पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नांची दुनिया

स्वप्नांची दुनिया

दि.२ जून, २०२२.

आपल्या प्रत्येकाला वेळोवेळी झोपेत पडणारी स्वप्ने ही विविध प्रकारची व अनाकलनीय असतात. जणू काही एखादा चलतचित्रपट आपण पाहतो की काय असे भास कधी कधी होत राहतात. स्वप्ने जशी मध्यरात्री किंवा पहाटे पडतात तशीच ती दुपारी साधी डुलकी लागली तरी पडतात. काही आनंददायी असतात तर काही भयावहही असतात. स्वप्ने जशी मोठ्यांना पडतात तशीच ती लहान मुलांनाही पडतात व वृद्धांनाही ! काहींच्या स्वप्नात मृत व्यक्ती किंवा मृत नातेवाईकही येतात तर काहींना त्यांच्या मनातील हयात व्यक्तीही स्वप्नात येतात. काही स्वप्ने बराच वेळ घटनेच्या स्वरूपात दिसतात तर कधी कधी काही स्वप्ने क्षणभर आपले अस्तित्व दाखवून नाहीशी होतात. कधी कधी स्वप्नात अप्रासंगीक घटनाही दिसतात मात्र त्याचे कारणही आपणास सापडत नाही.

असे म्हटले जाते की " मनी वसे ते स्वप्नी दिसे ", पण तसेही सहसा घडताना दिसत नाही. हे काही अंशी खरे की मनात सतत येणारे विचार स्वप्नांच्या माध्यमातून एखादी झलक अधून-मधून दाखवितात. भयावह स्वप्नांच्या बाबतीत सहसा आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही ती कोणत्याही प्रकारची असू शकतात व त्याची तीव्रता कधी कधी एवढी असते की माणूस झोपेतून खडबडून जागाही होतो. कधी कधी काही माणसे झोपेत रडतात देखील. विस्मरणात गेलेल्या व्यक्ती देखील स्वप्नात कधी कधी अवतरतात, कधी कधी स्वप्ने आपण अनुभवलेल्या जुन्या वातावरणात आपल्याला घेऊन जातात व जुन्या आठवणी जागृत करतात. कधी कधी स्वप्नात चालू घटनांचे देखील अवतरण होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.

एक मात्र खरं की लहान मुले एखाद्या ठराविक अशा त्यांच्या आवडत्या वस्तूंचा सातत्याने विचार करीत असतात त्यामुळे त्या वस्तू, ते प्रसंग त्यांच्या स्वप्नात येतात व जागेपणी ते आपल्या पालकांना वा घरातील व्यक्तींना अशी स्वप्ने पडल्याचे सांगत असतात त्यामुळे त्यांच्या अंतर्मनातील भाव-भावना त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून त्यांना दिसतात. असे म्हटले जाते की वारंवार मनात येणारा विचार अंतर्मनावर कोरला जातो व त्याचे प्रतिबिंब आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून पहावयास मिळते, कदाचित लहान मुले एखाद्या गोष्टींचा घ्यास जेव्हा घेतात त्यावेळी असे घडत असावे.

स्वप्नांच्या बाबतीत कोणताही विशिष्ठ ठोकताळा अस्तित्वात नसावा असे मला वाटते. अमुक एक गोष्ट वा अमुक एक आवडती व्यक्ती स्वप्नात यावी व आपण ती पहावी असे घडत नाही. तसेच अमुक एखादी अप्रिय व्यक्ती अथवा प्रसंग येऊ नये असे वाटत असूनही तिचे स्वप्नात येणे आपण टाळू शकत नाही. आपल्या निद्रिस्थावस्थेत स्वप्ने आपल्या मनाचा ताबा घेतात व अनिर्बंधितपणे जे जे दिसेल ते आपण पाहत राहतो असा तो प्रकार असतो. स्वप्ने अशी का पडतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास माझा नाही, त्यामुळे त्या पाठीमागील कारणांची खुप चिकित्साही मी केली नाही मात्र स्वानुभवावर आधारित मी हा लेख लिहितोय.

माझ्या बाबतीत १-२ वेळा स्वप्नात मोठी गंमत झाली की मी कामावर आहे व कामावर असताना काही कार्यालयीन समस्या निर्माण झाल्या व त्या कशा दूर कराव्यात अशा विचारात मी असतानाच झोपेतून जागा झालो. खरंतर, माझ्या सेवानिवृत्तीनंतरच्या १० वर्षाने असे नोकरीतील प्रसंग स्वप्नात येणे हे अतर्क्य वाटते तसेच ४०-५० वर्षांपूर्वीच्या काळातील घटना व व्यक्ती अचानकपणे स्वप्नात येणे हे देखील अतर्क्य आहे कारण तत्कालीन कोणताही विचार सांप्रत परिस्थितीत मनामध्ये आलेला नसतो. मात्र कोणती बाब स्वप्नात यावी वा स्वप्नात येऊ नये यावर मानवी नियंत्रण नसते हेच स्वप्नांचे वैशिष्ठ असते असे मला वाटते.

नाही म्हटले तरी, आपल्या अंतर्मनावर होणाऱ्या चांगल्या अथवा वाईट घटनांचा परिणाम कधी कधी आपल्या स्वप्नातून आपल्याला पहावयास मिळतो हे खरं, पण ते ही शत-प्रतिशत खरं असतं असंही नाही. त्यामुळे स्वप्नांची दखल फारशी गंभीरपणे कोणी घेत नाही व ती एक आपसूक घडणारी झोपेतील एक क्रिया आहे असे समजून आपण पुढे जात असतो असे मला वाटते. थोडक्यात आपली झोपेतील स्वप्ने आपल्या आयुष्याचा सहप्रवासी असतात असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही कारण याला ना वयाचे निर्बंध ना दृष्टीची अडचण. एक मात्र खरं की झोपेत सहसा आपण मनसोक्त स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतो, कधी ती आपल्या मनाला उभारी देतात तर कधी कधी खट्टू पण करतात पण ती स्वप्ने नेमकी कोणती पडतील व का पडतील याबद्दल आपण अनभिज्ञ असतो मात्र ती आपल्या झोपेवर अधिराज्य गाजवत असतात हे मात्र खरं !


दि.२ जून, २०२२. सुधीर नारायण इनामदार..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू