पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या सायकलच्या आठवणी

फिलिप्स, ऍटलस आणि हरक्यूलस

भावंडे...


शनिवारचीच गोष्ट...

संध्याकाळी ऑफिस वरून घरी जातांना माझा मोरोक्कन मित्र  म्हणाला "

" उद्या सकाळी सायकलिंगला जाऊ या का? मी नवीन सायकल घेतली ती पण दाखवतो ".

"अरे वा...अभिनंदन...!!! नक्की जाऊ यात की " मी त्याचे कौतुक केले.


आमच्या  हरेगावातील सायकलिंगचा  तो  सगळा इतिहास त्याला  सांगावासा वाटला...


लहानपणी  पायात घालायला  चपला जरी मिळाल्या तरी खूप होत्या, "सायकल " मिळणे ही खुप दूरची गोष्ट..!!

हरेगावात "सायकल "असणे म्हणजे  "श्रीमंतीचे " लक्षण होते.

आणि जर तुमच्या कडे गाई, म्हशी,बकऱ्या, कोंबड्या जास्त असतील तर तुम्ही "अधिक श्रीमंत "असं एक अलिखित समीकरण होत.

याच श्रीमंती साठी आमच्या कॉलोनी पासून सरळ खाली  " गवळी वाडा "

नावाने  " डी  टाईप " मधली काही घरे प्रसिद्ध झाली होती. हया कामगारांनी गाई म्हशी सांभाळून आपला " दुधाचा " व्यवसाय समृद्ध केला होता..


त्या वेळी कारखान्यावर असतांना कित्येक कामगारांची सायकल घेण्याइतपत सुद्धा कमाई नसायची, पण कधी कोणाचं  काम मात्र अडलं नाही.

दुसऱ्यांच्या सायकली बघून "समाधान " मानणे हेच आमच्या हाती असायचे.

त्यावेळी दुचाकी मोटार सायकल कोणाकडे सुद्धा नव्हती.

माझ्या आठवणी प्रमाणे एका साहेबांकडे मला  "लक्ष्मी " नावाची मोपेड फक्त दिसली होती...

त्यावेळी 95 % मुलं, मुली हरेगाव मध्ये दुसऱ्यांची  सायकल घेऊन शिकले असतील हे मी खात्रीने सांगतो.


घरी कोणी "नवखा पाहुणा "सायकल घेऊन आला की आम्ही त्या कडे  चोरासारखी नजर ठेवायचो,

आणि पाहुणा  " गप्पात " रंगला की हळूच सायकल उचलायची आणि चालवायला घेऊन जायचो,आम्ही गावच्या भाषेत ह्याला " चक्कर मारणे " अस म्हणत असे.

पाहुणा बाहेर येऊन सायकल कोठे गेली असा विचारू लागला की मग घरातील लोक आमचा "शोध " घेत.


सायकल चालवायला येऊ लागली की मग सारखी खेळावीशी वाटे.

 हा असा एकच प्रकार आहे जो टप्या टप्यात शिकावा लागायचा.

म्हणजे असं की सुरवातीला अर्धे प्यांडल   नंतर नळी ला धरून पुन्हा फुल प्यांडल   मग सीटावरून आणि शेवटी डबल शीट..!!!

बाहेरची कोणतेही काम करायला  आम्ही एका पायावर तयार असायचो कारण "सायकल "खेळायला मिळणार हा त्या मागे हेतू  असायचा.


सायकल खेळण्याची ती हौस मग स्वस्थ बसू देत नव्हती . मित्रांच्या सायकली घेऊन कधी  आपली "तहान" भागवायची किंवा त्यावेळी "पन्नास पैसे " तासाने सायकलच्या दुकानात छोट्या, मोठ्या आकाराच्या  सायकली  भाडयाने चालवायला मिळायची.तो आनंद खरोखर

 " पैशात " मोजता न येणारा होता.


 आमच्या घरी पहिल् आगमन झालं ते फिलिप्स च्या सायकलच !!

त्या आधी "बावीस इंच "घायची की "चोवीस इंच " यावर खूप चर्चा झाली

 पण हा काय प्रकार असतो ते   समजत नसायचं.!!

 नववधू प्रमाणे शेवटी फिलिप्स ची "बावीस इंची"  घरात आली.तिच्या अस्तित्वाने  खरं तर घर एकदम भरल्यासारख वाटू लागलं . हॅण्डल वर असलेले ते आमचं " नांव " मग आम्हीच पुन्हा पुन्हा हाताने " स्पर्श " करून वाचायचो.


सायकलच्या कव्हरवर तर नावासहित संपूर्ण "पत्ताच " असायचा. त्यामुळे एकवेळ "आम्ही "हरवू पण "सायकल " हरवू शकत नव्हती.मागच्या आणि पुढच्या चाकाला लावलेली सिनेमाच्या नावाची ती रबरी पोस्टर काय आनंद द्यायची काय माहित ?  पण असायची!!


कधी आम्हाला हौस झाली की आम्ही नवीन गुलाबी रंगाच्या मुठी आणि  चाकामध्ये लावायला शोभेची रंगीत लाल पिवळी हिरवी  रिंग आणायचो.

खूप वर्ष वापरल्या नंतर "पंचर होणे" हे नेहमीच्या आजाराच दुखणं लागल्या सारखं सुरु होई..

कधी कधी त्यावेळी "पार्ट बदलणे " हया सारख्या मोठ्या "शस्रक्रिया" करायची पण वेळ येई.


त्याच काळाच्या दरम्यान "ऍटलस" आणि "हरक्यूलस "यांच पण आगमन झालं आणि मग घरटी एक किंवा दोन सायकली दिसू लागल्या.

श्रीरामपूला जाण्या येण्यासाठी किंवा थेट शिर्डी नगर पर्यंत जाण्यासाठी लोक वापर करू लागले.

रात्रीच्या वेळी लाईट असलेल्या सायकली अंधारातून " काजवा  " चमकावा तश्या लूक लुकतांना दिसत. रात्री  हा लाईट लागतो कसा हया  " विज्ञान " चा आम्ही सकाळी  सायकली जवळ " शोध " घ्यायचा प्रयत्न करायचो.


कॉलेजला आणि पुढे नोकरी निमित्ताने औरंगाबादला गेल्यावर सुद्धा " फिलिप्स " ने   खूप साथ दिली.आणि शेवटी ती "थकली" तिचा वापर थांबला...

"वार्धक्य " हे कोणालाही टळले नाही. वस्तू असो की व्यक्ती.!!

कोणत्याही वस्तूचा होणारा चांगला वापर हेच  त्या वस्तुच खरं "जीवन" कामी येणं हे असत..

वस्तू घेऊन वापर होत नसेल तर त्या वस्तूला खरं तर "किंमत " असूनही  राहत नाही.!!

थोडक्यात काय तर वस्तूचा योग्य  वापर हेच खरं त्या वस्तूच जीवन सार्थक करणे असते नाही का? !!

आठवून बघा आपला ही "सायकल" चा तो प्रवास आणि तिच्या बरोबर गेलेले ते दिवस....

ह्याच सर्व गप्पा उद्या मित्राला सांगतांना मन भरून येणार हे नक्की.!!!

जागतिक सायकल दिनानिमित्ताने आज आमच्या सायकलची आठवण झाली.


©®प्रकाश फासाटे.

     मोरोक्को 

212 661913052








पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू