पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जगी सर्व सुखी असा मीच आहे

जगी सर्वसुखी असा मीच आहे .....
************************

समर्थ ,
तुम्ही जर आज हयात असता ,
आणि , कर्मधर्मसंयोगाने जर कधी,
आपल्या भेटीचा योग आला असता ,
तर ,
" जगी सर्वसुखी असा कोण आहे ",
हा प्रश्न तुम्हाला पडलाच नसता !
होय , होय मी स्वतःला सुखी समजतो !
सर्वसुखी समजतो !

काय नाही माझ्याजवळ ?
सर्व अवयवांनी परिपूर्ण असा
अमूल्य मानवी देह आहे माझ्याजवळ!

माझ्या शेजारच्या बाबुरावांची
किडनी खराब झाली , तेव्हा ,
ट्रांसप्लान्टसाठी त्यांना
लाखोंची फी मोजावी लागली !
समोरच्या बंगल्यातल्या
रावबहाद्दूर नरेशचंद्रांची
पॅरॅलीसीसने वाचा गेली ,तेव्हा ,
त्यांची कोट्यावधींची सम्पत्तीही
त्यांच्या कमी नाही आली !

अंधविद्यालयातल्या
लहान लहान चिमण्यांना ,
अनाथालयातील न उमललेल्या कळ्यांना ,
आणि मूकबधिरांच्या शाळेतल्या
कोवळ्या कोवळ्या कोकरांना
जेव्हा मी बघतो ,
तेव्हा कळते मला
माझ्या एकेका अवयवाची किंमत !
रेल्वेच्या पुलाखाली पहुडलेल्या
जिवंत बेवारस प्रेतांना
जेव्हा मी बघतो ,
तेव्हा कळते मला माझ्या
'टू -बेड किचन' ची किंमत !

वाळलेल्या सशांना ,
काळवंडलेल्या पिलांना
मी पहातो कधीकधी
हॉटेलात कपबश्या विसळतांना !
कधी तेंदूपत्याच्या विड्या वळतांना !
कधी फटाक्यांच्या कारखान्यात
कोवळे कोवळे हात पोळून घेतांना !
तर कधी पहातो ,
वासनांधांच्या हलकट चाळ्यांचे
शिकार होतांना !

मी पाहिलं आहे रामा कुणब्याला
त्याच्या तरुण घरवालीसह
आणि तीन कच्च्याबच्च्यांसह
अग्नीचा भक्ष होतांना ,
त्यांच्या जठराग्नींना तो
शांत करू शकत नव्हता म्हणून !

मी पाहतो आहे ,
वेलीवर एक तरी फुल
फुलण्याच्या आशेने झुरणाऱ्या लतिका,
मी पहातो आहे,
रावणांच्या भुका शमविणाऱ्या गणिका ,
मला दिसताहेत ,
टीचभर खळग्यासाठी
जीवावर उदार होऊन
खेळ खेळणारे डोंबारी ,
मला दिसताहेत ,
हातपाय गळालेले ,
जगाने झिडकारलेले ,
कुष्ठरोगी, महारोगी, भिकारी !

समर्थ ,
हे सर्व पाहून ,
जेव्हा मी माझ्याकडे पहातो,
तेव्हा ,
माझा अंतरात्मा मला
ओरडून ओरडून सांगतो ,
" जगी सर्वसुखी असा मीच आहे "
" जगी सर्वसुखी असा मीच आहे "

कवी -- अनिल शेंडे .

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू