पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रेयाचे स्वातंत्र्य व सुरक्षा

यामिनीला लहानपणापासून नृत्यात रस होता परंतु शाळेतील गॅदरिंगच्या पलीकडे तिला क्लास वगैरे लावून नृत्य शिकण्यासाठी घरून अजिबात पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे तिची आवड तिने तशीच मनांत दाबून ठेवली होती. पण आज जेंव्हा तिची छोटीशी मुलगी श्रेया सुंदर डान्स करत होती तिने मनांत पक्का निश्चय केला आणि सर्वांचा विरोध झुगारून तिला डान्स क्लासला घातले. श्रेयाला डान्स करतांना पाहून यामिनीला वाटत होते की स्वतःला न मिळालेले स्वातंत्र्य आपल्या लेकीला मिळवून देऊन जणू आपण मोठी लढाईच जिंकलो आहोत. 



असेच पदोपदी समाजाच्या दबावाखाली घरातल्यांनी यामिनीला नाकारलेले व्यक्तिस्वातंत्र्य ती तिच्या लेकीला लहानपणापासून मिळवून देण्यासाठी धडपड करत राहायची. पुढे श्रेयाला दहावीला चांगले मार्क्स पडले. तिने सायन्समध्ये ऍडमिशन घेतली पण मॅथ्स सोडून बायोलॉजी घेतले. तिच्या बाबांचे म्हणणे होते दोन्ही घे पुढे इंजिनिअरिंगला पण जाता येईल पण तिला डॉक्टर किंवा इंजिनीअर दोन्ही व्हायचे नव्हते. तिला पीएचडी करून बायोलॉजीमध्ये 'न्यूरोलॉजी' किंवा 'जेनेटिक्स'मध्ये रिसर्च करायचा मनांत होते. बाबांना लगेच टेन्शन आले "अरे देवा, किती वर्षे शिकतच राहणार आणि मग लग्न कधी करणार" त्यांचे लगेच सुरू झाले. पण तेंव्हा यामिनीने तिला खंबीरपणे साथ दिली. आणि बाबांना समजावले, "तिला जे आवडेल तेच आपण शिकायला दिले, तर ती जास्त मन लावून अभ्यास करेल आणि रिझल्टही चांगलाच येईल. बाकीचे पुढचे पुढे बघू आपण." 



यामिनी कटाक्षाने मुलीला पाठींबा देत होती. आपण जसे मन मारून जगत आलो तसे आपल्या लेकीला जगायला लागू नये हा एकच विचार तिच्या मनांत असायचा. कधीकधी यामिनीला हे कठीण जायचे कारण आपला समाज मुळात वेगळे काही करू दयायला तयारच नसतो. त्यातही मुलींना तर अजिबातच नाही. पुढे जाऊन चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे मग कशाला एव्हढे करियरच्या मागे लागायचे. असा एकंदर सूर असूनही आज अनेक महिला विविध क्षेत्रांमध्ये धडाडीने काम करीत आहेत अगदी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून. जर अभिनयाच्या क्षेत्रात जिथे चेहरा, फिगर, ग्लॅमरस असणे आवश्यक असते तिथेही काजोल, माधुरी, करीना इ अभिनेत्री 'कमबॅक' करू शकतात तर श्रेयाला काहीच कठीण नाहीये तिच्या क्षेत्रात घर सांभाळून काम करीत राहणे. पण तिच्या मनांत यायचे मुळात लग्न झाल्यावर घर, मुले व संसाराच्या इतर जबाबदाऱ्या ह्या फक्त मुलीच्या नसतात तर घरातील प्रत्येकाचा त्यात हिस्सा असतो. मग घरातील इतर मंडळी आणि अगदी तिचा नवरा जर स्वतःचे करियर सांभाळून त्याची घरची जबाबदारी सांभाळेल तर हिलादेखील करीयर करून हिच्या वाटणीची घरची जबाबदारी सांभाळणे शक्य होईल. पण समाजात स्त्रियांनी शिक्षण व करियरमध्ये पुरुषांच्या बरोबरीने आपले स्थान मिळवले असले तरी घरच्या आघाडीवर अजूनही आपला समाज पुरुषांना बरोबरीने जबाबदार धरण्याच्या बाबतीत दुर्दैवाने मागे राहिला आहे. यामिनी मात्र ह्या गोष्टींमुळे कुणाला श्रेयाचे पाय मागे खेचू देणार नव्हती. तिचे शिक्षण व तिचे करियर हे तिच्या वैयक्तिक प्रगतीसाठी गरजेचे आहे. कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बायको, कुणाची तरी आई ह्या व्यतिरिक्त तिचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तिला आत्मविश्वास येईल व आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिचे जगणे जास्त सुंदर होईल ह्याची तिला खात्री होती. 



स्वतःच्या बाबतीत जरी यामिनी गप्प बसली तरी श्रेयाच्या बाबतीत ती शांत बसायची नाही, नेहमी तिची बाजू घेऊन बोलून दाखवायची. पण श्रेयाच्या सुरक्षेचा विषय आल्यावर मात्र तिच्या समोर पेच प्रसंग उभा राहायचा. असेच एक दिवस श्रेया तिच्या मित्र, मैत्रिणींच्या सोबत बाहेर फिरायला गेली होती. संध्याकाळी वेळेवर येईन असे सांगून ती गेली खरी पण संध्याकाळचे 7 वाजून गेले तरी ती अजून परत आलेली नव्हती. श्रेयाच्या वडिलांचा पारा चढत चालला होता. आणि त्यांचा सगळा राग यामिनीवरच निघत होता, "दिवसभर बाहेर भटकतेय कार्टी, संध्याकाळच्या आत घरी यायला नको होते का तिने? हे सगळे तू तिला दिलेल्या 'सो कॉल्ड' स्वातंत्र्यामुळेच झाले आहे. तुझीच फूस असते तिला नेहमी. कशाला हवे असे मित्र-मैत्रिणींच्या सोबत मुक्तपणे हिंडणे, फिरणे. जर का काही अघटित घडले तर किती महागात पडेल तुमचे हे स्वातंत्र्य, कधी विचार केला आहेस का तू?" 


हे ऐकून यामिनी देखील जराशी धास्तावली. नको, नको ते वाईट विचार तिच्या मनांत यायला लागले. तशी श्रेया हुशार, समजूतदार आहे पण दुसऱ्याची काही खात्री देता येत नाही आणि वाईट वेळ आली की काहीच बुद्धी चालत नाही. तिने मनोमन देवाचा धावा केला. "देवा, माझ्या लेकीला सुखरुप घरी आण रे बाबा."  


तिच्या वडिलांनाही काळजी वाटायला लागली होती. त्यांनी यामिनीला तिला फोन करायला सांगितले. "विचार कुठे आहे ती? आजकाल दिवस किती वाईट आहेत माहीत आहे ना तुला. काळजी वाटते मला. तरणीताठी पोर आहे, 7च्या आत घरी यायला हवे होते तिने. माहीत नाही फ्रेंड्स म्हणवणारे देखील कसे आहेत? कुणाचा काही भरवसा देता येत नाही आजकाल." 


यामिनीही मनातून घाबरून गेली होती, "हो करते फोन" असे म्हणत तिने लगेच श्रेयाला फोन लावला. 


"अगं आई, आम्ही केंव्हाचे निघालोय घरी यायला पण खूप ट्रॅफिक आहे. कसलातरी मोर्चा आहे म्हणून रस्ते 'डायव्हर्ट' केले आहेत नेहमीचे. तू काळजी करू नकोस मी ठीक आहे. माझ्यासोबत ईशापण आहे, आम्ही  पोहोचतोच आहोत, साधारण अर्ध्या तास लागेल अजून. " 


"बरं बरं, लवकर या आम्ही वाट पहात आहोत." असे म्हणत यामिनीने फोन ठेवला.

"काय म्हणाली?" आतुरतेने वडिलांनी विचारले.


"अहो, ती रस्त्यात आहे, ट्रॅफिकमुळे उशीर होतोय. अर्ध्या तासांत पोहोचेल म्हणाली." 


"अजून अर्धा.. तास..? इथून पुढे तिला असे बाहेर जायला 'परमिशन'च द्यायला नाही पाहिजे".


यामिनीलाही आधी काळजी वाटत होती खरी पण तिच्याशी फोनवर बोलल्याने व ती आता सुखरूप घरी पोहीचते आहे हे कळल्यावर तिला जरा हायसे वाटले.  


"अहो, ट्रॅफिकमुळे तिला उशीर होतोय. जो तिलाच काय कुणालाही होऊ शकतो, तुम्ही लगेच 'कधीच परमिशन न देण्याचा' टोकाचा निर्णय नका घेऊ. आणि मी ही तिला समजावीन, ह्यापुढे वेळेवर निघत जा म्हणून." 



वडिलांचा तिला नेहमीच विरोध असायचा कुठेही बाहेर जाण्याकरता पण यामिनी तिला पूर्ण सपोर्ट करत होती. "कॉलेजमध्ये गेलीय आता आपली मुलगी. मोठी झाली आहे, समजूतदार आहे, आता नाही फिरणार तर कधी. आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. बारावीपर्यंतच्या तिच्या वागण्याने तिने तो कमावला आहे. अभ्यासात हुशार आहे आणि सुरक्षेच्या नावाखाली तिला घरांत डांबून ठेवणे हे चुकीचे आहे". 


ह्यावर तिच्या वडिलांचे एकच म्हणणे असायचे, "तुझीच फूस आहे तिला, वेळीच आवर तिला." 



पण यमिनीचा स्वतःचा अनुभव काही वेगळा नव्हता. तिच्या मते, "एकूणच मुलींना लहानपणी लहान म्हणून आणि तरुणपणी तिची सुरक्षा महत्वाची आहे म्हणून आपण स्वातंत्र्य देत नाही. लग्नानंतर स्वतःच्या नवऱ्याबरोबर फिर हवी तेव्हढी असेही आपण तिला म्हणतो. पण लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्या, मुलंबाळं सांभाळण्यातच स्त्रीचे आयुष्य सरून जाते, जसे माझे गेले. ना कसली हौस, मौज ना मित्र, मैत्रिणी ना कुठे फिरायला जाणे. जी बांधिलकी मी अनुभवली ती मला माझ्या मुलीवर लादायची नाहीये. स्वतःचे राहते घर स्त्रीला तुरुंग वाटता काम नये. कित्येकींना सासरच्या मंडळींकडून ऐकून घ्यावे लागते, "ह्या घरात राहायचे असेल तर इथले नियम पाळावे लागतील." म्हणजे ज्या घराची ती जबाबदारी घेते, स्वच्छता ठेवते तिथून कधीही बाहेर काढले जाऊन बेघर होण्याची तिला भीती असते हे किती अनैतिक आहे. मुळात व्यक्तिस्वातंत्र्य  म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचे स्वातंत्र्य. पण आधी एका स्त्रीला एक व्यक्ती म्हणूनच मान्यता मिळालेली नाही मग तिच्या स्वातंत्र्याची सुरुवात कुठून होणार. व्यक्तीस्वातंत्र्य असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा स्त्रीदेखील एक व्यक्तीच आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण मनातले हे सगळे बंडाचे विचार मांडण्याची ही वेळ नाही हे उमजून यामिनी गप्प राहिली. 



श्रेया सुखरूप घरी येईपर्यंत तसा तिचाही जीव टांगणीला लागला होता. यामीनीच्या मनांत आले, "आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा ती गैरवापर तर करणार नाही ना? काहीतरी भलते, सलते तिच्या डोक्यात कुणी भरवले तर नसेल ना. असे काही झाले तर आपण तोंडावर पडू, स्वातंत्र्य महत्वाचे आहे पण त्याचा स्वैराचार होता कामा नये. घरच्यांची लाज निघेल असे वर्तन तिने करायला नाही पाहिजे. तसा माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे पण जिथे विश्वास असतो तिथेच विश्वासघात होण्याची शक्यता असते. " 



पण तसे काही झाले नाही श्रेया यामिनीच्या विश्वासावर खरी उतरली. तिने घरी आल्यावर सगळे खरे, खरे सांगितले. दुपारी खाण्यापिण्यात त्यांचा अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त वेळ गेला होता. त्यामुळे निघायला उशीर झाला आणि घरी यायला निघाल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकल्याने अजून उशीर होत गेला. पोलिसांनी 'डायव्हर्ट' केलेले रस्तेही त्यांना नीटसे माहीत नव्हते त्यामुळे विचारत, विचारत यावे लागले त्यात आणखी वेळ गेला. तरीही 'लेट' येण्यावरून वडिलांनी तिला खूप रागावले. आईनेही तिला समजावले, बाबा काळजी पोटीच रागावत आहेत. तिनेही मनापासून त्यांची माफी मागितली. पण तिला वाईट ह्याच गोष्टीचे वाटत होते की आईने विश्वासाने आपल्याला फिरायला पाठवले आणि आपल्या उशिरा येण्यामुळे आईलाच बाबांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 



श्रेयाने यामिनीची पुन्हा माफी मागितली, "मला माफ कर आई, चुकलं माझं, मी ह्यापुढे वेळेवर निघत जाईन. पण ट्रॅफिक काही माझ्या हातात नाहीये ना. मी तरी काय करणार, नाईलाज होता माझा." तिचे अपराधी भावनेने माफी मागणे व बोलणे यामिनीला मनातून हलवून गेले. 



यामिनीला तिच्या आयुष्यात घडलेला असाच प्रसंग आठवला. वडिलांना आवडत नाही म्हणून ती घरी न सांगताच मैत्रिणी बरोबर सिनेमाला गेली होती. घरी परत आल्यावर तिला चांगलाच मार खावा लागला होता. ती खोटं बोलून सिनेमाला गेली होती कारण खरे बोलून तिला कधीच 'परमिशन' मिळाली नसती. तिने हाच विचार मनात ठेवून श्रेयाला विश्वासात घेऊन सूट दिली होती. निदान आपली मुलगी कुठे जाते आणि कुणा बरोबर जाते आहे बाहेर हे आपल्याला माहीत हवे. तिच्या सुरक्षेचा विचार करतांना हे देखील महत्वाचे आहे. न सांगता कुठे बाहेर गेली आणि दुर्दैवाने वाईट प्रसंग ओढवला तर आपण तिची वेळेवर काहीच मदत करू शकणार नाही. ह्याच विचाराने तिने मायलेकींचे नाते पारदर्शक ठेवले व त्यामुळेच ते चांगले दृढ झाले होते. श्रेया तिला सगळे सांगायची, शेअर करायची. तिला खंबीरपणे, न घाबरता, धारिष्ट्याने कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायला ती शिकवायची. पण तिच्या सुरक्षेची चिंता वाटून वडिलांना मात्र तिचे बाहेर मजामस्तीसाठी फिरणे अजिबात मान्य नव्हते." 



ह्याउलट यामिनीला, 'मुलींना सुरक्षिततेच्या नावाखाली घरात बंदिस्त करून, डांबून ठेवणे'च मान्य नव्हते. कारण मुली 'सेफ' तर कुठेच नाहीत अगदी घरांत सुद्धा. किती सगळे किस्से आपण ऐकतो, वाचतो त्यातून हेच समजते. पण म्हणून काय जगणेच सोडायचे का तिने. तिला सुरक्षित वातावरण मिळवून देणे आणि तिला मोकळा श्वास घेऊ देणे हे समाजातील आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण आजही कित्येक घरांतून तिचा गळा जन्माला येण्याच्या आधीच घोटला जातो. 



यामिनीचे विचारचक्र चालूच होते, "मी जसे आयुष्य जगले तसे निदान माझ्या मुलीच्या नशिबी येऊ नाही ह्यासाठी लागेल तेव्हढी हिम्मत मी करणार, बोलणार. माझ्या आई वडिलांनी कधीच माझ्या मताला फारसे महत्व दिले नाही. मी देखील त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत राहिले. त्यांनी जो कोर्स, जे कॉलेज म्हणले तेथे शिकले. वेळेवर लग्न केले तेही त्यांनी पंसद केलेल्या मुलाशी. सासरच्यांच्या न संपणाऱ्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन जीवतोड मेहनत करून घर,नातेवाईक, सणवार सगळे सांभाळते आहे. मी केलेल्या कामाचे कधीच कोणी कौतुक करीत नाही उलट त्यांच्या मते 'हे तर माझे कर्तव्यच आहे' आणि काही चुकले किंवा राहून गेले की मात्र सगळे बोट दाखवायला सरसावतात". 



यामिनीला हे सगळे आठवले की तिचा जीव घुसमटतो, डोळे पाणावतात. पण आता तिला स्वतःचे रडगाणे गाण्यात काहीच अर्थ वाटत नाही कारण जे झाले ते ती आता बदलू शकत नाही. आता तिचे सगळे लक्ष फक्त तिच्या लेकीवर केंद्रित झाले आहे. श्रेयाला स्वतःच्या पायांवर उभे करायचे तिला वेध लागले आहेत. श्रेयाला तिच्या मनाप्रमाणे, मर्जीप्रमाणे जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य यामिनीला मिळवून द्यायचे आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे स्वातंत्र्य गमावून यामिनीला त्याचे महत्व चांगलेच समजले आहे आणि म्हणून ते स्वातंत्र्य श्रेयाला मिळवून द्यायचा तिने मनाशी पक्का निर्धारच केला आहे.  


© राधिका गोडबोले




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू