पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजोळ

आजोळ 

प्रचितीचा दाखवायचा कार्यक्रम अगदी यथासांग पार पडला. पोहे, लाडू-चिवडा वर गरमागरम कॉफी तीही सुगरण असणार्‍या प्रचितीच्या हातची, मग काय सासरची मंडळी एकदम खूशच झाली. प्रचितीच्या होऊ घातलेल्या सासरचे लोक गेल्यावर प्रचितीचे आई-बाबा मुलगा कसा आहे, सासरचे कसे आहेत याची चर्चा करण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यात रममाण झाले होते. प्रचितीच्या मनाचा विचार कोण करणार? पण स्थळ नाकारण्यासारखंही नव्हतं.

 सरंजामे म्हणजे बडे कूळ होतं. त्यांची स्वत:ची नावाजलेली फर्म होती. फर्मचा पसारा फार मोठा होता. सासू-सासरे, मोठा दीर-जाऊ आणि आता विहंगही या कंपनीचं कामकाज बघत असे. अशा सरंजामेंच्या घरात सून म्हणून जाणे हे अगदी प्रतिष्ठेचं लक्षणच मानलं जाणार होतं, आई-वडिलांची मान त्यामुळे उंचावणार होती. हे सगळं होतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते आई-बाबांचं जबाबदारीतून मुक्त होणं. प्रचितीच्या आई-बाबांना प्रचिती तशी उशिराच झाल्यामुळे त्यांचं वय आता जास्त होतं त्यामुळे ते आता तिच्या लग्नाच्या मागे लागले होते, तसेच परिस्थितीही बेताचीच होती आणि अगदी चांगली असती तरी इतकं छान स्थळ चालून आलंय म्हटल्यावर कोण नाकारणार? 

प्रचितीला सर्व मान्य होतं, पण विहंगची एक अट तिला सल देत होती, ‘‘मुलगी गृहिणी असली पाहिजे. घराचा पसारा सांभाळणारी असली पाहिजे.’’ खरंतर सरंजामेंची कंपनी होती खाद्यपदार्थ तयार करायची. चकली, करंजा, मोतीचूर लाडू, चिवडा असे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार करून ते देशात-परदेशात पाठवण्यात त्यांची कंपनी   अगदी प्रसिद्ध होती. सुगरण फूडस तिने नाव परत आठवलं. आणि तिला हसू आलं, आई विहंगच्या आईला सांगत होती, ‘‘अगदी सुगरण आहे हो आमची प्रचिती!’’ त्याबरोबर त्यांचा चेहरा जरा उतरल्यासारखा वाटला. 

विहंग तर लगेच म्हणाला, ‘‘आम्हाला सुगरणच हवीय, फक्त घर सांभाळणारी.’’ 

***

काही दिवसांतच विहंग आणि प्रचितीचे धुमधडाक्यात लग्न झाले. प्रचितीच्या आई-बाबांना कधी स्वप्नातही वाटले नसेल इतकं दणक्यात तिचं लग्न झालं आणि तेही दमडीही खर्च न करता वर त्यांनाच सुंदर सुंदर भेटी मिळाल्या हात्या. मग आणि काय हवं? आई-बाबा सरंजामेंचं, जावईबापूंचं कौतुक करताना आपली लेक विसरूनच गेले होते. तिच्या आनंदी चेहर्‍यामागचा खरा चेहरा जणू त्यांना दिसतच नव्हता किंवा त्यांनी तो जाणूनबुजून नजरेआड केला होता. आईने जाताना फक्त प्रचितीला इतकंच सांगितलं होतं, 

‘‘प्रचिती, सगळं मनासारखं होत नसतं बेटा, सर्व चांगलं असलं आणि एखादी गोष्ट मनासारखी नसली तर ती सोडून द्यावी आणि जर तुझी इच्छा मनापासून असेल तर कधी ना कधीतरी ती पूर्ण होईलच.’’

‘‘आई ऽ ऽ ऽ’’ म्हणून प्रचितीने आईला नमस्कार केला आणि आईचा सल्ला आशीर्वाद म्हणून तिने सतत लक्षात ठेवला होता. 

खरंतर प्रचितीलाही काही कमी नव्हती. घरातही फारसं काम नसे. फक्त घरात असणार्‍या नोकर वर्गावर नजर ठेवणे, आणि उत्तम स्वयंपाक करवून घेणे. तसंच मोठ्या जावेची दोन मुलं होती. ती शाळेतून घरी आली की, त्यांना खायला देणे, त्यांची काळजी घेणे ही जबाबदारीही तिच्यावर होती आणि ती ती मनापासून पार पाडत असे.  घरात कपडे, लत्ते, दागिने याचीही कमी नव्हती. विहंगच्या सुट्टीच्या दिवशी छोटीशी सहल नाहीतर एखादा सिनेमा हे तर सुरूच असायचे. म्हणजे हौसे-मौज याची कमतरता अजिबातच नव्हती. 

प्रचितीच्या हातच्या पदार्थांना खूपच छान चव असायची आणि विहंगची लाडाची बायको असल्याने तो कधीतरी तिला आवर्जून फोन करत सांगत असे, 

‘‘प्रचिती, आज तुझ्या हातचे मस्त बटाटेवडे खावेसे वाटत आहेत.’’ मग प्रचितीही मुद्दाम त्याला चिडवत असे, 

‘‘कशाला आहेत ना ताई, स्वयंपाक करायला?’’ 

‘‘पण मला तुझ्याच हातचे खायचे असतील तर?’’ 

‘‘नाही हा मी काही नाही करणार. मला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे.’’ असं म्हणून प्रचिती फोन ठेवून देत असे व बटाटे वड्याच्या तयारीला लागत असे. 

दारात पाऊल ठेवताच विहंगला समजत असे की, प्रचितीने आपली मागणी पूर्ण केली आहे. खरंतर विहंग जेव्हा अशी काही फर्माईश करे तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. आपल्या माणसांसाठी जेवण करणं आणि ते उत्तम झालंय असं सांगितल्यावर होणार आनंद ती अनुभवत असे.

पण तरीही कधीतरी घरातील सर्वजण बाहेर जातायत, काम करतायत, आपलं अस्तित्व सिद्ध करतायत आणि आपण मात्र घरातच बसतोय तेही आपलं चांगलं शिक्षण झालेलं असताना याची तिला खंत वाटत असे. ती विहंगला हे बोलून दाखवत असे, 

‘‘विहंग, मी पण करते ना रे नोकरी, अगदी पार्टटाईम?’’ ती अजीजीने म्हणे.

पण तो म्हणत असे, ‘‘प्रचिती, तू माझ्याकडे काहीही माग, बाहेर जाऊन नोकरी करणं किंवा अगदी आपल्याच बिझनेसमध्ये लक्ष घालणं एवढं मागणं मागू नकोस.’’ सुरुवातीला तिला वाईट वाटलं, पण जेव्हा तिला खरं कारण कळलं तेव्हापासून तिने हट्ट केला नाही. 

विहंग लहान असतानाच त्याच्या वडिलांची नोकरी अचानक गेल्याने त्याच्या आईवडिलांनी हा बिझनेस सुरू केला होता. तेव्हा विहंग आणि त्याचा मोठा भाऊ सुहास शाळेच्या महत्त्वाच्या वर्षांत शिकत होते. सुहास विहंगला सांभाळून घेत असे, पण विहंग लहान असल्याने त्याला घरात आईची कमी भासत असे आणि इतके दिवस घरात असणारी, आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घरात खायला करून देणारी आई अचानक घरात दिसेनाशी झाल्याने त्याच्या बालमनावर थोडासा परिणाम झाला ज्या वयात आईची त्याला अतिशय गरज होती त्या काळात आईचे दर्शनही दुर्लभ झाले होते आणि त्याने हे पक्कं ठरवून टाकलं होतं की, काही झालं तरी आपण नोकरीवाली किंवा उद्योग करणारी बायको करायची नाही. खरंतर आता त्या सर्वांना काही अर्थ नव्हता, पण एकदा त्याच्या मनाने घेतलं होतं. हे सर्व कळल्यावर प्रचितीने नोकरी किंवा बिझनेस करण्याचा विचार मनातूप पार हद्दपार केला होता, पण तरीही कधीतरी मन थोडं नाराज असे. 

जावेच्या मुलांनाही आता काकूची खूप सवय झाली होती. ती आपल्या आईपेक्षा काकूशी मनातलं बोलू लागली होती, त्यांनाही आता खरंतर आईच्या प्रेमाची, मायेची गरज होती, पण मोठ्या जाऊबाई कंपनीच्या कामात इतक्या बुडून गेल्या होत्या की, त्यांना वेळही मिळत नसे आणि आल्यावर त्या थकून जात असत. प्रचितीचे त्या मनापासून आभार मानत की, ‘‘तू मुलांना चांगलं सांभाळते आहेस. तू आहेस म्हणून माझी मुलं आता खूश आहेत. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाही.’’ 

प्रचिती म्हणे, ‘‘वहिनी, अहो त्यात कसले आभार मानता? मुलांमुळे माझाही वेळ छान जातो.’’ 

अशातच प्रचितीला बाळ होण्याची चाहूल लागली. आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विहंग तसेच घरचे प्रचितीची फार काळजी घेऊ लागले. प्रचितीने एका छोट्या गोड परीला जन्म दिला. सरंजामेंच्या घरात मुलगी नव्हतीच विहंगला बहीण नव्हती, तसेच मोठ्या जाऊबाईंनाही दोन मुलगेच होते. त्यामुळे तिचे फार कोडकौतुक होऊ लागले. परीचा जन्म झाला आणि प्रचिती तीन मुलांच्यात दंग झाली. त्यांचे संगोपन करणे यात तिला दिवस अपुरा पडू लागला. बघता बघता परी मोठी झाली. शाळेत जाऊ लागली. तोपर्यंत पुतणेही मोठे झाले. कॉलेज नोकरी यात व्यस्त झाले. आता सासूबाईही घरी राहू लागल्या कारण त्यांना बाहेर जाणं जमत नसे. सासूबाई घरी असल्याने त्याही घरकामात मदत करीत असत.

परी शाळेत गेल्यावरचा रिकामा वेळ काढणं प्रचितीला कंटाळवाणं होऊ लागलं.  काहीतरी काहीतरी वेगळं करण्याची, उर्मी परत तिच्या मनात उसळी मारून वर येऊ लागली. प्रचितीचं घर मोठं होतं शेजारी दोन खोल्यांचं सर्व सोईनियुक्त आऊटहाऊसही होतं. प्रचितीच्या मनात एक कल्पना आली आणि विहंगला ती कल्पना बोलून दाखवताच तोही खूश झाला. त्याला तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुकच वाटलं. घरातल्या सगळ्यांनी प्रचितीला पाठिंबा दिला. जणू इतके वर्षं तिने निगुतीने घर सांभाळलं आणि सर्वांना मदत केली याची पोच पावती देण्यासाठी सर्वांनी तिला हातभार लावायचे ठरवलं. तिच्यासाठी मदतनिसांची नियुक्ती झाली. 

आणि एक दिवस आजोळ नावाचं पाळणाघर प्रचितीने दणक्यात सुरू केलं. परी शाळेतून घरी आल्यानंतरही आई घरातच शिवाय तिच्याशी खेळायला भरपूर मुलं यामुळे परीही खूश होऊन जात असे. प्रचितीला मुलांचं मानसशास्त्र चांगलं समजल्यामुळे मुलं तिच्याकडे छान राहात असत. शिवाय ती मुलांना आवडीचा खाऊही करून देत असे. नोकरी करणार्‍या स्त्रिया प्रचितीच्या जिवावर बिनधास्त कामावर जाऊ लागल्या. अशा रितीने प्रचितीने सर्वांचा मान राखून पण तरीही स्वतंत्र व्यवसाय सुरू करून  स्वातंत्र्य मिळवले. 

पुढे पुढे मात्र तिचा पाळणाघराचा व्यवसाय वाढला. शेजारचा एक बंगलाच तिने विकत घेतला आणि आपला व्यवसाय स्वतंत्ररित्या स्वबळावर जोरदार सुरू केला. विहंगला, प्रचितीच्या आई-वडिलांना, सासू-सासर्‍यांना, दीर जावेला सर्वांनाच प्रचितीचा फार अभिमान वाटत होता आणि प्रचिती ती तर काय आनंदाच्या झुल्यावर मस्त झोके घेत होती आणि परीसहीत सर्व मुलांना आजोळचं सुख भरभरून देत होती.  

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू