाच्या ओघात नष्ट होत चाललेलं देशी वान. आता आपल्याच पिढीनं जतन केलं पाहिजे. हे त्यांना आता मनोमनी पटलं होतं.  

                     

                                           -भानुदास धोत्रे

                                            परभणी

                                            7972625086

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू