डाॅक्टर वंदना
डाॅक्टर्स-डे निमित्त डाॅक्टर वंदना
शुभेच्छाच ह्या तुम्हा अर्पितो
वैद्यराज माऊली,
सकल व्याधितांची बनुनी रहाता
सदा सत्य सावली।
बहुपीडित तो मानव जाता व्याधीने व्यापुन
अतीव श्रमाने कष्ट वेचिता
पेटवित स्वसौख्याची धून।
रात्र असो वा दिवस तुम्ही हो
व्याधीपरिमोक्षा धावता
अपरिमित आपुल्या पाहुनी कष्टा
विनम्र श्री चा माथा।
गरज भासता शल्यकर्म ते
तत्परतेने करिता,
साथही तुमची सदैव असता
सरते व्याधीची चिंता।
व्याधित होता चरणही वंदिती
पीडित जन सारे,
रोगमुक्त परी होऊनी जाता
वदती त्याला,पैसा अती झाला रे।
बघता ऐश्वर्या ते जळती
कोण पहातो बुद्धी ती!
नाईफ धरोनी निजहाती
परि टरबुज सुरेख न कापिती जी।
पैसा तुमच्या ज्ञानाचा तुम्ही
अवश्य सदैव मिळवा,
आशिष लाभे भगवंताचा
जगी अमोल दुर्मिळ जो ठेवा!
@ डाॅ.श्रीकांत औटी
नेवासा
डाॅक्टर्स डे निमित्त
आदरपूर्वक समर्पित