पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती नटसम्राज्ञी

 ती नटसम्राज्ञी
 
            
‘नशिबाच्या ह्या चक्रव्यूहातील,
                        मी शापित रमाई....
            रडू नकोस रे, तळमळते बाळा,
                        तुझी ही आई....’
   ती हुंदके देत रडत होती. अश्रू आवरेना. सोबतच अगदी आर्त स्वरात कण्हत ती गात रस्त्याने जात होती. या गजबजलेल्या रस्त्यावर ती चार महिन्याचं तान्हुलं बाळ कुशीत घेवून पावलांचा अंदाज घेत कधी अडखळत तर कधी डगमगत हुंदके देत तशीच चालत राहिली. तिचं रडणंही आता असह्य झालं होतं. बाळही तिच्या कापऱ्या स्वरा सोबतच भूकेसाठी टाहो फोडून रडत होता. तिला त्याची दया येत होती. पण करणार तरी काय? ती त्याला बघूही शकत नव्हती. तिने हातानींच बाळाच्या निरागस चेहऱ्याला कुरवाळलं. जणू डोळ्यावरील मिटलेल्या की चिपकलेल्या ह्या पापण्या फाडून ती सपाट उघड्या डोळ्याने एकदातरी बाळाला बघावं असंच तिला वाटत होतं. तिने बाळाच्या अजान चेहऱ्याला कुरवाळतच म्हणाली,
   ‘रडू नकोस रे... बाळा, घे.. दुदू... घे!’
   ‘माझा सोनूला...’
   तिचं हुंदके देत रडणं, तिचं बाळाला समजावीत पटापट मुके घेणे. पण बाळाचा आर्त टाहो.... पुनश्च वाढत चालला होता. त्याला खूपच भूक लागली होती. त्याला दूधाची जाणीव झाली होती.
    वाटेतील एका दगडाला तिचा पाय ठेचाळला. ती पडणार, एवढ्यात तिने स्वतःला आंधळी असूनही सावरले होते. बाळही हातून पडता-पडता राहिले. अलगद बाजूला हात करीत चाचपडलं. एका झाडाच्या बुद्यांचा तिला आधार मिळाला होता. तिच्या ते सहजच लक्षात आलं. ती बाळाला कुशीत घेत रडत, हात टेकवित मांड घालीत खाली बसली. तिला झाडाच्या सावलीत थोडं बरं वाटलं होतं. पदराने बाळाचा चेहरा पुसला, सोबतच स्वतःचाही चेहरा पुसला आणि तिने बाळाला दूधाला लावलं. पण तिला आता दूधही फुटत नव्हतं. बाळ वारंवार दूधाला तोंड लावत विव्हळत होता. भूक मीटेना म्हणून पुनश्च बाळाचं रडणं. ती चार दिवसापासून अशीच फिरत होती. तिला पोटभरण्यासाठी साधं अन्नही मिळालं नव्हतं. पोटात अन्नाचा कणही नसतांना बिचारीला दूध तरी कुठून फुटणार होतं. पण आईचं मन फार मोठं असतं... नाही? स्वतःसाठी नाही पण बाळासाठी तिला जगावच लागणार होतं. या निर्दयी जगात तिला आपलं गमावलेलं अस्तित्व आयुष्य पुन्हा उभारायचं होतं. तिचं मन या क्षणाचीच जणू अपेक्षा करीत रस्त्यातील अंतर पुढे-पुढे कापित होती. जणू तिच्या अंधारात स्थिरावलेल्या डोळ्यांना पुनश्च उजेडाची चाहूल लागली होती.
   तिने बाळाला दूध भरविलं. थोड्याशा दूधाने बाळ आता शांत झाला होता. तिला हायसं वाटलं. तिलापण खूप भूक लागली. हाताने आजूबाजूला चाचपडलं. बाजूलाच नळाच्या तोटीतून पाणी पडण्याचा आवाज आला. ती अलगद उठली. आवाजाच्या दिशेने जात बाळाला सावरत, तिने नळाला हात धरला. धो-धो वाहणारं पाणी. आंजोळ भरूण ती घटाघट पिवू लागली. भूकेची जाणीव ती पाण्यानं शमवित होती. तिच्या पोटातील आतड्यांनाही कळ येत होती. तिने हळूच आपली दुखणारी कूस दाबली. पोटात अॅसीड चरचर करीत जावं अगदी तसेच पाणी तिच्या आतड्यांना चिरत गेलं होतं. तिला पाणी पिवून हायसं वाटलं. थोडं-थोडं पाण्याचा ओलसर हात तिने बाळाच्या चेहऱ्यावर आणि आपल्याही चेहऱ्यावर व डोक्यावर लावला. ती पुनश्च त्या झाडाच्या खाली निवांत बसली. बाळ रडून-रडून थकलं नि अर्धमेला होत निपचित तिच्या कुशीत निजला होता. तिने अंगाई गीत गात आणि हातानेच झोक्याचं स्वरूप देत आंधळ्या नजरेनं त्याला हळूच निरखण्याचा प्रयत्न करू लागली.
   ‘माहयं राजा.... झोप... तुला दूदू देते हं...!’
   तिला हुंदके देत पुनश्च रडू आलं आणि वेदनेच्या या मोहजालात ती पुनश्च अगदी क्षीण व हळू आवाजात गावू लागली...
   ‘नशिबाच्या ह्या चक्रव्यूहातील मी शापित रमाई....’
   तिचा आवाज अगदी कोमेजून क्षीण व कापरा झाला होता. बाळही अगदी शांत निजले होते. तिच्याही डोळ्यावर झापड येवू लागली आणि तिच्या पूर्वजीवनाची कथा ती आठवित जीवनाच्या ह्या चक्रव्यूहात गर्क होत राहिली...
   तिची शरीरयष्टी कृश झालेली. डोळ्याभोवती काळ्या पखाली पसरलेल्या. तीचं मन अगदी निराशमय. देह थकलेला. मळलेली फाटकी साडी, अनवानी पाय. आणि हरलेलं जीवन...
   ‘ती पूर्वी खूप-खूप सूखी होती परंतु या संसारालाच दुष्ट लागलेली. प्रत्येक संसार म्हणे पैश्यासाठी आणि सत्तेसाठी असाच होरपळत असतो. त्याशिवाय काय दुसरं कुठलं कारण उरतच नाही? तिचं नाव ‘रमा’ तिच्या आईबाबानी लडीवाळपणे ठेवलेलं. दोघ्या बहीणी, एक भाऊ, घरी चार एकर शेती. सारं काही ठीक व उत्तम होतं. रमाईला मात्र आईचं प्रेम मिळालेलेच नव्हतं...
   ती लहान असतांनाच आई वारलेली. बाबानेच तिला लहानाचं मोठं केलं. वयात येताच सुखी संसाराचे स्वप्न बघणारी ती रमाई, छान स्थळ आलं. खाजगी नोकरीला छान पगार मिळवणारा, घरंदाज मध्यम कुटुंबातला तिला जीवनसाथी लाभला. चार- सहा महिने सासू दिर आणि ती अगदी मजेत गेलेले क्षण... पण पुढे? या बदलत्या जीवनप्रवाहातील सासूचं रूप तिला दिसलं. वारंवार बढती मिळविणे तथा चैनिच्या वस्तू खरेदी करिता तिला हुंडारूपाने छळल्या गेलं. तिच्या वडीलाने अगोदरच लग्नात दोन एकर शेती विकून चांगल्या स्थळापोटी दिवाळखोरी स्वीकारली. पुढे या पैशाच्या लालसी मागणीने कर्जबाजारीपणाही आला. परंतु या संसाराच्या रहाटगाडग्यात तिला छळणं थांबलेच नाही. मध्यंतरी तिची कूस फुलण्यापूर्वीच जाळण्याचा प्रयत्नही झाला होता. पण ती एक निष्ठतेने सारं काही सहन करीतच गेली. तिचा अर्धवट भाजलेला चेहरा आणि या यातनेनंच डोळे गेलेले. सासूने तिला घराबाहेर काढलं.    
   पांढऱ्या पायाची अभागीन अपशकुनी म्हणूनच ती त्यांना भासायची. तिचं वेदनारूपी रडत घरी येणं आणि बाबाचं तिला सोडून जाणं एकच ठरलं होतं. तिच्या वेदना व छळ बघून हार्टअटॅकने बाबा गेले. आई तर लहानपणापासून नव्हतीच. एक मात्र भाऊ होता, परंतु त्यालाही त्याची जाणीव अशी नव्हतीच. वाईट मित्र व व्यसनांध दुनियेत तो अपराधी स्वरूप जगत होता. त्याला कुठलीही अशी माणुसकी नव्हती की त्याच्या जीवनाला स्वरूप असे नव्हतेच. याच गुन्हेगारी स्वरूपाने तो तुरूंगात अडकतो. सुटून आल्यावर बहीणीला माया न देता अंतर देतो. निर्दयी होत घराबाहेर काढतो. आता कुणीही उरलेलं नाही. ती माहेरी तरी कशी राहणार? तिची लहान बहीण मात्र बाहेरगावी शिकणारी, तिला घटना की प्रसंगही ठावूक नाही. ती नवऱ्यानं टाकलेली आणि माहेरातून बाहेर पडलेली असह्य वेदना ऊराशी घेवून जगणारी...
   परंतु तिच्या भावाला तो मामा होणार आहे, तिच्या नवऱ्याला तो बाप होणार आहे हे ठाऊकही नसते. त्यांना तिच्या सुखद घटनांची जाणीवही नाही. नामनिराळ्या या स्वभावातील वागणं ती कशी सहन करणार. तिच्या गर्भात फुलणारं, वाढणारं बाळ त्याचं ओझं, वेदना घेऊन ती आधार शोधतेय. पण कोण देणार तिला आधार?
   पुढे एका निराश्रीत आईने तिला आधार दिला. तिला आपलसं केलं. आणि रमाई या दुःख वेदनेतही छान गोजीरवाण्या या बाळाची आई झाली. पण त्या बाळाला ती बघूही शकत नव्हती. कारण तिचे डोळे अंधाराशी नातं जुळवणारे होते.
   असं आंधळेपणाचं एकाकी जगणं, संसारानं दिलेलं अंतर, बाबाचं जाणं...
   मृत्यूसमयी त्यांचं रूपही पाहू न शकणं. भावाचं अपराधी वागणं. घरातून हाकलणं. कसाबसा मिळालेला आधार. पुनश्च जीवनाचं सोनं होईल, पुन्हा हे जीवन उमलेल. निदान बाळासाठी तरी मला केव्हा ना केव्हा घरात घेतील हीच इच्छा होती. पण ज्या माऊलीनं आधार दिला त्या माऊलीचेही एकाएकी जाणं. आधारवडही संपलेला. आता कुठला पर्याय होता. पुनश्च चार महिन्याचं लेकरू कडेवर घेत आधारासाठीची ही वणवण होती.’
   ती शांत निजलेली बाळही तिच्या कुशीत विसावलेला. थंड झाडाचा गारवा... पूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यासमोर तरंगत होतं. तिचं जगणं हे जगणं नव्हतेच. तिला हे जीवन संपवावे असंही वाटायचं. पण लेकरासाठी तर... मनाने ती केव्हाच मृत झालेली होती. जगण्यासाठी आता उरलं तरी असं काय होतं? मरता येत नव्हतं म्हणून जगावं आणि जगता येत नव्हतं म्हणून रडावं. कदाचित जगण्याला नवी पालवी फुटेल. ह्या आशेनंच तिला जगवलं होतं. एका सुखी संसाराची लोभस हव्यासापोटी राखरांगोळी झाली होती आणि सुखाचे स्वप्न बघतानांच संपली ती होती. ती असह्य होती... परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली पण मानवी जीवनातील दुर्दम्य आशावाद हा सरणावर जाईतो असाच तरंगत राहणार होता.
   बाळाचं हलणं, तिला जाग आली. त्याला हाताने कुरवाळलं. केव्हापासून उपाशी निजलेली. अगदी शांत वाटलं होतं तिला. बाळ पुनश्च दूधासाठी रडू लागला. तिच्याने उठणेही होत नव्हतं. ती कशीतरी उठली. त्याला घेवून पुनश्च आधारवड शोधण्यास्तव निघाली...
   ह्या रस्त्याच्या गर्दीमधून जाणारे-येणारे तिच्याकडे बघायचे. पण तिला तरी ते कुठं ठाऊक होतं? तिची केविलवाणी अवस्था बघून आपलेही मन रडावं... पुनश्च बाळाचं रडणं वाढलेलं... तिचं कणवाळू मन अंतरंगातून रडू लागलं होतं...
   ‘अरे, थांब रे सोनुल्या... असा तू तरी अंत पाहू नकोस. ती रडवेली होवून मनाशीच बोलत होती...
   ‘काय वाईट केलं मी....? कुठलं पातक भोगतेय रे बाळा..!’
   सहजच ती गावू लागली. तिच्या समोर पर्यायही उरला नव्हता.
   ‘रडू नकोस रे, तळमळते बाळा तुझी ही आई
   दूधासाठी तान्हुल्याला दे, पदरात भीक माई
   नशिबाच्या चक्रव्यूहातील, मी शापित रमाई.’
   ती रडता-रडताच अनपेक्षितपणे पदर पसरून जात होती. बाळाचं रडणं तिच्या गाण्याला जणू कापरं भरवित जणू दुःखद संगीतच देत होतं आणि चालतांना ती एकाएक ठेचाळली, तेवढ्यातच बाळाला सावरलं. थोडीशी समोर जात नाही तोच पुन्हा खांबाला अडगळली. तिच्या कपाळाचा असा नशिबरूपी कपाळमोक्ष झाला होता. पुनश्च सावरणं आणि पदरात बाळाच्या भूकेसाठी भीकेची याचना करणं...
   ‘नशिबाच्या चक्रव्यूहातील मी शापित रमाई...’
   याच वाटेतील वाटसरूंनी तिची केविलवाणी दयनीय अवस्था बघून दयाभाव स्वरूपी पदरात, बाळाच्या भूकेसाठी, रूपयाचे दान टाकणे सुरू केले होते. पर्याय नसल्याने मिळालेलं दान बघून बाळाच्या कर्कश रडण्यातही ती पुनश्च अंतरंगातून अंगाई गाते. नशिबाच्या ह्या चक्रव्यूहाला ती प्रयत्नांती भेदत जाते.
   अशा ‘रमाईच्या’ भूमिकेतील विदारक, दुःखद, कारूण्यमय प्रसंगाचा ‘शापित’ नाटकातील प्रवेश पडदा पडतो. आणि थियेटर मधील प्रेषकांच्या डोळ्यांत अश्रूचा पूर तरंगत उभे राहून तिच्या अभिनयाला दाद देत टाळ्यांचा गजर प्रतिसाद मिळत असतो.
   ‘केतकीचं’ असं नाटकातील कारूण्यमय उच्च पराकोटीचा अभिनय असलेला तो प्रसंग. या प्रवेशात ती तन्मयतेनं रंगून जायची. अभिनयासाठीच जणू तिचा जन्म झाला होता. की अभिनयच तिच्या रूधीरकणात दरवळत होता. हे शोधणही कठीण झालं होतं. अशा दुःखानुभवाचा आविष्कार हजारो प्रेषकांच्या अंतरंगाला प्रबोधनरूपी बोचायचा. तिच्या या अभिनयाला नावच नाही तर टाळ्यांचा गजर प्रतिसाद तिला साद द्यायचा. प्रत्येक प्रयोगात असं हजारो रूपयाचं कारूण्यमय बक्षीस तिच्या पदरात सहजच मिळायचं. जेव्हा ‘केतकी’ या कारूण्यमय प्रसंगाला साकारून ड्रेसींग रूममध्ये यायची तेव्हा ती खरेच नटसम्राज्ञी म्हणून गणली जायची. प्रेषकांनी मान्य केलेली नटसम्राज्ञी... टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत होणारी नटसम्राज्ञी.. रसिकांना दुःखाचा पाझर फोडून प्रत्येकांना रडवणारी नटसम्राज्ञी...
   केतकीचं असं तन्मयतेनं अभिनयात प्राण ओतणं यामुळेच ती फार नावाजलेली तेवढीच प्रमुख नटी म्हणून ओळख तर अनेक संस्थांनी तिला बरेचसे मानसन्मानही दिले होते आणि आता तर शासनाचा नटसम्राज्ञी मानाचा पुरस्कारही... तिच्या अभिनयाची नि तिची उंची वाढवणारा असाच होता...
   केतकीचं नाव आता उंच शिखरावर पोहचलेलं होतं. अमाप किर्ती आणि पैसा तिला कमी वयातच मिळाला होता आणि यातच तिचं ‘शेखरशी’ लग्न झालं होतं. शेखर चित्रपट निर्माता आणि फार मोठा दिग्दर्शक हेाता. तिच्या अभिनयावर आणि तिच्या सौंदर्यावर तो भाळला होता. त्याचं तिच्याशी ओळखीचं रूपांतर पुढे प्रेम प्रसंगात आणि नंतर विवाहात बदललं होतं...
   केतकी पाहायला सुंदर, सालस, साध्या निर्मळ स्वभावाची होती. तिने प्रसिद्ध आणि समव्यवसायात जाणकार असलेल्या शेखरला अगदी खुशीनं एकरूप होत स्वीकारलं होतं. शेखरच्या घरात विवाहरूपी पहिलं पाऊल टाकलं होतं...
   अगदी काही दिवस सुखात आनंदात गेले. पण एखाद्या वर्षातच शेखरने तिला अभिनयापासून दूर सारलं. तिला नाईलाजाने ही अभिनयबंदी स्वीकारावी लागली होती. कारण ती आता शेखरच्या बाळाची आई होणार होती. आपल्या अंगातील अभिनयकला ही दुनियेला दाखवायची होती. परंतु शेखरची आई अर्थात सासू ‘स्त्रियांनी रात्रो घराबाहेर पडून स्टेजवर नाचणं, अभिनय करणं याला विरोध करायची.’ सासूबाईच्या जुनाट स्वभावालाही औषध नव्हते आणि यातच केतकीचे व सासूचे भांडण व्हायचे. केव्हा-केव्हा केतकी हिरमुसून हमसून रडायची. पण पुढे आपण अभिनय करणारच हा निर्धार तिने ठेवला होता. कधी वाटायचं की या संसारानेच तिला या नाट्य अभिनयक्षेत्रात बंदी लादली आहे. हळूहळू दिवसे उलटत होती...
   केतकी आपल्या बाळाच्या आगमनात सुखी संसाराचे स्वप्न रंगवीत होती. अधामधात सासूशी तोंडही वाजायचं. शेखर आपल्या चित्रपट व्यवसायात एवढा गर्क होता की, तो बराचसा वेळ बाहेरच असायचा. केतकी त्या दिवशी सिनेमा सेटवरून हास्पीटलात तपासणी करिता शेखरच्या सोबत गेली होती. घरी परततांना मात्र विपरीतच घडलं. शेखरच्या कारला अपघात...
   ती चक्कर येवून शांत पडली होती. तिची सासूही बातमी ऐकून सावरू शकली नाही. शेखरच्या कारला अपघात झाला आणि त्यातच तो दगावला. बाळ जन्माला यायच्या अगोदरच बाप बाळाला पाहू शकला नव्हता. केतकी या दुःखसागरात पार डुबून गेली होती मात्र केतकी अपशकुनी नि पांढऱ्या पायाची असल्याने शेखर दगावला अशी सासूबाईची समजूत. सासूनं तिला अखेर घराबाहेर काढलं होतं. सासूला तिचा काहीही आधार वा उपयोग होणार नव्हता. कारण शेखरसोबतच्या अपघातात डोळ्यात काच जावून केतकीही कायमचीच आंधळी झाली होती आणि ‘शापीत’ नाटकातील तो काल्पनिक विदारक प्रसंग तिच्या जीवनात सत्यस्वरूपानं खरेच ओढवला होता...
   केतकी, आपल्या बाळाला कटेवर घेवून दृष्टिहीन... हाताने आधार शोधत रस्त्यावरून अनवानी... ती बाळाला बघुही शकत नव्हती. बाळ रडतो आहे... त्याचा दूधासाठी कर्कश आवाज... तिचं स्वतःवर ओढवलेल्या दुःखाला पाहून रडणं... तिचं कापरं भरवणारं रडणं... एकाएकी पाठांतर असलेलं ते शापीत नाटकातील अंगाई गीत ओठावर येते...
   ‘नशिबाच्या चक्रव्यूहातील मी शापित रमाई...
   रडू नकोस रे, तळमळते बाळा तुझी ही आई
   दूधासाठी तान्हुल्याला दे पदरात भीक माई
   नशिबाच्या चक्रव्यूहातील, मी शापित रमाई...’
   येणारे-जाणारे रत्यावरील लोकं तिच्याकडे बघायचे. तिच्या पदरात पडणारा भीकस्वरूपी पैशाचा पाऊस...
   खरेच!
   केतकी....
   ती नटसम्राज्ञी होती...


संजय येरणे 
9404121098

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू