पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एबीसी प्रायव्हेट लिमिटेड

"एबीसी प्रायव्हेट लिमिटेड" (कथा)

 

        निजामाच्या राजवटीत बरीच वर्षे उसाच्या चिपाडागत चेपून-चेपून चोथा झालेला प्रदेश म्हणजे मराठवाडा. ह्याच मराठवाड्यातलं एक खेडंगाव. त्याचं नाव उमापूर. साधारणतः दोनेक हजार लोकवस्तीचं गाव. गावात शिकल्या-सवरलेल्या लोकायची संख्या तशी बोटावर मोजण्या इतकीच. जिल्ह्याच्या ठिकाणापासून अनेक मैल दूर असलेलं उमापूर हे गाव तसं दुर्लक्षितच म्हणायला काही हरकत नाही. पाचेक वर्षाला कधी-मधी लागलंच इलेक्शन तर जिल्ह्याचे पुढारी, त्यांचे कार्यकर्ते, घोट्याइतके खोल खड्डे पडलेल्या रस्त्यानं, धुळ उडवीत कसंतरी कसरत करत-करत गावात यायचे. जोर-जोरात भाषणं ठोकायचे. रस्ते, पाणी, वीज, नाली, देऊ म्हणून लोकायला अस्वस्थ करायचे. अन् त्याबदल्यात मतांची भीक आमच्या झोळीत घाला म्हणून, जे निघून जायचे तं थेट त्यांची भेट गावाला पाच वर्षानंतरच व्हायची. असं हे आडपेठाला वसलेलं, कुणाच्या कधी फारसं चर्चेत नसलेलं उमापुर गाव.

             याच गावात लहानाचा मोठा झालेला. याच मातीत जन्मलेला. तरुण पोरगा अंकुश बाभनराव चंद्रमुनी. वडिलोपार्जित वाट्याला आलेल्या तीन-साडेतीन एकरात,  काळ्या ढेकळाशी खेटे घालीत, संघर्ष करीत आपलं नशीब आजमावत होता. पण कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी ही त्याच्या पाचवीलाच पुजलेली असायची. एखादं वरीस चांगलं साधायचा अंदाज असला की पिकावर काहीतरी रोगराईचं संकट यायचं. अन पहिले पाढे पंचावन म्हणल्याप्रमाणं खिशातून वावरात टाकलेला खर्चही निघायचं नाही. त्यामुळं नव्या दमानं शेतात उतरलेला तरणाबांड गडी अंकुश चांगलाच घायकुतीला आला होता. काय करावं अन काय नाही असं त्याला झालं होतं. तो चांगलाच बुचकळ्यात पडला होता.

           आभाळात एकाएकी वीज कडाडावी, तसा एके दिवशी त्याच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. त्याला वाटलं आपण दरवर्षी खिशातला पैसा वावरात ओततो. अन वेड्यावानी पिका-पाण्याची वाट पाहत बसतो. ही आपली गत म्हणजे, डोहात गळ टाकून मासेमारी करणाऱ्या कोळ्यांसारखीच. त्या कोळ्याचं नाही का, कधी लागलाच मासा गळाला तर चांदी. नाही तर दिवस वाया गेला म्हणूनच समजायचा. तसंच ह्या शेतीच्या नादापायी आपलं होऊन राह्यलं. याची तीव्र जाणीव अंकुशला झाली होती. म्हणून त्यानं आपलं वडिलोपार्जित तीन-साडेतीन एकर शेत, गावातीलंच भावकीतल्या एकजणाला ठोक्यानं कसण्यासाठी देऊन टाकलं होतं. आता थेट पुणं गाठायचा त्याचा निर्णय एकदम पक्का झाला होता.

             शेत ठोक्यानं देऊन आलेला पैसा खिशात टाकून अंकुश बसमध्ये बसून पुण्याकडे निघाला होता. शिक्षण म्हणावं तर तसं लय काही नव्हतं. पण तो शंभर टक्के अडाणीही नव्हता. बारावी नंतर एक वर्ष बी.ए.करता-करता अर्ध्यातच त्यानं कॉलेज सोडून दिलं होतं. अन आता बसमध्ये बसून कामाच्या शोधात सुसाट पुण्याच्या दिशेने निघाला होता. पुण्यात आल्यानंतर त्याला सुरुवातीला गरगरल्यासारखं होऊ लागलं. जिल्ह्याच्या ठिकाणांपासून मैलो दूर असलेल्या उमापुरचा अंकुश पुण्यातील गगनचुंबी इमारती, कारखाने, मॉल पाहून. काळ्या काळ्या काचायच्या पांढऱ्याशिपीत कार, कारमध्ये बसलेले सुटाबुटातले लोकं पाहून एकदम चक्रावून गेला. अन आपल्या दलिंदर शेतकरी जीवनाची त्याला आता लाज वाटू लागली होती. इथल्या शहरातल्या झगमगाटाचं, मोहमयी दुनियेचं आकर्षण त्याला आता भलतंच सतावू लागला होतं. या चंदेरी, मोहमयी दुनियेची भूल पाहता क्षणी त्याला पडली होती. अन त्यानं मनाशी एक पक्का निश्चय करून टाकला होता, की आता गावाकडं उमापूरला जायचं तर अगोदर काहीतरी हटके करून दाखवायचं. अन मगच आपलं तोंड गावाला दाखवायचं.

            इकडं बाभनरावचा अंकुश पुण्याला गेल्याची चर्चा साऱ्या गावात पसरली होती. पारावर, नव्ह्याच्या दुकानात, पानठेल्यावर, विहिरीवर पाणी भरताना, जिकडं पहावं तिकडं गडीमाणसायच्या, बाया-पोरायच्या तोंडी अंकुशचीच चर्चा सुरू होती. कुणी म्हणायचं अंकुश पुण्याला गेला ते बरंच झालं. कसं तरी सुखानं पोट तरी भरेल. तर कोणी म्हणायचं अंकुश काय दिवे लावणाराय पुण्याला जाऊन. मोठ्या शहरात आपल्यासारख्या खेड्यातल्या लोकायचा निभाव लागत असतो व्हय? येईल बोंबलत गावाकडं काळं तोंड घेऊन चार-सहा महिन्यात. अशी काहीतरी साधक-बाधक चर्चा रोज अंकुश बाबत उमापूरात झडत होती. उमापूरात आता अंकुश म्हणजे एक टिंगल-टवाळीचा, हेटाळणीचा, अन तंबाखू खाऊन चोथा थुंकल्यागत थील्लर विषय झाला होता. उगवला दिवस असाच चर्चा चर्वण करता-करता निघून जात होता.

           इकडं पुण्याला येऊन अंकुशला आता चांगले चार-पाच वर्ष झाले होते. आता त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला होता. शहरातल्या नंबर दोन धंदेवाल्याशी त्याची ओळख झाली होती. छक्केपंजे कसे खेळायचे, पोटातलं ओठात कसं दिसू द्यायचं नाही. इमानदारी गाठुड्यात बांधून कशी बाजूला ठेवायची. अंगावर उंची किमतीची वस्त्रे घालून, पायात सूट-बूट घालून चार माणसात आत्मविश्वासानं कसं वावरायचं, महागडी शिगारेट एका विशिष्ट स्टाईलमध्ये पेटवून त्याचा लांबच-लांब धूर कसा सोडायचा. याचे प्राथमिक धडे त्यानं दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी आत्मसाथ केले होते. जुनी वाहणं विकायच्या बाजारातून त्यानं एक लाखभर रुपयाची कारही खरेदी केली होती. तब्बल चार-पाच वर्षांपूर्वी पुण्यात आल्यानंतर "काहीतरी हटके करूनच गावाकडे जायचं" हे स्वप्न उराशी बाळगून अंकुश बाभनराव चंद्रमुनी आता आपल्या स्वतःच्याच पूर्ण नावाच्या आद्याक्षरावरून झटपट पैसा दुप्पट करून लोकांना श्रीमंत करणारी, दिवास्वप्ने दाखविनारी, एबीसी प्रायव्हेट लिमिटेड नावाची फायनान्स कंपनी स्थापून, झगमगीत कपडे अंगावर परिधान करून, सुटबूट घालून नव्यानेच विकत घेतलेल्या सेकंड हॅन्ड पांढऱ्या शिपीत कारमध्ये बसून, अंकुश चे अंकुशराव झालेले एबीसी कंपनीचे स्वयंघोषित सर्वेसर्वा चेअरमन, गावातील, पंचक्रोशीतील एक बडी हस्ती झाल्याच्या अविर्भावात पुण्याहून उमापूरच्या दिशेने सुसाट निघाले होते.

            इकडं उमापूर गावांत अंकुश गावी येत असल्याची कुण-कुण एव्हाना सर्वांना लागली होती. कुच्चरओट्यावर हळूहळू दबक्या आवाजात लोकं त्याच्याबद्दल कुजबुजत होते. एवढ्यात पहाटं साडेनऊच्या सुमारास पांढरीशीपीत कार गावातल्या मंदिरामोऱ्ह थबकली. अंकुश गाडीतून उतरला तव्हा त्याच्यात लय अमूलाग्र बदल झालेला होता. डोळ्याला काळा चष्मा, हिरोसारखा मागं भांग, हातात कडे, पायात बूटमोजे, अंगात बगळ्यांसारखे पांढरेशुभ्र कपडे, कमरेला चमड्याचा बेल्ट, हातात भारीचा मोबाईल. अशा थाटामाटातला गडी पाचेक वर्षात पुण्याहून पहिल्यांदाच गांवात आल्यानं लोकही गांगारून गेले होते. अंकुशला माघारी नावंबोटं ठेवणारे काहीजणं आता चांगलेच तोंडावर पडले होते. काहींना अंकुशनं शुन्यातून विश्व् निर्माण केल्याचा आनंद होत होता. एकंदरीत अंकुशच्या आगमनानं गांवात आनंदी आनंद पसरला होता. वातावरण चैतन्यमय झालं होतं. खेडेगावातून परगावाला मोठया शहरात गेलेलं एक खेडुत पोरगं, कोणीतरी मोठ्ठा साहेब बनून गांवात आल्यानं लोकं आश्चर्यानं तोंडात बोटं घालीत होते. एक-दोघायन आनंदाच्या भरात त्याचा हारा-फुलांनी सत्कारही केला होता. 

          दुसऱ्या दिवशी पारावरल्या लाऊडस्पीकरवरून कोणीतरी आलाउंशिंग केली की "आज ठीक नऊ वाजता मंदिरामोहरल्या मोकळ्या जागेत अंकुश बाभनराव चंद्रमुखी आपल्या गावाला झटपट श्रीमंत होण्याविषयी काही टिप्स देणार आहेत. तरी सर्व महिला, पुरुष, तरुण-तरुणी यांनी मंदिरामोहरं येण्याची कृपा करावी हो..... " अशी दवंडी मंदिरावरील लाऊडस्पीकरवरून देण्यात आली होती. मंदिराकडं मोकळ्या पटांगणात जागा धरायला लोकायची रिघ लागली होती. बायाबापड्या सयपाक-पाणी उरकायचं सोडून वेळेआधीच हजर झाल्या होत्या. पारामोऱ्ह चांगलीच गर्दी जमली होती. सारा गाव गोळा झाला होता. अंकुशचं एका रात्रीत श्रीमंत होणं, ही गावासाठी स्वप्नवतच गोष्ट होती. म्हणून आता अंकुश गावातल्या लोकायला कोणता कानमंत्र देतो ह्याबद्दल प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तो आता लोकायच्या गळ्यातील ताईत बनला होता.

              तेवढ्यात झपाझप पावलं टाकीत मोठया आत्मविश्वासानं अंकुश जमलेल्या गर्दीमोहरं आला. मांडलेल्या खुर्चीत बसला. अन हातात माईक घेऊन बोलू लागला. "या ठिकाणी उपस्थित सर्व मायमावल्याहो.....! गावातल्या सर्व सुजान नागरिकहो......! माझ्याकडं बघून घटकाभर तुमचा इश्वास बसला नसंल की, हा खरोखरच अंकुश आहे की कुणी डुप्लिकेट उभा केलाय.....! पण मी तोच अंकुश आहे. की जो याच गावात, याच भूमीत तीन-साडेतीन एकरात चार-पाच वर्षापूर्वी राब-राब राबत होतो. मर-मर मरत होतो. उन्हातान्हात कष्ट उपसत होतो....! पण मी काही दिवसांपूर्वी पुण्याला गेलो अन मोठ्या कष्टानं माझं नशीब पालटलं. आता मला एवढ्यावरच थांबायचं नाही. माझा गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, नव्हे नव्हे तर माझा मराठवाडा पूर्णपणे सुधारण्याचा माझा मानस आहे. गावाकडच्या हालअपेष्टा, कष्ट मला संपवायचे आहेत. मी आता एक स्वतःची एबीसी करपोरेशन लिमिटेड कंपनी उभी केली आहे. तिचा शेअर मार्केटमधील भाव खुप वधारलेला आहे. शिवाय मोठमोठ्या शहरात वेगवेगळे बिल्डर्स आपल्याच कंपनी मार्फत अपार्टमेंट बांधत आहेत. रो-हाऊस बांधत आहेत. म्हणजेच माझ्या ह्या एबीसी करपोरेशन लिमिटेड कंपनीचा बिझीनेस आता काही लाख कोटीमध्ये जाणार आहे. तेंव्हा तुम्हां गावाकऱ्यांना मी असं जाहीर आव्हान करतो की तुम्ही तुमचं घरातलं सोनं-नाणं विका. किडूक-मिडूक विका, शेळ्या मेंढ्या विका, हवं तर खुंट्याला बांधलेले गाय-बैलं विका. कुणाच्या हातावर मुलीच्या लग्नासाठी म्हणून काही पैसा साचवून ठेवलेला असेल तर तो आमच्या ह्या कंपनीत गुंतवा. कंपनीत वेगवेगळ्या स्कीम आहेत. त्या स्कीम तुम्हाला समजावून सांगितल्या जातील. त्या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट तिप्पट रक्कम मिळेल. मग प्रत्येकाच्या घरात कसे माझ्यासारखे अंकुश तयार झालेले तुम्हाला दिसतील. असे प्रत्येक घरा-घरात तयार झालेले श्रीमंत अंकुश मला पाहायचे आहेत. ते माझं स्वप्न आहे. येत्या दोन दिवसात प्रत्येक तालुक्याला आपल्या कंपनीचं कार्यालय थाटल्या जात आहे. तिथं जाऊन रीतसर पैसे भरा. लेखी  पावत्या घ्या. हवे तर ग्यारंटी म्हणून आम्ही तुम्हाला कोरे चेकही देऊत. पण या सुवर्ण संधीचा लाभ घेतल्याशिवाय कोणी स्वस्थ बसू नका. आता नाही तर कधीच नाही......!! या त्वरा करा आमच्या कंपनीसोबत जॉईन व्हा......!! आणि आपला घामाचा पैसा दुप्पट तिप्पट करण्याची संधी आम्हाला द्या. " असं जाहीर आव्हान करून सभा समाप्त करण्यात आली. जवळ जवळ सर्वांना अंकुशचं म्हणणं पटलं होतंच. एखाद दुसऱ्याला शंका आल्यास सोबतचे त्यांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करत होते. पटवून देत होते.

           पाहता-पाहता जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात चकाचक कार्यालये थाटली गेली होती. अंकुशनं काही प्रशिक्षित पोरं कार्यालयात बसवली होती. आलेल्या गिर्‍हाईकाला बराबर कसं ठगवायचं हे त्यानं आपापल्या पंटरला बराबर सांगून ठेवलं होतं. त्यानं आता थेट लोकायच्या काळजालाच हात घातला होता. त्यामुळे लोकही मागचा-पुढचा विचार न करता त्याच्या एबीसी कार्पोरेशन लिमिटेड मध्ये पैसे भरण्यासाठी गर्दी करू लागले होते. आपल्या बराबरच आपल्या लेकीबाळी, सोयरे-धायरे याह्यचं उत्पन्न दुप्पट-तिप्पट व्हावं म्हणून पटवून सांगत होते. कोणी शंका उपस्थित केली तर अंकुशच्या पूर्वीच्या आयुष्याचं अन आताच्या अमुलाग्र बदललेल्या आयुष्याचं उदाहरण ते जावयांना, सोयऱ्या-धायऱ्यांना देत होते. त्यांनाही खात्री पटत होती. म्हणून ते कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता, कोणी बैल बारदाना विकी, कोणी घरातलं धनधान्य विकी, कुणी शेळ्या-मेंढ्या विकी अन तडक तालुक्याला जाऊन अंकुशच्या कंपनीत पैसे भरीत होते. लेखी पावती घेत होते. एक दोन वर्षात उत्पन्न दुप्पट होण्याची वाट पाहत होते.

           असं करता-करता अंकुशच्या कंपनीची जाहिरात कानोकानी आसपासच्या जिल्ह्यात पसरली होती. वर्षामागून वर्ष जात होती. ज्या काही शंभर खांड लोकांनी सुरुवातीलाच कंपनीत गुंतवणूक केली होती त्यांना कंपनीतर्फे दामदुप्पट रक्कम मोठ्या सन्मानपूर्वक वितरित केल्या जात होती. त्यामुळे लोकांचा कंपनी बद्दलचा विश्वास दुणावत होता. गुंतवणुकीसाठी गर्दीचा ओघ दिवसेंदिवस वाढतच होता. अंकुश हा पूर्वीचा अंकुश न राहता तो पूर्णपणे हायटेक झाला होता. त्याला हवी तशी यंत्रणा त्यानं आपल्या दिमतीला उभी करून ठेवली होती. अल्पावधीतच अंकुशच्या एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काही लाख कोटीचा टर्नओव्हर पूर्ण केला होता. त्याच्या शाखा आता संपूर्ण मराठवाड्यात झाडाच्या फ़ांद्यासारख्या पसरल्या होत्या. लोक कोणताही मागचा पुढचा विचार न करता काहीतरी उलाढाल करून पैसे आणत होते. अंकुशच्या कंपनीत भरत होते. दरम्यानच्या काळात अंकुशची काही राजकीय पुढाऱ्यासोबत उठबस वाढली होती. त्यामुळं लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत होते.

            बघता-बघता दोन-तीन वर्ष सरली होती. ज्या-ज्या लोकांनी सुरुवातीलाच कंपनीत पैसे डिपॉझिट केले होते, त्यांची आता पैसे विथड्रॉल करण्याची वेळ आली होती. बक्कळ पैसा हातात येणार म्हणून लोक खूष होते. कोणाला येणाऱ्या पैशातून मुलीचे विवाह करायचे होते. कोणाला घर बांधायचे होते. कोणाला शेती विकत घ्यायची होती. कोणाला शिक्षणासाठी खर्च करायचा होता. अशी विविध स्वप्ने लोकांनी उराशी बाळगली होती. त्यामुळं लोकं तालुक्याच्या कार्यालयात खेटे घालत होते. कार्यालयात गेल्यावर त्यांना आज-आज, उद्या-उद्या अशी उत्तरे मिळत होती.

           इकडे अंकुशनं सिंगापूरचा व्हिसा आधीच काढून ठेवला होता. तिथलं नागरिकत्व अगोदरच स्वीकारलं होतं.आता त्याच्या एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे गडगंज पैसा जमा झाला होता. पैसे मागण्यासाठी लोकांचा तगादा वाढण्याअगोदर, कंपनीच्या नावाने चॅव-चॅव, म्याव-म्याव चालू होण्याअगोदर तेथून पलायन करणं आवश्यक होतं. कंपनी स्थापन करण्यामागचा त्याचा हाच मास्टर प्लॅन होता. लोकायला श्रीमंत करण्याचं आश्वासन देऊन जाळ्यात ओढण्याची त्याची शक्कल पूर्णपणे सक्सेस झाली होती. तालुक्याच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पंटरांना अंकुशनं कार्यालयांना टाळे ठोकून रातोरात परागंदा होण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमानं सर्वच कार्यालयांना रातोरात टाळे ठोकून त्याचे पंटर पुण्या-मुंबईला परागंदा झाले होते. पसार झाले होते. पहाटे-पहाटेची शिंगापूरची पहिली फ्लाईट पकडून अंकुशही आधीच ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सिंगापूरला रवाना झाला होता.

             दुसरा दिवस उजाडला तेंव्हा सर्वच तालुका कार्यालयांना टाळे लागलेले पाहून सामान्य गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. होतं नव्हतं ते विकून-टीकून त्यांनी आपल्या जवळची संपूर्ण जमापुंजी एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दामदुपटीच्या आमिषापाई गुंतवली होती. तोपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रात, एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.सगळेच गुंतवणूकदार सैरभैर झाले होते. मिडीयावाले वार्तांकन करण्यात गुंतले होते.वार्ताहार बातम्या लिहिण्यात गढून गेले होते. बऱ्याच बड्याबड्या गुंतवणूकदारांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं. उमापूर या संपूर्ण गावावर तर शोककळा पसरली होती. गावाचाच भूमिपुत्र अंकुशनं त्यांना पुरतं उध्वस्त करून टाकलं होतं. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे काळे ढग जमा झाले होते. तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडत होता. तोपर्यंत ही बातमी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा जोमानं कामाला लागली होती. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय दणक्‍यात झाला होता. इमिग्रेशन विभाग आणि आर्थिक गुन्हे विभागानं अंकुशच्या नावानं रेडक्रॉस नोटीस जारी केली होती. झाल्या प्रकारानं मराठवाड्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.

          पैसा कमवण्याचा शॉर्टकट मार्ग निवडल्यामुळे संपूर्ण गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. होतं नव्हतं ते एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हवाली करून लोकं पुरते कंगाल झाले होते. एका क्षणात त्यांच्या स्वप्नांची धूळधाण झाली होती. राखरांगोळी झाली होती. आपल्या स्वतःबरोबरच आपले आप्तस्वकीय कायमचे फसले गेले होते. सगळीकडे स्मशान सन्नाटा पसरला होता. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही विचारपूस केल्यास वरील स्तरावरून चौकशी चालू असल्याचं सांगितलं जात होतं. एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मराठवाड्याच्या मुळावर उठली होती.

 

                                -भानुदास धोत्रे

                                  परभणी

                                  7972625086

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू