पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खिडकी बाहेरचा पाऊस

खिडकीबाहेरचा पाऊस.


सहाव्या मजल्यावरील आमच्या सदनिकेच्या माझ्या खोलीतील ही प्रशस्त खिडकी. इथे ठेवलेल्या खुर्चीत बसून मी बाहेरचं जग न्याहळत असतो. खिडकीच्या समोर एक पिंपळ आहे. पिंपळाच्या समोर आहे भीमा शंकराचं मंदिर; त्याच्यामागे आहे एक टेकडी. टेकडीवर भली मोठी पाण्याची टाकी. या टेकडीचा सगळा परिसर म्हणजे नेरूळ (पूर्व)चे आर. आर. पाटील उद्यान. हा सगळा निसर्गरम्य परिसर आणि उद्यानात फिरायला येणारी माणसे थोडी दूरून पण माझ्या खुर्चीत बसून मला सहज न्याहाळता येतात.
पिंपळाला खेटून समोरच्या इमारतींना झाकून टाकणारे, सात मजल्याहून अधिक उंचीचे एक विशालकाय झाड होते. ते आजूबाजूच्या झाडांना वाढू देतच नव्हते. गेल्या वर्षीच्या वादळात ते उन्मत्त महाकाय झाड, अचानक कोसळले. आता पिंपळाला वाढायला चांगला अवकाश मिळाला आहे; पिंपळ जोमाने वाढतो आहे. पिंपळ वाढतोय याचा मला खूप आनंद होतोय. कारण पिंपळ परोपकारी आहे; तो दिवस रात्र प्राणवायुचे उत्सर्जन करीत असतो आणि या परोपकारी पिंपळाने प्रसाद म्हणून दिलेला प्राणवायु खिडकीत बसून मला माझ्या छातीत अनायासे भरून घेता येत असतो.
पावसाळ्याच्या दिवसात तर इथं बसण्यातील मजा "कुछ औरही है ।" खिडकीचे छप्पर बरेच रुंद असल्याने कितीही मोठा पाऊस आला तरी तो खिडकीतून घरात येत नाही. जोराचा वारा असेल तर मात्र अंगावर पावसाचे थोडेफार तुषार येतात नि ते झेलून नजरेसमोर धुॅंवाधार बरसणाऱ्या पावसाची, प्रत्यक्षात पावसात न भिजताही अगदी जवळून मला मनमुराद मजा घेता येते.
आज सकाळपासून कोसळणारा तुफान पाऊस मला ही अनुभूती पुन्हा, पुन्हा मिळवून देत आहे. पावसाचा आनंद लुटता लुटता मजा म्हणून मोबाईलवरच्या पावसाच्या चारोळ्या मी वाचतो आहे. एक कवी म्हणतो,
"बरंच काही आपण मागायच्याआधी देऊन जातो पाऊस. सांडून जातो धुॅंवाधार आसुसलेलं, थकलेलं, बरंच काही मोकळं मोकळं करून जातो पाऊस ."... दुसरा कवी म्हणतो,
"पाऊस आलाय भिजून घ्या, थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या, उरात भरून आनंद घ्या, आलाय पाऊस जरा भिजून घ्या"..... तिसरा एक कवी म्हणतो,
"ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, गारठलेल्या संध्याकाळी हिरवी चिंब पायवाट, कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय, कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय, बरसणाऱ्या धारांमध्ये कुणी शोधतोय हरवलेले क्षण, कोणी पावसात आसवे लपवून हलके हलके करतोय आपलं मन.
मला असं काही काव्यमय सुचत नाही. मला सुचते ते असे...
"काय ती खिडकी, काय तो पिंपळ, काय ते मंदिर, काय ते उद्यान आणि काय तो पाऊस, ओक्के,ओक्के!"


सर्जेराव कुइगडे
दि. ०५/०७/ २०२२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू